गणेशोत्सव म्हणजे बुद्धिदात्या गणरायाचा उत्सव. त्याच्याकडे सद्बुुद्धी मागण्याचा काळ. काहींच्या बाबतीत मुळात बुद्धी मागण्याचा काळ! या उत्सवाच्या आगेमागे जे काही घडते आहे, ते पाहता, यंदा गणरायाकडे सुबुद्धांना वेगळेच काही मागावे लागणार आहे.
गणेशोत्सवात आणि एकंदरच सर्वधर्मीय उत्सवात डीजेचा भयावह आवाज करू नये, अशी मागणी करणारे पुण्याचे विद्यानंद बापट यांना मुंबईच्या एका वकीलाने म्हणे नोटीस पाठवली आहे, ४८ तासांत माफी मागा नाही तर कायदेशीर कारवाई करू? कशासाठी माफी, तर म्हणे धर्मभावना दुखावल्या म्हणून. डीजे वाजवण्याचा आणि धर्माचा काय संबंध आहे? कोणत्या धर्मग्रंथात डीजे वाजवायला सांगितले आहे. आणि धर्मग्रंथांमध्ये सांगितले म्हणून सगळे काही शिरोधार्य ठरते का? एक वेल्डिंग चष्मेवाला पगारी फुटाणाही संविधानात डीजेबंदी कुठे लिहिली आहे, असा खुळचट प्रश्न विचारत टणाटणा उडतो आहे. गंमत म्हणजे, या अनाठायी आवाजबाजीमध्ये वर्गकलह वगैरे शोधून डीजेवर नाचणारे सगळे बहुजन आहेत आणि डीजेचा त्रास होणारे सगळे उच्चवर्णीय, सुखवस्तू लोक आहेत, असले जावईशोध लावणारे विचारवंत लालभाईही कमी नाहीत. सरकारने जागोजाग डिस्कोथेक, पब आणि नाचण्याच्या जागा तरुणाईला उपलब्ध करून द्याव्यात, नाहीतर मग डीजेचा आवाज सहन करावा, हे यांचे साफ गंडलेले तर्कशास्त्र.
गोकुळाष्टमीच्या सणाला गोविंदा पथकं, त्यांनी केलेला सराव, त्यांनी लावलेले थर, हंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम ही सगळी आकर्षणं असण्याचा काळ कधीच संपुष्टात आला, याचं भान आणून देणारी या वर्षीची दहीहंडी होती. जागोजाग सत्ताधारी नामदारांच्या आशीर्वादाने बीभत्स, अश्लील नृत्याचे कार्यक्रम सुरू होते. तमाशाच्या फडांवर आणि डान्स बारमध्ये जे पांचट चाळे तिकीट काढून पाहायचे, ते फुकटात दाखवण्याची व्यवस्था या मस्तवाल सरंजामदारांनी केली होती आणि तरुण पोरे चेकाळून हा ‘कलाविष्कार’ अनुभवत होती, हा उत्तर भारतातच पाहायला मिळणारा सोहळा महाराष्ट्राच्या भूमीवर खेचून आणल्याबद्दल महाराष्ट्राच्या प्रमुख सत्ताधार्यांचा, कोणत्या ना कोणत्या देशाच्या संसदेत, भले भाड्याने सभागृह घेऊन का होईना, सत्कार करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असं ते सतत म्हणत होते, ते सार्वत्रिक घसरणीच्या बाबतीत बोलत होते, ते आता राज्यातल्या जनतेला समजलं असेल. अर्थात, यातही वडाची साल वांग्याला लावून, या चीअरगर्ल्स चालतात तर हे का नको, त्या नृत्यांगनांनीच सुपारी घेतली ना, त्यांच्या शरीरावर त्यांचा अधिकार नाही का, वगैरे मखलाशी करून सणांच्या विद्रुपीकरणाचे समर्थन करणारेही कमी नाहीत!
