• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

धन्य धन्य नामदेव

ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर अभंगबोध

Marmik Team by Marmik Team
August 20, 2026
in विशेष लेख
0
धन्य धन्य नामदेव

धन्य धन्य नामदेवा।
केला उपकार जीवा।।१।।
माझा निरसिला भेवो।
दाखविला पंढरिरावो।।२।।
मंत्र सांगितला सोपा।
निवारिले भवतापा।।३।।
माझी कृपेची माऊली।
चोखा म्हणे पान्हा घाली।।४।।

चोखोबाराय हे वारकरी संप्रदायातील अधिकारी संत होते. आज त्यांच्या नावे जवळपास ३५० अभंग आहेत. पूर्वीच्या काळी चोखोबारायांच्या अभंगाकडे वारकरी संप्रदायिक मंडळींचं काही प्रमाणात दुर्लक्ष झालं. चोखोबारायांचा जन्म तेव्हा अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत झालेला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढच्या काळात अस्पृश्य जातीतून लाखो वारकरी झाले. त्यातीलच आधुनिक काळातील एक थोर वारकरी म्हणजे वै. ह. भ. प. श्रावणबुवा कांबळे. ते आळंदीतच राहत असत. एकनिष्ठेने वारकरी संप्रदायाची सेवा करत. चोखोबारायांची गाथा छापली जावी अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेला मूर्तरूप मिळालं ते स. भा. कदम यांच्यामुळं. स. भा. कदम लिहितात- ‘ १९६६च्या ऑक्टोबर महिन्यात एके दिवशी श्री श्रावणबोवा माझ्याकडे आले असताना त्यांनी ही गोष्ट माझ्याजवळ काढली. बोवाजवळ ना पैसा ना संतवाङ्मय लेखनाचा व्यासंग, मग हे कार्य कसे तडीस जाणार? बोवांना मी सांगितले, ‘बुवा, ही अवघड गोष्ट आपणास कशी शक्य होणार?’ बोवा नाराज झाले व म्हणाले, ‘आमच्यासारख्या गरिबांचे कोणी ऐकूनसुद्धा घेत नाही. चोखोबांच्या कार्याकडे आमच्या वारकरी पंथातले लोक सुद्धा कोणी पाहत नाहीत. मी पुष्कळांना विचारून पाहिले, पण कोणीच या गोष्टीत लक्ष घालीत नाहीत.’ यातून चोखोबारायांच्या कार्याविषयीची आणि अभंगांविषयीची अनास्था वारकरी संप्रदायिक मुखंडात आणि संतसाहित्याच्या अभ्यासकांमध्ये होती असं दिसतं. पुढे मात्र वै. ह.भ.प. श्रावणबुवा कांबळे यांच्या आग्रहामुळे स. भा. कदम यांनी चोखोबारायांची गाथा छापून प्रसिद्ध केली. या गाथेत जवळपास ३२ अभंगातून चोखोबारायांनी नामदेवांची स्तुती केलेली आहे. त्यातीलच हा एक अभंग.
प्रस्तुत अभंगात चोखोबाराय म्हणतात की नामदेवराय धन्य आहेत. त्यांनी अनेक जिवांवर उपकार केलेला आहे. जे लोक अज्ञान-अंधकारात चाचपडत होते, त्यांच्यासाठी नामदेवांनी ज्ञानाचा दिवा लावला. चोखोबाराय म्हणतात की नामदेवांनी माझी भीती घालवून टाकली. भेव म्हणजे भीती. चोखोबाराय त्यावेळी अस्पृश्य मानल्या जाणार्‍या जातीत जन्माला आले होते. त्यामुळे त्यांच्या मनात भय दाटलं होतं. हे भय वेद, शास्त्र, पुराण, यज्ञयागादी कर्मकांड आणि जातिभेदाचं होतं. आत्मोद्धार करुन घ्यावा तर वेदशास्त्राचा अधिकार नाही. मंदिरात प्रवेश