
आयुष्यामध्ये कधी असा दिवस उजाडतो की आनंदाचा बहर घेऊन येतो. पण एखादा दिवस असा येतो की दु:खद जळमट घेऊन येतो आणि तीच जळमटे प्रामुख्याने मनात ठाण मांडून बसतात व कायम मनाला चटका लावतात.
मला मुंबईला नोकरीला लागून ५-६ वर्षे झाली होती. साल १९६१ होते. माझे कुटुंब आई, भाऊ, बहिणी वडिलांच्या बदलीनंतर पुण्यात राहात होते. दोन खोल्यांची जागा लहान जरी असली तरी मोक्याच्या जागी आणि मुख्य म्हणजे चांगल्या वसाहतीत होती. वडील निवर्तल्यावर संसार चालू ठेवण्याची जबाबदारी आली. मोठा भाऊ एकटा कमावता म्हणून मला आणि धाकट्या भावाला नोकरी शोधणे भाग पडले. आमची मुंबईची शिवाजी पार्क, दादरजवळील जागा न सोडल्यामुळे मी मुंबईत नोकरीला आलो. धाकट्या भावाला पुण्यात नोकरी मिळाली. त्यामुळे मुंबई-पुण्याला सतत ये-जा असायची.
१२ जुलै १९६१ रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेलो. एकच्या सुमारास बॉसने मला बोलावले आणि म्हणाला, अरे, तुझ्या घरचे सर्व पुण्यात असतात ना? तुला कळले आहे का पुण्यात काय झाले आहे? अतिवृष्टीमुळे पुण्यातील पानशेत येथील मातीचे धरण फोडून पाणी पुण्यात घुसले आहे आणि नदीकाठच्या भाग घरांसकट वाहून जात आहे. हाहा:कार माजला आहे, अशी वायरलेसवर बातमी आली आहे. लोक जीव वाचवण्याकरिता धडपडत आहेत. पाण्याचा जोर जिमखाना, ओंकारेश्वरांत जास्त आहे. पाण्याची पातळी वाढत आहे. तू ताबडतोब पुण्यास जा. मीही माझ्या लोकांना पाहायला जातोय.
माझ्याच शाखेतला माझा सहकारी कुलकर्णी याचे सासर पुण्यालाच होते. त्यांनाही हे सांगितले आणि आम्ही दोघांनी लगेच ऑफिस सोडले आणि आम्ही पुण्याला जायच्या तयारीला लागलो. घरी असलेल्या धाकट्या बहिणीला परिस्थिती सांगितली. पुरामुळे होत्याचे नव्हते झाले होते… त्यामुळे काडेपेटीपासून ते कणीक, तांदूळ, मेणबत्त्या असा दोन ते तीन दिवस पुरेल इतका किरणा विकत घेतला.
बॅग चांगलीच जड झाली होती. ती जड बॅग घेऊन मित्राने आणि मी दादर स्टेशनहून त्यावेळी दुपारी साडेतीन वाजता सुटणारी जनता एक्सप्रेस पकडली. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजीनगरला पोहोचलो. तिथून रिक्षा पकडून आधी मित्राच्या घरी आलो. सुदैवाने त्यांचे घर उंचावर असल्याने ते सुखरूप होते. त्याच्या घरी चहापान करून आम्ही दोघेजण आमच्या घराकडे निघालो. माझ्याकडचे सामान जड असल्यामुळे त्याची दोघांमध्ये विभागणी करून घेतली.

सर्वत्र काळोख होता. रस्त्यावर एक लाईट नव्हता. स्मशानशांतता जाणवली. रात्रीचे साडेआठ वाजले होते. संभाजी पार्कसमोरील घोले रोड कॉर्नरला आलो. तिथून जायला लागलो तर पाऊल जवळपास फूटभर खोल चिखलात गेले. त्या चिखलातून पाऊल उचलणं जड झाले. आमची हालचाल ऐकून एक मिलीटरी जवान पुढे आला आणि म्हणाला, ‘काय राव, रात्री अशी परिस्थिती, कुठे निघालात?’ आम्ही त्याला सांगितले, ‘बाबा आम्ही आता मुंबईहून आलोय. आमच्या लोकांना शोधतोय.’ तो म्हणाला, ‘पुढचा सर्व भाग चिखलाने भरलाय. तुम्हाला तिथून चालताही येणार नाही. पुराबरोबर साप, मगरी वाहून आल्या आहेत. वाटेत गाड्या, स्कूटर, लोकांचं घरातून वाहत आलेलं सामान देखील त्या चिखलात रुतलं आहे. पाणी ओसरलं असलं तरी चिखल आहे. त्यामुळे मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. कृपा करून माघारी जा. सकाळी या.’ त्यानंतर आम्ही मागे फिरलो.
