• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कावड

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

Marmik Team by Marmik Team
August 13, 2026
in वात्रटायन, विनोदी लेख
0
कावड

चित्र-आशुतोष वाळे

अर्ध्या घरातून बाहेर पडला अन् एकदोन गल्ल्या ओलांडून मंदिर गल्लीत आला. यायचं कारण देवदर्शन होतंच, पण त्याच वेळी अजयला भेटणंही होतं. आणि ज्याच्यासाठी अर्ध्या आला तो अजय समोर उभा.
‘राम राम भाऊ!’ अध्वर्यूनं समोर उभ्या असलेल्या अजयला रामराम घातला.
‘जय श्री राम!’ अजयनं काहीश्या जोरकसपणे प्रतिसाद दिला. हा अजय म्हणजे सर्व उत्सव मंडळांचा सक्रिय सदस्य. गणपती म्हणू नका, देवी म्हणू नका, की कसला उत्सव! प्रत्येक धार्मिक कामांत त्याचा सहभाग ठरलेला. वय साधारण पंचवीस-सव्वीसच्या आसपास. पण गुटखा आणि गायछाप कायम तोंडात भरलेला. कपाळभर कुंकू फासलेलं.
‘मग काय तयारी?’ अर्ध्यानं उगाच विचारपूस सुरू केली.
‘अरे श्रावण आलाय, मग पहिल्या सोमवारी गोदेतून कावड आणायची आहे, अभिषेक घालायला.’ अजयनं माहिती दिली.
‘तेवढं झाल्यावर मग निवांत ना?’ अर्ध्याला काही काम करवून घ्यायचं दिसतं.
‘कसलं? त्यानंतर गणपती येतील…’ अजयचं पुढलं वेळापत्रक तयार.
‘हा पण ते झाल्यावर…’ अर्ध्याची वेडी आशा.
‘मग देवी घटी बसायला ज्योत घेऊन यावं लागेल…’ अजय थांबणार्‍यातला आहे थोडाच?
‘हां पण त्यानंतर तरी..?’ अर्ध्याचा भाबडेपणा.
‘कसलं? त्यानंतर वसुबारस… म्हणजे गोशाळा भेटी! गायीपूजन!’ अजयनं पुढलं पण नियोजन सांगितल़ं
‘मग पुढं तरी?’ आता अर्ध्यानं चाचरतच विचारलं.
‘पुढं यात्राबित्रा आणि…’ अजय काही सांगायला सुरुवात करतोय तोच अर्ध्यानं कानावर हात ठेवले.
‘बास, बास! मी काय कॅलेंडर उचकू राहिलो का? हे झालं का ते आणि ते झालं की हे!’ अर्ध्या पारच भणभणला.
‘तुला करायचं काय आहे पण? काही काम करायचं होतं का तुला?’ अजयला अर्ध्याचं काही काम असंल याची जाणीव झाली.
‘भंड पडो त्या कामावर! पण मी म्हणतो, हे झालं का ते, ते झालं का हे! असले उद्योग करायचेच असत्या का तुला?’ काहीश्या रागात अर्ध्यानं विचारलं.
‘अरे धर्मासाठी करावं लागतं! आपल्यासाठी धर्मानं काय नाही केलं? मग आपण थोडं फार केल्यानं काय बिघडलं?’ अजयनं अर्ध्याला कोडं घातलं.
‘धर्मासाठी?’ अर्ध्यानं पुन्हा प्रश्न केला.
‘हो, धर्मासाठी! हे इतर देशांत लोकं धर्मासाठी काय काय करतात, माहित्येय का?’ अजयनं प्रश्न केला.
‘काय करतात ते नेमकं?’ अर्ध्याचा भाबडा प्रश्न.
‘हेच आपलं..? ते नाही का..?’ अर्ध्याच्या अनपेक्षित प्रश्नानं गडबडलेल्या अजयला काही सुचेना.
‘हे काय?’ अर्ध्या पिच्छा सोडायला तयार नाही.
‘ते काही देशात नाही का, अंगाला बॉम्ब लावून हल्ले करतात…’ अजयला काहीतरी सुचायला लागलंय.
‘मग आपल्या धर्मासाठी आपण पण अंगाला बॉम्ब लावायचा का?’ अर्ध्या नुसत्या प्रश्नानेच धास्तावला.