नाही. यज्ञाच्या जवळही लोक फिरकू देत नाहीत. एखाद्या सत्पुरुषाजवळ जाऊन ज्ञान मिळवावं म्हटलं तर कोणी स्पर्शही करुन घेत नाहीत. अशा भयंकर कालखंडात ते जन्माला आले होते. साहजिकच त्यांना लोकांची भीती होती. हे लोक परमार्थ करू देत नाहीत, त्यामुळे आपला उद्धार होणार नाही, याची भीती त्यांना लागून राहिली होती. त्यांना भयमुक्त करण्याचं काम नामदेवरायांनी केलं. त्यांनी चोखोबारायांना आत्मविश्वास दिला. कोणत्याही जातीचा माणूस परमेश्वराचं भक्तिप्रेम अनुभवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. परमार्थासाठी वेदशास्त्राची आणि यज्ञयागादी कर्मकांडाची जरुरी नाही हे त्यांनी पटवून दिलं. साहजिक जातीचा न्यूनगंड, अपराधित्वाची भावना आणि त्या अनुषंगाने येणारी भीती यावर मात करण्याचं सामर्थ्य चोखोबारायांना नामदेवरायांच्या शिकवणुकीतून मिळालं. जातीय हीनत्वाच्या भावनेवर नामदेवरायांच्या कृपेने कशी मात करता आली याचं वर्णन ते एका अभंगात करतात.
बहु हीन याति देह अमंगळ।
न कळे चोखाळ चोखट ते।।१।।
परी इही केले मज कृपादान।
निरसिले अज्ञान मळकट।।२।।
बहुता परीचा बहुताचा बोल।
तो झाला फोल कृपादृष्टी ।।३।।
म्हणोनि जीवे धरियेले पाय।
चोखा म्हणे काय बोलू आतान।।४।।
चोखोबाराय म्हणतात की माझी जात हीन मानली गेलेली आहे. त्यामुळे मला ‘चोखाळ चोखट’ कळत नाही. चोखाळ चोखट म्हणजे परमेश्वर. परमेश्वरच चोख आहे. चोख म्हणजे शुद्ध. जे चोखोबाराय या अभंगात मला चोखट कळत नाही असं म्हणतात, ते चोखोबाराय नामदेवांच्या प्रेरणेने स्वतःच चोख झाले. ‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।’ असं संतांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा।।’ असं म्हणत त्यांनी नामाचा सोहळा केला आणि स्वतःची शुद्धता सिद्ध केली. संतकाळात चोखटपणाचा निकष जातकुळाच्या आधारावर निश्चित होत होता. संतांनी मात्र कुळाचा चोखटपणा नाकारला. ज्ञानोबाराय म्हणतात,
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा। अभिजात झणी श्लाघा। व्युत्पत्तीचा वाऊगा। सोसु का वाहवा।।
ज्ञानोबाराय म्हणतात की कुळाच्या चोखटपणाची गरज नाही. कुळाच्या आधारे चोखटपण ठरवता येत नाही. त्यामुळे उच्च जातीत जन्माला आल्याची अजिबात बढाई मारू नका. उच्च जातीत जन्माला आल्यामुळे भक्ती घडते असं नाही. उलट उच्चजातीयांना वेदज्ञानाचा जो विशेष अधिकार आहे, त्यामुळे अहंकार वाढत जातो. वास्तविक पाहता भक्तीत, वेदज्ञानाची म्हणजेच शब्दज्ञानाची जरुरीच नाही. त्यामुळे शाब्दिक व्युत्पत्तीच्या आधारे पांडित्य दाखवण्याची पोकळ हाव का बाळगावी, असा सवाल ज्ञानोबाराय विचारतात. त्यामुळे कुळाच्या आधारे नव्हे तर आचरणाच्या-भक्तीच्या आधारे चोखटपणा ठरवला पाहिजे असं संतांनी सांग्िातलेलं आहे. ‘तुका म्हणे नवविध। भक्ती जाणे तोचि शुद्ध।।’ असं तुकोबाराय म्हणतात.

