
शारीरिक आणि आर्थिक अडचणींनी भेडसावलं असताना प्रबोधनकार मुंबईत बरंच काही घडवतही होते. पुढे प्रबोधकारांनी याच काळाचं वर्णन अज्ञातवास असं केलेलं असलं तरी, त्यांनी याच काळात ‘शनिमाहात्म्य’सारखं पुस्तक हातावेगळं केलं. सार्वजनिक नवरात्रौत्सवाची मुहूर्तमेढही रोवली. याच काळात त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिलं, ते म्हणजे, शेतकर्यांचं स्वराज्य.
तो१९२७चा नोव्हेंबर महिना होता. निमित्त होतं कोर्टाच्या नोटिसींना उत्तर द्यायचं, प्रबोधनकार पुण्याहून मुंबईला आले, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की ते प्रबोधनचे संपादक म्हणून पुन्हा पुण्याला जाऊ शकणार नाहीत. ते मुंबईत आले आणि आजारी पडले. आर्थिक अडचणीत सापडले. कसेबसे एक महिना प्रबोधन आणि साप्ताहिक लोकहितवादीचे अंक काढले. त्यानंतर साप्ताहिक लोकहितवादीचे अंक कायमचे बंद पडले. प्रबोधनही बंद पडलं. इथे त्यांचा दारिद्र्याशी आणि प्रकृतीशी संघर्ष सुरू राहिला. धाकटा भाऊ आणि मेहुणा यांच्या आश्रयाला राहणं भाग पडलं. तरीही ते हरले नाहीत. शनिमाहात्म्य या ग्रंथाच्या लेखनाने पहिला हात दिला. सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या चळवळीने पुन्हा एकदा सामाजिक जीवनात भूमिका मिळवून दिली. हळूहळू दादरच्या मिरांडा चाळीत त्यांच्या संसाराची घडी बसली.
त्यात अनेक मित्रमंडळी प्रबोधनकारांच्या मदतीला धावून आलेली दिसतात. त्यात एक महत्त्वाचं नाव म्हणजे, दिनकरराव जवळकर. महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव. जहाल लेखणी आणि तितक्याच आक्रमक वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी ब्राह्मणेतर चळवळ जनसामान्यांपर्यंत पोचवली. पुण्यात असताना त्यांचा प्रबोधनकारांशी स्नेह जुळला. जवळकर आणि त्यांची मित्रमंडळी प्रबोधनकारांपेक्षा वयाने दहा बारा वर्षांनी लहान. प्रबोधनकारांचा पत्रकारितेला अनुभव, व्यासंग आणि सामाजिक कार्यातलं योगदान यामुळे त्यांना थोरलेपणाचा मान मिळाला. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत नावारूपाला आलेल्या जवळकरांवर प्रबोधनकारांचा प्रभाव होता. त्यांच्या लिखाणावर आजही तो पाहता येतो. तो प्रभाव इतका की जवळकरांचं `देशाचे दुश्मन हे पुस्तक प्रबोधनकारांनीच लिहिलं असावं, असा पुण्यातल्या सनातन्यांना संशय होता. त्यामुळे तर प्रबोधनकार कायदेशीर कचाट्यात येता येता वाचले.