दुसर्या दिवशी आम्ही सकाळी नऊ वाजता पुन्हा तिथं गेलो. सुदैवानं चिखल सुकला होता. मात्र संपूर्ण वातावरणात भकासपणा जाणवत होता. रस्त्यावर तुरळक प्रमाणात लोक होते. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं असल्यानं तिथपर्यंत चिखलाच्या खुणा दिसत होत्या. रस्त्यावर काही ठिकाणी चिखल ओला होता, त्यामुळे त्यातून चालणे मोठे जिकिरीचं होतं. जो रस्ता एरवी १५ ते २० मिनिटांत पार केला जायचा, तिथेच चालायला दोन ते अडीच तास लागले. आमची जागा तळमजल्यावर होती. कपाऊंडमध्ये गेलो तर खिडक्या बंद होत्या. प्रवेशद्वाराजवळ खूप चिखल साचला होता. त्या चिखलात सायकली रुतून बसल्या होत्या. घरातील सामानसुमान विखरून पडले होते. आमचे घर बंद होते आणि त्याला कुलूप लावले होते. आजुबाजूला कुणी ओळखीचे दिसेना. सगळीकडे शुकशुकाट आणि भयाण शांतता होती.
तिथून निघालो आणि भांडारकर रोडवर आलो. तिथून वर जाणार्या रस्त्याला लागलो. पुराचे अंश पुढे साने डेअरीपर्यंत दिसत होते. मात्र त्यानंतरचा पुढे उंचावर जाणारा रस्ता कोरडा दिसत होता. तिथेच पुढे आमचे नातलग रहायचे ते मला आठवले आणि तिथे गेलो. तिथे गेल्यावर त्या नात्यातल्या काकू भेटल्या. त्या म्हणाल्या, ‘तुझी घरची सर्व मंडळी सुखरूप आहेत. काल संध्याकाळी आमच्याकडे आली. आज सकाळीच रेल्वेने तुझ्या घरी गेली. नेसत्या कपड्यानिशी…’ मी त्यांना विचारले, ‘त्यांच्याकडे एवढे पैसे होते का?’ त्यावर काकू हसत म्हणाल्या, ‘अरे तुझी आई हुशार आहे. पुराचं पाणी शहरात शिरल्यावर घरातल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी स्वयंसेवक फिरू लागले. ते तुमच्या घरी गेले आणि तुझ्या आईला आणि बहिणीला बाहेर काढू लागले. तेव्हा आईने तुझ्या बहिणीला घराच्या सर्व खिडक्या बंद करायला सांगितल्या. त्यानंतर साठवलेले पैसे कनवटीला लावले आणि घराला कुलूप घालून मगच ती बाहेर पडली. दोघी जीव मुठीत धरून पळत होत्या. त्यांच्यामागून पाण्याचा लोंढ वेगानं येत होता. जिवाच्या करारानं त्या दोघी पळत साने डेअरीपर्यंत आल्या. सुदैवाने तिथे त्यांना पिंपरीहून आलेले तुझे भाऊ भेटले. त्यावेळी मात्र पुराच्या पाण्यानं होत्याचं नव्हतं करून टाकलं… हिंदविजय टॉकीज अर्धे पाण्यात गेले होते. त्या मार्गावरील अनेक बंगल्यांत पाणी शिरल्याने बंगल्यांतील लोक गच्चीवरून मदतीसाठी हाका मारत होते. कॅफे गुडलक, लकी हॉटेल देखील पाण्यात होते.’ हे सर्व ऐकल्यानंतर माझ्या जीवात जीव आला आणि तिथून परत निघालो.

