ब्रह्मज्ञान दारी येते काकुलती।
अव्हेरले संती विष्णुदासी ।।१ ।।
रिघो पाहे माजी बळे त्याचे घर।
दवडिती दूर म्हणोनिया ।।२ ।।
तुका म्हणे येथे न चले सायास।
पडिले उदास त्याच्या गळा ।।३ ।।
प्रस्तुत अभंगात तुकोबारायांनी ब्रह्मज्ञान नाकारण्याचा प्रसंग उभा केलेला आहे. ब्रह्मज्ञान संतांच्या दारात काकुळतीला येतं पण संत त्याचा अव्हेर करतात. ते संतांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतं म्हणून संत त्याला दूर नेऊन सोडतात. इथे तुकोबाराय संतांचा महिमा सांगण्यासाठी ब्रह्मज्ञानाचं एक शब्दचित्र उभं करत आहेत. मुळात वैदिक परंपरेत ब्रह्मज्ञान हे अत्यंत दुर्लभ आणि अप्राप्य मानलं जातं. ब्रह्मज्ञान प्राप्त करणारा ब्रह्मज्ञानी सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे. तरीही वारकरी संत मात्र ब्रह्मज्ञान नाकारतात त्याची कारणे आपण समजून घेतली पाहिजेत.
ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता कठीण साधना कराव्या लागतात. ब्रह्मज्ञान सहजासहजी मिळत नाही. ‘ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी। तरी का हिंपुटी वेदशास्त्रे ।।’ असा सवाल तुकोबाराय विचारतात. ब्रह्मज्ञान जर सहजासहजी कळत असतं तर वेदशास्त्रं दुःखी का झाली असती, असं तुकोबाराय म्हणतात. याचा अर्थ वेदशास्त्रांनाही नीटपणे ब्रह्मज्ञान झालेलं नाही. ब्रह्मज्ञान शिकण्याची पात्रता मिळवण्यासाठी शास्त्राचा अभ्यास, तपश्चर्या, तीर्थाटन, जप, ग्रंथ अध्ययन, पृथ्वी भ्रमण अशा अनेक साधना कराव्या लागतात. त्यासंदर्भात तुकोबारायांचा एक अभंग आहे.
ब्रह्मज्ञान जरी मिळे उठाउठी।
तरी का हिंपुटी वेदशास्त्रे ।।१ ।।
शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन।
उर्वीचे भ्रमण याजसाठी ।।२ ।।
याजसाठी जप याजसाठी तप।
व्यासे हे अमूप ग्रंथ केले ।।३ ।।
आता ब्रह्मज्ञानाकरता ज्या ज्या साधना सांगितल्या आहेत त्या सर्व कठीण आहेत. शास्त्राभ्यास करायचा तर त्यात सगळा मतमतांतराचा गलबला आहे. वादविवाद आहेत. त्यामुळे शास्त्राभ्यास आणि त्यातून मतैक्य सहजासहजी घडत नाही. सगळं काही कन्फ्यूजन तयार होतं आणि ‘सोल्युशन कुछ पता नही’ अशी अवस्था होते. तप करावं तर त्यातही कठीणता आहेच. शिवाय तपामुळे कामक्रोधावर नियंत्रण राहत नाही. ‘करिता तपे कामक्रोध खवळती।’ असं निळोबाराय म्हणतात. जे तपाच्या बाबतीत तेच जपाच्या बाबतीतही आहे. जप करताना मंत्रात चूक चालत नाही. ‘जपता मंत्रबीज चळचि घाली घाला।’ असं निळोबारायांनी सांगितलं आहे. जप-तपाचा हा मार्ग स्वाभाविकच कठीण आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ अध्ययनाचंही आहे. ब्रह्मज्ञानासाठी व्यासांनी अमूप ग्रंथ केल्याचं तुकोबाराय सांगतात. एवढे ग्रंथ जर वाचायचे तर आयुष्यही पुरणार नाही आणि त्याचा अर्थ कळणं तर लांबची गोष्ट. ‘पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती। नाही ऐशी मती अर्थ कळे।।’ ही तुकोबारायांची भावना आहे. थोडक्यात ब्रह्मज्ञान मिळवण्याची पात्रता कमावण्यासाठी आवश्यक असणार्या साधनाही अत्यंत कठीण आणि काहीवेळा अशक्य आहेत. त्यामुळेच तुकोबारायांनी ब्रह्मज्ञान नाकारलं आहे.
