• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाथ संप्रदायाचा बोधवंश

ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर अभंगबोध

Marmik Team by Marmik Team
September 29, 2026
in धर्म-कर्म, भाष्य, विशेष लेख
0
नाथ संप्रदायाचा बोधवंश

आदिनाथ उमाबीज प्रकटिलें । मछिंद्रा लाधली सहजस्थिती ॥ १ ॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥ २ ॥
वैराग्यें तपाला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ ३ ॥
निर्द्वंद्व निःशंक विचरतां मही । सुखानंद हृदयीं स्थिर जाला ॥ ४ ॥
विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख । देऊनि सम्यक अनन्यता ॥ ५ ॥
निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण । कूळ हें पावन कृष्णनामें ॥ ६ ॥
निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायातील अधिकारी संत होते. त्यांनी या अभंगातून त्यांची नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा विशद केलेली आहे. वारकरी संप्रदायाची मूळ प्रेरणा समजून घेण्याच्या दृष्टीने हा अभंग महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदायाचा उगम नाथ संप्रदायातून झालेला आहे. वारकरी संप्रदायातील काही वेदांती अभ्यासकांनी ज्ञानदेवांवर आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचाच प्रभाव होता अशी मांडणी केलेली आहे. काही अभ्यासकांनी ज्ञानदेवांवर रामानुजाचार्यांचा प्रभाव होता अशी, तर काही अभ्यासकांनी व्यासोक्त भागवत धर्माचा प्रभाव होता अशी मांडणी केलेली आहे. या सर्व अभ्यासकांनी त्यांच्यावरचा नाथ संप्रदायाचा प्रभाव दुर्लक्षित केलेला आहे. स्वतः ज्ञानदेवांनीच ज्ञानेश्वरीच्या अखेरीस त्यांची गुरुपरंपरा नाथ संप्रदायाची असल्याचं विस्तारपूर्वक नोंदवलं आहे. तरीही ज्ञानदेवादी भावंडांची नाथ संप्रदायाशी असलेली संलग्नता आजवर नीटपणे अभ्यासली गेली नाही.

प्रस्तुत अभंगातून निवृत्तीनाथ त्यांची बोधपरंपरा स्पष्ट करतात. नाथ संप्रदाय शिवोपासक आहे. त्यामुळेच या परंपरेची सुरुवात शिवापासून झाल्याचं निवृत्तीनाथ सांगतात. नाथ संप्रदाय हा योगप्रधान संप्रदाय आहे. योगाची अंतिम परिणती समाधीत होते. समाधी म्हणजे सहजस्थिती. या तत्त्वज्ञानाचा स्वीकार मच्छिंद्रनाथांनी केला. त्यातूनच त्यांना ‘सहजस्थिती’ प्राप्त झाली असं निवृत्तीनाथ सांगतात. मच्छिंद्रनाथांविषयी बरीच मतमतांतरे आढळतात. ते आधी कौलमतानुयायी होते असं त्यांच्या ग्रंथांवरून दिसतं. त्यांचा कौलज्ञाननिर्णय हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. कुल आणि अकुल यांच्या समरसीकरणाचा जो मार्ग तो कौलमार्ग होय. हे कौलमत बौद्ध तांत्रिक विचारांशी जवळीक साधणारे आहे असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. मुळात नाथ संप्रदाय ज्या सिद्धांमधून उदयाला आला ती सिद्धपरंपरा ही बौद्ध-जैनादी श्रमण विचारांच्या संस्कारातून पुढे आलेली आहे. साधारणपणे सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत ही परंपरा संपूर्ण भारतात पसरलेली होती. बहुतांश सिद्ध हे बहुजन जाती-जमातीतील होते. शबर, डोम, चर्मकार, विणकर, तेली, भिल्ल, धोबी, कुंभार अशा बहुजन जातींपासून ते ब्राह्मण-क्षत्रिय अशा उच्च मानल्या गेलेल्या जातीतही सिद्ध होते. या सर्व सिद्धांचा जातीभेद, वर्णश्रेष्ठत्व आणि वेदमाहात्म्याला प्रचंड विरोध होता असं त्यांच्या रचनांमधून दिसून येतं. ते स्त्री-पुरुष समतेचेही पुरस्कर्ते होते. सिद्धांविषयी डॉ. रा. चिं. ढेरे लिहितात – ‘या वेळी बौद्ध, जैन व हिंदू या तीनही परंपरा शिवाला सारख्याच उत्कटतेने मानू लागल्या होत्या. शिव हे या काळाचे साधारण उपास्य बनले होते. आणखी एक विशेष म्हणजे या काळात वेदविरोधी प्रवृत्तींचा प्रकर्ष होत गेला. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत बहरत राहिलेल्या तंत्रसाधनांनी वेदांविरुद्ध जोरदार उठवला. वैदिक परंपरेतील सामान्यतिसामान्य गोष्टींचाही त्यांनी प्रखर विरोध सुरू केला आणि प्रतिक्रियावश आध्यात्मिक साधनेत प्रतिकूल अशाही गोष्टींचे महिमान वाढविले. बाह्याचाराचा विरोध, चित्तशुद्धीवर जोर, शरीरालाच सकल साधनांचा आधार मानणे आणि समरसीभावाने स्व संवेदनानंद उपभोगणे ही साधनेची साधारण वैशिष्ट्ये या काळात सर्वत्र दृग्गोचर होतात. या सकल वैशिष्ट्यांनी युक्त आणि आपापल्या प्रणालीचे व्यवच्छेदकत्व असलेला सिद्धांचा मेळावा या काळात तयार झाला होता. वज्रयानी सिद्ध, सहजयानी सिद्ध, जैन सिद्ध, शाक्त सिद्ध, कापालिक सिद्ध, इत्यादि विविध सिद्धांचे समूह तयार होत होते. त्यात कौल सिद्धांसारख्या आणखीही अन्यान्य साधनांतील सिद्धांची भर पडत होती. या काळातील संस्कृतीला आध्यात्मिक दृष्ट्या सिद्धसंस्कृती म्हणावयास हरकत नाही.’

