पुण्यात शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी झालेला राहुल गांधी यांचा छात्रों की गूँज हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला… तब्बल साडेचार पावणे पाचपासून ते रात्री नऊपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास तरुणाई या कार्यक्रमात सामील होती. विशेष म्हणजे खुर्च्या टाकलेल्या नसताना सुद्धा पाच तास ही मुलं उभी राहून राहुल गांधींच्या अतिशय प्रसन्न मुद्रा टिपण्याचा प्रयत्न करत होती. या कार्यक्रमाची संकल्पना इतकी सुंदर होती की नेमकं या तरुणांशी संवाद साधणे म्हणजे नेमकं काय असतं हे अनुभवण्यासाठी अस्सल शिवसेनेकडून मी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार रोहित पाटील आणि अनेक वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे पदाधिकारी येथे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असं होतं की संपूर्ण कार्यक्रमात कुठेही न पक्षाचे चिन्ह होते ना झेंडा होता ना प्रादेशिक पातळीवरील पक्षनेत्यांचा वावर होता. स्टेजवर फक्त चार बाजूला उभे असणारे पाच ते सहा अंगरक्षक आणि मध्यभागी हातात माईक घेऊन उभे असलेले राहुलजी आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणार्या तरुणी… एरवी या मुली आपल्या आईशी सुद्धा फार कमी वेळा इतक्या मोकळेपणाने बोलत असतील, त्या फार फार तर मैत्रिणी जवळ व्यक्त होत असतील. राहुलजींपाशी मात्र इतक्या मोकळेपणाने बोलताना त्यांना तो विश्वास आणि आपुलकी वाटावी इथेच राहुलजी जिंकतात हे महत्त्वाचे…
हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा असता तर पाण्याच्या बाटलीपासून ते मुलींना दिल्या जाणार्या टोप्या टी-शर्ट फ्रेंडशिप बँड या प्रत्येकावर भाजपने मोदीजी आणि पक्षाची जाहिरात केली असती… पण राहुलजी का नाम ही काफी है! मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हटल्यावर काहींना भलत्याच मिरच्या लागल्या. पण त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की हा कार्यक्रम पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा होता. काल राहुलजी बोलत असताना माझ्यासह तिथे असणार्या प्रत्येकाला ते आमच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आमचं म्हणणं ऐकून घेत आहेत असं वाटत होतं.
एक आदिवासी मुलगी जेव्हा अतिशय मोकळेपणाने सांगते की आम्हाला वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्याच्या आधी प्रेग्नंन्सी टेस्ट द्यावी लागत आहे, जी आमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारी गोष्ट आहे, तेव्हा हे किती वेदनादायी आहे. याकडे राजकीय चष्म्यातून बघणारे फक्त भाजपचे अंधभक्त असू शकतात, कारण त्यांना कधी महिलांविषयी एक बहीण, एक लेक म्हणून असणार्या जाणीवा असूच शकत नाहीत… राहुलजींची मांडणी ही राजकीय असण्यापेक्षा सुद्धा या देशातील सामाजिक-सांस्कृतिक वीण समजून घेत त्याची उकल करणारी होती. ‘लडकियां गाली दे रही है, ये हमारे लिए कल्चरल शॉक है,’ असं म्हणणारे मोदी त्यातून काय सांगत असतात… या शिव्या मुलांनी दिल्या असत्या तर कदाचित मोदींना आणि त्यांच्या अंधभक्तांना कल्चरल शॉक लागला नसता? ही एक वेगळी बाजू काल पुढे आली हे फार महत्त्वाचे…
मनुस्मृतीवर इतक्या थेटपणे एखाद्या राजकीय मंचावरून प्रहार करण्याची हिम्मत काल कदाचित पहिल्यांदा दाखवली गेली आणि तीही सप्रमाण… तुमचं तुमच्या वडिलांशी, पतीशी, मुलाशी, भावाशी नातं नक्कीच आहे; परंतु तुम्ही कुणाच्याही मालकी हक्काची वस्तू नाहीत, तुमची मालकी ही तुमची स्वतःची आहे, हा स्त्रीच्या आत्मसन्मानाचा हुंकार पहिल्यांदा राजकीय मंचावरून आला, जो कदाचित पंधराशे रुपये देऊन जाहिरात करणार्या लोकांमध्ये कधी रुजलेलाच नाही. पंधराशे रुपये देऊन ते मत विकत घेतात म्हणजे एका अर्थाने लोकशाहीचे, मतदाराचे वस्तूकरणच करण्याचा प्रयत्न करतात…
‘Smash the patriarchy’ हा संदेश राजकीय कारकीर्दीच्याही पुढे जाऊन एक सामाजिक जोखीम पत्करत देण्याची हिंमत पहिल्यांदा एखाद्या मुख्य प्रवाहातल्या राजकीय पक्षाने करावी, ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. कारण पितृसत्ताक व्यवस्था नाकारणे ही जातव्यवस्था नाकारण्याची पहिली पायरी आहे. परंतु मनुवादी व्यवस्थेला हे इतक्या सहज पचन होणार नाही… राहुलजींनी ही जोखीम पत्करली आहे. आजवर ५० टक्के पुरुषांना केंद्रस्थानी मानून राजकारण करणारे पक्ष बघता, पहिल्यांदाच पन्नास टक्के स्त्रियांना केंद्रस्थानी मानून, पण त्यांचे वस्तूकरण न होऊ देता किंवा निव्वळ मतांसाठी हजार बाराशे ची खैरात न करता ‘स्त्रीप्रतिष्ठा’ केंद्रीभूत म्हणून केलेला हा प्रयत्न सुखावणारा आणि आश्वासक आहे. ज्या चर्चा आम्ही फक्त सामाजिक चळवळीच्या मंचावरून ऐकतो, त्या चर्चा काल एका मुख्य प्रवाहातल्या राजकीय पक्षाच्या मुख्य नेत्याने विशेषतः संसदीय राजकारणातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याने मांडाव्यात, हे भारतीय राजकारणाच्या नव्या बदलाचं पहिलं पाऊल आहे…
या सगळ्यांचं मला साक्षीदार होता आलं हे प्रचंड भारी आहे. यामुळे अनेकांचा पोटशूळ सुद्धा उठू शकतो. कदाचित मी आरएसएसच्या मंचावर दिसले असते तर हे सगळे आळी मिळी गुप चिळी करून बसले असते. काही लोक भाजपला खोटा खोटा विरोध करतात आणि खुष्कीच्या मार्गाने आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, तेव्हा भाजपा आणि त्यांचे लावारिस भक्त गालात खुदुखुदू हसत असतात. पण स्त्रियांच्या आत्मप्रतिष्ठेच्या संदर्भात चर्चा करणारा एखादा कार्यक्रम असेल आणि त्यात पक्षीय राजकारण न आणता जर स्त्रिया सामील होत असतील, तर मात्र पत्रकारितेत फार चमक न दाखवू शकणारे अनेक जण, भाजपच्या तुकड्यांवर युट्युब चॅनल चालवून रात्रंदिवस भाजपची खुशामत करून पोट भरणारे, काथ्यकूट करणारे लावारिस पेड ट्रोलर मात्र जोरदार पद्धतीने रोजगार कमावण्याच्या कामाला लागतात… चालू राहू द्या लेकाहो…
पण कालच वाक्य फार महत्त्वाचा आहे… पुणे म्हणजे प्रेम… प्रेम म्हणजे राहुल… राहुल म्हणजे भारताचे भविष्य…
(लेखिका उपनेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
