
चला, आज आपण रेल्वे स्टेशनवर एक चक्कर मारून येऊ या! तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण ज्याला रेल्वे स्टेशन किंवा ठेसन म्हणतो त्याचे खरे भारतीय भाषेतील नावं हे ‘लोहपथगामिनी विश्राम स्थळ’ असे भारदस्त आहे!
ही एक अशी जागा आहे जिथे अमुक एका ठिकाणाहून तमुक ठिकाणी जाण्यासाठी तिकीट घ्यावे लागतेच, पण त्याचप्रमाणे नुसत्या रिकाम्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुद्धा प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागते! अर्थात, तसं प्लॅटफॉर्म तिकीट काढणार्याकडे जनरल पब्लिक ‘किती भोळं गं माझं बाळ ते!’ अशा दृष्टीने पाहतात म्हणा. तुमच्या-आमच्यासारखे शहाणे सुरते मनुष्यप्राणी कशाला असले तिकीट काढतात? पण, वेळ-प्रसंग कुणावर सांगून येत नाही. टीसीचा काय भरवसा? टीसी म्हणजे तिकीट कलेक्टर. कधी अशाच एखाद्या, जेवण अंगावर आल्यामुळे आराम करण्याच्या, कातरदुपारी सासरकडच्या पाहुण्यांना रेल्वेगाडीत बसवून दिल्यानंतर ‘गेली एकदाची पीडा…’ असे म्हणून तुम्ही सुटकेचा निश्वास सोडता आणि मागे फिरता तर एक काळ्या कोटातला इसम दत्त म्हणून समोर येऊन हात पुढे करून तुमचा रस्ता अडवत असलेला दिसतो, तोच तिकीट कलेक्टर! तो जिल्हाधिकारी ‘कलेक्टर’ वेगळा. पण ह्या कलेक्टरचा रुबाब त्याच्या वरचा! त्याने आपल्याला पकडले की तो कशाच्या तरी दहा पट रकमेचा फाईन भरावा लागेल म्हणून धमकी देतो. मुरलेले गिर्हाईक कधी अशा पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. तिकिटाच्या एक चतुर्थांश रकमेची चिरीमिरी हाती टिकवून पसार होतो.
पूर्वी चार माणसे मुंबईला चालली की गावातली चाळीस माणसे त्यांना सोडायला बस स्टॅन्डवर येत. बायका तर एवढ्या मोठ्या मोठ्याने रडत की आजकाल तेवढी रडारड कुणी ‘वरती’ गेले तरी ऐकावयास मिळत नाही. अशी सामुदायिक निरोप घेण्याची कुप्रथा नष्ट
व्हावी ह्या सद्हेतूने रेल्वेने हे प्लॅटफॉर्म तिकीट जारी केलेले आहे. मज्जा अशी की सीझननुसार हे तिकीट सुद्धा रु. दहा ते रु. पन्नास असे कितीही वाढू शकते.
तर आज मी तुम्हाला ह्या संकटात न घालता बसल्याजागी प्लॅटफॉर्म उर्फ लोहपथगामिनी विश्रामस्थलाची सफर घडवून आणतो. ती पाहा, यात्री विश्रामगृहाची पाटी दिसते का?… नाही दिसत?… नाहीच दिसणार! रेल्वे प्रशासन अशा पाट्या लावते ज्या शक्यतो सहजासहजी कुणाच्या दृष्टीस पडू नयेत! न जाणो कुणाची दृष्ट लागली तर, अशी भीती त्यांना वाटतं असावी. किंवा चोरांचीही भीती वाटतं असावी. अन्यथा टॉयलेटमधील मग त्यांनी असा लोखंडी साखळीने बांधून ठेवला नसता. पूर्ण प्लॅटफॉर्मवर एक रपेट मारल्याशिवाय रेल्वे खात्याने काय काय सुविधा (?) आपल्या लाडक्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, हे अजिबात समजत नाही.
