• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ठाणेकर जागे होणार का?

प्रशांत सिनकर निसर्गायन

Marmik Team by Marmik Team
August 21, 2026
in निसर्गायण
0
ठाणेकर जागे होणार का?

जंगलाला आग लागते तेव्हा सर्वात आधी पक्ष्यांची घरटी जळतात; पण धूर मात्र संपूर्ण आकाश व्यापतो. विकासाच्याही आगीचे तसेच असते. सुरुवातीला काही झाडे पडतात, नंतर मातीचा श्वास हरवतो, त्यानंतर पावसाचे पाणी वाहून जाते, पक्ष्यांचे आवाज विरून जातात आणि शेवटी शहराच्या विकासाच्या बदल्यात निसर्गाची शांतपणे अंत्ययात्रा निघते. प्रश्न एवढाच आहे की, आपण ही अंत्ययात्रा मूकपणे पाहणार आहोत की योग्य वेळी प्रश्न विचारणार आहोत?

आज ठाणे शहर एका ऐतिहासिक टप्प्यावर उभे आहे. एका बाजूला स्मार्ट सिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल अर्थव्यवस्थेची मोठी स्वप्ने आहेत; तर दुसर्‍या बाजूला वेगाने कमी होणारी झाडे, वाढणारे काँक्रीटीकरण, बदलते हवामान, उष्णतेच्या लाटा, पावसाचे विस्कळीत चक्र आणि निसर्गापासून दूर जात असलेले शहर आहे. प्रश्न विकासाचा नाही; प्रश्न विकासाच्या दिशेचा आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले. अनेक ठिकाणी वृक्षतोड झाली, काही ठिकाणी झाडांचे स्थलांतर करण्यात आले. विकासासाठी काही प्रमाणात बदल अपरिहार्य असतात; मात्र त्याचवेळी शहराचा पर्यावरणीय समतोल राखणे हे प्रशासन, प्रकल्प राबविणार्‍या कंपन्या आणि समाज या तिघांचीही समान जबाबदारी आहे. कारण झाडे ही केवळ सजावट नसतात. ती शहराची नैसर्गिक वातानुकूलन व्यवस्था असतात. ती भूजल पुनर्भरण करतात, कार्बन शोषतात, पक्ष्यांना आश्रय देतात आणि माणसाला श्वास देतात.

याच पार्श्वभूमीवर ठाण्यात प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पाकडे केवळ औद्योगिक गुंतवणूक म्हणून पाहणे पुरेसे नाही. हा विषय ऊर्जा, पाणी, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि शाश्वत नागरी विकासाशी निगडित आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रश्न विचारणे म्हणजे विकासाला विरोध नव्हे; तर जबाबदार विकासाची मागणी आहे. वेक अप ठाणेकर या सामाजिक संस्थेने उभारलेल्या चळवळीची भूमिकाही हीच आहे की आम्ही डेटा सेंटर, एआय किंवा डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विरोधात नाही, आम्ही विज्ञानविरोधी नाही, आम्ही रोजगारनिर्मितीच्या विरोधात नाही; परंतु कोणताही विकास हा पर्यावरणीय उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि वैज्ञानिक नियोजन यांवर आधारित असावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. डेटा सेंटर म्हणजे फक्त मोठी इमारत नाही. ती हजारो सर्व्हर्स, जीपीयू क्लस्टर्स, स्टोरेज प्रणाली, यूपीएस,
ट्रान्सफॉर्मर्स, नेटवर्क उपकरणे आणि अत्यंत मोठ्या शीतकरण यंत्रणांनी चालणारी, २४ तास कार्यरत असणारी डिजिटल औद्योगिक सुविधा असते. आपल्या मोबाईलवरील यूपीआय व्यवहार, इंटरनेट बँकिंग, एआय, ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि क्लाऊड सेवा याच डेटा सेंटरवर अवलंबून असतात. त्यामुळे अशा सुविधा आवश्यक आहेत, यात वाद नाही. मात्र प्रश्न असा आहे की, एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम कितपत पारदर्शकपणे नागरिकांसमोर ठेवला जात आहे?

प्रस्तावित प्रकल्पासाठी ४२२ मेगावॅट वीज क्षमतेचा उल्लेख आहे. इतक्या मोठ्या ऊर्जेचा किती भाग नवीन स्रोतांतून येणार? कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना असेल? ऊर्जा कार्यक्षमतेची पातळी काय असेल? हे प्रश्न नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे. याचप्रमाणे डेटा सेंटरमध्ये वापरली जाणारी जवळपास सर्व वीज शेवटी उष्णतेत रूपांतरित होते. ही उष्णता बाहेर टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शीतकरण यंत्रणा वापरावी लागते. त्यामुळे स्थानिक तापमान, सूक्ष्म हवामान आणि उष्णता बेट (अर्बन हीट आयलंड) परिणाम यांचा स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास सातत्याने होणे आवश्यक आहे. केवळ प्रारंभिक अहवाल पुरेसा नसून प्रकल्प सुरू झाल्यानंतरही नियमित पर्यावरणीय निरीक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे.

यापुढे प्रश्न आहे झाडांचा. ईआयए अहवालानुसार प्रकल्प परिसरात ९२४ झाडांची नोंद असून त्यापैकी ६५४ झाडांवर परिणाम होणार असल्याचे नमूद आहे. भरपाई वृक्षारोपण हा उपाय असू शकतो; पण तोच अंतिम उपाय नाही. लावलेली रोपे जगली का, त्यांचा तगून राहण्याचा दर किती आहे, त्यांचे स्वतंत्र लेखापरीक्षण झाले का, याची माहितीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण पन्नास वर्षांच्या झाडाची पर्यावरणीय किंमत पन्नास रोपांनी लगेच भरून निघत नाही. तेवढाच महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. डेटा सेंटरमध्ये शीतकरणासाठी पाण्याची आवश्यकता किती असेल, त्याचा स्रोत कोणता असेल, पुनर्वापरित पाण्याचा वापर किती प्रमाणात केला जाणार आहे आणि भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही ना, याबाबत स्पष्ट आणि सार्वजनिक माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. कारण, ठाणे शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूपही बदलत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक थेंबाचे नियोजन महत्त्वाचे ठरते.

