
शेतकर्यांचे स्वराज्य हे प्रबोधनकारांचं पुस्तक आजही अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. ब्रिटिश सत्ता नेमकी कोणत्या कारणांमुळे आली, त्याचा उलगडा नीट केला नाही, तर स्वातंत्र्य मिळणार नाही, ही स्पष्टोक्ती या पुस्तकात आहे. तो उलगडा या पुस्तकात करण्याचा प्रयत्न केला आहे. जोवर शेतकरी स्वतंत्र होणार नाही, तोवर देश स्वतंत्र होणार नाही, हा तो विचार आहे.
शेतकर्यांचे स्वराज्य या प्रबोधनकारांच्या पुस्तकाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या एका फोटोने होते. प्रबोधनकार असोत किंवा हे पुस्तक लिहिण्याचा प्रस्ताव देणारे दिनकरराव जवळकर असोत, दोघांच्याही विचारांवर आणि व्यक्तिमत्त्वावरही छत्रपती शाहूंचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या फोटोने आणि त्या फोटोखाली असणार्या त्यांच्या या विचाराने पुस्तकाची सुरुवात होणं स्वाभाविक आहे,ज्यांना राजकारणांत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी इतर देशांप्रमाणे याहिं देशात प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत; नाहीतर आमच्या हातून मुळींच देशसेवा होणार नाही. -राजर्षी कै छत्रपती शाहू महाराज
देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत माणूस म्हणून जगण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या तरच खरी देशसेवा घडू शकेल, हा दूरदृष्टीचा आणि मूलगामी विचार या पुस्तकाचाही गाभा आहे. ज्या स्वराज्यासाठी तेव्हा आंदोलन सुरू होतं, ते प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गाचा होतं. हा लढा जोवर शेतकर्यांचा आणि शेतकर्यांसाठी होत नाही, तोवर तो निरर्थक आहे, अशी मांडणी या पुस्तकात आढळते. त्याचं सूत्र छत्रपती शाहूंच्या या वाक्यात सापडतं. दिनकरराव जवळकरांनी सांगितल्यानुसार हे पुस्तक लिहिलेलं असलं, तरी या पुस्तकाची बीजं दीर्घकाळ प्रबोधनकारांच्या मनात रूजत होती. मनोगतात ते सांगतात की त्यांच्या वयाच्या चौदा पंधराव्या वर्षी मॅट्रिकसाठी देवास इथे शिकताना शाळेचे सुपरिटेंड गंगाधर नारायण शास्त्री पंड्या हे त्यांना इंग्रजी शिकवत. तेव्हा त्यांनी अठराव्या शतकातला इंग्रजी कवी
ऑलिवर गोल्डस्मिथ याची डेझर्डेट विलेज या कवितेने प्रबोधनकारांवर कायमस्वरूपी ठसा उमटवला होता. या कवितेत उद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे उद्ध्वस्त होणार्या खेड्यांचं वर्णन आहे. या कवितेची छाप प्रबोधनकारांच्या पूर्ण पुस्तकावर आहे. पण प्रत्यक्ष पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा देणारा एक प्रसंगही त्यांनी या मनोगतात दिला आहे. तो असा–
मुंबईच्या चालू संपांच्या क्रान्तियुगात गिरणी कामगारांच्या प्रत्येक झोपडीत उपासमारीची अवदसा भयंकर धुमाकूळ घालीत आहे. सावकारी पिण्डाच्या माझ्या अनेक `मित्रां`नी कायदेबाजीच्या चापात माझ्या उमलत्या लोकसेवेची ठेचणी करून, मलाहि या गिरणबाबूंच्या उपासमारीचा आणि कफल्लक राहणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुसंधी दिल्यामुळे, त्यांच्या बेदनांशी आणि भावनांशी तद्रूप आणि तल्लीन होणे कठीण गेले नाही. प्रस्तुत पुस्तकाच्या कल्पनेचा जन्म गिरणीत जाणार्या, पण बेरोजगारीने उपाशी तळमळणार्या एका तरुण कोकण्या बाईच्या स्फुंदनात झालेली आहे. करुणेलाहि करुणेचा पाझर फोडणारे तिचे ते चित्र पाहून मी क्षणभर दिङ्मूढ होऊन, तसाच, रस्त्यावर उभा राहिलो. एका क्षणात लाख विचारांचा सिनेमा मस्तकात खेळला. इतक्यात एका मोटारबाईने कर्णभेदी कर्णा ़फुंकून `राजरस्त्यावर उभे राहणे मूर्खपणाचे आहे असे माझे कान उघडले.` या प्रसंगामुळे प्रबोधनकारांना डेझर्डेट विलेज कवितेतल्या गावातून उद्ध्वस्त होऊन शहरात आलेल्या एका गरीब महिलेलं वर्णन आठवलं.
