
‘हॅप्पी रिपब्लिकन डे, अर्ध्या!’ घरातून बाहेर पडल्या पडल्या पलीकडल्या गल्लीतल्या काकांनी अर्ध्याला समोर बघून शुभेच्छा दिल्या. काका तसेच वाटेने निघून गेले.
‘हॅप्पी रिपब्लिकन?’ अर्ध्यानं डोकं खाजवलं.
ते प्रजासत्ताक, स्वतंत्रता, गणराज्य अशी भारंभार मराठी तर डेमोक्रॅटिक, रिपब्लिक (न?), इंडिपेंडस, इंडिपेंडंट आणि काय काय शब्द आहेत? डोक्याचा भुगा होतो पार असल्या शब्दांनी. त्यात २६ जानेवारी असो की १५ ऑगस्ट फडकवतात तर झेंडाच! जायचं, ठरलेली गाणी घसा ताणून गायची, देशभक्त असल्याचं फक्त मैदानावर सिद्ध करायचं. येताना तिथले झेंडे-बिंडे, सजावटीच्या वस्तू, तीन रंगाचे कागदं असं काही रस्त्यात फेकत यायचं. देशभक्ती सिद्ध केल्यावर पुढे सगळे गुन्हे माफच होतात ना? स्वातंत्र्य मिळालं म्हणजे बापाजाद्याच्या प्रॉपर्टीत हिस्सा म्हणजे मालकी हक्क मिळतो, तसं काही होत असावं. आणि आपली भारतीयांची मालकी हक्क बजावण्याची सोपी पद्धत म्हणजे नव्यानं मिळालेल्या वस्तू, व्यक्तीचं पायपुसणं करा. स्वातंत्र्यात मिळालेल्या देशाचं तसंच काही आम्ही करतोय अजूनही. फक्त इथं स्वातंत्र्य मिळून सत्तर, ऐंशी वर्षे झाली आहेत. इतकाच फरक!
‘अर्ध्या हॅप्पी इंडिपेंडस् डे!’ नम्याच्या पडवीत घुसल्याबरोबर नम्यानं विश केलं.
‘अरे नेमकं आज आहे काय? इंडिपेंडस डे की रिपब्लिकन डे? मघा ते झिपरे काका रिपब्लिकन डे म्हणाले मला!’ अर्ध्यानं नम्याला प्रश्न विचारला.
‘तू नागरिक शास्त्रच्या तासाला वर्गात काय करायचा?’ नम्यानं कळ काढली.
‘सगळ्यात बोर तास तोच असायचा, त्या तासाला अक्षरशः जांभया, झोपा यायच्या. त्याच्यात शिक्षक नुसते वाचूनच काढायचे. मग कळायचा काय मॅटर?’ अर्ध्याचा रोख सवाल.
‘हां ते पण बरोबर आहे. पण ते नीट वाचलं असतं तर किमान आता हे नसते प्रश्न पडले असते का?’ नम्या मात्र ठाम!
‘इथं नागरिक शास्त्र शिकवणारा मास्तर देशात शिस्त लागावी म्हणून लष्करशाही यावी, ही इच्छा ठेवायचा. तिथं मी दोनचार ओळींचं स्वातंत्र्य विसरलो तर काय बिघडलं?’ अर्ध्याचं तितकंच रोखठोक उत्तर.
‘बावळ्या, काहींना हुकूमशाहीचे कड आले किंवा येतात म्हणजे आपण स्वातंत्र्य विसरायचं का?’ नम्यानं कसर काढली.
‘पण तू का एवढा सिरीयस होतो. कोणताही डे असला तरी झेंडाच फडकवत्या ना? आपण तर बुवा किमान सॅल्युट ठोकून मान तरी देतो, ते अमेरिकेवाले झेंडा डायरेक ढुंगणाला लावून फिरतात. म्हणून काही बिघडतं का?’ अर्ध्याचं बेफिकीर उत्तर.
‘बस, जरा निवांत! तुझ्या डोक्यातले किडे ठेचावे लागतील आज! असं दिसतंय.’ नम्यानं अर्ध्याला खुर्चीत बसायला लावलं. दोघं बसले. पण त्यांच्या नजरा एकाएकी पुढं स्थिरावल्या. पुढल्या रस्त्यानं १५ ऑगस्टचा कार्यक्रम संपवून पोरं आपापल्या घराकडं पळताना दिसायला लागली. कुणाच्या हातात झेंडे. कुणाच्या हातात फुगे. तर कुणी गांधी, नेहरू, वा इतर क्रांतिकारकांच्या वेषात सजलेली मुलं परतताना दिसायला लागली. काही तिरंगी झेंडे घेऊन खेळताय, काही तिरंगी फुगे फोडताय. तर काही गांधीची काठी उगारून पळताय. मागून त्यांना दटावत काही पालक मंडळी त्यांच्या मागे गप्पा मारत घराकडे निघालीय. मुलांपेक्षा पालक जास्त नीटनेटके सजलेले. पण रस्त्यावर पडणारे प्लास्टिकचे झेंडे आणि इतर गोष्टींकडे त्यांचं मात्र लक्ष नाही.