आम्ही तिथून निघालो. लकी हॉटेलवरून संभाजी पुलाकडे (लकडी पूल) गेलो. तिथून पाहिलं तर काळजाचा ठोका चुकला… कारण सर्व काही उद्ध्वस्त झालेलं दिसत होतं. दुकानातले, घरातले सामान रस्त्यावर विखुरले होते. सगळीकडे कुजल्याचा वास येत होता. तिथं काही लोकांशी बोलल्यावर कळलं की, त्यांचा नेहमीचा अंडीवाला, रस्त्यावर लिंब विकत फिरणारा मुलगा, भाजी विकणारी एक म्हातारी पुराच्या पाण्यातून वाहून गेली. हे ऐकल्यावर वाईट वाटलं. पुढे पुलाजवळ आलो तर भयंकर दृश्य दिसले. ज्या पुलावरून कित्येक वर्षे आम्ही ये-जा करायचो तो रस्ता नदीच्या पात्रात गलितगात्र होऊन पडला होता. नदीपात्रात खांब, दगडी कमानी उन्मळून पडल्या होत्या. पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे नारायण पेठेचा संपर्क तुटला होता.
तिथे उभा असताना कॉलेजमधला एक मित्र अरविंद सोमण याची आठवण आली. मी मुंबईला गेल्यामुळे आमचा संपर्क कमी झाला होता. अरविंद पुलाच्या वाडीत राहायचा. त्याची आठवण आल्यानं मी त्याच्या घराकडे गेलो. तिथं गेल्यावर सगळं काही उद्ध्वस्त झालेलं दिसलं. त्याच्या घराच्या शेजारी असलेला पटवर्धन वाडा आणि त्याच्या पुढे असलेले काही वाडे पडले होते. तिथं काही लोक सामान शोधत होते. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की सोमण आणि पटवर्धन मंडळी एकमेकांचे हात धरून पुराच्या पाण्यातून जात होते. काय झालं समजलं नाही. पण ते सगळेजण नदीच्या पात्रात वाहून जाताना दिसले. पुढेच काही कळले नाही… हे ऐकल्यावर मी हादरून गेलो. सुन्न मनाने मी परत जायला निघालो.
आम्ही संभाजी पार्कसमोरच्या फुटपाथवर आलो तेव्हा तिथं राहणार्या माझ्या आतेबहिणीची, पमा टिपणीसची आठवण आली. पमा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांची मुलगी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सख्खी बहीण. तिच्या घराजवळ गेलो तर ती दारात उभी दिसली. तिला पाहून मला बरे वाटले. तिची चौकशी करू लागलो तेव्हा ती हमसूहमसून रडत म्हणाली, ‘अरे, माझा सर्व संसार वाहून गेला रे! नदीचे पाणी इतके जोरात आले की आवरायला वेळच मिळाला नाही. आम्ही तसेच घर उघडे टाकून वरच्या मजल्यावर गेलो. इतका मोठा पूर येईल, याची कल्पनाच नव्हती. वरून आम्ही सर्व काही बघत होतो. पुराच्या पाण्यात घरातील एक एक वस्तू वाहून जाताना आम्ही हताशपणे बघत होतो. पाणी ओसरल्यावर खाली आलो. त्यानंतर म्युनिसिपालटीवाल्यांनी दोनदा थोडा चिवडा आणि पांचट चहा तेवढा दिला. बाकी काही नाही. कालपासून आम्ही उपाशी आहोत.’ तिचे हे बोलणे ऐकल्यावर मला गलबलून आले. मी तिला म्हणालो, ‘पमाताई, काही काळजी नको करूस. मुंबईहून येताना घरच्यांसाठी किराणा सामान घेऊ आलो होतो. परंतु ते सर्वजण कालच मुंबईला गेले. त्यामुळे माझ्याकडचे किराणा सामान तू ठेवून घे. हे सामान तुला किमान दोन ते तीन दिवस पुरेल… काही काळजी करू नकोस.’ माझं हे बोलणं ऐकून तिचे आणि तिच्या घरच्या सर्व मंडळींचे डोळे भरून आले.

