
गणेशोत्सव मिरवणुकीत वाजवल्या जाणार्या डीजेविरुद्ध पुण्यात झालेली आंदोलने आणि राज्यातील काही जिल्ह्यांत पोलिसांनी डीजे वर घातलेली बंदी कितपत यशस्वी झाली, याची प्रचिती आता अनंत चतुर्दशीलाच येईल. गणेश आगमन मिरवणुकांपेक्षा, विसर्जन मिरवणुकांत लोकांचा उत्साह आणि आवेश शिगेला पोहोचतो. डीजे बसविलेली वाहने आणि त्यांच्या पुढे बेधुंद नाचणारी जनता हे गणेश विसर्जन मिरवणुकांचे आजवरचे चित्र आहे. मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे शक्यतो अनंत चतुर्दशीला विसर्जन होत असते. यामुळे परिसर प्रचंड गर्दीने फुलून जातो. विसर्जन मिरवणुकीत डीजे वाहनांवर चढविलेले असतात आणि क्वचितच त्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली जाते. याचबरोबर ढोलताशांचा आवाजही मोठा असतो. डीजे आणि डॉल्बी साऊंडचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि डोळ्यांवर अनिष्ट परिणाम करणारे प्लाझ्मा आणि लेझर लाईट्स प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शरीराला इजा पोहोचवतात यात शंका नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजेबाबतची भूमिका स्पष्ट केली नसली तरी बर्याच जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाने डीजेवर बंदी घातली आहे किंवा निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्ण बंदी आहे (पण ती दहीहंडीलाच धाब्यावर बसवण्यात आली होती). नांदेडमध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आगामी गणेशोत्सवात डीजेच्या वापरावर बंदी घातली आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्येही डीजे वाजवण्यास परवानगी नाही.
पुण्यात प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांवर पूर्ण बंदी आहे. शिवाय डीजेसाठी ०४ टॉप आणि ०४ बासची मर्यादा निश्चित केली आहे. एकही बास किंवा टॉप वाढविल्यास गणेश मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करून संपूर्ण साऊंड सिस्टम जप्त केली जाईल, असा इशारा पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. कोल्हापुरात डीजेवर पूर्ण बंदी नसली, तरी मिरवणुकांसाठी केवळ दोन बास आणि दोन टॉप वापरण्यास परवानगी देण्यात आली असून साऊंड सिस्टीममध्ये ‘प्रेशर मिड’, आधुनिक लेझर लाईट्स आणि स्मोकरच्या वापरावर सक्त बंदी आहे. सातारा आणि पालघरमध्ये काही अटींवर डीजेला परवानगी दिली आहे. सोलापूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, भंडार्यामध्ये डीजे आणि साऊंड सिस्टिमवर बंदी घातली आहे. सांगलीत पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी डीजेऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्या, असं आवाहन केले आहे. मुंबईत जवळ जवळ १२,००० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत ज्यांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मुंबईत पोलीस व गणेशोत्सव समितीच्या बैठकीत डीजे व लेझर लाईट वापरण्यास मज्जाव केला आहे.
डीजे म्हणजे काय?
डीजे म्हणजे डिस्क जॉकी. ध्वनिमुद्रित संगीत निवडणे, गाणी एकमेकात मिसळणे आणि ते श्रोत्यांना सादर करणे हे डिस्क
जॉकीचे काम. डिस्क म्हणजे ग्रामोफोन रेकॉर्ड आणि जॉकी म्हणजे ते नियंत्रित करणारी व्यक्ती. आता संगीत कॉम्पेक्ट डिस्कऐवजी डिजिटल फाईल्स, मिक्सर, कंट्रोलर आणि संगणकाच्या मदतीने सादर केले जाते. डीजेमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अॅम्पलिफायर आणि स्पीकर्सचा वापर होत असल्यामुळे तो दूरपर्यंत जातो. डीजे सामान्यतः अशी ऑडिओ उपकरणे वापरतात, जी एकाच वेळी किमान दोन रेकॉर्ड केलेले संगीत स्रोत वाजवू शकतात. यामुळे त्यांना रेकॉर्डिंग्जमध्ये संक्रमण तयार करण्यासाठी ट्रॅक्स एकत्र मिसळता येतात आणि गाण्यांचे अद्वितीय मिश्रण तयार करता येतात.
ध्वनिप्रदूषणाचे नियम
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नियमाप्रमाणे व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल्स, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल्स आणि औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबल्स ध्वनिमर्यादा आहे.
