• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सोयाबीन

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

Marmik Team by Marmik Team
September 19, 2026
in गावगप्पा, गावची गजाल, विनोदी लेख, विशेष लेख
0
सोयाबीन

चित्र-आशुतोष वाळे

‘अध्वर्यू आला आहे, तर आता निघावयास हरकत नसावी!’ अर्ध्या नम्याच्या दारात पोहोचला कुठे नाही तर घरातून आवाज आला. अर्ध्याने कान टवकारले.
‘निघू थांब! अजून माझा मोबाईल चार्जिंगचा बाकी आहे. शर्टची इस्त्री बाकी आहे. तोवर त्याला बस म्हणावं.’ नम्यानं ‘बोलणार्‍याला’ सांगितलं. त्याचबरोबर तो बोलणारा अर्थात परीक्षित बाहेर डोकावला.
‘अध्वर्यू, आपणास बसावयास सांगितले आहे नमितने! संभवतः नमितला अजून काही वेळ लागेल असे वाटते.’ परीक्षितनं अर्ध्याला सूचनावजा विनंती केली.
‘हा बसतो ना मग! त्याला म्हणा लवकर आवर! नाहीतर निघता करता इथंच दुपार व्हायची!’ अर्ध्या सजून आलाय. त्यात काही वेळ निव्वळ बसून राहायचं म्हणजे कटाळा यायचा. लवकर नम्यानं आवरलं तर दोन ठिकाणं जास्त फिरता येतील, पण हा गडी काय करतो? याची अर्ध्याला चिंता!
‘तू कुठल्या कंपनीत जॉब करतोस?’ परीक्षित बाहेर पडवीत अर्ध्यासमोरच्या खुर्चीत बसला, त्याला बघून अर्ध्यानंही एक खुर्ची ओढली. आणि बूड टेकवलं.
‘मी त्या वरल्यांगून तिसर्‍या कंपनीत जातो.’ अर्ध्यानं नाव न घेता त्याला थेट खूण सांगितली.
‘सॅलरी चांगली मिळत असेल तुला? नाही?’ परीक्षित अर्ध्याच्या पगारावर आला.
‘कायचं? म्हणायला फक्त! तेवढ्यात काय भागतं?’ अर्ध्यानं रडगाणं गायलं.
‘तिथे तर चांगली सॅलरी मिळावयास हवी ना? आंतरराष्ट्रीय कंपनी आहे ना ती?’ परीक्षितला सगळी माहिती लगेच जाणून घ्यायची आहे असं दिसतं.
‘म्हणायला. तसंबी ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या! वाण नाही पण गुण घेतला! त्यांना इथले कायदे माहीत नाहीत काय?’ अर्ध्यानं उलट सवाल केला.
‘मागे तूच नमितला नोकरी शोधावयास सांगितली होती का?’ परीक्षितला आणखी काही विचारायचं बाकी आहे अजून.
‘हां, मग काय करतो? इथं काम करू करू भुस्कट पडलं पण पगार बी वाढंना! अन् परमनंटबी करीना! बाकीच्या पोरांचे पार लग्नयेवं झाले. गाडी-बंगला झाले. सगळे लायनीला लागले. मी बसलोय अजून नाकदुर्‍या काढत बॉसच्या!’ अर्ध्यानं सगळी मळमळ ओकली.
‘फार केविलवाणा वाटतोय तू! आपल्या मराठी तरुणांचा हाच त्रास, त्रागा मला बघवत नाही. त्याला महत्त्वाचे कारण आपण स्किल्स अर्थात नवनवी कौशल्यं शिकत नाही, आत्मसात करत नाही.’ परीक्षितचा अवतार आणि अवसान बघून हा प्रोफेसर आहे की काय? असं अर्ध्याला वाटायला लागलं.
‘म्हणजे?’ अर्ध्याला काही कळलं नाही.
‘आता मला सांग. तुला कुठल्या भाषा अवगत आहेत?’ परीक्षित अर्ध्याचा इंटरव्यू घ्यायला बसला.
‘आता मराठी येती. हिंदी समजती, थोडीफार बोलू-लिहू बी शकतो. अन् सोपी-सोपी इंग्रजी वाचलेली कळती. बास! याच्याउप्पर काही नाही.’ अर्ध्यानं अवघड प्रश्न आठवू आठवू सांगितला.
‘मराठी येते? मालवणी, वर्‍हाडी, अहिराणी बोली कळतात का? किमान प्रमाण मराठी बोलता येते का?’ परीक्षित न फुटलेले एमपीएससीचे प्रश्न इंटरव्ह्यूत घ्यायला लागला.