त्याचबरोबर या साधनांचा अधिकार शूद्रातिशूद्रांना आणि स्त्रियांना नाही, हेही ब्रह्मज्ञान नाकारण्याचं आणखी एक कारण आहे. तपाचं उदाहरण घ्या. तपाचा अधिकार शूद्रातिशूद्रांना नाही. रामायणाच्या उत्तरार्धात शंबुकाची एक कथा आली आहे. शंबुक नावाचा शूद्र वर्णातील एक व्यक्ती तपश्चर्या करत होता. शूद्राला तपाचा अधिकार नाही म्हणून त्याची हत्या करण्यात आली. काही अभ्यासक ही कथा मूळ रामायणात नसल्याचं सांगतात. मागाहून कोणीतरी वर्णाभिमानी मानसिकतेच्या लोकांनी ही कथा रामायणात प्रक्षिप्त केली असा या अभ्यासकांचा दावा आहे. वास्तविक पाहता ही कथा मूळ रामायणात असो वा प्रक्षिप्त असो त्यातून यामागची भूमिका समजून येते. शूद्राने तप केलं तरी त्याची हत्या करावी एवढा तो गंभीर अपराध समजला जात होता. त्यामुळेच ब्रह्मज्ञानासाठीच्या तपसाधनेचा अधिकार सर्वांना नाही. तेच जपाच्या बाबतीतही आहे. वेदमंत्राच्या जपाचा अधिकारही शूद्रातिशूद्रांना नाहीच. त्यामुळे जप, तप, तीर्थाटन, शास्त्राभ्यास आणि ग्रंथ अध्ययन अशा सर्व साधना कठीण आणि अधिकारभेदाच्या असल्यामुळे संतांनी नाकारल्या. साहजिकच त्या साधनांचं साध्य असलेलं ब्रह्मज्ञानही संतांनी नाकारलं.
खरंतर तुकोबारायांची वाणी अत्यंत रसाळ आणि मोहक होती. त्यातील भक्तिविचार मानवी जीवनाभिमुख होता. त्यांच्या कीर्तनात केवळ शाब्दिक काथ्याकूट नव्हता तर ज्वलंत सुखाचा अनुभव होता. साहजिकच त्यांच्या अभंगांना आणि कीर्तनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकप्रियता मिळाली. अगदी ब्रह्मज्ञानी लोकही तुकोबारायांच्या कीर्तनाने प्रभावित झाले. अनेक शास्त्रीपंडित त्यांचा पांडित्याचा मार्ग सोडून तुकोबारायांच्या भक्तिमार्गात सामील झाले. ‘घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्याहाती। मुक्ता आत्मस्थिती सांडवीन।।’ ही तुकोबारायांची प्रतिज्ञा म्हणजे त्यांच्या कीर्तनाविषयीचं आत्मभान होतं. अनेक ब्रह्मज्ञानी लोक तुकोबारायांचं कीर्तन ऐकून ब्रह्मज्ञानाचा मार्ग सोडून भक्तीच्या मार्गाने निघाले. साहजिकच त्यावेळच्या वैदिक पंडितांच्या गोटात खळबळ माजली. तुकोबाराय असाच भक्तीचा महिमा वाढवत राहिले तर ब्रह्मज्ञानाचा माहात्म्य आपोआपच कमी होईल हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे अशा पंडितांनी तुकोबारायांनी ब्रह्मज्ञानाचा मार्ग अनुसरावा यासाठी धडपड करायला सुरुवात केली. काही पंडित तुकोबारायांना भेटून अद्वैत वेदांताचा म्हणजेच ब्रह्मज्ञानाचा महिमा सांगू लागले. ब्रह्मज्ञानातील काही प्रश्न विचारून हैराण करायला लागले. ‘न कळे ते मज पुसती छळूनी। लागता चरणी न सोडता।।’ असं तुकोबाराय म्हणतात. पंडितांचा असा उपद्रव वाढायला लागला. त्यावेळी एकदा तुकोबारायांनी त्यांना स्पष्ट करून सांगितलं की ब्रह्मज्ञान हा आमचा मार्गच नाही. मुळात वैदिक परंपरा ब्रह्मज्ञानाचा अधिकार बहुजनांना देत नाही. याबाबतीत विदुराचं उदाहरण देता येईल. विदुर दासीपुत्र असल्याने त्यांना ब्रह्मज्ञानाचा अधिकार नव्हता. पण विदुराने अन्य मार्गाने ब्रह्मज्ञान मिळवलं होतं. एकदा धृतराष्ट्राला विदुराकडून ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकायचा होता. मात्र विदुरांना ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांनी सन्तसुजात नावाच्या ब्राह्मणाला आमंत्रित केलं. त्या सन्तसुजातानी धृतराष्ट्राला उपदेश केला. तो उपदेश सन्तसुजात नीती नावाने प्रसिद्ध आहे. थोडक्यात ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा आणि उपदेशाचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांना आहे. तरीही तत्कालीन पंडित मात्र तुकोबारायांना ब्रह्मज्ञान देण्यासाठी उत्सुक होते. कारण तुकोबारायांनी जर त्या पंडितांकडून ब्रह्मज्ञानाचा स्वीकार केला असता, तर वारकरी संप्रदायात ब्रह्मज्ञानाचा महिमा वाढला असता. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने तुकोबारायांचा नव्हे, तर ब्रह्मज्ञानाचा महिमा वाढणार होता. तुकोबारायांच्या कीर्तनाने ब्रह्मज्ञानाचं महिमान कमी झालं आणि त्यातूनच ब्रह्मज्ञानी पंडितांचंही महिमान जवळपास नष्ट झालं होतं. ब्रह्मज्ञानाचं हे माहात्म्य नव्याने प्राप्त करण्यासाठी त्याला तुकोबारायांच्या प्रमाणाची गरज होती. त्यामुळेच हे पंडित तुकोबारायांना ब्रह्मज्ञान देण्यासाठी उत्सुक होते. प्रस्तुत अभंगात तुकोबाराय त्याचं शब्दचित्र रंगवतात.
तुकोबाराय म्हणतात की संतांच्या दारात ब्रह्मज्ञान काकुळतीला आलं होतं. याचा अर्थ संतांनी ब्रह्मज्ञानाच्या मार्गाचा स्वीकार करावा अशी तत्कालीन वैदिक पंडितांची इच्छा होती. त्यामागे त्यांचा हेतू ब्रह्मज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणाचा नसून ब्रह्मज्ञानाचं आणि त्या अनुषंगाने त्यांना वेदमाहात्म्य, कर्मकांडाचं माहात्म्य आणि वर्णमाहात्म्य वाढवायचं होतं. ब्रह्मज्ञानाचा महिमा वाढला की ते प्राप्त करण्यासाठीच्या वेदाचं, वेदाचा अधिकार असलेल्या उच्चवर्णीयांचं आणि ब्रह्मज्ञानाच्या पात्रतेकरिता आवश्यक असलेल्या कर्मकांडाचं माहात्म्य आपोआप वाढणार होतं. त्यामुळेच ते संतांना ब्रह्मज्ञानाच्या मार्गाचा स्वीकार करा म्हणून काकुळतीला आले होते. संतांनी मात्र त्याचा अव्हेर केला. तुकोबाराय पुढच्या चरणात सांगतात की हे ब्रह्मज्ञान आम्ही नाकारलं असलं तरी ते अचानकपणे आमच्या वारकरी संप्रदायात शिरकाव करू शकतं. त्यामुळे आम्ही त्याला आमच्यापासून जास्तीत जास्त लांब ठेवू. या ब्रह्मज्ञानाने वारकरी संप्रदायात शिरकाव करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही त्याचे प्रयत्न हाणून पाडू. शेवटी त्या ब्रह्मज्ञानाच्या गळ्यात औदासीन्यच पडेल.
खरंतर ब्रह्मज्ञानाने भक्तीला बाधा येते.ब्रह्मज्ञानात देव-भक्त एकच होऊन जातो आणि त्यामुळे भक्तीच्या व्यवहारात अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच तुकोबाराय ‘नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव। मी भक्त तू देव ऐसे करी।।’ असं म्हणतात. ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारी जीवनमुक्त स्थितीही परमेश्वराच्या प्रेमाला बाधा आणणारी आहे. त्यामुळेच ‘कासया व्हावे जिताची मुक्त। सांडोनिया थिते प्रेमसुख ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. देवाचं प्रेमसुख सोडून जीवनमुक्तीची अवस्था संतांना नकोच होती. त्यामुळेच संतांनी ब्रह्मज्ञानाचा अव्हेर केला. ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता साधनांची कठीणता, त्यातला अधिकारभेद, ब्रह्मज्ञानाने भक्तीला होणारा अडसर आणि ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणार्या जीवनमुक्तीतील प्रेमसुखाचा अभाव या कारणांनी संतांनी ब्रह्मज्ञानाचा मार्ग नाकारून प्रेमभक्तीचा प्रशस्त राजमार्ग स्वीकारलेला आहे.

