
नरेंद्र मोदी हे २०२९मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच पंतप्रधानपदावरून पायउतार होतील असे भाकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांपुढे केले. आतापर्यंत राहुल यांनी जे जे भाकीत केलेत ते खरे ठरत गेले. राहुल यांच्या ताज्या भविष्यवाणीमुळे काँग्रेसचे तमाम नेते लगेच ‘मोगॅम्बो खुश हुआ’ या मोडमध्ये आले आहेत. परंतु मोदी जातील कसे? हा प्रश्न सगळ्यांसमोर आ वासून उभा आहे. मोदी नावाचा भाजप आणि संघाने फुगवलेला फुगा आता फुटला आहे. मात्र, ईव्हीएममधील बदमाशी आणि एसआयआरच्या माध्यमातून मोदी निवडणूक जिंकतीलच, या काँग्रेस नेत्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचे एकच उत्तर होते, ‘लढाई आता त्यापलीकडे पोहोचली आहे, अब मोदी को जाना ही होगा, तुम्ही आता लोकांपर्यंत पोहोचा’.
नाशिकमध्ये गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी ग्रेप पार्क, रिसॉर्टमध्ये २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षांसाठी दहा दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. ७२ अध्यक्षांचा यात सहभाग होता. राहुल गांधी यांनी शेवटच्या दिवशी तब्बल सहा तास काँग्रेसची रणनीती कशी असेल याबाबत मार्शल आर्टसोबतच मानसिक, बौद्धिक, सामाजिक धडे दिले. जिल्हाध्यक्षांना घाम फुटेपर्यंत आणि हातांना फोड येईपर्यंत मेहनत करावी लागली. मनरेगाच्या कामावर पाठवण्यात आले. खड्डे खोदायला गेलेल्या या नेत्यांना ‘हे राम जी’ म्हणायची वेळ आली. साडेचार तासांत हे नेते केवळ ४४ रुपयांचे काम करू शकले. एकही नेता पूर्ण दिवसाचे काम करू शकले नाहीत. कार्यालयात बसून राजकारण करण्यापेक्षा लोकांच्यात मिसळून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज व्हा, हा सल्ला राहुल यांनी दिला. नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये एकेक नेता कार्यकर्त्यांच्या घरी, काही गावातील देवळाचा आसरा घेत दिवस-रात्रभरासाठी थांबले. गावातील समस्या जाणून घेतल्या. गेल्या बारा वर्षातील समस्यांच्या चिखलात फसलेल्या गावकर्यांना बाहेर काढण्यासाठी काँग्रेसने त्यांना विश्वास देत ‘संघटित व्हा’ आम्ही तुमच्यासोबत आहोत हा शब्द दिला आणि कामाला सुरुवात केली. घरात हिंसा करू नका, कोणतेही व्यसन करू नका. आयुष्यात चांगले ध्येय ठेवा आणि स्वतःसाठी सीमारेषा तयार करा, हा मौलिक सल्ला राहुल गांधी यांनी दिला.
मतदार यादी पुनरीक्षण यादीत हमखास घोटाळे केले जातील त्यामुळे डोळ्यात तेल घालून सीसीटीव्ही सारखे सज्ज होत देशातील जनतेपुढे भ्रष्टाचार्यांना उघडे पाडा. आक्रमक व्हा यासाठी राहुल गांधी आग्रही दिसले. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, यावर सरकारला सोडू नका. शक्तीपीठ महामार्ग निर्मितीत ‘आंधळं दळत आणि कुत्रं पीठ खातं’ हा प्रकार हमखास होणार असल्याने शक्ती दाखवत खाणार्यांचे पीठ करणार्यांची जिद्द व्यक्त करण्यात आली. मराठा-ओबीसी आरक्षण, आदिवासी आंदोलन हे विषय काँग्रेसकडून दुर्लक्षित केले जाणार नाहीत. संघटना बांधणी, पक्ष विचारधारा, नेतृत्व विकास, राजकीय आव्हाने, जनसंपर्क यावर भर दिला गेला.

दिल्लीहून आलेल्या प्रशिक्षकांकडून जपानी मार्शल आर्ट्स जिऊ-जित्सू/जुजित्सूचे प्रशिक्षण देण्यात आले. राहुल यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले आणि मॅटवर सहभागींसोबत खेळले. या शिबिरात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काँग्रेस म्हणजे काय, या व्याख्येवर चिंतन झाले. ‘काँग्रेस काही मोजक्या लोकांचा गट नाही, तर ती जनतेची संघटित शक्ती आहे. ती भारतातील जनतेपासून वेगळी अशी काही गोष्ट नाही. ती तुम्हा सर्वांची आहे.’ पंडितजींचा हा संदेश यापुढे काँग्रेसच्या कार्यालयात झळकताना दिसेल. राहुल जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबियांनाही भेटले. संवाद साधला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांसोबत बंद दाराआड बैठक घेतली. २०२९ सालच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राची रणनीती त्यांनी आखली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली.
निवडणूक आयोगासोबत संगनमत करून भाजपने बळकावलेल्या हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांवर काँग्रेसने फोकस केला आहे. या राज्यातील मतदारांना कौल काँग्रेस आघाडीकडे होता असे स्पष्ट चित्र दिसत होते. इथे लोकांच्या भावना तीव्र आहे आणि भाजपबाबत रागही आहे. काँग्रेस अग्रक्रमाने या राज्यांत आतापासूनच कामाला लागली आहे.
संघ हा नागपूरचा कलंक!
