
‘जिया जले जाँ जले, नैनो तले…’ काही गाणं वाजतंय. कुठं? अर्ध्यानं डोळे किलकिले केले. अंगावरचं पांघरूण जरा बाजूला करत अर्ध्या उठला.
“उठला का? त्या खिडक्या उघड. त्ये दिवे विझिव. पार डोक्यावर ऊन येईपर्यंत पडून राहतो. अश्यानं काही खरं व्हायचंय का?” म्हातारीनं कुटकूट केली. दोनचार भांडी घेऊन ती बाहेर गेली. अर्ध्याला हे रोजचं झालेलं. म्हणजे रात्री उशिरा या आणि सकाळी थोडं उठायला उशीर झाला तर शिव्या खा, हे ठरलेलं, सालं! कुणाला कदरच नाही! अर्ध्यानं वाकून अंथरूण-पांघरून गोळा केलं.
ब्रश घेतला, पेस्ट घेतली. आडवेतिडवे दात घासले. चूळ भरली.
“लौकर आवर! घुळघुळ करू नको!” म्हातारी आली वाटतं घरात.
“जायचं कुठंय?” अर्ध्यानं विचारलंच! काय एखादाच दिवस असतो सुट्टीचा! त्याच्यात घाई कश्याला?
“दिवे लावायला!” म्हातारीनं दोन शब्दात आदेश दिला.
दिवे लावायला? अर्ध्याला प्रश्न पडला. त्यानं कॅलेंडर उचकलं. आज इथं काहीच दिसंना! त्यात भाद्रपद महिना! मग नेमकं दिवे लावायला औचित्य काय? अर्ध्या विचारात पडला. पण असो! म्हणत त्यानं अंघोळ उरकली. कपडे घातले.
“भाजी वर ठेवेले! दोनचार भाकरी चुर! ताट घासून लवकर बाजारात जाय!” म्हातारी पुन्हा घरात डोकावली.
काय वेगळी माहिती मिळाली? रोज तर भाजी तिथंच ठेवते ना ही? अर्ध्या स्वतःलाच विचारू लागला. पण आज कुठे पाठवायचा विचार आहे? हे काही त्याला अजून कळेना! तो आरश्यासमोर उभा झाला. केस विंचरले. चेहरा न्याहाळू लागला.
“हा लै देखणा दिवा आहे, माहित्ये! आवर लवकर जरा! उठतो पासल्या पहारा अन्…” म्हातारीचा पुन्हा तोंडाचा पट्टा सुटला. आली वाटतं घरात. त्यानं वळून बघितलं.
“नेमकं करायचं काय आहे आज? कव्हाची भुणभुण लावली माझ्या मागं? नीट सांगशील तर कळंल ना?” आता अर्ध्यानं ठ्यह्यरून विचारलं.
“काही नाही. बाजारातून दिवा आण आणि संध्याकाळचा मंदिरापुढं पेटवून ये! व्हय!” म्हातारीनं एवढंच बोलली.
“दिवाच पेटवायचा आहे ना? मग मागल्या दिवाळीच्या पणत्या उरेल असतील. द्यायचं कुणाला पाठवून!” अर्ध्यानं टाळाटाळ करायचा प्रयत्न चालवला.
“लग्न तुझं करायचंय! नोकरी तुला पाहिजे. दुसऱ्याला पाठवून काय करायचं?” म्हातारी आता पदर खोचून उभी राहिली. आता काही खरं नाही अर्ध्या!
“नाही, जातो ना! पण दुपारून पणती घेतो अन् तसंच जातो पुढं. पण भाद्रपदात अशे दिवे लावलेले चालत्या का? असं मधीच काय काढलं?” अर्ध्यानं धाकानं होकार दिला, पण त्याला हे दिवेलागणीचं कारण शोधायचंय…
“हे काल बामनाकडं गेल्थे, तो म्हणी पाच गुरुवार दिवे लावा. दिवाळीपर्यंत चांगली नोकरी आणि स्थळ चालून येईल.” म्हातारीनं पदरानं स्वतःचं तोंड नीट पुसलं.
