• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दिमाग के दुश्मन!

Marmik Team by Marmik Team
August 22, 2026
in इतर
0
दिमाग के दुश्मन!

देशातला सशस्त्र नक्षलवाद आम्ही आटोक्यात आणला आहे. पण अजूनही देशात ‘दिमागी नक्षल’ (वैचारिक नक्षलवादी) शिल्लक आहेत आणि ते युवकांना भरकटवून अराजक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली आणि पाठोपाठ तीन बातम्या पाहण्यात आल्या… एकीकडे उत्तर प्रदेशात भाविकांना विविध धार्मिक कार्यांसाठी दिल्या जाणार्‍या गोमूत्रात अन्य प्राण्यांच्या मूत्राची भेसळ होत असल्याचं उघडकीला आलं… काँग्रेसने ‘वंदे मातरम’चा अपमान केला म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचा कोणी जायस्वाल काँग्रेस कार्यालयावर चालून गेला होता, त्याला स्वत:ला वंदे मातरम नीट गाता येत नाही, हे लक्षात आल्यावर तो परतला… तिसरी बातमी आहे संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान म्हणून उभारण्यात आलेल्या राम मंदिरातल्या दानपेटीवर मारल्या गेलेल्या डल्ल्याची. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर विशेष अन्वेषण पथकाने (एसआयटी) दिलेला अहवाल जनतेसमोर आत्ताच खुला करता येणार नाही, असं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेलं आहे…

…या तिन्ही बातम्या आणि इतरही अनेक बातम्या वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते… ती म्हणजे लोकांनी स्वत:च्या धडावर आधी दिमाग म्हणजे डोकं बाळगलंच पाहिजे आणि ते स्वत:चं डोकं असलं पाहिजे, हे किती गरजेचं आहे, ते या बातम्यांमधून अधोरेखित होते… एकदा आपलं डोकं इतरांकडे सोपवलं की ते त्यात मेंदूच्या जागी डोक्यात कसा गोबर भरतात आणि त्यातून आपण कसे मार्ग सोडून भरकटतो, देश कसा अराजकाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला जातो, याचं दर्शन या बातम्यांमधून घडतं आणि पंतप्रधानांच्या दिव्यदृष्टीबद्दल आदर निर्माण होतो… पण, पंतप्रधान काही त्यांच्याच ‘पारिवारिक’ मालकीच्या, ‘कमजोर-दिमाग’ अंधभक्त घडवण्याच्या फॅक्टरीबद्दल बोलत नव्हते… ते कुणाबद्दल बोलत होते, तेही त्याच दिवशी उघड झालं… उत्तरादाखल स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावरच सोशल मीडियावर ‘दिमागी नक्षल’ जनता पार्टी स्थापन झाली, मग त्या पेजला रिपोर्ट करणं, ते हटवण्याचा प्रयत्न केला जाणं आणि त्या पेजला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळणं, हे सगळं सालाबादप्रमाणे पुन्हा सुरू झालं… सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगारांना कॉक्रोच असं संबोधून कॉक्रोज जनता पार्टीची चळवळ जन्माला घातली आणि जंतर मंतरवर जेन झी पिढीने केलेल्या प्रखर आंदोलनाचे चटके मोदी सरकारला सहन करावे लागले. खुद्द मोदींना इन्स्टाग्राम या तरुणाईच्या माध्यमावर अवतीर्ण होऊन त्यांना फ्रेंड्स म्हणून साद घालावी लागली. पण यातून ते काही शिकले आहेत असं दिसत नाही.

भाजपला, संघ परिवाराला, त्यांच्या संविधानद्रोही, लोकशाहीविरोधी कुरापतींना विरोध करणार्‍यांची नालस्ती करण्यासाठी मोदींनी काहीतरी परवलीचा शब्द द्यावा, त्यांच्या पगारी, बिनपगारी ‘बददिमाग’ चौकीदारांनी, ‘दक्ष’लवादी फुकट फौजदारांनी तो शब्द देशभर गाजवत ठेवावा आणि भावभक्तीत रमलेल्या ‘दिमागमुक्त’ अंकल लोकांनी त्यावर माना डोलावाव्यात, हा काळ जंतर मंतरवर ‘जंतर मंतर’ झाल्यानंतर इतिहासात जमा झालेला आहे… आता आपल्याला मुद्द्यांवर विरोध करणार्‍यांना उत्तर द्यायला लागेल, नाहीतर तोच शब्द उचलून जेन झी तरुणाई आपल्याला पळता भुई थोडी करेल, याचे भान मोदींसारख्या मुरब्बी राजकारण्याला ‘इन्स्टाग्राम’वरच्या कमेंट्स वाचल्यानंतर तरी यायला हवे होते. तसे ते आल्याचे दिसत नाही.

