साप्ताहिक मार्मिक १३ ऑगस्ट २०२६ रोजी ६५ वर्षे पूर्ण करून ६६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही ६५ वर्षे एका चमत्काराची आहेत. कोणतीही दैवी शक्ती आकाशातून विजेचे लोळ उठवत चमत्कार घडवत नसते किंवा कोणा बुवाच्या हातचलाखीतून ते घडत नाहीत; दुर्दम्य धडाडी, आत्मविश्वास आणि एखाद्या मूल्यावर असीम निष्ठा असलेली माणसंच चमत्कार घडवत असतात, हे दाखवून देणारा चमत्कार म्हणजे साप्ताहिक मार्मिक.
हा चमत्कार घडवला तो बाळ केशव ठाकरे या व्यंगचित्रकाराने… त्या चमत्कारातूनच त्यांनी नंतर हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख या उपाधी मिळवल्या, तोही एक चमत्कारच!
व्यंगचित्रकाराला तो जिथे काम करतो त्या वर्तमानपत्रापेक्षा वेगळा राजकीय दृष्टिकोन बाळगण्याचं स्वातंत्र्य नाही, या बंधनातून मुक्त होण्यासाठी बाळासाहेबांनी नोकरीचा राजीनामा देऊन बंधुराज श्रीकांतजी ठाकरे यांच्यासोबत व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करण्याचा घाट घातला, तेव्हा त्यांनाही कल्पना नव्हती की आपण केवढा मोठा चमत्कार घडवणार आहोत! ‘मराठा’कार, पत्रकार, नाटककार, लेखक, सिने दिग्दर्शक, विडंबन कवी, शिक्षक आणि इतरही बरंच काही असलेले आचार्य प्र. के. अत्रे हे उभय बंधूंचं प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान. त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून ठाकरे बंधूंनी मार्मिक सुरू केले तेव्हा बाळासाहेबांची त्यामागची कल्पना एक चटपटीत, विरंगुळा देणारं साप्ताहिक काढावं आणि चार पैसे कमावावेत, इतकीच होती- त्यांनीच ती पहिल्या अंकाच्या संपादकीयात स्पष्टपणे मांडली आहे. त्यामुळे मार्मिकमधून हास्यविनोदाची मेजवानीच मिळेल, अशीच वाचकांचीही कल्पना झाली असणार. सोबत, बाळासाहेबांच्या ़कुंचल्यातून उमटलेलं, एखाद्या राजकीय घडामोडीवरचं सणसणीत व्यंगचित्र आणि मान्यवरांच्या टोप्या उडवणारी दोन पानी खुसखुशीत, रसरशीत रविवारची जत्रा एवढा माफक मसाला पुरेसा होता.
आपला खरा पिंड कोणालाही ‘विरंगुळा’ पुरवण्याचा नाही, याची कल्पना बाळासाहेबांना त्या काळात आली नसणार. व्यावहारिक यशस्वी व्यवसाय उभा करण्याच्या स्वप्नाने काही काळापुरता तो पिंड झाकला असणार. अर्थात, मार्मिकच्या पहिल्या काही अंकांमध्येच विरंगुळ्याचा भाग मागे पडून झणझणीत अंजनाचा भाग प्रबळ होत गेला. त्याचबरोबर, मुंबईतल्या खासगी आणि सरकारी नोकर्यांमध्ये परप्रांतीयांचा वाढता टक्का दिसू लागला, तेव्हा तर बाळासाहेबांमधला प्रबोधनकारांचा अंश जागा झाला. कोणीतरी तुमच्या ताटातलं अन्न ओढून नेतंय, बसायचा पाट काढून घेतंय, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देतो, पण तुम्ही मात्र ‘वाचा आणि थंड बसा’ अशी पराणीच त्यांनी मार्मिकमधून लावल्यावर मराठी माणसं अस्वस्थ होऊ लागली. बाळासाहेबांकडे लागलेली संतप्त मराठीजनांची रीघ पाहून प्रबोधनकारांनीच त्यांना सांगितलं की याला संघटित स्वरूप देण्याची जबाबदारी तुझीच आहे. ज्या प्रबोधनकारांनी साप्ताहिकाला ‘मार्मिक’ हे नाव दिलं होतं, त्याच प्रबोधनकारांनी या संघटनेचं नामकरणही क्षणार्धात करून टाकलं… शिवसेना!
