
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महत्त्वाचे सामने व्हायला हवेत. कसोटी क्रिकेटसाठी मैदान निवडताना धोरणापायी वानखेडेसह पाच कायमस्वरूपी कसोटी केंद्रांवर अन्याय होतोय. मुंबईच्या हद्दीतील स्टेडियमचं यजमानपद संघटनेकडेच असायला हवं; पण तसं होताना दिसत नाही. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रुबाब असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेची हीच खंत ‘बीसीसीआय’च्या बैठकीत मांडण्यात आली.
‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अन्याय होतोय. होय, हे खरं आहे. चालू क्रिकेट हंगामात जिथे ऑस्ट्रेलियासारखा दिग्गज संघ गावस्कर-बोर्डर मालिकेसाठी भारतात येतोय. तिथे कायमस्वरूपी कसोटी केंद्राचा दर्जा असलेल्या वानखेडेकडे दुर्लक्ष करण्यात आलंय आणि वाट्याला आलाय दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्धचा एकमेव एकदिवसीय सामना. १८ सप्टेंबरला मुंबईत झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत मुंबई क्रिकेट संघटनेला महत्त्वाचे सामने देण्यात यावेत, ही मागणी संघटनेचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर यांनी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. इथे नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, रांची आणि अहमदाबाद या शहरांना कसोटी सामने मिळालेत; पण मुंबईला नाही? हा सवाल आहे. तसंच मुंबई क्रिकेट संघटनेच्या हद्दीतल्या ब्रेबोर्न स्टेडियम आणि डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमला परस्पर सामने दिले जातात. ते संघटनेमार्फत म्हणजेच त्यांच्या यजमानपदाखाली दिले जावेत, ही मागणीसुद्धा आहे.
वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ नोव्हेंबर २०२४मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला तो न्यूझीलंडविरुद्ध. एजाज पटेलच्या फिरकी गोलंदाजीपुढे हाराकिरी पत्करल्यामुळे भारतानं तो सामना गमावला. पण त्यानंतर वानखेडेची कसोटी सामन्याची प्रतीक्षा संपलेली नाही, हीच खंत मुंबई क्रिकेटला सतावतेय. गेल्या काही वर्षांत क्रिकेट नकाशा बदललाय. अहमदाबादचं नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला प्रत्येक कार्यक्रमपत्रिकेत महत्त्वाचं स्थान देणं हे अपरिहार्य असतं. मग सचिव देवाजित सैकिया हे त्यांच्या पदाचा वापर करून गुवाहाटीची वर्णी लावतात. सैकिया यांच्या पदामुळेच ‘आयपीएल’ची गंगा आसामपर्यंत पोहोचली, तसंच कसोटी सामन्यांची खिरापतसुद्धा त्यांना मिळाली. याच बर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर मागील वर्षी भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेकडून सपाटून मार खाल्ला होता. हा दुसरा कसोटी सामना गमावल्यामुळे भारतानं आफ्रिकेविरुद्धची मालिका ०-२ अशा फरकानं गमावली होती.
सूर्यास्त लवकर होतो, ही अतिपूर्वेच्या राज्यांची समस्या. त्यामुळे खेळ लवकर म्हणजे सकाळी ९ वाजता सुरू केला जातो आणि लवकर संपवला जातो. परिणामी चहापानाची विश्रांती ही उपहाराच्या विश्रांतीच्या आधी होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात उपहार आधी आणि मग चहापान हा नियम मोडण्याचा पराक्रमही गुवाहाटीचाच. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ घातलीय, ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रदीर्घ मालिकेत. ह्या मालिकेत ही घटना दोनदा होईल. कारण जी समस्या गुवाहाटीची, तीच रांचीची. हिवाळ्यात दिवसाचा उजेड (सूर्यप्रकाश) रांचीमध्ये पुरेसा वाट्याला येत नाही. त्यामुळेच कसोटीच्या पूर्ण दिवसांचा ९० षटकांचा खेळ होणं हे तिथे अवघड मानलं जातं. त्यामुळेच किमान रांचीचा सामना अन्यत्र हलवण्याची चिन्हं दिसतायत. यासंदर्भात अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसला तरी विशाखापट्टणम्, हैदराबाद आणि राजकोट ह्या तीन शहरांच्या राज्य संघटनांनी दावेदारी मजबूत केलीय. म्हणूनच मुंबईनंही या दर्जेदार सामन्याच्या दृष्टीनं यजमानपदाची तयारी दर्शवलीय. भारतीय संघ मायदेशातील पहिला कसोटी सामना मुंबईच्या बॉम्बे जिमखाना मैदानावर १५ ते १८, डिसेंबर १९३३ या कालावधीत खेळला होता. येत्या सात वर्षांत त्या ऐतिहासिक घटनेची शतकपूर्ती होईल. पण, सध्या त्याच मुंबईला कसोटी मागावी लागतेय, हीच शोकांतिका आहे.