‘हां आता जे बोलतो त्यात मराठीचं परमाण ९० टक्क्याच्या वर असंल ब्वॉ!’ अर्ध्याचं डोकं भणाणलं.
‘हीच मराठी तरुणांची शोकांतिका आहे बघ! आपल्याला नीट प्रमाण मराठी लिहिता येत नाही. बोलता येत नाही. तिथे आपण काय अपेक्षा ठेवणार? हेच आपण आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त किमान एक जरी परकीय भाषा अस्खलित बोलू शकलो, लिहू शकलो. तरीही आपल्याला नोकरी मिळावयास विलंब होणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय पटलावर परकीय वा पाश्चात्य भाषा येऊ शकणार्‍या, जाणणार्‍या तरुणांची नितांत गरज आहे. त्यांस अनेकविध संधी सहज उपलब्ध होत आहेत. अजून तरी मी इतर कौशल्या…’ परीक्षितमधला प्रोफेसर रटाळ एकपात्री करायच्या बेतात दिसतोय तोच वैतागून अर्ध्या ताडकन उठून दाराकडे निघाला.
‘नम्या निघायचं नसेल तर मी येतो रे घरून! दोन भाकरी कुस्करून खातो. दोन तास आडवा पडतो. मग भेटू संध्याकाळी!’ अर्ध्या परीक्षितपासून सुटका करून घ्यायच्या इराद्यानं फिरायला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करायला निघाला.
‘अरे झालं!’ नमित शर्ट अंगात घालून हातात बूट घेऊन पायरीवर येऊन बसला. आणि निवांत पायात बूट घालून लेस बांधायला लागला.
‘अध्वर्यूस मी चारदोन लाभाच्या गोष्टी सांगत होतो, त्या रुचल्या नाहीत वाटतं! कसे आहे? मराठी तरुण मागे राहता…’ परीक्षित त्याचा मुद्दा क्लिअर करायला बघू लागला.’तू तुझी मोटारसायकल घे! मी माझी घेतो. अर्ध्या आणि मी एक गाडीवर. अन् तू एकटा! चला निघायचं?’ नम्यानं परीक्षितला मध्येच थांबवलं.
अर्ध्यानं सुटकेचा निःश्वास टाकला. एकदाची बला टळली, म्हणत तो नम्यामागं बसला. परीक्षित अगदी हेल्मेट वगैरे डोक्यात घालून त्याच्या गाडीवर बसला. त्याच्याकडं बघून नम्या केवळ ‘यायला हेल्मेट….’ म्हणत चुचकारला. अन् पुढल्या मिनिटाला किक मारून गाडी काढली पण!
बघता बघता दोन्ही मोटारसायकली रस्त्याला लागल्या.
‘हे रत्नं कुठल्या खाणीत शोधावयास गेला व्हता तुम्ही?’ अर्ध्यानं चालत्या गाडीवर नम्याच्या कानाजवळ तोंड नेलं.
‘अरे तो बॉसचा साला आहे. मागं तुला नाही का म्हंटलं? तिथं कंपनीत भेटला होता? काही पीएचडी वगैरे करतोय. पण तू काल फोन केला ना? फिरायला जायचा अख्खा प्लॅन त्यानं ऐकला. मग काय? गडी यायला तैवरला. एक तास झाला, तेव्हापासून इथं येऊन बसलाय.’ नम्यानं डिटेल मााfहती पुरवली.
‘कान बरे आहेत ना तुझे?’ अर्ध्या हसला आणि नम्या पण त्यात सामील झाला. दोन्ही गाड्या आगेमागे चालत पुढं निघाल्या. जिल्हा ओलांडत असताना इतका वेळ दुतर्फा दिसणारी हिरवळ आता हरवायला लागलीय. लांबच लांब माना टाकलेले, खुरटे पिकं दिसायला लागले.
‘अय जागा बघून थांबव जरा!’ अर्ध्याला थांबायची गरज जाणवली.
‘हा थोडं पुढं…’ नम्या बोलतोच आहे तर बाजूला परीक्षितची गाडी उभी दिसली. मग नम्यानं बी ब्रेक दाबला. तो थांबल्या थांबल्या अर्ध्यानं रस्त्या कडेला धाव घेतली. आणि उभ्या उभ्या एक येड्या बाभळीचा लांब बघून काटा काढला.
‘अरे परीक्षित असं डायरेक कोणाच्या बी वावरात जाऊ नको! काही शेतकरी चांगले राहत्या. एखादं अवघड भेटलं तर उगाच शिव्या-बिव्या द्यायचं!’ नमितनं वावरात घुसलेल्या परीक्षितला आवाज दिला.
