• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उच्च कामगिरी केंद्र की रुग्णालय?

प्रशांत केणी खेळियाड

Marmik Team by Marmik Team
August 21, 2026
in खेळियाड
0
उच्च कामगिरी केंद्र की रुग्णालय?

देशातले १३ क्रिकेटपटू सध्या बेंगळुरूमधील उच्च कामगिरी केंद्रात उपचार घेऊन पुनर्वसन करीत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेप्रसंगी बुमरा आणि साई सुदर्शन यांचा या केंद्राने प्रमाणित केलेला फिटनेस वादात सापडला. त्यामुळे उच्च कामगिरी केंद्राकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय…

 

भारतीय संघाचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारे एकंदर १३ खेळाडू सध्या दुखापतींशी झुंजत आहेत. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याच्या काही दिवस आधी जसप्रीत बुमरा आणि साई सुदर्शन खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झालं. मग बुमरा आणि साई सुदर्शनची भारतीय संघात निवड करण्याची घाई का करण्यात आली? त्यांना तंदुरुस्त का ठरवण्यात आलं? गेल्या काही वर्षांत असं वारंवार का घडतंय? हे प्रश्न सर्वांना पडू लागताच बेंगळुरूत तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्याचं नाट्य उत्तमपणे वठवण्यात आलं. सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) म्हणजेच उच्च कामगिरी केंद्राचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजित सैकिया यांनी येथील कार्य कसं चोख चाललंय, याची ग्वाही दिली.

भारतीय संघ जाहीर झाला, तेव्हा बुमरा आणि साईच्या नावापुढे तारांकित चिन्ह ‘ङ’ दर्शवलं होतं आणि खाली कंसात ‘तंदुरुस्तीवर अवलंबून’ असं त्याचा अर्थ मांडला होता, ही माहिती लक्ष्मणनं दिली; पण संघनिवड आणि प्रत्यक्ष सामना यामधील अंतर तीन-चार आठवड्यांचं होतं. या कालावधीत खेळाडू सज्ज होईल, अशी अपेक्षा होती. मग ‘बीसीसीआय’नं केलेली ही सारवासारव खरंच पटण्याजोगी होती का?

मार्च २०२५मध्ये क्रीडा विज्ञान प्रमुख नितीन पटेल यांनी राजीनामा दिला. हे पद अजूनही रिक्त आहे. त्या दर्जाचा व्यक्ती न सापडल्यामुळे पद भरले गेले नाही, असं कारण सैकिया यांनी दिलं. ह्या पदासाठी अँड्यू लेपस ही ‘बीसीसीसीआय’ची पहिली पसंती होती; पण लेपस यांनी हा प्रस्ताव नाकारला. ह्या पदाच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया चालू आहे, असं सांगण्यात येतं. वस्तुस्थिती अशी की जेव्हा राहुल द्रविड उच्च कामगिरी केंद्रात कार्यरत होते. तेव्हा हे केंद्र, भारतीय संघ व्यवस्थापन आणि वैद्यकीय विभाग या तिघांचा उत्तम समन्वय होता. प्रत्येक खेळाडूसाठी कृती आराखडा बनवला जायचा. त्यामुळेच क्रिकेटपटूंचं कार्यभार व्यवस्थापन उत्तम होतं. पण सध्याच्या कार्यरचनेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वेगवान गोलंदाज हर्षित राणा, फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना तंदुरुस्त ठरवण्याची घाई अंगलट आली. कारण काही दिवसांतच दुखापतींनी पुन्हा डोकं वर काढल्यानं त्यांना बेंगळुरूत परतावं लागलं. संघ व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार त्यांना संघात निवडण्यात आल्याचं उच्च कामगिरी केंद्राकडून विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून मांडण्यात आलं.

दुखापती हा कोणत्याही क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. क्रिकेटमधील एका सर्वेक्षणानुसार, ४१.३ टक्के दुखापती गोलंदाजी करताना, २८.६ टक्के क्षेत्ररक्षण किंवा यष्टीरक्षण करताना आणि ३०.१ टक्के फलंदाजी किंवा सराव करताना होतात. क्रिकेटमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारांत दुखापतींचं वर्गीकरण केलं जातं. शरीराच्या वरील भागात डोकं, खांदा, कोपर आणि हात हे अवयव येतात. दुसरा भाग पोट, छाती, पाठ आणि कंबरेचा असतो, तर तिसर्‍या भागात गुडघा, पोटरी, घोटा, मांडी हे पायाचे अवयव येतात. आता या दुखापती कशा झाल्या, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. यापैकी काही मैदानी आहेत, काही सराव करताना झालेल्या आहेत, तर काही खेळाच्या ताणामुळे होतात. यापैकी पहिल्या दोन प्रकाराच्या दुखापती टाळता येत नाहीत. खेळाच्या ताणावर मात्र कार्यभार व्यवस्थापन हा उपाय आहे. सध्या बुमरा, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, हर्षित, वरुण, सुंदर, नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप हे खेळाडू पुनरागमनाच्या निर्धारानं दुखापतीतून सावरत आहेत. याशिवाय रियान पराग, सुयश शर्मा, अशोक शर्मा, हिमांशू सिंग आणि युधवीर सिंग ह्या दुसर्‍या फळीतल्या खेळाडूंचीसुद्धा पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे.

