• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

क्युबाला गाझा बनवण्याचा ट्रम्प यांचा चंग!

अ‍ॅड. नोएल डाबरे जगाच्या पाठीवर

Marmik Team by Marmik Team
August 13, 2026
in विशेष लेख
0
क्युबाला गाझा बनवण्याचा ट्रम्प यांचा चंग!

अमेरिकेने क्युबाची नाकेबंदी करून तीन महिने झालेले आहेत. गेल्या महिनाभर क्युबामध्ये वीज गायब आहे. रात्री भयाण शांततेचे वातावरण आहे. क्युबामध्ये चार चाकी वाहनांच्या कित्येक किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत. त्यासाठी अनेक दिवस नागरिक रस्त्यावरच असतात. अन्य प्रश्नांचा तर विचारही करू नये, इतकी वाईट परिस्थिती सध्या क्युबाची आहे. क्युबामध्ये आजच्या घडीला ९० टक्के जनता कुपोषित आहे. औषधांची मारामार आहे. आवश्यक त्या शस्त्रक्रियेअभावी अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. क्युबाचे इतके हाल चालू आहेत की खुद्द अमेरिकेमध्ये काही मानवतावादी संघटनांनी आणि व्यक्तींनी ट्रम्प सरकारविरोधात आवाज उठविलेला आहे. आपण क्युबन लोकांना भुके मारून मृत्यूचे दार दाखवायला घेतले आहे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. क्युबामध्ये कधीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यात हजारो नागरिक भूकमरीला बळी पडू शकतात. तो एक प्रकारचा नरसंहार ठरेल.

तरी देखील क्युबा वाकलेला नाही. शेजारच्या व्हेनेझुएलाने नांगी टाकलेली आहे. जानेवारी महिन्यात व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ट्रम्प यांनी अमेरिकेत पकडून आणल्यानंतर संपूर्ण व्हेनेझुएलाचे सरकार अमेरिकेला शरण गेले. खुद्द निकोलस मादुरो यांची मुले सरकार समर्थक आहेत. सद्या व्हेनेझुएला हे अमेरिकेचे मांडलिक राज्य म्हणून वागत आहे. नुकताच व्हेनेझुएलामध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. काही हजार माणसं त्यात मारली गेली. त्यांच्याविषयी अनुकंपा दाखवत, प्रसारमाध्यमे व्हेनेझुएला सरकारवर तुटून पडलेली आहेत. व्हेनेझुएलातून सरकारविरोधात चित्रण करून ते जगभर प्रसिद्ध करण्यात प्रसारमाध्यमे आघाडीवर आहेत. व्हेनेझुएलाचे सरकार त्यांचे काही वाकडे हलवू शकत नाही.

व्हेनेझुएलामध्ये आठ महिन्यांपूर्वी या गोष्टी अशक्य कोटीतल्या होत्या. तेथील सरकार विरोधकांना पकडून सरळ जेलमध्ये टाकून देत असे. आता व्हेनेझुएला सरकारकडे ही हिंमत उरलेली नाही. कोणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी सध्या व्हेनेझुएलाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर क्युबाला अजूनही अमेरिकन सरकार वाकवू शकलेले नाही. हा चमत्कार म्हणावा लागेल. तसे क्युबा आणि व्हेनेझुएला दोन्ही देश कम्युनिस्ट राजवटींचे देश. त्यात व्हेनेझुएला अधिक बलवान. व्हेनेझुएलाकडे खनिज तेलाचे भांडार आहे. संपूर्ण जगाला १०० वर्षे पेट्रोल पुरवू शकेल इतके तेलाचे साठे व्हेनेझुएलामध्ये उपलब्ध आहेत. क्युबाकडे त्या तुलनेत काहीच नाही. क्युबन सैनिक व्हेनेझुएलाच्या पदरी नोकरी करतात, यावरून काय समजायचे ते समजा. तरीदेखील क्युबा अमेरिकेला शरण जात नाही. हे काय गौडबंगाल आहे?
क्युबाचा आधुनिक इतिहास चित्तथरारक आहे. क्युबा क्रांतीची जननी आहे. क्युबा हे अमेरिका खंडातील पहिले कम्युनिस्ट राष्ट्र होते. १९५८मध्ये हुकूमशाह बॅटीस्टा यांचा क्युबन राज्यक्रांतीने पराभव केला. या क्रांतीचे नेतृत्व फिडेल कॅस्ट्रो, चे ग्वेवारा आणि अन्य क्रांतिकारक करत करत होते. केवळ ८१ साथीदारांसह १९५६ मध्ये ओरिएंटे प्रांतातून फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबामध्ये प्रवेश घेतला. त्यातील फक्त १२ शिल्लक उरले. सिएरा मेस्त्रा या पर्वतराजीतून त्यांनी क्रांती पुढे चालू ठेवली. हळू-हळू लोकांचे लोंढे त्यांच्याकडे वळू लागले. हवाना या क्युबाच्या राजधानीमध्ये जीवघेणा प्रवेश करीत कॅस्ट्रो यांनी बॅटीस्टा यांना १ जानेवारी १९५९ रोजी देशाबाहेर पळून जाणे भाग पाडले. त्यावेळी क्युबन जनता दारिद्र्यात खितपत पडली होती. फिडेल कॅस्ट्रो यांनी देशासाठी नवीन धोरण जाहीर केले. देशावरील अमेरिकेची दादागिरी संपली असल्याची घोषणा केली. जमीनविषयीच्या सुधारणा अंमलात आणल्या. सगळ्यांना शिक्षण आणि औषध उपचार मोफत केला. छोटासाही भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, अशी प्रस्थापितांना तंबी दिली. बँकांचे राष्ट्रीयीकरण करून टाकले. या क्रांतिकारक निर्णयामुळे अमेरिकेचे आर्थिक निर्बंध चालू असताना देखील एक सक्षम राष्ट्र म्हणून क्युबा पुढे आले.