हॉस्पिटल्सजवळील परिसर आणि इतर शांतता क्षेत्रात दिवसा ५० आणि रात्री ४५ डेसिबल्स ध्वनिमर्यादा आहे. दिवसाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० आणि रात्रीची वेळ १० ते सकाळी ६पर्यंत असते. शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ही मर्यादा कित्येक पटीने वाढते. पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या एका अभ्यासानुसार पुण्याच्या लक्ष्मी रोड भागात गणेश विसर्जनाच्या वेळी आवाजाची पातळी २०२२ मध्ये १०५.२ डेसिबल्स होती, २०२४मध्ये ती १०१.३ डेसिबल्स होती आणि गेल्या वर्षी ती ९४.८ डेसिबल्स होती. फक्त कोविडच्या काळात आवाजाने उच्चांक गाठला नाही. मुंबईतही थोड्याफार फरकाने विसर्जन काळात आवाजाची मर्यादा ८० डेसिबल्सपेक्षा जास्त असतेच.

डीजेमुळे होणारे आजार
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डीजेच्या कर्णकर्कश आणि उच्च क्षमतेच्या आवाजामुळे माणसाच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होतात. ७० डेसिबलपर्यंतचा आवाज मानवासाठी सुरक्षित आहे. मात्र ८० ते १०० डेसिबल मर्यादेचा आवाज सतत कानावर पडत राहिल्यास कानाची क्षमता कायमची कमी होऊन बहिरेपण येऊ शकते. १०० ते १२० डेसिबल दरम्यानच्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. या आवाजामुळे कानाची जी नस हृदयाला जोडलेली असते ती स्टिम्युलेट होते. यामुळे टिनिटससारखा आजार, ज्यात कानात सतत्ा शिटी वाजल्यासारखा, मधमाशा घोंघावल्यासारखा आवाज येतो, उद्भवू शकतो. डीजेचा आवाज १२० डेसिबलपेक्षा जास्त जातो, तेव्हा त्याचे थेट परिणाम मानवी शरीरावर होतात. अतिआवाजामुळे रक्तदाब वाढतो. हृदयाचे ठोके अनियमित होतात. अचानक अॅड्रेनालिन संप्रेरक वाढते. यामुळे रक्तदाब वाढून त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मोठ्या आवाजामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब तीव्र गतीने वाढतो. अतिउच्च डेसिबलच्या आवाजामुळे मेंदूवर तीव्र ताण येतो, ज्यामुळे रक्तदाब वाढून मेंदूची नस फुटण्याचा (ब्रेन हॅमरेज) धोका संभवतो. सततच्या मोठ्या आवाजामुळे डोकेदुखी वाढते आणि अंतर्गत कानावर परिणाम झाल्यामुळे चक्कर येणे किंवा मळमळणे सुरू होते.
डीजेच्या सततच्या धडधडणार्या आवाजामुळे शरीरातील ‘स्ट्रेस हार्मोन्स’’ वाढून मानसिक अस्वस्थता निर्माण होते आणि अशा वातावरणात दीर्घकाळ राहणार्या लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. याचबरोबर रात्री उशिरापर्यंत चालणार्या डीजेमुळे लोकांच्या झोपेचे चक्र पूर्णपणे बिघडते. यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्याने थकवा आणि इतर आजार बळावतात. लहान मुले, वृद्ध नागरिक, गरोदर महिला आणि आधीपासूनच हृदयविकार किंवा मधुमेह असलेले रुग्ण यांना डीजेच्या आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो. गरोदरपणात तीव्र आवाजाच्या संपर्कात आल्यास होणार्या बाळाच्या श्रवणशक्तीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. डॉल्बी-डीजेचा दणदणाट गर्भपातासही कारणीभूत ठरू शकतो.