डेटा सेंटर प्रकल्पात १९३ डिझेल जनरेटर प्रस्तावित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे जनरेटर मुख्यतः आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाणार असले, तरी त्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या संभाव्य परिणामांबाबत नियमित आणि स्वतंत्र पर्यावरणीय देखरेख आवश्यक ठरते. डिझेल ज्वलनातून नायट्रोजन ऑक्साइड्स, सल्फर डायऑक्साइड, सूक्ष्म कण्ा (पीएम१० आणि पीएम२.५) तसेच कार्बन मोनॉक्साइड यांसारखे प्रदूषक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उत्सर्जन नियंत्रण प्रणाली, ध्वनी नियंत्रण, इंधन साठवण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांची माहितीही सार्वजनिक असावी.

पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन हा कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्यामध्ये हवा, पाणी, ध्वनी, माती, भूजल, जैवविविधता, हवामान आणि परिसरातील विद्यमान पर्यावरणीय स्थितीची नोंद केली जाते. मात्र कोणताही ईआयए अहवाल हा अंतिम सत्य नसतो. तो उपलब्ध माहितीच्या आधारे तयार केलेला अभ्यास असतो. त्यामुळे प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्या अहवालातील गृहितके प्रत्यक्षात कितपत खरी ठरतात, याची सातत्याने पडताळणी होणे तितकेच आवश्यक असल्याचे ‘वेक अप ठाणेकर’चे राजेश कदम यांनी सांगितले. जगभरात अनेक देश डेटा सेंटर उभारत आहेत; पण त्याचवेळी हरित ऊर्जा, सौर आणि पवन ऊर्जेचा वापर, पुनर्वापरित पाणी, कार्बन न्यूट्रल धोरण, ई-कचर्‍याचे सुरक्षित व्यवस्थापन आणि पारदर्शक पर्यावरणीय अहवाल या बाबींनाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. ठाण्यातही अशाच सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब व्हावा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.

आज सर्वात मोठी गरज आहे ती विश्वासाची. नागरिकांना माहिती मिळाली, शंका दूर झाल्या, पर्यावरणीय निरीक्षण सार्वजनिक झाले आणि स्वतंत्र तज्ज्ञांनी वेळोवेळी प्रकल्पाची पडताळणी केली, तर विकासाविषयीचा विश्वास अधिक मजबूत होईल. माहिती लपवली गेली किंवा प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, तर अनावश्यक संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. वेकअप ठाणेकरने सुरुवातीपासूनच संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाशी पत्रव्यवहार, ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा, प्रकल्पाशी संबंधित अधिकृत प्रतिनिधींशी संवाद, लोकप्रतिनिधींना निवेदने आणि नागरिकांमध्ये जनजागृती अशा लोकशाही मार्गांनी हा विषय सातत्याने मांडला जात आहे. आवश्यक असल्यास कायद्याच्या चौकटीत जनहित याचिका आणि रिट याचिकेचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. ही भूमिका विकासविरोधी नसून उत्तरदायी विकासाची मागणी करणारी आहे.

आज ठाणेकरांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. पुढील वीस वर्षांनंतर आपण आपल्या मुलांना कसे शहर देणार आहोत? सावली देणारी झाडे, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाचे पाणी मुरणारी जमीन असलेले ठाणे, की उष्णतेने त्रस्त, काँक्रीटीकरणाने गुदमरलेले आणि नैसर्गिक संतुलन गमावलेले शहर? विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे शत्रू नाहीत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग असेल, तर दोघांमध्ये सुंदर समतोल साधता येतो. प्रश्न डेटा सेंटरचा नाही; प्रश्न त्या विकासाच्या पद्धतीचा आहे. कारण शहरे केवळ काँक्रीट, काच आणि स्टीलने महान होत नाहीत. ती महान होतात त्यांच्या झाडांनी, नद्यांनी, तलावांनी, पक्ष्यांनी, स्वच्छ हवेमुळे आणि पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या नागरिकांमुळे.

आज आपण ज्या झाडाकडे दुर्लक्ष करतो, त्याच झाडाच्या सावलीची गरज उद्या आपल्या मुलांना भासणार आहे. आज आपण ज्या मातीवर काँक्रीट टाकतो, त्याच मातीमध्ये उद्या पावसाचा एक थेंबही मुरणार नाही. आज आपण ज्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतो, त्याच पर्यावरणाचा हिशेब निसर्ग भविष्यात व्याजासह वसूल करतो. म्हणूनच वेकअप ठाणेकर संस्थेचा आग्रह एकच आहे. विकास करा, पण निसर्गाचा श्वास गुदमरू देऊ नका. उद्योग उभारा, पण पर्यावरणाची किंमत लपवू नका. रोजगार निर्माण करा, पण पुढील पिढीचे आरोग्य धोक्यात घालू नका. डेटा सेंटर उभारा, पण त्याचवेळी झाडे, पाणी, हवा, जैवविविधता आणि नागरिकांचा विश्वासही जपा.

Previous Post

जेन झी , जेन अल्फा ‘भाषेचं नवं रूपडं’

Next Post

दिमाग के दुश्मन!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.