“हे पहिले सांगितलं असतं तर आतापर्यंत दर गुरुवारी दिवाळी साजरी केली असती. फुकट दिवस वाया घालवले?” अर्ध्या टोचून बोलला.
“आवर! तुझ्या पैश्यानं एक पणती घे! पाण्यात थोडी भिजव. मग सुकवून रातच्याला दिवा पेटव. त्याला तेल-बिल तूच आण. वात बी तुलाच वळावा लागंल!” म्हातारीनं सांगितलं तसं अर्ध्यानं मुंडकं हलवलं. दुसरा पर्याय काय आहे त्याच्याकडं?
‘दिया तेरी चाहत का ना मैंने बुझने दिया…’ पुन्हा काही ओळी अर्ध्याच्या कानावर आल्या. च्यामारी, आज सगळीकडं दिवेच चालुय का? त्याचं डोकं भणभणलं. बाहेरला आवाज ऐकायलाच नको म्हणून त्यानं टीव्ही चालू केला. तर पहिलीच बातमी आज दीपोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाची! त्यानं झटकन टीव्ही बंद केला. दोन घास खाल्ले. ताट धुवून आदेशानुसार परत ठेवलं आणि बाहेर पडला. एक पिशवी घेऊन.
“काय अर्ध्या, आज पिशवी?” नम्यानं रस्त्यातच टोकलं.
“हा हे म्हातारीनं सांगितलं…” अर्ध्यानं काही बोलायचा प्रयत्न केला.
“हा का वशाट आणायला चालला?” नम्या गप्प बसंल का?
“काही काय? म्हातारीनं दिवे आणायला लावलेय. त्याच्यासाठी चाललोय.” अर्ध्या काहीसा रागात बोलला.
“काय करवा चौथ साजरी करतो का काय?” नम्यानं पुन्हा चिडवलं.
“हा ये तुला ववाळतो!” अर्ध्या चिडून नम्याच्या मागे पळाला. तसा नम्या जोरात लांब पळून गेला. अर्ध्या चरडतफरडत गप पहात राहिला.
“येताना एक चाळणी, सॉरी… छलनी आण. बरं का?” नम्या दुरून मोठ्यानं चिडवत राहिला. आता याच्या नादी लागावा का निघून जावा? अर्ध्याला प्रश्न पडला. शेवट अर्ध्या निघाला, थेट बाजाराच्या दिशेनं.
“वो अजून कुठं दिवाळी चालू झाली? नीट नीट भाव सांगा जरा!” ती पोर कुंभाराशी डोकं लावू राहिली. अख्ख्या बाजारात इथंच पणत्या दिसू राहिल्या. म्हणून अर्ध्या तिथं थबकला.
“जा ना मागून! जागा आहे ना?” त्या पोरीनं एकाएकी अर्ध्यावर तोफ डागली.
“नाही, मला पणती घ्यायचीय एक!” अर्ध्यानं शांततेनं उत्तर दिलं.
“बाई, तुला घ्यायचं ते घे! पण माझं गिऱ्हाईक का हाकलते?” आता कुंभार विचारू लागला.
“सॉरी मला हे वाटलं… सॉरी म्हणजे…” ती पोर गडबडली. तिला काय बोलावं हे उमजेना. आणि अर्ध्याला सॉरी म्हंटल्यावर त्याला उत्तर म्हणून काय बोलावं हे सुचेना.
“एक पणती द्या!” अर्ध्यानं डायरेक कुंभाराशी बोलणं चालू केलं. त्यानं काही प्रकार लागलीच अर्ध्यापुढं ठेवले.
“पण तुम्ही फार महाग सांगताय, कमी करा ना!” ती पोर घासाघीस करतेच आहे. अर्ध्यानं एक पणती उचलली. आणि शंभरची नोट कुंभाराला देऊन तो माघारी फिरला.
“अय भौ! जास्त दिले ना तू पैसे!” कुंभार शंभरची नोट बघून पाठमोऱ्या अर्ध्याकडं बघून ओरडला.
“उरले तर त्यातून तिला पणत्या द्या!” अर्ध्यानं एकदाच मागं बघितलं आणि गेला ते थेट इतर पूजासाहित्य विकणाऱ्या दुकानापुढं. थोडा कापूस घेतला त्यानं तिथून. आणि निघणार तर मागून आवाज आला.