प्रबोधनकार पुण्याहून मुंबईला येऊन तीनचार महिनेच झाले असताना त्यांना कळलं की जवळकर विलायतेला गेले आहेत. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्याचं कारण त्यांनी दिलं आहे. फाटक्या खिशाचा हा सर्वश्रुत इनामदार. काही हजार बिजार नव्हे तर म्हणे चक्क एक लाख रुपये नोटांचे पुडके पाटलोणीत कोंबून लंडना गेला! त्याच्या प्राप्तीचे ओढे तर नेहमी सुकेठाक आढळायचे! काही महिन्यांनी लंडन दौर्याहून परतल्यावर जवळकर लगेचच प्रबोधनकारांना भेटायला आले. त्या भेटीतली चर्चाही प्रबोधनकारांनी लिहून ठेवली आहे. जवळकर म्हणाले, लंडनला जाऊन आलो दादासाहेब. पंतप्रधान मॅकडोनल्डची भेट घेतली. त्यावर प्रबोधनकारांना प्रश्न पडला की इंग्रजी येत नसताना जवळकर कसं काय इंग्लंडभेट करून आले? पण जवळकरांनी इंग्रजीची अडचण ब्रिटनच्या वाटेवरच्या जहाजाच्या पंधरा दिवसांच्या प्रवासात सोडवली. सेल्फ इंग्लिश टीचर पुस्तकातलं पाठांतर केलं. जहाजावरच्या प्रवाशांशी हिमतीने इंग्रजी बोलण्याचा सराव सुरू ठेवला. लिवरपूलला उतरेपर्यंत कामचलाऊ इंग्रजीची सोय झाली होती.
मुंबईला परतून जवळकरांनी मुंबईत केनेडी पुलाच्या तोंडाशी छापखाना सुरू केला. वैâवारी नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्यासाठी आशीर्वाद घ्यायलाच ते प्रबोधनकारांना भेटायला आले होते. कारण प्रबोधनकार हे जवळकरांसारख्या ब्राह्मणेतर चळवळीतल्या अनेक लेखक पत्रकारांचे आदर्श होते. जवळकरांनी प्रबोधनकारांची आपुलकीने चौकशी केली. प्रबोधनकार अडचणीत आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं असावं. पण त्यांना मदत किंवा उपकार म्हणून पैसे देणं प्रशस्त वाटलं नसावं. त्यामुळे त्यांनी प्रबोधनकारांना शेतकर्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या भवितव्यावर पुस्तक लिहायला सांगितलं. प्रबोधनकारांनी हो म्हटलं पण एक अडचण होती. दरम्यानच्या काळात एका रेल्वे प्रवासात खिडकीचा वजनदार दरवाजा हातावर पडल्याने त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता. त्यामुळे त्यांना लिहिता येत नव्हतं. पुढे त्यांनी टाइपरायटरवर एका हाताने लिहिण्याची सवय लावून घेतली. तरीही त्यांच्यापाशी कुणी ना कुणी लेखनिक म्हणून सोबत असे, असं दिसतं. हे पुस्तक लिहिण्यासाठी गोव्यातल्या देवदासी समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे तरुण कार्यकर्ते मोतीराम जांबावलीकर हे लेखनिक म्हणून मदतीला आले. जवळकरांनी लेखकाचं मानधन म्हणून तीनशे रुपये रोख काढून दिले. जवळकरांच्या नव्या छापखान्यालाही प्रबोधनकारांसारख्या लोकप्रिय लेखकाच्या पुस्तकाचा फायदाच होणार होता. तरीही या पुस्तकाच्या ऑफरमधून प्रबोधनकारांना मदत करण्याचा हेतूच स्पष्टपणे दिसून येतो.