त्या काळामध्ये जगातल्या अनेक राष्ट्रांना स्वातंत्र्याची आस लागली होती. कॅस्ट्रोनी असंख्य क्रांतिवीर निरनिराळ्या देशात पाठवले. त्यांचा खंदा समर्थक चे ग्वेवारा यांना तर बोलिव्हियाच्या अरण्यामध्ये हौतात्म्य प्राप्त झाले. त्यानंतर किमान २५ वर्षे अमेरिकेतील तरुणासहित जगातल्या असंख्य तरुणांचा चे ग्वेवारा चेहरा बनला होते. आजही जगात सर्वात जास्त प्रसारित झालेला फोटो म्हणून चे ग्वेवारा यांचा आर्मी कॅपमधील फोटो प्रसिद्ध आहे.
अनेक देशांनी क्युबन क्रांतीपासून स्फूर्ती घेऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. अमेरिकेने फिडेल कॅस्ट्रो यांना पदच्युत करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यापैकी ऑफ पिग्स हे अत्यंत गाजलेले प्रकरण होते. १९६२मध्ये रशियाने क्युबाला अण्वस्त्रे पुरविली. या गोष्टीवरून अमेरिकेने तिसर्‍या महायुद्धाची धमकी देखील दिली होती. तरीदेखील क्युबा झुकला नाही. कोविडने मात्र क्युबाचे कंबरडे मोडून टाकले. क्युबा पर्यटनासाठी जगातला स्वर्ग मानला जायचा. कोविडमुळे पर्यटनच थांबले. क्युबाकडे स्वतःची अशी आर्थिक ताकद नाही. नैसर्गिक संपत्ती नाही. निकेल आणि काेबाल्टचे भांडार सोडले तर साखर, तंबाखू, रम आणि कॉफी या शिवाय क्युबा कोणत्याही गोष्टी निर्यात करू शकत नाही. त्यात अमेरिकेने क्युबावर विशेष आर्थिक निर्बंध चालूच ठेवले.
राष्ट्राध्यक्ष ओबामांचा कालखंड वगळता क्युबावर अमेरिकेचा निरंतर निर्बंध राहिला. त्यामुळे हळू-हळू क्युबा कोसळू लागला. फिडेल कॅस्ट्रो अध्यक्षपदावर असेपर्यंत क्युबा जगात चमकत होता. २००६ साली कॅस्ट्रो निवृत्त झाले. त्यांचे भाऊ राऊल कॅस्ट्रो सत्तेवर आले. त्यांच्या कारकीर्दीत क्युबा ताठ कण्याने उभा राहिला. सन २०१६पासून डायस कॅनेल अध्यक्ष पदावर आल्यापासून आणि अमेरिकेने निर्बंधाचे पाश अधिकाधिक आवळायला घेतल्याने क्युबा जागतिक क्रमवारीत घसरत चाललेला आहे. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमानवीय पद्धतीने क्युबाभोवती फास आवळायला घेतलेले आहेत. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातून क्युबामध्ये तेल निर्यात करण्यासाठी प्रतिबंध लावलेले आहेत. त्यामुळे क्युबाचे सर्व प्रश्न उग्र बनत चाललेले आहेत. तेल नाही म्हणून ट्रान्स्पोर्ट नाही, ट्रान्स्पोर्ट नाही म्हणून मालाची ने-आण नाही. मालाची ने-आण नाही म्हणून जागोजागी लोकांना अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. ट्रम्प यांची ही खेळी क्युबाने त्यांना शरण यावे यासाठी खेळली जात आहे. त्यास जगातून सर्वत्र विरोध होत आहे. माणसांना वेठीस धरून एखादा देश नमवणे हे युनायटेड नेशनच्या चार्टरचे उल्लंघन आहे.

डोनाल्ड ट्रम्प जगाच्या मतांची किंमत करत नाहीत. तरीदेखील अजूनपर्यंत क्युबा वाकलेला नाही. उलट साम्राज्यवादाच्या विरोधात ठामपणे उभा राहण्याची भाषा करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना शह देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय धोरण बदललेले आहे. आता क्युबामध्ये खाजगी कंपन्यांना व्यापार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सरकारी कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्याची मुभा परकीय नागरिकांना देण्यात आलेली आहे. खाजगी बँका चालू करण्याच्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. स्थावर मालमत्ता परकीयांनी विकत घेणे सुलभ केलेले आहे. आता पुढे काय घडेल हेच पहायचे आहे. ट्रम्प यांची सरशी होते की, क्युबन सरकार तारले जाते याकडे जग उत्कंठेने पाहत आहे.

Previous Post

लोच्या झाला रे!

Next Post

बावन्न पत्त्यांचा डाव आता संपवायलाच हवा…

Next Post
बावन्न पत्त्यांचा डाव आता संपवायलाच हवा…

बावन्न पत्त्यांचा डाव आता संपवायलाच हवा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.