आज सबंध भारत देश गोल्डस्मिथचं उद्ध्वस्त खेडं झालेलं असतानाही मराठीत या कवितेचं भाषांतर न झाल्यामुळेही त्यांनी खेद व्यक्त केलाय. अनेक आंग्ल काव्यांचे तर्जुमे देशी व मराठी भाषेत करणारे कवि झाले. पण एकाहि जातिवंताला या काव्याचे रूपांतर करण्याची प्रेरणा होऊ नये, याचे कारण आधुनिक कवींच्या आत्म्याची संवेदनाच शेतकीप्रमाणे उद्ध्वस्त झालेली आहे. गुलामांच्या शारदेने लव्हाळ्याची लक्तरेच धूत बसावी!
शेतकर्यांचे स्वराज्य या पुस्तकात एकूण सात प्रकरणं आहेत. पैकी पहिलं प्रकरण परिस्थितीचे सिंहावलकन या कवितेच्या आधारेच मांडणीला सुरुवात करतं. आज हिंदुस्थान भाकरीला मोताद झालेला असल्यामुळे तात्विक चर्चांना अर्थ नाही, अशी सुरुवात ते करतात. हिंदुस्थान पूर्वी कसा होता, किती श्रीमंत होता, त्यातून सोन्याचा धूर निघत होता, तो जाड होता की बारीक होता, इत्यादि ऐदी प्रश्नांवर डोकी खाण्याची आज जरूर नाही. वेदान्ताचा कामा धरून आम्ही स्वर्गाला जाणार का धादान्ताच्या एरोप्लेनमधून पाटलोणे युरपियन स्वर्गपाताळ एक करणार, चरख्याने स्वराज्य मिळणार, का टिळकांची देवळे गावोगाव थापून तेथे घण्टा बडविल्याने स्वराज्याचा मेवा अलगद आमच्या घशात घुसणार असल्या बाष्कळ बायकी बडबडीनाहि विचारांत घेण्याची आज फुरसद नाही.
आज क्रांतीची गरज आहे, पण भारत शांतीत वेळ वाया घालवत आहे, अशी तक्रारही ते उदाहरणं देऊन केलीय. त्यापुढे जाऊन आतापर्यंतची परकीय आक्रमणं आणि ब्रिटिशांची सत्ता यातला वेगळेपणाही सिद्ध केलाय. त्यात त्यांनी केलेली मोगल आणि इंग्रजांची तुलना लक्षवेधी ठरते, प्रत्येक विजयी जेत्याने दिल्लीचे सार्वभौम तक्त काबीज करताच, हिन्दुस्थानालाच आपला मायदेश मानून, येथेच कायमचे वास्तव्य केले. मोगल्ा बादशाही तर हिन्दी जीवनात इतकी समरस होऊन गेली की, दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या बारा बादशाहांपैकी सहा बादशाहांच्या माता हिन्दू होत्या. हिन्दुस्थानात वंश, जातिधर्म वगैरेचे कितीही भेद अस्तित्वात असले तरी मोंगल रियासतीच्या अमदानीत, हिन्दू आणि मुसलमान दिल्लीकडे पाहताना एकदम एकजिनशी अभेदभावी बनत असत, ही मुद्द्याची गोष्ट आज हिंदू-मुसलमान द्वैताची धुळवड, शेणवड खेळणार्या हिंदी पुढार्यांच्या भ्रष्ट मनोवृत्तीत घुसत नाही. यथावकाश क्रान्तिचक्राची गति बदलली आणि क्रान्तिप्रधान मोगल दिल्ली खतम होऊन, त्या जागेवर शान्तिप्रधान ब्रिटिश दिल्ली चमकू लागली. तिच्या शांतिमय शंभर वर्षांच्या अमदानीत हिंदी शेतकरी किती उन्नत झाला, हिंदी कारागिरांची केवढी भरभराट झाली, याची चिकित्सा करणे, हेसुद्धा सध्याच्या शांतिप्रधान आणि कायदेबाज राजवटीत एक भयंकर महापाप होऊन बसले आहे.