“ए हॅलो! मी भिकारी वाटले का तुला? तिला पणत्या द्या म्हणतो ते?” ती पोरगी उजरायला आली.
“मला पैसे कुंभाराला द्यायचे होते. मी दिले! पूर्वीसारखं कुणी हे काम करत नाही. फार थोडेजण हे काम करतात. बुरुड झालं किंवा हे. मला वाटलं की मी देत जातो पैसे. आणि त्यांच्या समाधानासाठी मी काही बोललो. तुला म्हणून मी काही बोललो नाही. तरी चुकलो असेल तर सॉरी!” अर्ध्यानं भर बाजारात कान पकडले. त्यानं ती पोरच खजील झाली.
अर्ध्या तिथून मागं न बघता किराण्याच्या दुकानात गेला. दिव्यासाठी किती तेल घ्यावा, त्याला प्रश्न पडला. त्यात सुट्टे तेल बंदचा बोर्ड लागलेला. मुंढे इफेक्ट इकडंही झाला म्हणायचा.
“काय पाहिजे?” दुकानदारानं विचारलं.
“तेल पाऊच पाहिजे. लहान मिळेल का?” अर्ध्यानं विचारलं.
“पावशेर आहे, अर्धाचं आहे आणि एक…” दुकानदार सांगायला लागला.
“पावशेर द्या!” अर्ध्यानं खरेदी केली आणि घरी आला. आता वाट संध्याकाळची!
अखेर साडेसहा-सातच्या दरम्यान अर्ध्या पिशवी घेऊन मंदिराकडं निघाला. बाहेर बरेच दिवे आज काहींनी लावलेले दिसले. अर्ध्यानं नीट वात वळली आणि एक चांगली जागा शोधून तिकडे गेला.
“ही जागा मी साफ केलीय…” ही दुपारचीच पोरगी! अर्ध्यानं वर मान केली! आता?
“सॉरी! मी बघितलं नाही! म्हणजे आताच आलोय…” अर्ध्या अडखळला. मागे सरकला.
“नाही. होईल दोन पणत्यासाठी जागा.” तिनं समजुतीनं घेतलं. अर्ध्या गप राहिला. तिनं पणती ठेवली. अर्ध्याची पण पणती ठेवली. बाजूनं दोन बोटं रांगोळी रेखली. छान वात वळली! पणतीत ठेवली.
“अय पळ! हाकला रे यांना! दिव्यातलं तेल चोरत्या हे!” एक माणसानं दिव्यातलं तेल बाटलीत ओतून घेणाऱ्या पोराच्या हाताला हिसडा दिला. तसं बाटलीतलं तेल सांडलं. त्या माणसानं तशी एक चापट त्या पोराच्या कानशिलात लावून दिली. तसं पोर रडायला लागलं आणि मंदिराबाहेर पळालं. त्यासरशी अर्ध्या पोरामागं पळाला. हातात पिशवी तशीच आहे. पणती फक्त मधी काढली तेवढीच!
“अय नको रडू! पण तेल का घेतो तू?” अर्ध्या बाहेरून भिंती जवळ उभ्या त्या रडणाऱ्या पोराला विचारायला लागला.
“आय म्हणली बापश्याला! फोडणीला तेल नाही. आण म्हणून! त्यानं आयला हाणलं. रातची भाजी पाण्यात उकडायला टाकली आयनं. मला आवडत नाही, बिनतेलाची! म्हणून थोडंसं तेल घ्यायला आलो…” ते पोरगं फाटक्या अवतारात फुंदके देत बोललं. अर्ध्या काही क्षण थिजला. पण पुढल्या मिनिटाला त्यानं पिशवीतून पावशेर तेलाचं पाऊच काढलं आणि त्या पोराच्या हातात दिलं. ते पोरगं एकदम फुललं आणि उड्या हाणत थ्यांकू म्हणून निघून गेलं.
“छान केलं!” ती पोरगी अर्ध्याच्या मागून पुटपुटली. “आता लावू या दिवा?”
“काही गरज नाही.” अर्ध्या रिकामी पिशवी खिश्यात कोंबत बोलला…