मुळात स्वातंत्र्यदिन हा एक साजरा करायचा दिवस. पण, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात शून्य सहभाग असलेल्या संघटनेचा पाईक असलेले मोदी देशाच्या पंतप्रधानपदावरूनही तोच शून्याचा वारसा गिरवताना दिसतात. या दिवसाला अपशकुन करण्यासाठी मुद्दाम देशभर देशाच्या फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराची चित्रं ठळक करून कसला तरी अवजड संस्कृत नावाचा दिवस पाळायचा, फाळणी घडवून आणणार्‍यांबरोबर आपलेच वैचारिक पूर्वज सत्तेत होते, हे मात्र सांगायचं नाही, हे सगळे प्रकार त्यांचा परिवार करत असतोच. त्याबरोबर पंतप्रधानही लाल किल्ल्यावरून विरोधकांच्या नावाने सतत बोटं मोडण्याची प्रचारकी संधी साधत असतात. या पदाची गरिमा आणि त्याबद्दलचे संकेत पायदळी तुडवत असतात.

यंदाही त्यांनी तेच केलं. त्यांच्या अनुयायांना खेळवायला एक शब्दप्रयोग दिला… दिमागी नक्षल. भाजप सरकारच्या संविधानविरोधी उपद्व्यापांना जे विरोध करतील, त्यांच्यावर माओवादी, अर्बन नक्षल वगैरे शिक्के मारले जातच होते, आता त्यापुढचा नवा शिक्का आला… दिमागी नक्षल. पंतप्रधानांच्या लक्षात यायला हवे की त्यांच्या दुर्दैवाने जेन झी पिढीमध्ये पंतप्रधानांच्या मातृपरिवाराला धर्मांधतेचं गोबर भरता येईल, अशी रिकामी डोकी नाहीत, त्यांच्याकडे स्वत:चं दिमाग म्हणजे डोकं आहे, ते ताळ्यावर आहे आणि त्यात आता सत्ताधीशांच्या विरोधात राग साचलेला आहे. तो मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या अजोड कामगिरीमुळेच निर्माण झालेला आहे. ना नोकर्‍या, ना शिक्षण, ना भविष्याची खात्री, ना उत्तम दर्जाचं आयुष्य- अशी त्यांची दिशाहीन अवस्था मोदींच्याच धोरणांमधून झालेली आहे. दोन उद्योगपतींच्या घशात देश घातला जातो आहे, त्यात पर्यावरणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत सगळ्याचा सत्यानाश होतो आहे, सरकारच इंधनात भेसळ करून नप्ाâेखोरी करतंय, सगळीकडे खड्डे, कोसळणारे पूल, उखडणारे रस्ते आणि चराचरात भरलेली सिमेंटची धूळ हा या सरकारने घडवून आणलेला भंपक विकास आहे, हे त्यांच्या डोळ्यांना उघडपणे दिसते आहे. धर्माचे तुणतुणे वाजवून आणि दोन धर्मांत, दोन जातींत, शक्य तिथे सर्व प्रकारची फूट पाडून सत्तेत आलेल्या भाजपकडे देशाच्या विकासाचा कोणताही रोडमॅप नाही, त्यांच्याकडे कोणतंही आर्थिक धोरण नाही, कारण या सगळ्यासाठी आवश्यक ‘दिमाग’ विकसित करण्याची त्यांच्या मातृपरिवारात पद्धतच नाही, हे आता उघड झालेलं आहे.

पंतप्रधान महोदय दिमागी नक्षल म्हणून ज्यांना हिणवत आहेत, त्यांच्याकडे मुळात डोकं आहे आणि त्यात विचार करणारा मेंदू आहे, याचंच त्यांना सर्वात मोठं भय आहे. ही पिढी आता तुमच्या भुलाव्यांना भुलणार नाही, तुम्ही त्यांच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर तुम्हाला पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांना हिणवून, डिवचून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका… एवढे तरी दिमाग बाळगा!

Previous Post

ठाणेकर जागे होणार का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.