खरं तर प्रबोधनकार काही शेतकरी कुटुंबात जन्मलेले नव्हते. त्यांना सातार्यातले नऊ महिने वगळता ग्रामीण भागात राहण्याचा अनुभवही नव्हता. त्यांनी पूर्वी शेतकर्यांवर फारसं लिहिलेलं दिसतही नाही. तरीही प्रबोधनकारांनी या विषयावर लिहिण्याचं कबूल केल्ां आणि ते उत्तम प्रकारे प्रत्यक्षातही आणलं. शेतकर्यांचा असूड लिहिणार्या महात्मा जोतिबा फुलेंचा आदर्श त्यांच्यासमोर होताच. पण त्या काळात जगाला प्रभावित करणार्या कम्युनिस्ट क्रांतीचा प्रभावही त्यांच्यावर होताच. स्वतः जवळकरही याच काळात सत्यशोधक विचारांबरोबरच कम्युनिस्ट विचारांनी भारावले असल्याचा दाखला गेल ऑम्वेट यांनी एका लेखात सविस्तर विशद केलेला आहे. त्यामुळे जवळकरांशी झालेल्या चर्चेचाही प्रभाव या लिखाणावर असावा. कारण हे पुस्तक लिहित असताना जवळकर दर दोन तीन दिवसांनी भेटीला यायचे. अशाच एका भेटीत प्रबोधनकारांनी जवळकरांना विचारलं, काय रे, विलायतचा प्रवास, हा छापखाना, कुठून फिरली एवढी यक्षिणीची कांडी? त्यावर ते आमचं शिक्रीट आहे, सांगेन केव्हा तरी, असं म्हणून जवळकरांनी उत्तर टाळलं. पण ते पुढे मिळालंच. एकदा अशाच भेटीत दोघांचा झालेला संवाद. या संवादाची सुरुवात जवळकरांनी प्रबोधनकारांना केलेल्या विनंतीने झाली.
जवळकर : हे पहा दादासाहेब, या पुस्तकात वाटेल त्यावर हवी तशी टीका करा, पण आमच्या म्हातार्याला– भास्करराव जाधवांना– मात्र दुखवू नका.`
प्रबोधनकार : पण का? आडकित्त्यात खांड आले का मी काडकन तोडणारच.
जवळकर : अहो, त्यांच्या प्रसादानेच मी विलायत गाठली नि छापखाना काढला. दारूपिठ्यांच्या लिलावांना लोकांचा चालला होता कडवा विरोध. जाधवराव अबकारी खात्याचे मिनिस्टर. मिनिस्टरने स्वतः वाटेल त्याला पिठ्याचे कंत्राट द्यावे, असा सरकारी हुकूम निघाल्याचे तुम्हास माहीतच आहे. मी होतो लिलाववाल्यांचा वशिला लावणारा. त्या भानगडीत लखुबाईने अस्मादिकांचा घेतला किस्स. हे आमचे शिक्रीट.
हा सगळा संवाद प्रबोधनकारांनी माझी जीवनगाथामधे दिला आहे. तो रंजक असला तरी बहुजन चळवळीचा फारसा प्रकाशात न येणारा चेहरा दाखवतो. प्रबोधनकारांच्या या आत्मचरित्रात भास्करराव जाधव यांचे असे निरनिराळे पैलू समोर येतात. आजच्या रायगड जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्मून त्या काळात
मॅट्रिकमधे पहिलं येण्याची कामगिरी या विद्वान सत्यशोधकाने केली होती. नंतरही त्यांनी केलेलं लिखाण भारतीय तत्त्वज्ञान आणि इतिहासावर सखोल अभ्यास व्यासंगाची साक्ष देतं. त्यांचं हे मोठेपण हेरलं ते छत्रपती शाहू महाराजांनी. त्यांनी भास्कररावांना अनेक जबाबदार्या दिल्या. छात्रजगद्गुरू म्हणून मराठ्यांचा शंकराचार्य नेमण्याच्या छत्रपती शाहूंच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला. भर दरबारात शंकराचार्यांना मुजरा करण्याचं नाकारलं. हे त्यांचं रूपही माझी जीवनगाथात येतं, तसंच काऊन्सिलच्या निवडणुकांत मराठ्यांनी आपल्यालाच मत द्यावं, असा प्रचार करणारे राजकारणी भास्कररावांची भेटही ते घडवतात. यानंतर मुंबई इलाख्याच्या मंत्रिमंडळात आधी शिक्षणमंत्री आणि नंतर वन, अबकारी आणि शेती खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. यातल्या अबकारी म्हणजे एक्साईज खात्यात दारूच्या दुकानांचे परमिट वाटणारे मंत्री म्हणूनही ते समोर येतात.