मुख्यत्वेकरून उशिराने येणार्या गाड्यांची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालये, इनपुट म्हणजे खाण्यासाठी उपहारगृहे आणि आउटपुट म्हणजे मलमूत्र विसर्जन केंद्रे अशी तीन महत्वाची सुविधा केंद्रे आपल्याला पाहावयास मिळतात. ‘पुरुष मुत्री’ ह्या एकाच पाटीचा मात्र मुळीच गरज नसताना उगाचच खर्च केल्या जातो. ह्या जागेचा सुगावा आपल्याला प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध टोकावर सुद्धा लागू शकतो, एवढा तीव्रतम घमघमाट पसरलेला असतो. माझं गणित मुळातच कच्चे असले तरी मला त्यांना ह्या ‘एक नंबरचा’ एक रुपया आणि ‘दोन नंबरचे’ दोन रुपये गोळा करणार्या कर्मचार्यांचा पगार देणे कसे परवडत असेल, असा प्रश्न नेहमी पडतो.
जपानची रेल्वे म्हणे क्वचित काही सेकंद उशिरा आली तरी तेथील रेल्वे महामंडळ दिलगिरी व्यक्त करते. आपल्या महान देशातील रेल्वे वेळेवर आली तर प्रवाशी एफआयआर दाखल करतील. व्हीआयपी लोक नेहमी उशिरानेच येत असतात. किंबहुना उशिरा येणे हेच व्हीआयपी लोकांचे वैशिष्ट्य आहे, असा आपल्याकडे समज आहे. चार ते चोवीस तास उशीरा ट्रेन आली तरी आपल्याला काहीही खटकत नाही. त्यामुळेच तर प्रतीक्षालये चालतात. प्रतीक्षा करणारे प्रवासी मग टाईमपास म्हणून काहीतरी तोंडात टाकतातच. त्यामुळे सर्व स्थानकांवर एक तरी खाण्याचा स्टॉल असतोच असतो. बहुतेक वेळा निविदांचे नाटक करून मोठ्या कंत्राटदारालाच हा स्टॉल दिलेला असतो. एक दार प्लॅटफॉर्मवर आणि दुसरा दरवाजा स्टेशनबाहेरच्या बाजूला उघडणार, अशी ह्याची रचना असते. चेहर्यावर निर्विकार, निरंकार भाव असलेला एक महापुरुष गल्ल्यावर बसलेला असतो. आपली ट्रेन सुटायला एक मिनिट जरी राहिला असला आणि तुम्ही कितीही घाईत असला तरी हा इसम आपली शांती बिलकुल न ढळू देता ‘चेंज नही’चा जप करत बसलेला असतो. तुम्ही वरच्या सुट्ट्या पैशांवर पाणी सोडले तरी ह्याच्या चेहर्यावर ना खेद ना खंत असे भाव कायम ठेवलेले दिसतील. हो तेवढी सिद्धी प्राप्त झालेल्या लोकांनाच ही जागा दिली जाते. इथे मेनुकार्ड नेहमी आपण बसलेल्या सीटच्या मागच्या भिंतीवर मोठ्या अक्षरांत रंगवलेले असते. मागे वळून वळून आपण ते पदार्थ आणि त्याच्या किंमती वाचत असतो. चहा रु. पंचवीस आणि पुढे कंसात शंभर मिली असे संदर्भासहित स्पष्टीकरण दिलेले असते. पुढे इडली रु पंचेचाळीस आणि कंसात दोन नग प्रत्येकी पंचवीस ग्रॅम असे रोखठोक वकिली भाषेत लिहिलेले असते. पन्नास ग्रॅमला पंचेचाळीस रुपये म्हणजे कसे किलो पडतील बरे, हा प्रश्न सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत शेवटी तुम्ही इडलीच ऑर्डर करावी म्हणून वेटरला इकडे तिकडे शोधत असता. एक वेटर हातात फडके घेऊन तुमच्या समोरच्या टेबलवरचे खरकटे काढत असतो. तुमच्या शुकशुकाटाकडे तो सिंहाने उंदराकडे पाहावे तशी क्षुद्र नजर तेवढी टाकतो आणि आत निघून जातो. काही वेळा इकडे तिकडे शोधक नजर फिरवल्यावर तुम्हाला सेल्फ सर्व्हिसची पाटी दिसते. चरफडत तुम्ही काऊंटरवर जाता. तेथे गेल्यावर तुम्हाला तेथील वेटर ‘कुपन लेके आव’ असा मंत्र म्हणतो. काऊंटरवरच्या महापुरुषाकडे तुम्ही ‘तुझे पैसे आम्ही बुडवणार नाही काही’ अशा नजरेने पाहात खिशातले पाकिटं काढून चेंजसहित रक्कम मोजता. परत इकडे काउंटरवर गर्दीत आपल्या पदार्थाची प्रतीक्षा करत भिकार्यासारखे दीनवाणा चेहरा करून उभे राहता.