डीजेमुळे मृत्यू
सांगलीतील तासगांवमध्ये २०२३मध्ये अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झालेला शेखर पावशे (३२) हा तरुण गणपतीची विसर्जनाच्या मिरवणुकीत लावलेल्या डीजेच्या आवाजामुळे चक्कर येऊन पडला आणि इस्पितळात उपचारापूर्वीच मरण पावला. याच प्रमाणे वाळवा तालुक्यात प्रवीण शिरतोडे (३५) डीजेच्या आवाजामुळे मृत्यूमुखी पडला. गेल्या वर्षी सोलापूरमध्ये मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना एका २५ वर्षीय तरुणाला अस्वस्थ वाटून हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भोपाळमध्ये २०२४ साली १३ वर्षांच्या मुलाचा, तर त्याच वर्षी ओडिशात ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

कार्यक्रमांना पूर्णविराम
ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी २०१०मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी डीजे, लाऊडस्पीकर किंवा कोणतेही ध्वनिवर्धक यंत्र वाजवण्यास ध्वनी प्रदूषण नियम, २००० नुसार पूर्णपणे बंदी आहेच. यात सरकार मर्यादित दिवसांसाठी सूट देऊ शकते. या नियमामुळे पूर्वी गणेशोत्सवात आयोजित केले जाणारे ऑर्केस्ट्रा, मराठी नाटके यांच्यासारखे कार्यक्रम आधीच बंद झाले आहेत.
जल प्रदूषणाचे काय?
ध्वनिप्रदूषणाबरोबर मोठ्या गणेश मूर्तींचे समुद्रात विसर्जन आणि विसर्जनानंतर समुद्रकिनार्यांवर वाहून येणार्या मूर्तींचे अवशेष ही वर्षानुवर्षाची चिंताजनक समस्या आहे. अनेकदा मूर्ती पुरेशा खोल पाण्यात विसर्जित न केल्यास, ओहोटीच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी मोठ्या लाटांमुळे त्या पुन्हा किनार्यावरील वाळूत येऊन पडतात. मूर्तींसोबत विसर्जित केलेले प्लास्टिकचे हार, थर्माकोलचे मखर आणि इतर निर्माल्य किनार्यावर कचर्याच्या स्वरूपात जमा होते. मुंबईत विसर्जनाच्या दुसर्याच दिवशी अनेक जागरूक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि आणि महानगरपालिका किनार्यांची स्वच्छता करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येतात आणि वाहून आलेल्या अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती गोळा करून त्यांचे पुन्हा खोल समुद्रात किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करतात ही समाधानाची बाब. मूर्तीचा आकार लहान ठेवावा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नसल्यामुळे पाण्यात विरघळणार्या शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी असे आवाहन वारंवार केले जात असले तरी आतापर्यंत परिस्थितीत जास्त फरक पडला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५चा आदेश कायम ठेवल्यामुळे मुंबईत सहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात, नैसर्गिक जलस्रोतांत करण्याचा मार्ग या वर्षी मोकळा झाला आहे. या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावांत विसर्जन करणे बंधनकारक आहे. हा अंतरिम आदेश याचिकेवर अंतिम निकाल देईपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हवामानबदलांचे परिणाम
हवामानबदलामुळे समुद्रात सध्या नैसर्गिक घडामोडी घडत आहेत आणि समुद्रकिनार्यावर कचरा येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या वर्षी जुलैमध्ये मुंबईच्या जुहू समुद्रकिनार्यावर नाले आणि नैसर्गिक जलवाहिन्यांतील अरबी समुद्रात वाहून गेलेला जवळ जवळ ३५० मेट्रिक टन कचरा रोज मोठ्या लाटांमुळे किनार्यावरील वाळूत येऊन पडत होता. बांद्रा-वरळी सी लिंकमुळे दादर, माहीमची खाडी, गोराई यांसारख्या किनार्यांचा आकार पूर्णपणे बदलला आहे.

उंच गणेशमूर्तींसाठी नियम
मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेने गंभीर दखल घेऊन एक टनापेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या गणेशमूर्तीसाठी ‘योग्यता प्रमाणपत्र’ म्हणजेच ‘फिटनेस सर्टिफिकेट’ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मनपाच्या विशेष कार्यप्रणाली नुसार, गणेश मंडळांनी मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून ती तयार होऊन मंडपात येईपर्यंतची संपूर्ण माहिती मनपाकडे नोंदवली जाणार आहे. जड मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान कोणताही अपघात होऊ नये, यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावर मनपाचे पथक विशेष देखरेख ठेवणार आहे. अर्थात हे नियम पुढील वर्षी लागू होतील.उत्सवाचा जल्लोष आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी केलेले नियम यांच्यात समतोल राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अशा परिस्थितीत उंच मूर्तींची स्पर्धा न करता त्यांची उंची मर्यादित ठेवून शाडूच्या मूर्तींचा जास्तीत जास्त वापर ही आजची गरज आहे. आपल्या सणाची सांगता निसर्गाचा र्हास करून होऊ नये, हीच गणरायाची खरी सेवा.