या सिद्ध परंपरेतूनच नाथ संप्रदायाचा उगम झाला. हे प्रवर्तन गोरखनाथांनी घडवून आणलं. प्रस्तुत अभंगात निवृत्तीनाथ मच्छिंद्रनाथांनी सहजस्थिती प्राप्त करून नंतर ती प्रेममुद्रा गोरखनाथांना दिली असं म्हटलेलं आहे. गोरक्षनाथांना ही परंपरा कशी प्राप्त झाली यासंदर्भातील एक ओवी ज्ञानेश्वरीत आली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात- ‘योगाब्जिनीसरोवरू। विषयविध्वंसकैविरू। तिये पदी का सर्वेश्वरू। अभिषेकिले॥’ याचा अर्थ असा की योगरूपी सरोवरातील कमळ आणि विषयाचा विध्वंस करणाऱ्या गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी समाधीपदावर अभिषिक्त केलं. इथे माऊलींनी गोरक्षनाथांना कमळाची उपमा दिलेली आहे. कमळाचं एक वैशिष्ट्य संतसाहित्यात सतत सांगितलं गेलं आहे. कमळ हे पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त असतं. ‘सत्यवादी करी संसार सकळ। अलिप्त कमळ जळी जैसे॥’ किंवा ‘मग मी व्यवहारी असेन वर्तत। जेवी जळाआत पद्मपत्र॥’ हे तुकोबारायांच्या दोन अभंगांतील चरण याच आशयाचे आहेत. गोरखनाथही सिद्ध परंपरेचा भाग असले तरी ते त्यापासून अलिप्त होते. त्या काळात सिद्ध परंपरेतील तांत्रिक साधना वामाचारी म्हणजेच विषयासक्त बनत चालल्या होत्या. त्यांच्यातील विषयाचा ध्वंस करून गोरखनाथांनी वीरता प्राप्त केली. अधोगत तांत्रिक साधनांचं शुद्धीकरण केलं. एका बाजूला त्यांनी सिद्धांमधील प्रेममुद्रा आणि योगमुद्रा स्वीकारली. योगाचं परमध्येय असलेली समाधी अवस्थाही प्राप्त केली. दुसऱ्या बाजूला विषयासक्त साधनांपासून अलिप्त राहून विषयांचा विध्वंस केला. त्यामुळेच माऊलींनी त्यांना सिद्ध सरोवरातील कमळाची उपमा दिलेली आहे. ‘आत्मशुद्धी हेच आत्मसाक्षात्काराचे महाद्वार आहे, असा शतकंठांनी घोष करणारा, अधोगत भारतीय साधनेचा उद्धारकर्ता, स्त्री-शूद्रांचा त्राता, लोकभाषांचा व हिन्दु-मुस्लिम ऐक्याचा प्रथम पुरस्कर्ता आणि भारतीय जनजीवनाला आत्मोन्नतीच्या वाटेवर खेचणारा समर्थ नेता म्हणून श्री गुरु गोरक्षनाथ आणि त्याचा नाथ संप्रदाय भारतीय साधनेच्या इतिहासात चिरंजीव झाला आहे’ अशा शब्दात गोरखनाथांच्या कार्याची महत्ता डॉ. रा. चिं. ढेरे यांनी नोंदवली आहे.