याच काळात जैनांचे पर्युषण पर्व होणार आहे. मिरा भायंदरच्या जैनबहुल भागात आधीपासूनच या काळातले दोन दिवस मांसविक्रीला बंदी असते. दर वर्षी जैन नगरसेवक आठही दिवस मांसविक्री बंद करावी, अशी मागणी करतात. त्यात या उपनगराचा सातबाराच आपल्या नावावर आहे, अशा मिजाशीत वावरणार्या सत्ताधारी आमदाराने त्याच्या शाळेतल्या मुलांना डब्यात कांदा, लसूण आणि जमिनीखाली उगवणार्या भाज्या देऊ नका, अशी ‘विनंती’ करणारं पत्रक काढून आगीत तेल ओतलं. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने हस्तक्षेप करून ताळ्यावर आणलं. मुळात, आपण धार्मिक समजुतींमुळे काही खात नाही, ते इतरांनीही खाता कामा नये, हा काय आग्रह आहे. उद्या ईदच्या काळात भाजीविक्री बंद ठेवून सगळ्यांवर मांसाहारी बिर्याणी खाण्याची सक्ती करण्याची मागणी कुणी केली तर चालेल का?
इकडे हे सुरू आहे आणि त्याचवेळी परदेशातले आपले देशबांधवही रोज नवनवीन पराक्रम करून देशाचे हसे करण्यात मागे नाहीत.
कॅनडामधल्या एका भारतीय महिलेने तिच्या भाडेकरूला त्याच्या घरात गोमांस शिजवून खायला मनाई केली, त्याला अडवण्यासाठी मारामारी करण्यापर्यंत तिची मजल गेली. वर तिने पोलिसांना फोन करून बोलावले. त्यांनी अर्थातच तिलाच अटक केली. भाडेकरूने काय खावे, काय खाऊ नये, हे घरमालकाने ठरवायला कॅनडा म्हणजे काही भारत नव्हे. तिथे आहारविहार स्वातंत्र्य जपणार्या यंत्रणा आहेत. आणि इतका आपल्या धर्माचा पुळका आहे तर पोट भरायला दुसर्या देशात जायचं कशाला? इथल्या अमृतकाळात न्हाऊन निघायला मायदेशात परत यायचं ना!
अर्थात, अशा प्रकारच्या, मेंदू चक्रावून टाकणार्या घडामोडी काही फक्त भारतात घडत आहेत, अशातला भाग नाही. ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला या न्यायाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता तिकडे निवडणूक जिंकण्यासाठी तब्बल पाच हजार डॉलर्सची रेवडी वाटायला निघालेले आहेत. याआधी त्यांनी काही प्रांतांची नावं बदलण्याचा उद्योग करून आपल्याला भारतातल्या सत्ताधीशांचं वारं लागल्याचं दाखवून दिलं होतंच. त्याचवेळी माणसांची कामं सोपी करण्यासाठी जो तयार होत होता, तो एआय त्याच्या चौकटी भेदून, माणसांप्रमाणे खोटं बोलून, खोटं वागून, नियम तोडून दिलेल्या कामापेक्षा वेगळेच काही करताना आढळल्यामुळे एआयवर काम करणार्या तज्ज्ञांचेच धाबे दणाणले आहेत. ओपनएआय आणि अँथ्रोपिक या आघाडीच्या एआय कंपन्यांमध्ये काम केलेल्या जेकब कॉक्सन या वैज्ञानिकाने नोकरीचा राजीनामा देताना वॉर्निंग दिली- एआयचा प्रवास असाच चालू राहिला, तर २०३०च्या आतच एआय मानवजात पृथ्वीतलावरून नष्ट करील आणि पृथ्वीवर कब्जा करून बसेल.
खरे सांगायचे, तर हे होण्यासाठी एआयला एवढे कष्ट करण्याची गरज काय आहे? मोबाइल, फुकटचा डेटा, रील्सचं व्यसन लावणारा सोशल मीडिया, सत्ताधार्यांच्या चरणी लोळणारी प्रसारमाध्यमं, सरकारच्या बटीक बनलेल्या सर्व यंत्रणा यांनी मिळून आधीच जवळपास सगळ्या जगभरात निर्बुद्धांच्या फौजा तयार केलेल्या आहेत. बुद्धिदात्याच्या उत्सवात कानामनांवर, डोळ्यांवर, मेंदूवर आदळणारं हेच जळजळीत वास्तव आहे. ज्याला बुद्धी आहे, संवेदना आहेत, त्याला याचा त्रास होणारच.
त्यामुळे बुद्धिदात्या गणेशाच्या चरणी हीच प्रार्थना करायला हवी की जी काही थोडीबहुत बुद्धी असेल, ती तू काढून घे, म्हणजे इथे जगणे सोपे जाईल…
…बुद्धीची कामं करायला एआय आहेच की!