ब्रिटिशांच्या भारताला धुवून इंग्लंड या शॉपकिपर्स नेशनने आपल्या दुकानदारांची दुकानं भरण्याच्या धोरणाने शेतकर्यांची शेती मेली. त्याला स्थानिक उच्चवर्णींयांनी केलेली ब्रिटिशांची चाकरीही कारणीभूत होती. त्याविषयी ते सांगतात, इंग्रेज आज हिंदुस्थानाचे जेते मालक आहेत आणि हिंदी लोक आज त्यांचे जित गुलाम आहेत. `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असल्या आरोळ्या ठोकणार्या बृहस्पतींनी, इंग्रेज बनियांच्या पचनी पडणार्या आपल्या बापजाद्यांच्या गाढवपणाबद्दल चुकूनसुद्धा एखादा निषेधाचा फुत्कार काढल्याचे कधी कोणी ऐकले आहे काय?… इंग्रेजी सत्तेचा फास ज्या ज्या वळणांनी, गाठींनी आणि पेचांनी हिन्दुस्थानाच्या गळ्याभोवती बसत गेला आणि अखेर ब्रह्मगाठीने कायम घट्ट झाला, ती वळणे, त्या गाठी आणि ते पेच, ब्रह्मगाठीकडून उलट सुरुवात करून सोडविल्याशिवाय हा फास सुटणे शक्य नाही.`
पोटाच्या पापाचा व्याप हे दुसरं प्रकरण उद्ध्वस्त ग्रामीण जीवनातून जन्म घेतलेल्या बकाल शहरीकरणाचा वेध घेतं. प्रबोधनकार हे मुंबईकर. त्यामुळे त्यांनी शेती सोडून मुंबईत येणार्याचे हाल आणि त्यांची कारणं तपशिलात सांगितली आहेत. सुधारणेच्या नावाखाली मुंबईसारखी शहरे पृथ्वीवरील स्वर्ग बनली, तरी त्या स्वर्गाने सर्व खेडी उद्ध्वस्त करून शेतकर्यांच्या शेतीचा नरक बनविलेला असतो, हे पाहावयाला शहरी शहाण्यांना दृष्टीच उरलेली नसते… गिरणीवाल्या शेट्यांच्या मोटारी जीवंत माणसांच्या ताज्या तिखट कष्टाळू रक्ताच्या पेट्रोलवर दौडा मारीत असतात. शेतीला मुकून अन्नान्न झालेल्या स्त्री-पुरुष मजुरांच्या ऐन उमेदी जीविताच्या राखरांगोळीवर या लाखाधिशांना पुरुषोत्तमत्वाचा अधिकार प्राप्त होतो आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात यांच्या मोठेपणाच्या टिमक्या वाजतात. पोट पैशासाठी पापाचा परवल पत्करते; पण पैसा मात्र असा हरामखोर आहे की तो वाटेल तसल्या पापावर पुण्याचे पांघरूण पांघरतो… सगळी पोटे पत्करली, पण श्रीमंतीची भूक लागलेल्या भांडवलशाहीच्या पोटाची आग परवडत नाहीं. सामाजिक समतोलपणाचा कल भांडवलशाहीच्या राक्षसी पोटाकडे कलंडल्यामुळे आज पोटार्थी गरिबांचे हे हाल किंवा त्यांच्या पोटाचे बण्ड कसे थांबवावे, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे.