‘हे बघ यांना पंधरा ऑगस्ट सांगितलं काय नि सव्वीस जानेवारी सांगितलं काय? पोरांना असा किती फरक पडतो? त्यांना फक्त अर्धा दिवस सुट्टी मिळणार याचं समाधान!’ अर्ध्यानं पोरांकडं बोट दाखवलं.
‘पण आपल्याला तर भेद कळायला पाहिजे ना?’ नम्यानं पिच्छा पुरवला.
‘भेद काय कळायचा? शाळेत असताना इंग्रजीच्या सरांनी विज्ञानाच्या सरांना विचारलं होतं स्वातंत्र्य म्हणजे काय? तर त्यांनी उत्तर काय दिलं होतं माहिती आहे का?’ आता अर्ध्यानं लहानपण आठवलं.
‘आता ते मला काय सांगता येईल?’ नम्या!
‘ते म्हणाले, इंग्रज सोडून गेले ते स्वातंत्र्य! अन् दोघं टाळ्या देत हसत राहिले.’ अर्ध्या मोठ्या कवतीकाने किस्सा सांगायला लागला.
‘पण तुझ्या मते स्वातंत्र्य काय?’ नम्यानं अर्ध्याला थेट विचारलं.
‘हेच का ब्वॉ! आपण आधी इंग्रजांच्या गुलामीत होतो. मग ते गेले तर सगळं आपलं झालं. आपण स्वतंत्र झालो. पण ते झिपरे काका म्हणतात का तेव्हा नेहरूनी घाण केली, म्हणून देशाचे दोन तुकडे झाले. असं बरंच काही माहिती आहे मला!’ अर्ध्या भरभरून बोलला.
‘पण स्वतंत्र झालो म्हणजे काय झालं नेमकं?’ नम्यानं पुन्हा हसून प्रश्न केला.
‘हे पहाय मला असं डीपमधी नाही माहीत. पण आता आपण कुणाचे गुलाम नाही, असं काही असंल!’ अर्ध्यानं वेळ मारून नेली.
‘व्वा! भारी!’ नम्यानं अर्ध्याची पाठ थोपटली. तसं अर्ध्याला बोर्डात टॉप आल्यागत वाटलं.
‘शाळेत असताना कंपास सापडली होती. ती मुख्याध्यापकांच्या केबिनमधी नेऊन दिली होती. तेव्हा त्यांनी अशीच पाठ थोपटली होती! त्यानंतर आताच कुणी पाठ थोपटली माझी!’ अर्ध्याला गलबलून आलं.
‘पण तुला काय वाटतं? आपल्या देशात सत्तेत इंग्रज बरे होते का लष्कर सत्तेत पाहिजे का आपण निवडून देऊ तेच लोकं?’ नम्यानं केबीसी सुरू केलं.
‘इंग्रज फार कडक होते. पण ते नको. लष्कराच्या ताब्यात सारं दिलं पाहिजे. चुकला का गोळी घातली पाहिजे. तसे लोकं सुधारणार नाही.’ अर्ध्यानं सोपा पर्याय निवडल्ाा.
‘म्हणजे तुला स्वातंत्र्य नकोय तर…’ नम्यानं वर्मावर बोट ठेवलं.
‘मी कुठं तसं म्हंटलं? माणसं स्वतंत्रच पाहिजे. फक्त सत्ता लष्कराची पाहिजे.’ अर्ध्याचं गोलमोल उत्तर आलं.
‘तुला कळतंय का? तू काय बोलतो ते?’ नम्या!
अर्ध्यानं घाईनं स्पष्टीकरण देणं चालू केलं, ‘अरे शिस्त पाहिजे ना? लोकं कुठं पण कचरा करतात…’
‘हो, काल तू घर झाडलं नि कचरा गटाराजवळ टाकला.’ नम्यानं लगेच अर्ध्यालाच कोंडीत पकडलं.
