• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लोच्या झाला रे!

प्रशांत केणी खेळियाड

Marmik Team by Marmik Team
August 13, 2026
in खेळियाड
0
लोच्या झाला रे!

चित्र-आशुतोष वाळे

रोहित शर्मा लॉर्ड्सवर अखेरचा सामना खेळून निवृत्त होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती म्हणे! ठरल्यानुसार ठरल्या ठिकाणी बातमी पेरली गेली; पण ह्यावेळी ही योजना फसली. आता तर बूमरँग होऊन आगरकर-गंभीर यांचंच अस्तित्व धोक्यात आलंय. रोहितचा अपेक्षित निरोप समारंभ का गुंडाळण्यात आला? ह्या घटनेबाबत इंद्राच्या दरबारात केलं गेलेलं हे विश्लेषण.

 

(देवलोकी आनंदी-आनंद पसरला होता. कारण रोहित शर्माची निवृत्ती टळली होती. दरबारात सिंहासनावर देवांचा राजा इंद्र विराजमान होता. बाकीचे देवही ह्या आनंदवार्तेत मश्गुल असताना तिथे नारद मुनी अवतरतात…)
नारद : नारायण… नारायण! लोच्या झाला रे! महाराज पृथ्वीवरून खास बातमी आहे. पराक्रमी फलंदाज रोहितला दिलासा मिळालाय. तो पुढेही खेळत राहील, असं स्पष्ट झालंय.
इंद्र : नारदा, ही वार्ता आणायला तू खूप विलंब केलास. देवभूमीत तर दिवाळी साजरी होतेय.
ब्रह्मा : रोहितशिवाय २०२७चा विश्वचषक ही कल्पनाच मी करू शकत नाही. पण उशिरा का होईना मंडळाला सुबुद्धी लाभली, हे चांगलं झालं!
विष्णू : नारदा, म्हणजे रोहित निवृत्त होणार, ही तुझी वार्ता खोटी ठरली तर…
इंद्र : हा, हा, हा! म्हणून तो निराश आहे. (सर्वांकडे पाहात) नारदाचा चेहरा पाहा. हे सूत्र तसं वर्षानुवर्षं चालत आलेलं. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांनाही याच सूत्रानं निरोप दिला. अगदी आणखी काही गाजलेल्या खेळाडूंची काही विशिष्ट क्रिकेट प्रकारातील निवृत्तीही ह्याच पद्धतीनं झाली. यावेळी हा मान होता, मुंबईच्या राजाचा. म्हणजे रोहित शर्माचा. ‘लॉर्ड्सवर १९ जुलैला रोहित अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार!’ ही बातमी ठरल्याप्रमाणे परंपरेनुसार नारदा तुझ्या माध्यमातून योग्य ठिकाणी पेरण्यात आली. पण… नारदा, मोठा गेम झाला यार! (आता सर्वच ह्या हास्यजल्लोषात सामील झाले आणि नारद थट्टेचा विषय ठरला.)
ब्रह्मा : गेल्या काही वर्षांत चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे यांनाही तुमची गरज संपली, अशा सूचना प्राप्त झाल्या, म्हणूनच त्यांनी निवृत्ती जाहीर करून नवे मार्ग पत्करले.
इंद्र : तसं तर महाभारतातही लाक्षागृह उत्तम बांधण्यात आलं होतं. ते जळलंही; पण जसे पांडव सहीसलामत वाचले. तसेच रोहितही तूर्तास बचावला. रोहितची कारकीर्द संपवण्यासाठी आखलेली योजना अंगलट आली.
नारद : ‘दिसते मजला सुखचित्र नवे’… हे गाणं गुणगुणत राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय क्रिकेट प्रकाराच्या विश्वचषकासाठी संघबांधणीचे सुखचित्र उभे करायचे होते. या मोहिमेत त्यांना रोहित नकोसा झालेला. त्याचा अनुभव कुचकामी ठरेल, असं वाटत होतं.
ब्रह्मा : विश्वचषकासाठी तसा वर्षभराचा अवधी. मग ही घाई कशासाठी?
नारद : ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून दाखवला. तशीच नव्या उमेदीची संघरचना करून २०२३मध्ये हुकलेला एकदिवसीय विश्वचषक यंदा आपलाच असावा, ह्या इराद्याने ही आखणी सुरूही केली होती…
इंद्र : नारदा, रोहितच्या निवृत्तीची योजना कशी फसली, ही सुरस कथा आम्हाला ऐकायला अतिशय आवडेल.
नारद : महाराज, रोहितच्या निवृत्तीची बातमी हा-हा म्हणता वार्‍यासारखी पसरली. रोहितचे आई-वडीलसुद्धा लंडनमध्ये डेरेदाखल झाले. पत्नी तिथेच होती. प्रसारमाध्यमांनी आणि समाजमाध्यमांनी ह्या निरोपाच्या सामन्याच्या दृष्टीनं मोठी वातावरणनिर्मिती केली. पण काही तासांत चक्र वेगानं फिरली; पण विरुद्ध दिशेनं…
ब्रह्मा : नारदा, उत्कंठा कशी वाढवायची, हे तुझ्याकडून शिकावं. नेमक्या ह्याच वेळी असं काय घडलं की होत्याचं नव्हतं झालं!
नारद : ऐका तर… रोहित निवृत्त होतोय, हे कळताच हे आम्हाला नामंजूर आहे, असं सांगणारा क्रिकेटरसिकांचा मोठा वर्ग तयार झाला. रोहितवर निस्सीम प्रेम करणार्‍या क्रिकेटचाहत्यांची नाराजी उघडपणे मांडली जाऊ लागली. इथेच सारा गेम फिरला!