‘ही काही फुलं सुंदर दिसली. आपसूक पाय वळले इकडे!’ परीक्षित एक कमरेइतक्या झुडुपाजवळ उभाय.
‘काँग्रेस आहे ते! हात नको लावू त्याला! सगळी कड लागंल हाताला.’ वावरातून एक पोरगं झपाझप चालत आलं.
‘म्हणजे? हे फूल चांगलं नाही का?’ परीक्षितनं फूल हातात घेतलं.
‘काँग्रेस म्हणजे गाजर गवत आहे हे! त्याला कडू रहाते. हाताला ती कड लागली ना? लवकर जायची नाही. साबणच लावावी लागंल हाताला!’ त्या पोराने सांगितलं तसं परीक्षितनं हात काढले.
‘पीक कोणते आहे? सुंदर दिसते आहे फार!’ परीक्षित वावरात मध्ये गेला. मागोमाग अर्ध्या आणि नम्या दोघंही गेले, खाली वाकून पानं बघायला लागले.
‘सुकलेत पानं!’ नम्यानं सगळ्यात आधी शोध लावला.ै
‘ऊन धरलंय सोयाबिननं!’ तो पोरगा बोलला.
‘म्हणजे?’ परीक्षितनं प्रश्न विचारला.
‘पाऊस नाही ना? त्याच्यात जमिनीची तहान भागेल नाही. मग पिकं सुकणारच ना?’ तो पोरगा.
‘मग विहिरीचं पाणी द्यायचं!’ अर्ध्यानं मध्येच डोकं चालवलं. तशी नम्यानं त्याच्या डोक्यात टपली मारली. त्याला त्याची चूक उमगली. अर्ध्यानं जीभ चावली अन् मागं सरकला.
‘हेच आपल्या शेतकर्‍यांस समजायला हवे! तिकडे वाळवंट असूनही इस्रायलसारखा एक लहान देश पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून आधुनिक शेतीत नवनवीन अचंबित करणारे प्रयोग करत क्रांती घडवतो आहे. आणि आपल्याकडे केवळ कमी पाऊस वा फारतर एकवर्ष पावसाची ओढ मिळाली तरी नापिकीला सामोरे जावे लागते. आपल्याकडे सूक्ष्म काटेकोर…’ परीक्षितमधला प्रोफेसर आता कृषितज्ज्ञ बनला.
‘अय सूक्ष्म! इथं काही बारीक सारीक नियोजन नसतं! सरकार एखाद्या गावच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन करू शकत नाही. शेतीचं काय… त्यात जिथं धरणातून पाटं काढले, तिथं आवर्तन आमदारा-खासदाराच्या मर्जीनं सोडली जात्या. तिथं नियोजन डायरेक गाढवाच्या मागं गेलं, उकिरड्यावर! तू आला शिकवायला. त्याच्यात तुलना इस्रायलबरोबर? जरा दम तर घेत जाय बाबा! ‘ ते पोरगं मधीच बोलून उठलं. ‘नुसतं भारी मराठी बोललं म्हणजे वरंभ्याच्या समस्या कळल्या आणि कांडी फिरवल्यावानी सुटल्या, असं होत नाही.’ ते पोरगं तडतडा बोललं!
अर्ध्या, परीक्षित आणि नम्या खाली मान घालून तिथून निघाले. सध्या मुद्दा दुष्काळाचा ध्यानी आहेच कुणाच्या? पिकं सुकलीत की तरारलीत, हे विचारतं कोण? पार पिकांचा खकाना झाला का सगळे जागे होतील, मग नियोजन आखले जातील. तवर सरकार बी फिरतंय नि पब्लिकबी! अर्ध्या मुक्यानं गाडीवर बसला!
‘ह्या काट्याला मागंपुढं लेंड्या खोचल्या आणि मधोमध सुबाभळीच्या शेंगा खोचल्या का फॅन तयार!’ अर्ध्यानं विषयांतर म्हणून काही बोलून बघितलं.
‘विष्ठा म्हणावी! अध्वर्यू भाषा…’ परीक्षित पुन्हा लेक्चर झाडू लागला. अर्ध्यानं डोक्यावर हात मारून घेतला. आणखी हा भाषा विषय ताणायचा किती?

Previous Post

महाकवींचे सहस्त्रचंद्रदर्शन!

Next Post

आर्थिक सुधारणा कोणी बरे केल्या?

Next Post
आर्थिक सुधारणा कोणी बरे केल्या?

आर्थिक सुधारणा कोणी बरे केल्या?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.