राहुल यांनी शिबिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर जोरदार टीका केली. जीव गेला तरी संघाची विचारधारा स्वीकारणार नाही. संघाच्या कार्यालयात कधीच जाणार नाही. तुम्हीही संघापासून दूर राहा, काँग्रेसची विचारधारा ठामपणे स्वीकारून लोकांसाठी न्याय मिळवण्यासाठी लढा, असे त्यांनी सांगितले. नव्या पिढीशी, विशेषतः जेन झी तरुणांशी संवाद साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आणि राहुल गांधी यांचे रणनीतिक सल्लागार सचिन राव यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक अध्यक्षांना त्यांच्या जिल्हयाची वैशिष्ट्ये आणि शक्तिस्थळे विचारली. त्यासाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नागपूरचा कलंक आहे आणि हा कलंक धुवून काढण्यासाठी आम्ही तयार आहोत असे नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी ठामपणे सांगितले. संघात डोकावणार्या स्वार्थी नेत्यांचे मतदारच डोके फोडतील, असे सांगून राहुल यांनी कमलनाथ काँग्रेसमध्ये आहेत परंतु काँग्रेसचे नाहीत असा त्यांनी सर्वांसमक्ष स्फोट केला. अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले, त्यांच्यासारख्या संधीसाधूंना काँग्रेसमध्ये स्थान नाही, असे सांगत काँग्रेसमध्ये असूनसुद्धा विरोधकांना मिठी मारणार्या नेत्यांची काही नावे त्यांनी उद्धृत केली.
राहुल गांधी पायाला भिंगरी लागल्यागत देशभर फिरत आहेत. हजारो तरुणांची गर्दी त्यांच्या कार्यक्रमाला असते. या गर्दीत मनुस्मृतीचा ते खिमा करतात. सत्याची जाणीव होत असल्याने देशातील करोडो तरुण तरुणींचे माथे जागेवर आले आहे. मोदीशहा, भाजप आणि संघाच्या विरोधात तरुणाईकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
राहुल गांधींची भाकिते
मोदी सत्तेत आल्यापासून राहुल गांधी यांनी सरकारच्या अनीतीविरोधात अनेक भाकिते केली होती. पुढे ती खरी ठरत गेलीत. ऐन कोरोना काळात २०२०मध्ये त्यांनी कृषी कायद्यास ‘काळे कायदे’ म्हणून विरोध केला. सरकारला माघार घ्यावी लागेल हा माझा शब्द आहे, असे त्यांनी वारंवार सांगितले होते. या काळात आंदोलनातील ७००पेक्षा अधिक शेतकर्यांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर २०२१मध्ये पंतप्रधान मोदींनी तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली. २०१६मध्ये राहुल गांधींनी नोटबंदीला ‘राष्ट्रीय शोकांतिका’, ‘मूलभूत धोरण अपयश’, ‘स्वरचित हल्ला’ आणि लहान व्यवसायांना, रोजगाराला आणि जीडीपीला नुकसान पोहोचवणारे पाऊल म्हटले. काळा पैसा नष्ट होणार नाही आणि अर्थव्यवस्था बाधित होईल असे भाकीत केले. जवळजवळ सर्व नोटा बँकेत परत आल्या. काळा पैसा नष्ट करण्याचे मुख्य उद्दिष्ट मागेच पडले. जीडीपी वाढ मंदावली, अनौपचारिक क्षेत्रात नोकर्यांवर परिणाम झाला आणि लहान व्यवसायांना अडचणी आल्या. लाखो रोजगार बंद पडले. याबाबत त्यांचे आक्षेप आकडेवारीशी सुसंगत होते. २०२०मध्ये गलवान खोर्यातील चीनच्या हालचालींबद्दल सरकारला जागरूक राहण्याचे आवाहन राहुल यांनी केले होते. चीनचा हल्ला पूर्वनियोजित होता, सरकार ‘झोपलेले’ होते आणि चिनी सैन्य भारतीय प्रदेशात आहे, असे त्यांनी सांगितले होते. पुढे गालवान खोर्यात हिंसक संघर्ष झाला, २० भारतीय जवान शहीद झाले. राहुल गांधींनी वारंवार महागाई, बेरोजगारी आणि ‘मेक इन इंडिया’च्या अपयशाबाबत आक्षेप घेतले होते. काही वेळा त्यांनी अर्थव्यवस्था ‘मृत’ असल्याचेही म्हटले होते. ते खरे झाल्याचे दिसते आहे.
काँग्रेसला नवसंजीवनी
१२ वर्षांपूर्वी मृतप्राय झालेली काँग्रेस आज अत्यंत बलाढ्य झालेली दिसते. त्याचे श्रेय राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना निर्विवाद जाते. राहुल गांधी देशात जितके प्रभावी आहेत तितकेच ते पक्षातही प्रचंड ताकदवान झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या बाहेर डोकावणार्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संघटन मजबूत करतांनाच त्यांनी इंदिरा गांधींप्रमाणे लोकांमध्ये जाण्यावर भर दिला आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर इंदिरा गांधींनी जनतेमध्ये जात ‘गरिबी हटाओ’सारख्या घोषणा आणि गरीब-आधारित धोरणांच्या बळावर १९७१च्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. राहुल गांधी त्याच पथावर दिसत आहेत. राहुल आणि त्यांचा पक्ष विरोधी पक्षांना सोबत घेऊन किती चिवटपणे लढतो आणि या देशाला मोदी यांच्या तुघलकी राजवटीतून सोडवतो का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. घोडामैदान फार दूर नाही.