मला व्यक्तिशः असे जेवणाच्या लाइनमध्ये उभे राहिलेले मुळीच आवडत नाही. एकदा असेच बायकोला पाणीपुरी खाण्याची लहर आली म्हणून पाणीपुरीवाल्या भय्याच्या स्टॉलवर तिला घेऊन गेलो होतो. मला काही ती खायची नव्हती म्हणून जरा अंतरावरच थांबलो होतो. एकटीने चार पुर्या खाल्ल्यावर बायकोला माझी दया आली आणि तिने माझ्याकडे बोट दाखवून ‘भैया इनको भी एक पाणीपुरी देव’ म्हणाली.
‘अरे भाभी, ऐसे भिखारी रोज आते है, आप किस किस को खिलाओगी?’ असे म्हणत त्याने मला हुडूत् केले.
भाभीला ठसका लागला. म्हणाली, ‘वो मेरे हजबंड है भय्या!’
असो. परत रेल्वे स्टेशनातल्या खानपानाच्या स्टॉलवर येऊ. इडली आणि चहा यांच्यात चवीला काय जास्त पाणचट होतं बरं, हा विचार करत तुम्ही इथून बाहेर पडता. लोकलच्या स्टेशनवर तर अगदी छोटा स्टॉल लावलेला असतो. फलाटाच्या मधोमध आयताकृती जागेत हा स्टॉल असतो. हा दिवसाचे तेवीस तास पंचेचाळीस मिनिटं चालू असतो. एकदा रात्री (की पहाटे?) पावणे चार वाजता अशा स्टॉलवर चहा मिळतो का ते पाहायला गेलो होतो. तर मालकाने तो आता बंद झाला म्हणून माझ्यासमोर फळ्या लावल्या होत्या. पंधरा मिनिटांत म्हणजे चार वाजता त्याने स्टॉल उघडला आणि मला चहा दिला. मोठ्या बोगनवेलीच्या झुडपामागे लपलेल्या बंगल्यासारखे हे स्टॉल वेफर आणि चिप्सच्या पाकिटांनी झाकलेले दिसतात. आतल्या माणसांचं डोकं शिर नसलेल्या भुतांसारखं अदृश्य असतं आणि त्यांचे फक्त हात दिसत असतात. आपल्याला हवे ते पाकीट फाडून त्या हातावर पैसे ठेवले की झाले. ह्या पाकिटांसोबत गोळ्या आणि बिस्किटे, वडा पाव, समोसे, चहा, कोल्ड्रिंक आणि पॅकबंद पाण्याच्या बाटल्या इ. जिन्नससुद्धा येथे मिळतात. प्रवासात भुकेवर उपाय म्हणून हे सर्व सर्रास खपतात.
मागे एकदा हे स्टॉल ‘सुधारवायचे’ खुळ कोणा रेल्वे अधिकार्याच्या डोक्यात आले. तो नवीनच मोठ्या पोस्टवर डायरेक्ट भरती केलेला ‘क्वालिफाइड’ उमेदवार असावा. ‘वेटर्सना टिप देऊ नका’ अशा सूचना त्याने लावायला सांगितल्या. मोठं मोठ्या हॉटेलात टिप देणे हा सर्वमान्य प्रकार चालतो. पण त्या ठिकाणी जाणार्या गिर्हाईकाचा प्रकार आगळा. येथे प्लॅटफॉर्मवरच्या पाणपोईचे पाणी ओंजळीने पिणारे गिर्हाईक काय टिप देणार? न राहवून एक दिवस मी तेथील भय्याला विचारलं, ‘तुम्हाला कोणी टिप देते का?’ कोई नही देता… तो वैतागून म्हणाला. जे काही खातात त्याचे पैसे दिले तरी खूप झाले, तेही बुडवायच्या तयारीत ही गिर्हाईके असतात, असे एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून समजले.
कशाही असल्या तरी प्रवाशाच्या पोटाला आधार आणि प्रवासाची दगदग विसरून वेळ घालवण्यासाठी सहाय्यक असलेल्या ह्या टपर्या प्रत्येक स्टेशनात असायलाच हव्यात.