तिथून बाहेर पडलो आणि मित्राला म्हणालो, ’आपण ससून हॉस्पिटलमध्ये चक्कर मारून तिथली परिस्थिती बघून येऊ… तिथे कुणाला काही मदत करता येते का ते बघू या.’ त्याने होकार दिल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी होती. शोकाकुल अवस्थेत असलेले अनेकजण त्यांच्या आप्तस्वकीयांचा शोध घेत तिथं आले होते. हॉस्पिटलमध्ये कमालीची दुर्गंधी पसरली होती. शवागारात चिखलाने माखलेले अनेक मृतदेह होते. शवागारात जागा नसल्याने काही मृतदेह बाहेर ठेवले होते. मृतदेहांचे चेहरे इतके चिखलाने माखले होते की ते ओळखताही येत नव्हते. ते बघत पुढे जात होतो तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण त्या मृतदेहांमध्ये माझा मित्र अरविंदा सोमण याच्या शेजारी राहणारे पटवर्धन पती-पत्नी होते. पुराच्या पाण्यातून एकमेकांचा हात धरून चालत जात असताना ते वाहून गेले. मात्र त्या दोघांनी एकमेकांचा हात मात्र अखेरपर्यंत सोडला नव्हता. ते पाहून मला खूप वाईट वाटले. मी सुन्न होऊन तिथं उभा असताना तिथं डॉक्टर आले.
हॉस्पिटलच्या कर्मचार्यांना म्हणाले, ‘मृतदेह सडत चालले आहेत. आजचा एक दिवस थांबून कुणी नातेवाईक येतं का याची वाट पाहू. अन्यथा उद्या बेवारस अशी नोंद करून या मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवून देऊ.’ ते ऐकल्यावर मी डॉक्टरांना म्हणालो, ‘अहो डॉक्टर. हे हातात हात घातलेल्या आजी-आजोबांना मी ओळखतो.’ त्यानंतर डॉक्टरांना मी पटवर्धन आजी-आजोबांची सर्व माहिती दिली आणि त्यांना म्हणालो,’ त्यांची बेवारसांच्या यादीत नावे घालू नका. मी त्यांचा नातेवाईक आहे, असं समजून ते मृतदेह माझ्या ताब्यात द्या. पुढे अंत्यंसस्कार मी करतो.’ त्या भल्या डॉक्टरांनी माझी पूर्ण माहिती घेतली आणि मला पटवर्धन आजी-आजोबांवर अंत्यंसंस्कार करण्याची परवानगी दिली. त्यानंतर या आजी-आजोबांवर ओंकारेश्वरला नेऊन क्रियाकर्म केले.
त्यानंतर विमनस्क अवस्थेत मित्राच्या घरी आलो. माझा मित्र अरविंद सोमण आणि पटवर्धनांची नात निशा यांचा मात्र काहीच थांगपत्ता लागला नाही. पानशेतच्या धरणफुटीनंतर पुण्याची कमालीची वाताहात झाली. पुण्यातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आयुक्त स.गो. बर्वे यांनी खूप मेहनत घेतली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. पुण्याचं मूळ वैभव परत आणण्यासाठी वाट्टेल ते करा, असे आदेश त्यांनी अधिकार्यांना दिले होते. त्यासाठी नेहरूंनी भरघोस आर्थिक मदत दिली. वाचनाची आवड असलेल्या नेहरूंनी आपल्या या पुणे भेटीवेळी जिमखान्यावरच्या इंटरनॅशनल बुक हाऊसला भेट दिली आणि तिथं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि ते पुन्हा उभारण्यासाठी मदत देखील जाहीर केली. आणि खरोखरच काही महिन्यांतच पूर्वीच्या संभाजी पुलासारखाच नवा पूल बांधण्यात आला. हा पूल पडल्यामुळे शहराचे दोन भाग झाले होते, ते पुन्हा सांधले गेले… पानशेतचे धरण फुटल्यामुळे झालेल्या वाताहतीचा मागमूस हळूहळू कमी होत गेला आणि पुणे पुन्हा स्थिरावले…