ऑगस्ट महिना चालू असताना ह्या एवढ्या दुखापती कशा झाल्या? यापैकी बहुतांश दुखापती ‘आयपीएल’च्या आहेत. बर्‍याचशा खेळाडूंनी दुखापती असतानाही लीग पूर्ण केली. त्यामुळे आता त्यांना त्यातून सावरण्यासाठी वेळ मिळालाय. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं चांगली बाब ही की, ‘आयपीएल’नंतर इंग्लंड वगळता आपण बहुतांश दुबळ्या संघांशी सामने खेळतोय. त्यामुळे त्याची मोठी चर्चा होऊ दिली नाही. इथेही निकाल समाधानकारक नव्हते, हे मात्र अर्थातच निराशाजनक आहे.

कर्नाटकची राजधानी बेंगळूरुचं क्रिकेट वैभव मानल्या जाणार्‍या एम. चिन्नास्वामी स्टेडियमपाशी २०००मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच ‘एनसीए’ अस्तित्वात आली. ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांची ही संकल्पना. त्यावेळी वासू परांजपे आणि रॉजर बिन्नी यांच्याकडे ह्या अकादमीचं संचालकपद होतं. भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देणं म्हणजेच हिर्‍याला पैलू पाडणं, हे त्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. त्याच उद्देशानं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ आण्िा इंग्लंड क्रिकेट मंडळाशी करार करून तज्ज्ञांच्या मदतीनं त्याचं उच्च कामगिरी केंद्रात रूपांतर करण्याचेही ‘बीसीसीआय’नं प्रयत्न केले. ऑस्ट्रेलिया-भारत परिषदेकडून बॉर्डर-गावस्कर शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. देशातून वेगवान गोलंदाज घडावे, यासाठी एमआरएफ पेस फाऊंडेशनचं कार्यसुद्धा ‘एनसीए’द्वारेच चालायचं. महेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग, झहीर खान, मुरली कार्तिक, पार्थिव पटेल, मोहम्मद वैâफ, चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे अनेक क्रिकेटपटू हे ‘एनसीए’च्या शोधमोहिमेतून भारताला मिळाले आहेत. कालांतरानं ‘बीसीसीआय’नं ‘एनसीए’चं तंदुरुस्ती प्रमाणपत्र बंधनकारक केल्यानंतर हळुहळू ते मूळ उद्देशापासून दूर जाऊ लागलं. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेटपटूला दुखापत झाली की त्यातून सावरण्यासाठी त्याला ‘एनसीए’शिवाय पर्यायच उरला नाही.

दुखापतीसंदर्भात ‘एनसीए’ची विश्वासार्हता सुरुवातीला विश्वसनीय होती. परंतु मधल्या काही वर्षांतील दुखापती पुनर्वसनामुळे क्रिकेटपटूंना तिथे जायचं दडपण येऊ लागलं आहे. २०१८मध्ये यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा खांद्याच्या दुखापतीमुळे ‘एनसीए’त दाखल झाला. पण त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. या गोंधळामुळे त्याच्या कारकीर्दीचं मोठं नुकसान झालं. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला २०१९च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान डाव्या मांडीला दुखापत झाली होती. त्यानंतर १०० टक्के तंदुरुस्तीच्या उद्देशानं त्यानं ‘एनसीए’त मार्गदर्शन घेतलं. परंतु वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर दोनच सामन्यांत त्याला हर्नियाचं निदान झालं. या प्रकरणांमुळे काही खेळाडूंनी दुखापतीनंतर पुनर्वसनासाठी ‘एनसीए’त जाण्यास नकार दिला होता. २०२०-२१च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला. पण त्या दौर्‍यात ११ तंदुरुस्त खेळाडूंची निवड करताना भारताची तारांबळ उडाली होती. त्यावेळीही ‘एनसीए’ टीकेच्या केंद्रस्थानी होतं.

सप्टेंबर २०२४मध्ये ‘बीसीसीआय’नं बेंगळुरू विमानतळानजीक उच्च कामगिरी केंद्र सुरू केलं. ह्या अत्याधुनिक केंद्रात ‘एनसीए’चंच कार्य दुखापतींनंतरचं पुनर्वसन, दुखापतींचं व्यवस्थापन आणि क्रीडा विज्ञान सुधारित स्वरूपात साकारण्यात आलं. तूर्तास, उच्च कामगिरी केंद्राकडून तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय खेळाडूला भारतीय संघात परतता येत नाही, म्हणूनच ह्या केंद्राची आवश्यकता अपरिहार्य आहे.

या केंद्राचं मूळ उद्दिष्ट म्हणजे क्रिकेटपटूंना पैलू पाडणं, यापासूनच ते दुरावत असल्याचं दिसून येतं. त्याऐवजी ते दुखापतींचं नियोजन आणि खेळाडूंचं पुनर्वसन हेच कार्य अग्रस्थानी मानत आहे. ‘बीसीसीआय’नं हीच घडी व्यवस्थित लावण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, दुखापतग्रस्त खेळाडूंचं सत्र चालूच राहील. त्यामुळे उच्च कामगिरी केंद्र जे क्रिकेटपल्याड अन्य क्रीडापटूंसाठीसुद्धा उपलब्ध आहे, त्याचं ‘रुग्णालय’ होईल!

Previous Post

पानशेतचा प्रलयंकारी पूर!

Next Post

जेन झी , जेन अल्फा ‘भाषेचं नवं रूपडं’

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.