‘पण आपल्या चार गल्ल्यात कुठंच कचराकुंड्या नाही, त्याच्यात घंटागाडी पंधरा पंधरा दिवस येत नाही.’ अर्ध्यानं तक्रारीचा सूर लावला.
‘लोकप्रतिनिधी आपणच निवडून देतो.’ नम्यानं पुन्हा अर्ध्याला चूक दाखवली.
‘हां पण तेव्हा दोघांत हाच माणूस बरा वाटला…’ अर्ध्यानं समजावण्याचा प्रयत्न चालवला.
‘का दोघांत त्यानंच चांगला पैसा वाटला?’ नम्यानं टोला हाणला.
‘नाही, पण समोरचा नालायकच होता ना? तशे सगळे राजकारणी भ्रष्टच असतात.’ अर्ध्यानं हात झटकले.
‘कारण आपण भ्रष्ट झालो. पैसे घेतल्याशिवाय आपण मतं देतच नाही ना?’ नम्यानं आरसा दाखवला.
‘म्हणून म्हणतो लष्कर पाहिजे सत्तेत! हे चोर लबाड नकोच!’ अर्ध्यानं ताडकन विषय बदलला.
‘का ते माणसं नसतात? त्यांच्यात चोर लबाड नसू शकतात का?’ नम्यानं ढोसलं.
‘मग इंग्रजच पाहिजे होते! लुटून आणखी किती लुटलं असतं?’ अर्ध्यानं आता चक्क बाजूच बदलली.
‘मग स्वातंत्र्याचं काय?’ नम्यानं शेवटचा प्रश्न केला.
‘हां, पण इंग्रज वाईट होते का रे?’ अर्ध्याला आता प्रश्न पडला.
‘इंग्रज चांगले होते की वाईट? हे कळण्यासाठी वसाहतवाद समजावून घ्यावा लागंल. तो समजून घ्यायचा म्हणजे इतिहास अभ्यासावा लागेल. त्यात इंग्रज कधी आले? त्यांनी आपल्या देशात राज्यविस्तार कसा केला? असं सगळंच बारकाईने समजून घ्यावं लागेल. तेव्हा कळेल ना परकीय सत्ता, गुलामी, पारतंत्र्य वगैरे? ते कळालं तर कळेल ना स्वातंत्र्य?’ नम्या सांगायला लागला, विचारायला लागला.
‘जावो मरो! काय स्वातंत्र्य, पारतंत्र्य समजून मला करायचं आहे?’ अर्ध्या आता विषय टाळायला बघू लागला.
‘आपल्या पिढीला सहजपणे स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे आपल्याला काय घेणं स्वातंत्र्याशी? बरोबर ना? एवढं सोपंय का? आपल्या काही पिढ्या ह्या स्वातंत्र्य मिळावं यासाठी झटल्या. तेव्हा ते मिळालं. कुणी सहज दिलं नाही. ते आपल्या पूर्वजांनी लढून मिळवलं आहे. आपण त्याची किंमतच समजून घेत नाही. आपण माणूस आहोत, तसे इतरही आहेत. ते आणि आपण समान आहोत. सर्वांच्या खाण्यापिण्यात, पेहरावात, भाषेत, मतांत व इतर अनेक बाबतीत विविधता असेल, असते. पण त्यांना आणि आपल्याला आपल्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे. मुख्य म्हणजे आपण कुणाचे गुलाम नाही, कुणापेक्षा श्रेष्ठ नाही की कनिष्ठ नाही. आपला कुणी राजा नाही, आपली कुणी प्रजा नाही. आपल्या भोवतालचे सर्व माणसं समान आहेत. त्यांना जे अधिकार, हक्क आहेत ते आपल्याला पण आहेत. नागरिक म्हणून त्यांचे जे कर्तव्य आहे तेच आपले आहेत. नुसतं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही तर माणूस म्हणून आपली ओळख स्थापित झाली. नाहीतर आपण आधी गुलाम, शूद्र किंवा आणखी काही ठरवले गेलो असतो. स्वातंत्र्य फक्त गुलामीतून मिळालं नाही, तर आपल्याला स्वातंत्र्य सगळ्या भेदाभेदातून, जातीयतेतून, वर्ण-वंश व लिंग भेदातून मिळालंय. म्हणून हा १५ ऑगस्ट महत्त्वाचा! नि २६ जानेवारीला आपण ते समूह म्हणून आपल्याला समर्पित केलं. संविधान स्वीकारून. आणखी सांगू?’ नम्यानं हसून अर्ध्याला विचारलं.
‘नाही सर! माझ्या शाळेला आता तरी सुट्टी द्या!’ अर्ध्यानं हात जोडले.