‘तसं काही नाही… पण… त्याच्या वातीसारखं आपण तेवत रहायचं!’ सुचलं सुचलं अजयला पुढे सुचलं.
‘बॉम्बला वात असते? समजा, असली जरी तरी किती वेळ ती टिकते?’ अर्ध्यानं पुढला प्रश्न टाकला.
‘अरे… काय बोलावा ब्वॉ! पण ते लोकं धर्मासाठी मरायला तयार होतात, आपण जगू शकत नाही का?’ अजयनं घासूनपुसून वापरून झालेलं वाक्य आठवेल तसं फेकलं.
‘हां, ते आहे!’ अर्ध्या गोंधळला, पण विषय धर्माचा आहे म्हंटल्यावर नाही कसं म्हणणार? त्यानंही मान डोलावली.
‘चल मग, कावड आणायला येतो का?’ अजयनं लागलीच अर्ध्याला प्रस्ताव दिला.
‘पण किती दिवस लागतील?’ अर्ध्यानं डोकं खाजवत विचारलं.
‘दोन दिवस फक्त!’ अजयनं सहज माहिती दिली.
‘मग ठीक आहे, त्यानंतर लगेच कामावर जाता येईल म्हणजे!’ अर्ध्याची त्याची त्याची गणितं.
‘येडा आहे का? तिथून आल्यावर तीनचार दिवस पाय अशे दुखात्या का बास! उठायला मोकार त्रास होतो. त्याच्यात तू पहिल्यांदा आल्यावर तर आठेक दिवस तर लागतीलच!’ अजय हसून बोलला.
‘का बरं एवढे दिवस?’ अर्ध्याला कळेना.
‘अरे येड्या, पळत यायचं म्हणजे सोपं समजला का? पाय अशे दुखतील मग समजंल!’ अजयनं कारण सांगितलं.
‘अरे हा पळावं लागंल ना? मग नको! मी नाही येत! एवढे किलोमीटर नाही जमायचं मला.’ अर्ध्यानं थेट नकार कळवला.
‘हा तू फोफसाच आहे. तुला काय जमायचं आहे हे! त्याला स्टॅमिना लागतो. दरवेळी पळावं लागत.’ अजयला अर्ध्याला टोचायला मुद्दा सापडला.
‘खरंय यार! माझं ना पळणंच होत नाही.’ अर्ध्यानं कबूल केलं.
‘आमचा दर वर्षाचा सराव झालाय. त्याच्यामुळं काही वाटत नाही. पण तरी थोडेफार पाय दुखतातच!’ अजय!
‘पण जमवता कसं रे? एवढं पळायचं, त्याच्यात खांद्यावर कावड! सोपं नाही रे!’ अर्ध्यानं उत्सुकतेने प्रश्न विचारला.
‘देवाची इच्छा असली की होतं रे! फक्त मनात श्रद्धा पाहिजे!’ अजयनं मागून मंदिरात घुसणार्‍या एक वृद्ध व्यक्तीकडं बघून स्वतःची फुशारकी गायली.
‘पण खरंच एवढं पळल्यावर पाय दुखत नाहीत का रे?’ अर्ध्याला जाणून घ्यायची खुदबूद आहेच अजून.
‘त्याला ना, एक ट्रिक असते,’ अजयनं डोळे मिचकावत खिश्यातली चिलीम कतरती दाखवली अन् पटकन खिशात पुन्हा लोटली, ‘जालीम आयुर्वेदिक उपाय. सब दर्द का इलाज!’
‘त्याच्यानं काय होतं?’ अर्ध्याला अजून काही कळेना.
‘अंग ठणकायचं थांबतं! पळायला दम लागत नाही.’ अजयनं फायदे सांगितले.
‘पण नेमकं राहतं काय त्याच्यात?’ अर्ध्याला अजूनही काही कळालेलं नाही.
‘हे बघ!’ अजयनं खिश्यातला एक पुडगा थोडासा वर करत पुन्हा खिश्यात भरला.
‘मग हे कुणी बघितल्ां तर…’ अर्ध्याला धास्ती पकडलं वगैरे जाण्याची.
‘अरे आपल्याकडून जाणारे सगळे सर्रास घेतात. बाकीचे माहीत नाही. आणि हे सगळ्यांना माहिती असतं. एक झुरका जरी घेतला तरी अशी तरतरी येते ना? का त्याच्यात तू डोंगर चढायला लाव! पोरं बिनदोराचे कडे चढतील. काय समजला?’ अजयनं गुपित उलगडलं.
