फेसबुकसमोर आता मोठे संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेतील 50 पैकी 46 राज्यांनी फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे. या खटल्यात फेसबुकचा पराभव झाल्यास फेसबुकला व्हॉट्सऍप आणि इंस्टाग्राम विकावे लागणार आहेत. या राज्यांनी फेसबुकविरोधात अयोग्य प्रकारे व्यापार केल्याचा आणि गैरमार्गाचा वापर करत स्पर्धकांना संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अमेरिकेतील संघीय व्यापार आयोग आणि 50 पैकी 46 राज्यांना फेसबुकविरोधात एकत्रितपणे हा खटला दाखल केला आहे. या खटल्यास पराभव झाल्यास फेसबुकला कंपनीचे विभाजन करून कंपनीचे लहान भाग करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सऍप, इंस्टाग्रामसह इतर मालमत्ताही कंपनीला विकावी लागणार आहे. याबाबतचा खटला न्यायालयात लवकरच सुरू होणार आहे.
फेसबुकने व्यापार क्षेत्रात निकोप स्पर्धा करण्याऐवजी स्पर्धकांच्या कंपन्या विकत घेत किंवा त्यांना गैरमार्गाने संपवण्याचे धोरण राबवल्याचा आरोप कंपनीविरोधात करण्यात आला आहे. कंपनीविरोधात बुधवारी दोन खटले दाखल झाले. फेसबुक बाजारात स्पर्धा करण्याऐवजी स्पर्धकांच्या कंपन्या विकत घेत असल्याचा प्रमुख आरोप बुधवारी दाखल केलेल्या खटल्यात करण्यात आला आहे. 2012 मध्ये फोटो शेअरिंग अॅप 1 अब्ज डॉलरमध्ये फेसबुकने विकत घेतले. तर 2014 मध्ये 19 अब्ज डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेण्यात आले. कंपनीने हे सर्व यूजरच्या पैशांतून खरेदी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अमेरिकेत अशा खटल्याचा मुकाबला करणारी गुगलनंतरची फेसबुक ही दुसरी मोठी तंत्रज्ञान कंपनी ठरली आहे. अमेरिकेतील न्याय विभागाने ऑक्टोबर महिन्यात गूगलविरोधात खटला दाखल केला होता. बाजारातील आपल्या एकाधिकारशाहीचा गैरवापर करत स्पर्धकांवर नियंत्रण मिळवण्याचे किंवा त्यांना संपवण्याचे धोरण गूगल राबवत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
विशेष म्हणजे या खटल्याच्या निमित्ताने अमेरिकेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात सर्वसहमती असल्याचे दिसत आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या व्यापार धोरणावर नियंत्रण असावे आणि या कंपन्यांची जबाबदारी निश्चित करावी, असे मत व्यक्त होत आहे. याबाबत ट्रम्प प्रशासन आणि डेमोक्रेटिक पक्षामध्येही एकवाक्यता आहे. गूगल आणि फेसबुकचे विभाजन करून अनेक छोट्या कंपन्या बनवण्यात याव्यात, असे मत अनेक खासदारांनी व्यक्त केले आहे. या खटल्यामुळे आता फेसबुकसमोर संकट उभे ठाकले आहे.
सौजन्य- सामना