विष्णू : त्यात पुन्हा रोहितनं शतक झळकावून विरोधकांना चोख उत्तर दिलं. त्याची कामगिरीच पुरेशी ठरली!
नारद : विष्णूजी, तेवढंच नाही घडलं. आदल्या दिवशी रोहितच्या निवृत्तीच्या सामन्याची वार्ता पसरताच त्याचे तीव्र पडसाद जसे जनमानसात आणि माध्यमांत उमटले, तसे भारतीय क्रिकेट मंडळातील पदाधिकार्‍यांतही उमटले. तिथे रोहितची कारकीर्द वाचवणारा गट सक्रिय झाला आणि आगरकर-गंभीर अल्पमतात पडले. ‘बीसीसीआय’चे सचिव देवाजित सैकिया यांनी लंडनमध्ये सारवासारव करीत असं काही घडलं नसल्याचं नाट्य उभं केलं. ‘रोहितच्या भवितव्याबाबत माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, रविवारी लॉर्ड्सवर होणारा सामना हा रोहितचा अखेरचा सामना नसेल. रोहित हा भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे आणि तो संघाच्या योजनांचा भाग असेपर्यंत देशाचे प्रतिनिधित्व करत राहील,’ अशी ग्वाही सैकिया यांनी दिली. हे सारं सामन्याआधीच्या २४ तासांत घडलेलं.
इंद्र : म्हणजे रोहितनं इंग्लंडच्या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यानं इंग्लिश गोलंदाजांचा हिंमतीनं मुकाबला करीत ११० चेंडूंत १३८ धावांची खेळी साकारली. त्याआधीच आपण भारतीय संघात यानंतरही आहोत, याची शाश्वती त्याला मिळाली होती तर…
नारद : हो, महाराज. बरोब्बर!
ब्रह्मा : वाह, आगरकर-गंभीरची योजना बूमरँगच झाली. गेल्या काही वर्षांत असं घडलं नव्हतं. रोहित-कोहली ही ‘रो-को’ जोडी त्यांना खटकतेय; पण तरीही उत्तम कामगिरी करीत त्यांच्या नाकावर टिच्चून खेळतेय.
विष्णू : आता कुणाचा गेम होणार? कटाचे प्रमुख सूत्रधार आगरकर? की संघात अंतर्गत असंतोष निर्माण करणारा गंभीर? ही मला उत्सुकता निर्माण झालीय.
नारद : माझ्या खास दूतांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरकरचा कार्यकाळ पुढील वर्षीच्या विश्वचषकापर्यंत वाढवण्याचा ‘बीसीसीrआय’चा विचार होता. परंतु आता आगरकरच्या जागी अनुभवी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणकडे राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपवावी, अशी योजना आखली जातेय. निवड समितीत रविचंद्रन अश्विनलाही स्थान मिळवण्याची दाट शक्यता आहे.
ब्रह्मा : लक्ष्मण हे नाव विश्वासार्ह आहे. सध्या ‘जेन झी’चा उदो-उदो करण्याच्या नादात अनुभवी खेळाडूंकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतेय, ते लक्ष्मणपर्वात होणार नाही. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार या मंडळींची उमेद टिकून राहील.
नारद : माझी सूत्रं असंही सांगतात की, सैकिया यांनी रोहित अजून खेळत राहणार हे जाहीर करताना निवड समितीला विश्वासात घेतलं नव्हतं.
विष्णू : ह्याचाच अर्थ धूर आहे, म्हणजे काहीतरी जळतंय!
ब्रह्मा : सध्या हे प्रकरण सामोपचारानं हाताळलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
नारद : सप्टेंबरमध्ये ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल. ती निर्णायक ठरेल. पण तोवर होणार्‍या सामन्यांचे निकाल हे दिशादर्शी ठरतील.
इंद्र : म्हणजे श्रीलंका दौरासुद्धा महत्त्वाचा ठरणार तर…?
नारद : अर्थात, तिकडे वेगळीच समस्या झालीय!
विष्णू : ऐन दौर्‍यात… ती कोणती?
नारद : दुखापतींनी भारतीय संघाला पछाडलंय. कर्णधार शुभमन गिल, जसप्रीत बुमरा, साई सुदर्शन हे तिघेजण दुखापतींमुळे कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही.
इंद्र : वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, आकाशदीप हेसुद्धा बेंगळुरूच्या केंद्रात दुखापतीतून सावरतायत.
ब्रह्मा : म्हणजे सगळं कठीणच म्हणावं लागेल. गंभीरची प्रशिक्षक म्हणून कसोटीतली कामगिरीही तितकी समाधानकारक नाही. चला, तूर्तास आपण श्रीलंकेतील सामन्यांचा आस्वाद लुटुया!
नारद : हो, आणि मी ताजी वार्ता घेऊन येईनच!
इंद्र : रोहितच्या निवृत्तीच्या बातमीसारखी…?
(एकच हशा पिकतो, पण नारद हिरमुसतो.)

Previous Post

कावड

Next Post

क्युबाला गाझा बनवण्याचा ट्रम्प यांचा चंग!

Next Post
क्युबाला गाझा बनवण्याचा ट्रम्प यांचा चंग!

क्युबाला गाझा बनवण्याचा ट्रम्प यांचा चंग!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.