चोखोबाराय प्रस्तुत अभंगाच्या तिसर्‍या चरणात म्हणतात की नामदेवांनी सोपा मंत्र सांगितला. या मंत्रामुळे भवतापाचं निवारण झालं. वारकरी संप्रदायाचा सोपा मंत्र म्हणजे विठ्ठल. हा मंत्र त्रिअक्षरी आहे आणि उच्चारणासाठी सोपा आहे. वारकरी संप्रदायातील मंत्रोच्चाराच्या सुलभतेचं मूळ नामदेवराय आहेत. वेदमंत्राच्या उच्चारणात काटेकोरपणा महत्त्वाचा असतो. शब्दोच्चारात आणि स्वरात थोडाही बदल चालत नाही. उलट नामस्मरण मात्र सहज आणि सुलभ आहे. वारकरी संप्रदाय सोडून इतर संप्रदायात गुप्त कानमंत्र देण्याची प्रथा आहे. वारकरी संप्रदायात मात्र ‘उघडा मंत्र जाणा। रामकृष्ण म्हणा।।’ असा संतांचा आदेश आहे. मुळात वारकरी संप्रदायात गुप्ततेला जागा नाही. ‘प्रकट गुह्य बोले।’ ही संतांची ओळख आहे. त्यामुळेच चोखोबाराय म्हणतात की नामदेवरायांनी मला सोपा मंत्र सांगितला आणि भवतापातून मुक्तता केली. भवतापातून मुक्त होण्यासाठी पारमार्थिक लोक नाना प्रकारच्या साधना करतात. तरीही ते भवतापातून सहजासहजी मुक्त होत नाहीत. वारकरी संप्रदाय मात्र केवळ नामस्मरणाच्या बळावर भवतापातून मुक्त करतो.

नामदेवरायांनी चोखोबारायांना अफाट प्रेम दिलेलं होतं. मानसन्मान दिलेला होता. त्यामुळेच चोखोबाराय नामदेवरायाना ‘कृपेची माऊली’ म्हणतात. वारकरी संप्रदायात ‘माऊली’ हे पद महत्त्वाचं आहे. इथे प्रत्येकजण माऊली आहे. या जगात अतीव वात्सल्य फक्त आईच्या ठिकाणी आहे. आई कोणत्याही लाभाच्या अपेक्षेशिवाय तिच्या लेकराबाळांवर प्रेम करत असते. त्याचप्रमाणे नामदेवराय आणि एकूणच सगळे संत प्रत्येक जीवावर तितक्याच निरपेक्ष भावनेने प्रेम करतात. आईच्या वात्सल्यता फक्त संतांच्या ठिकाणी अनुभवता येते. त्यामुळेच चोखोबाराय नामदेवरायांना कृपेची माऊली म्हणतात. नामदेवरायांनी प्रेमाचा पान्हा घातला आहे असंही म्हणतात. यातून चोखोबाराय आणि नामदेवराय यांच्यातील आदर्श गुरू-शिष्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे दोन जिवलग मित्रांचं नातं समजून घेता येतं.

चोखोबारायांच्या निर्याणानंतर नामदेवराय मंगळवेढ्याला आले. त्यांनी चोखोबारायांच्या अस्थि गोळा केल्या. त्या अस्थि त्यांनी पंढरपूरला नेल्या. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबारायांची समाधी उभारली. तेराव्या शतकात एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील संताची समाधी विठ्ठल मंदिरासमोर बांधणं हे अत्यंत क्रांतिकारक होतं. विशेष म्हणजे कोणत्याही संतांची समाधी विठ्ठल मंदिराच्या एवढ्या जवळ नाही. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी मुद्दाम चोखोबारायांची समाधी पंढरपुरात आणि तीही विठ्ठल मंदिरासमोर बांधली. ही समाधी म्हणजे नामदेवरायांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या समतावादी संस्कृतीचं चिरस्मारक आहे.

Previous Post

६५ वर्षांचा चमत्कार!

Next Post

‘गुलामगिरी’चा पहिला टाहो!

Next Post
गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार

‘गुलामगिरी'चा पहिला टाहो!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.