म्हणजे पाहा, साप्ताहिक मार्मिकने अवघ्या सहा वर्षांत दोन चमत्कार घडवले… व्यंगचित्रकार बाळासाहेबांना त्यांचा खरा पिंड मार्मिकमध्येच गवसला आणि त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांचीही जाणीव मार्मिकनेच घडवून दिली… त्यातून तिसरा चमत्कार जन्माला आला… मराठी माणसांच्या हितासाठी स्थापन झालेली, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारी एकमेवाद्वितीय अशी संघटना… शिवसेना!
हा दैवी चमत्कार नाही, माणसांनी, मराठी माणसांनी घडवलेला चमत्कार आहे, रंगरेषांनी घडवलेला चमत्कार आहे, कुंचल्याच्या आणि वाणीच्या फटकार्यांनी घडवलेला चमत्कार आहे. कुंचल्याच्या ताकदीतून नियतकालिक, नियतकालिकातून चळवळ, चळवळीतून संघटना, संघटनेतून पक्ष असा दुसरा चमत्कार जगाच्या पाठीवर कुठे घडला नसेल.
शिवसेना या चार अक्षरी स्फुरणदायी मंत्राने ज्यांची आयुष्यं उजळून निघाली, ज्यांना आयुष्यात काही करण्याची दीक्षा आणि दिशा मिळाली, त्या सगळ्या शिवसैनिकांना हा सगळा इतिहास मुखोद्गत आहे आणि यापुढची शिवसेनेची सगळी संघर्षपूर्ण वाटचालही तोंडपाठ आहे…पण तरीही दरवर्षी मार्मिकच्या वर्धापनदिनाला या इतिहासाची उजळणी करावी लागते. कारण विपरीत काळ आला, चहूबाजूंनी संकटांनी वेढलं की आपण सगळेच एका जिवंत चमत्काराचा भाग आहोत, याचा विसर पडतो…
हा चमत्कार किती मोलाचा आणि कालजयी आहे, त्याचं दर्शन काही काळापूर्वीच दिल्लीत घडलं. १२ वर्षांच्या सलग सत्तेमुळे उन्मत्त झालेल्या सत्ताधीशांना जेन झी पिढीमधल्या ‘कालच्या पोरां’नी वठणीवर आणलं तेव्हा पाशवी सत्तेसमोर इतर कोणतंही हत्यार बोथटच ठरलं असतं. म्हणूनच या मुलांनी तीव्र उपरोध, विडंबन, उपहास, उपरोध आणि व्यंगचित्रकला यांचेच आधुनिक आविष्कार वापरले. त्यांच्या तिखट, तिरकस, तेजतर्रार विनोदांचे फटकारे सत्ताधार्यांना असुडांसारखे झोंबले, अगदी तसेच, जसे ६५ वर्षांपूर्वीच्या सत्ताधार्यांना बाळासाहेबांचे फटकारे झोंबले होते… बाळासाहेबांच्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर एक अद्भुत शक्ती कधीही त्यांच्यापासून दूर गेली नव्हती… तरुणाईशी थेट संवाद साधण्याची शक्ती… रात्री बारा वाजता मोबाइलच्या कॅमेर्यासमोर येऊन नाकातले पांढरे केस दाखवत नातवंडांच्या वयाच्या मुलांना उगाचच फ्रेंड्स’ म्हणून सलगी करायची गरज त्यांना पडत नसे… आत्यंतिक कळकळीतून आलेला त्यांचा प्रत्येक शब्द अस्वस्थ तरुणाईच्या हृदयाचा थेट वेध घेत असे…मनाने, वृत्तीने कायमच तरुण आणि रसरशीत राहिल्यामुळे त्यांना प्रत्येक पिढीतल्या तरुणांची भाषा अवगत होती…
आज वयाच्या शतकमहोत्सवी वर्षात ते हयात असते तर या निर्भीड तरुणाईच्या पाठीवर त्यांनी निश्चितच शाबासकीची थाप दिली असती. लेखणी आणि कुंचला ही अमोघ शस्त्रं खुद्द त्यांनी ज्या ताकदीने वापरली होती, त्याच ताकदीने या पिढीनेही वापरलेली आहेत, संघर्षाचा वारसा नव्या पिढीनेही तेवढ्याच ताकदीने स्वीकारला आहे, हे पाहून त्यांनाही किती आनंद झाला असता!
चमत्कार मरत नसतात. म्हातारेही होत नसतात. ‘मार्मिक’ही ६५ वर्षांचा ‘जेन झी’ युवाच आहे… कायम युवाच राहणार!