निवृत्तीनाथ प्रस्तुत अभंगात सांगतात की त्यांची गुरुपरंपरा गोरखनाथांनंतर गहिनीनाथांकडे आली. गोरखनाथांनी गहिनीनाथांवर पूर्ण कृपा केली. त्यांच्या बोधाने आणि कृपेने गहिनीनाथ एका उच्चतम अवस्थेला पोचले. गोरखनाथ हे कठोर वैराग्यमूर्ती होते. त्यांचं वैराग्य तुकोबारायांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘विवेकासहित वैराग्याचे बळ । धगधगीत ज्वाळ अग्नीमाजी॥’ असं होतं. त्यांच्या धगधगीत वैराग्याला विवेकाची जोड होती. तेच त्यांनी गहिनीनाथांच्या ठिकाणीही रुजवले. वैराग्यरूप अग्नीने ते तप्त झाले आणि प्रेमरूप भक्तीसुखाने ते निवले. गोरखनाथांकडून त्यांना शांतीसुखाचा ठेवा लाभला. वैराग्य, विवेक, प्रेमभक्ती आणि शांती अशा मूल्यांची शिकवण गहिनीनाथांना नाथ संप्रदायातून मिळाली. त्यांच्या अंगी निर्द्वंद्वता आणि निशंकता आली. निर्द्वंद्व म्हणजे द्वंद्वरहित अवस्था. द्वंद्व म्हणजे द्विधावस्था. गोरखनाथांनी दिलेल्या बोधामुळे गहिनीनाथांची द्विधा स्थिती संपली. तत्त्वज्ञानाच्या बाबतीत ते निशंक झाले. ‘निर्द्वंद्व निःशंक विचारता मही।’ असे शब्द निवृत्तीनाथांनी या अभंगात वापरले आहेत. यातील विचरण म्हणजे भ्रमण आणि महि म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांना ही निर्द्वंद्वता आणि निःशंकता प्राप्त झाली असं निवृत्तीनाथ म्हणतात. इथे ‘पृथ्वीवर भ्रमण’ म्हणजे ‘इहलोकीच्या व्यवहारात असणे’ असा अर्थ घ्यावा लागतो. गहिनीनाथांनी त्या बोधाने स्वतःच्या हृदयात आनंदाचा आणि सुखाचा स्थिर अनुभव घेतला. मानवी जीवनात सुखदुःख येतच राहतात. पण ही भौतिक सुखदुःखे नाशवंत असतात. कधी सुख तर कधी दुःख अशी उलटापालट चाललेली असते. त्यांचा मनावर विपरीत परिणाम होऊ न देता स्थितप्रज्ञ राहण्याची शिकवण नाथ संप्रदायाने दिलेली आहे. त्यामुळे तो बोध ग्रहण केल्यानंतर उच्च दर्जाचा आध्यात्मिक-मानसिक आनंद मिळतो आणि सुखाची अनुभूती प्राप्त होते. ते सुख मात्र शाश्वत आणि स्थिर आहे. त्याला स्थळकाळाची आणि परिस्थितीची बाधा नाही. तो नित्य-निरामय आनंद स्थलकाल आणि परिस्थिती निरपेक्ष आहे.