भारतात ईडन गार्डन्स (कोलकाता), वानखेडे स्टेडियम (मुंबई), एमए चिदम्बरम स्टेडियम (चेन्नई), एम चिन्नास्वामी स्टेडियम (बेंगळुरू) आणि अरुण जेटली स्टेडियम (नवी दिल्ली) ही पाच कायमस्वरूपी कसोटी केंद्रं मानली जातात. वैविध्याची परंपरा असलेल्या भारतात सुमारे ३१ मैदानांवर कसोटी सामने झाले आहेत. याचं एक कारण ‘बीसीसीआय’चं सर्वसमावेशक धोरण, दुसरं म्हणजे पदाधिकाऱ्यांचे निर्देश आणि तिसरं म्हणजे राजकारण. २०१९मध्ये रांचीत झालेल्या कसोटी सामन्याकडे क्रिकेटरसिकांनी पाठ फिरवली होती. त्यावेळी तत्कालीन कर्णधार विराट कोहलीनं पाच कायमस्वरूपी कसोटी केंद्रांवरच कसोटी सामने खेळवावेत, असं आवाहन ‘बीसीसीआय’कडे केलं होतं. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तीन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम्, पुणे आणि रांची येथे झाले होते. तेव्हा कोहली म्हणाला होता की, “ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी कोणत्याही स्टेडियमवर खेळणं ठीक आहे; पण कसोटी क्रिकेटमध्ये भारतात येणाऱ्या संघांना हे माहीत असायला पाहिजे की आम्ही या पाच केंद्रांवर खेळणार आहोत. अमुक प्रकारच्या खेळपट्ट्या आम्हाला मिळतील, अमुक प्रकारचे प्रेक्षक सामना बघायला येतील.
ह्या पाच केंद्रांचा कसोटी इतिहास भारतीय क्रिकेटच्या संस्कृतीचं वैभव दर्शवणारा आहे. मागील १० वर्षांत वानखेडे स्टेडियमवर जेमतेम दोन कसोटी सामने झाले. दोन्ही सामने न्यूझीलंडविरुद्धचे. दोन्ही सामन्यांत पराक्रम फिरकीपटू एजाझ पटेलचा. २०२१मध्ये तर त्यानं चक्क १० बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी साधलेली. गेल्या १० वर्षांचा आढावा घेतल्यास चिन्नास्वामीला ४, तर चेपॉक, ईडन गार्डन्स आणि अरुण जेटली स्टेडियमवर प्रत्येकी तीन कसोटी सामने झालेत. या पाच केंद्रांपैकी दिल्लीचं स्थान धोक्यात असू शकतं. कारण तेथील प्रदूषण. मागील दशकात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याला त्याचा फटका बसला होता.
वानखेडे स्टेडियमचं तसं नाही. येथील कसोटी क्रिकेटच्या संस्कृतीनं पन्नाशी ओलांडलीय. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यानंच जानेवारी १९७५मध्ये वानखेडेच्या कसोटी पर्वाला प्रारंभ झाला होता. त्या सामन्यात एकनाथ सोलकरनं शतक झळकावलं होतं. पण कॅरेबियन कर्णधार क्लाइव्ह लॉइडच्या नाबाद २४२ धावांच्या खेळीच्या बळावर विंडीजनं तो सामना जिंकला होता. या मैदानावर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, संजय मांजरेकर, अजित वाडेकर, पॉली उम्रिगर, प्रवीण अमरे, अजित आगरकर, झहीर खान, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, पद्माकर शिवलकर, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव इत्यादी अनेक नामांकित क्रिकेटपटूंनी मुंबईची परंपरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जपलीय. रणजी आणि कसोटी हे दीर्घकालीन सामने पाहायला मुंबईचे दर्दी चाहते आवर्जून वानखेडेवर हजेरी लावतात. १९८४-८५च्या रणजी हंगामात रवी शास्त्रीनं बडोद्याविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले होते. अगदी सचिनचं रणजीतलं पहिलं शतकही येथेच साकारलेलं. २०१३मध्ये सचिनच्या कारकीर्दीतील अखेरचा आणि २००वा कसोटी सामना वानखेडेवरच झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या सामन्यात सचिन ७४ धावांची खेळी साकारून माघारी परतला, तेव्हा चाहत्यांनी त्याला उभं राहून अभिवादन केलं. तो सामना भारतानं एक डाव आणि १२६ धावांनी सहज जिंकला. त्या भावनिक सामन्याच्या आठवणी अजूनही सर्वांच्या मनात ताज्या आहेत. ‘सचिन… सचिन…’ ह्या आरोळीनं किमान दोन अडीच दशकं येथे राज्य केलं. २०१२मध्ये इंग्लंडनं भारतावर मिळवलेला कसोटी विजय, हा जिव्हारी लागणारा. त्या सामन्यात इंग्लंडकडून २०पैकी १९ बळी हे फिरकी गोलंदाजांनी मिळवले होते. यापैकी मॉन्टी पानेसारनं ११ बळी मिळवत इंग्लंडच्या यशात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याचा वचपा भारतीय संघानं २०१६मध्ये काढला. यावेळी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं एकूण १२ बळी मिळवले. संघनायक विराट कोहलीनं द्विशतकी (२३५) खेळी साकारत भारताला ६३१ धावांचा डोंगर उभारून दिला होता.
भारतीय संघ वानखेडेवर एकूण २७ कसोटी सामने खेळलाय. यापैकी १२ सामने जिंकलेत आणि ८ सामने गमावलेत, तर ७ सामने अनिर्णित राखलेत. हा वैभवशाली इतिहास असल्यानंच कसोटी सामना वानखेडेवर हवाय. याशिवाय मुंबईतील अन्य स्टेडियमवरील सामन्यांचं यजमानपदही हवंय. वानखेडेपासून काही अंतरावर असलेल्या ब्रेबॉर्न स्टेडियमला जानेवारी-फेब्रुवारीत होणारी महिला प्रीमियर लीग बहाल करण्यात आली. त्याचं यजमानपद क्रिकेट क्लब ऑफ इंडिया हा क्लब भूषवणार आहे. ती संपल्यावर पहिल्यावहिल्या महिला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं यजमानपदही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं त्यांना दिलंय; पण मुंबई क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून नव्हे, तर परस्पर. मुंबईच्या नकाशावरील स्टेडियमचा अंकुश त्या क्रिकेट संघटनेकडे का नाही? हेच मुंबई क्रिकेट संघटनेचं आणखी एक शल्य आहे.
[email protected]