तिसरं प्रकरण बाण्डगुळ्या मध्यमवर्ग असं आहे. यात ब्रिटिशांच्या यंत्रणेचा भाग बनलेल्या पांढरपेशांनीच ब्रिटिशांना हिन्दुस्थान मिळवून दिला. इंग्रेजी विद्या म्हणजे अमृताचा वर्षाव किंवा वाघिणीचं दूध नसून बेचव बेवडा आहे. त्यातून निर्माण झालेली बांडगुळांची राजनिष्ठा ही कुत्र्याची स्वामीनिष्ठा आहे. त्यावर ब्रिटिश साम्राज्याचा पाया उभारलेला आहे. त्यामुळे त्यांच्या शहरी चळवळी निरर्थक आहेत, अशी मांडणी करून प्रबोधनकार रवींद्रनाथ टागोरांच्या लेखाच्या आधारे, महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ खर्या अर्थाने देशातल्या दीनदुबळ्यांची कशी बनवली, याची मांडणी केली आहे. त्यानंतर ते महात्मा जोतिबा फुलेंनी केलेल्या क्रांतीचं मर्म सांगितलंय, ते फार महत्त्वाचं आहे–
महात्मा गांधीच्या पूर्वी ६० वर्षे, मागासलेल्या शेतकरी जनतेच्या बौद्धिक आणि आर्थिक प्रबोधनाचा पहिला कसोशीचा प्रयत्न वैâ. जोतीबा फुले यांनी केला. फुले स्वतःच मागासलेल्या कष्टाळू शेतकरी समाजातले असल्यामुळे, जोडा कोठे चावतो, हे त्यांना बिनचूक कळले आणि त्याप्रमाणे त्यांनी अखिल शेतकरी वर्गाच्या वतीने `गुलामगिरी`चा पहिला टाहो फोडला. इंग्रेजांच्या गुलामगिरीची त्यांना जाणीव होती, तरीहि त्यापेक्षा विशेष निकटच्या आणि रात्रंदिवस रक्त शोषून निस्सत्व करणार्या बाण्डगुळ्यांच्या मखमाली जुलुमांची त्यांना फार काळजी होती. परदेशी शत्रूला घरात घेऊन त्याच्या पायतणपूजेवर स्वतःच्या पोटपूजेची सोय पाहणार्या शहरी शहाण्यांच्या घाशीरामीला टक्कर देण्याचा जोतिबाने अचाट प्रयत्न केला. त्याची स्थिति एकांड्या शिलेदाराची होती. ज्या खेडवळांच्या जागृतीसाठी तो झटत होता, ते सारे अनाडी आणि भोळसट, जगता मरता भटांच्या तोंडाकडे पाहणारे. एकीकडे केवळ व्यापारी तुंबडीबाजीची पर्वा करणारे परके इंग्रेज सरकार आणि दुसरीकडे अनाडी रयतेच्या अज्ञानावर चरण्यास सवकलेला धोरणी बाण्डगुळ्या भटवर्ग. अशा तिरंगी सामन्याला तोंड देऊन, जोतिबाला जेवढे काही देशकाळानुसार करता आले, तेवढे त्याने केले, पण अखेर त्याची शेतकरी आणि कामगार वर्गाच्या जागृतीची चळवळ बाण्डगुळ्या पांढरपेशा भटांनी आणि भटेतरांनी चिरडून टाकली. चालू घडीच्या राजकारणात शेतकरी आणि कामगारांचे महत्त्व क्रान्तीचे स्फोट कसकसे उडवीत आहे, हे पाहिले, म्हणजे जोतिबाच्या बोबड्या बोलाच्या खेडवळी चळवळीचे मर्म आणि महत्त्व जितके स्पष्ट होते, तितकेच चिपळूणकर, टिळक प्रभृति बाण्डगुळ्या गुंडांच्या शहरी चळवळीचे नासके धोरण नागडे उघडे पडते. बाण्डगुळ्यांच्या राजकारणात मामलदार मुनसफीच्या वाढत्या जागा, कौन्सिलातल्या खुर्च्या इत्यादि बाबी कितीहि असल्या तरी घोंगड्या शेतकरी, आणि त्याची मरती शेती या बाबींना त्याच्या ओसरीवरहि जागा नसे. जोतिबाची चळवळ शेताच्या बांधावरची. ती या शहरी शहाण्यांना क्षुद्र कां वाटू नये? भटांना पेशवाई मिळाली की, भटभोजनातल्या खरकट्या पत्रावळीच्या उकिरड्यालाहि `मराठी साम्राज्य नाव द्यायला यांची तयारी. अशा मुर्दाड मनाच्या माणसांनी जोतिबाची चळवळ पाळण्यातल्या पाळण्यात कितीहि ठेवली, तरी महात्मा गांधींनी तीच चळवळ पुनरुज्जीवित करताच, तिच्यापुढे टिळक, चिपळूणकरी बडव्यांना पगड्या, पागोटी घासताना आपल्या नाकांच्या अणकुचीदार बोंड्याही थबकटून घ्याव्या लागत आहेत, हा काळाचा महिमा खरोखरच रम्य आणि चिन्त्य आहे.`