निवृत्तीनाथ सांगतात, गहिनीनाथांनी विरक्त स्थिती प्राप्त केली. ते नाथ संप्रदायाच्या ‘अन्वयाचे मुख’ बनले असं निवृत्तीनाथ सांगतात. अन्वय हा शब्द वंशसातत्याचा क्रम या अर्थाने आलेला आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत आपण ‘महेशान्वयसंभूते’ असल्याचं सांगितलं आहे. याचा अर्थ महेशाच्या म्हणजेच शिवाच्या बोधवंशातील असा होता. अन्वय हा शब्द संतसाहित्यात काहीवेळा ‘वंश-कुळातील क्रम’ या अर्थाने आलेला आहे. ‘शोधूनि अन्वय वंश वंशावळी।’ असं तुकोबारायांनीही म्हटलं आहे. प्रस्तुत अभंगातही निवृत्तीनाथांनी कूळ हा शब्द पुढच्या चरणात वापरला आहेच. त्यामुळे गहिनीनाथांच्या रूपाने नाथ संप्रदायाच्या या बोधवंशाला मुख म्हणजे चेहरा मिळाला असं निवृत्तीनाथ म्हणतात. गहिनीनाथांकडे सम्यकता आणि अनन्यता होती. सम्यकता म्हणजे सारासार विचार करण्याची भूमिका. त्यालाच विवेक असंही म्हणता येईल. त्यामुळेच त्यांनी शिवोपासक नाथ संप्रदायात असूनही कृष्णभक्तीची शिकवण दिली. योगप्रधान असूनही नामभक्तीचा महिमा सांगितला. कृष्णभक्तीचा स्वीकार करण्याची सम्यकता आणि नाथ संप्रदायावरची अनन्य निष्ठा अशा दोन्ही गोष्टी गहिनीनाथांकडे होत्या.
निवृत्तीनाथ अभंगाच्या अखेरच्या चरणात म्हणतात की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांवर पूर्ण कृपा केली. मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ असा नाथ संप्रदायाचा बोधवंश आहे. त्या वंशाला कृष्णनामाची जोड देण्याचं ऐतिहासिक कार्य गहिनीनाथांनी केलं. भारतीय धार्मिक परंपरेत शैव-वैष्णव संघर्षाचे अनेक तपशील सापडतात. ही तेढ कमी करण्यात गहिनीनाथांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचं आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करण्याची आज्ञा निवृत्तीनाथांना दिली. तोवरच्या काळात गुरूची शरणागती पत्करलेल्या शिष्यांपुरताच उपदेश केला जात होता. गहिनीनाथांनी मात्र केवळ शरणागत शिष्यांनाच उपदेश न करता समदृष्टीने सर्व जनतेला उपदेश करण्याची भूमिका घेतली. त्याला अनुसरून निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाच्या अद्वय (अद्वैत नव्हे) तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी गीतेची निवड केली. गीतेचा अर्थ सांगण्याचं निमित्त करून नाथ संप्रदायाचं अद्वय तत्त्वज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना विशद केलं. गीताग्रंथ हे केवळ त्यासाठीचं निमित्त होतं.
स्वतः ज्ञानदेवांनीच याची स्पष्टता ज्ञानेश्वरीत दिलेली आहे. ज्ञानदेव म्हणतात

मग तिही ते शांभव। अद्वयानंदवैभव। संपादिले सप्रभाव। श्री गैणीनाथी॥
अर्थ- अद्वयानंदाचं वैभव गोरखनाथांकडून गहिनीनाथांनी संपादन केलं.
तेणे कलिकाळु भूता। आला देखोनि निरुता। आज्ञा श्री निवृत्तीनाथा। दिन्हली असे॥
अर्थ- कलीप्रभावाने ग्रासलेले लोक पाहून या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा दिली.
अनादिगुरु शंकरा। लागोनि शिष्यपरंपरा। बोधाचा हा सवंसारा। जाला जो आमुते॥
तो हा घेऊनि आघवा। कळी गिळितेया जीवा। सर्व प्रकारी धावा। करी पा वेगी॥
अर्थ- भगवान शंकरापासून हा बोधाचा जो प्रवाह आहे तो घेऊन तो बोध सर्वसामान्य लोकांपर्यंत वेगाने पोचवा.
अद्वयानंदाचं तत्त्वज्ञान वेगाने लोकांपर्यंत पोचवण्याची आज्ञा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना केली. त्याला अनुसरून निवृत्तीनाथांनी गीतेचा अर्थ ज्ञानदेवांना सांगितला आणि ज्ञानदेवांनी तो ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषेत आम जनतेत पोचवला.
मग आर्ताचेनि वोरसे। गीतार्थग्रंथनमिसे। वरिखिला शांतरसे। तो हा ग्रंथु॥
त्यामुळेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ही नाथ संप्रदायाची देणगी आहे. ‘नाथ संप्रदायाची थोरी। प्रकट केली ज्ञानेश्वरी॥’ असं निळोबाराय सांगतात त्यामागची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ‘अद्वयानंद, अष्टांगयोग, दलितोद्धाराची प्रेरणा आणि लोकभाषेची तरफदारी’ ही मूल्ये नाथ संप्रदायातूनच ज्ञानेश्वरीत आलेली आहेत असं गं. बा. सरदार म्हणतात, ते यथार्थ आहे.

Previous Post

वानखेडे स्टेडियमवर अन्याय का?

Next Post

हा मुळात आहे का समान नागरी कायदा?

Next Post
हा मुळात आहे का समान नागरी कायदा?

हा मुळात आहे का समान नागरी कायदा?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.