‘पण असं हे घेणं…’ अर्ध्याला अजूनही गैर वाटलं.
‘हे पहाय. माझ्या बघण्यात काही चपटीबहाद्दर पण दिसले, काही आणखी भलते प्रयोग करणारे भेटतात. पण आपण मात्र बाबा लोक, साधुलोक जो माल घेतात, तेच वापरतो. देवाच्या दारी जाताना हे असं भलतं घेऊन नाही जायचं.’ अजयनं त्याचं वेगळेपण सांगितलं.
‘पण नशा ही नशाच असते ना?’ अर्ध्यानं त्याच्या समजेप्रमाणे जे गैर वाटतं त्यावर प्रश्न विचारला.
‘सगळी थोडीच सारखी असते का? आता व्हेज खाऊन पण पोट भरतं आणि नॉन व्हेज खाऊन पण पोटच भरतं. पण आपले संस्कार आणि संस्कृती शाकाहारच करायला शिकवते. तसंच आहे हे! नशा यानेही होते आणि त्यानेही! पण ते आपल्या संस्कारात नाही. आपण स्वतःला बाटवणार नाही. असे उद्योग करून. काय?’ अजयनं संस्कारमाहात्म्य ऐकवलं.
‘म्हणजे हे असं बी रहातं का?’ आता अर्ध्या बुचकळ्यात पडला.
‘असंच असतं बाबा. मी तर हे दहा-दहा दिवसाचे कार्यक्रम असतात ना? तेव्हा खास माझ्यातर्फे  सोय करून देतो पोरांना. दिवसभर काम करून आणि गर्दीने पोरं जाम होतात रे! मग थोडं फार नको का थकवा घालवायला?’ अजयनं गोंडस कारण जोडलं.
‘पण नशेत पोरं नको त्याला शिव्या घालून धिंगाणा घालतात. हे रस्त्याने जाणारी पोरं राडे करतात. यानं…’ अर्ध्याला जे खटकतंय ते विचारायचं धैर्य आहे त्याच्यात अजून…
‘हा यानं बट्टा लागतो. पण बाजूनं जाणार्‍या लोकांनी धार्मिक कामाला जाणार्‍या पोरांना उगाच कश्याला डिवचायचं? एक तर तुम्ही धर्माचं काही करत नाही, जे करतात त्यांना उगाच छेडायला जातात. कश्यासाठी? मिळतंय त्याला पुण्य तर तुम्हाला अडचण का? उलट त्यांना खास जाण्याची-येण्याची सोय करून द्यावी. जी तिकडं बाबानं त्याच्या राज्यात करून दिलीय तशी!’ अजयनं उलट पोरांची बाजू घेतली.
‘पण मला एक कळत नाही, धार्मिक कामं करायची तर धर्मातील जित्या माणसांचं जगणं सुकर होईल असं काही केलं तर चालत नाही का? त्यानं पुण्य भेटतच नाही का? का दरवेळी हेच प्रार्थनास्थळं धरायची, तिथंच जायचं. तिथले देव पुजायचे. पुजार्‍यांकडून देव पुजल्याचे प्रशस्तीपत्र घ्यायचे. याची खरंच गरज आहे? धार्मिक काम म्हणजे फक्त कर्मकांड एवढंच का?’ अर्ध्याला भलते-भलते प्रश्न पडायला लागले.
‘तू निघ हांडग्या! परत जर देवळाच्या बाजूला दिसला ना? मग माझ्या इतका वाईट कुणी नसंल.’ अजयनं दातओठ खात धमकी दिली. तसा अर्ध्या घाबरून मागं फिरला. पण त्याच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं. त्यावेळी गाडगेबाबांना ही अजयसारखी लोकं कधी भेटली असतील काय? त्यांनाही कुणी दमबाजी केली असेल का? तो विचार करत करत घराच्या दिशेनं निघाला.

Previous Post

श्री दत्त बेकरी

Next Post

लोच्या झाला रे!

Next Post
लोच्या झाला रे!

लोच्या झाला रे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.