जवळकरांविषयी एक आपुलकीची भावना प्रबोधनकारांच्या लिखाणात आहे. पण त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामाची नोंद प्रबोधनकारांनी केलेली नाही. उलट ते पैसे नसताना आणि इंग्रजी येत नसतानाही लंडनला कसे गेले, याविषयीची जास्त उत्सुकता त्यांच्या लिखाणात येते. आपल्या या महत्त्वाच्या सहकार्याविषयी कौतुकाची नाही, तर थोडी हेटाळणीची भावना दिसते. कदाचित विचारनिष्ठेपायी प्रबोधनकार संघर्ष करत असताना जवळकरांनी पैसे कमावण्यासाठी अनैतिक मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांना रागही आला असेल. पण कमावलेल्या पैशातून त्यांनी प्रबोधनकारांना मदतच केलेली दिसते. वैâवारीसारखं बहुजन समाजाच्या भल्याचा विचार सांगणारं साप्ताहिक त्यांनी चालवून पाहिलं. पैशांसाठी त्यांनी काही वैचारिक गद्दारी केलेली नाही. या प्रसंगानंतर तीन चार वर्षांतच जवळकरांचं अवघ्या चौतिसाव्या वर्षी निधन झालं. त्यामुळे प्रबोधनकारांनी एक इतिहासकार म्हणून जवळकरांबद्दल कनवाळूपणा दाखवला असता, तर बरं झालं असतं.
जवळकरांच्या इच्छेनुसार प्रबोधनकारांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव होतं, शेतकर्यांचे स्वराज्य. जवळकरांनी प्रस्ताव दिल्यानंतर दोन तीन महिन्यांतच प्रबोधनकारांनी हे पुस्तक हातावेगळं केलं. लेखकाच्या मनोगताच्या शेवटी दिलेली तारीख आहे, श्रावण, श्रीकृष्ण गोपाल
जन्माष्टमी, शके १८५९. ता. २७ ऑगस्ट सन १९२९ इसवी. जवळकरांचं निधन १९३२ सालचं. प्रबोधनकार मुंबईतही होते १९२७ ते
१९३० या दरम्यान. त्यामुळे २७ ऑगस्ट १९२९ ही तारीख जुळते. पण त्यातलं शके १८५९ हे सालं १९२९शी जुळत नाही. त्यात १८५९च्या ऐवजी १८५१ असायला हवं होतं. याचाच अर्थ प्रबोधनकारांनी मे जून महिन्यात हे पुस्तक लिहायला म्हणजे खरं तर सांगायला सुरुवात केली असावी. मोतीराम जांबावलीकरांनी ते लेखनिक म्हणून अक्षरांत उतरवलं असावं.
शेतकर्यांचे स्वराज्य या पुस्तकाशी आणखी एका सत्यशोधकांचं नाव जोडलं आहे, ते म्हणजे भा.र. कद्रेकर. पुस्तकावर प्रकाशक म्हणून जवळकरांचं नाही, तर भास्करराव कद्रेकरांचं नाव आहे. त्यांचा उल्लेख याआधीही आला आहे. स्वाध्यायाश्रमाच्या उपक्रमापासून त्यांचा प्रबोधनकारांशी संपर्क असावा. कारण प्रबोधनकार दादर सोडून सातार्याला गेले, तेव्हा ते येऊन जाऊन त्यांना मदत करत. त्या अडचणीच्या काळात त्यांनी प्रबोधनकारांना साथ दिली. अगदी सातारा सोडून पुण्याला येतानाही ते सोबत होते. पुढच्या काळात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारी बनले. त्यांच्या समता सैनिक संघात ते कार्यरत होते. स्वतः भंडारी असूनही ते त्या काळातल्या अस्पृश्यांच्या चळवळीत सहभागी असत. बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रांच्या संपादकीय कामांत त्यांनी केलेली मदत फार मोलाची आहे. त्यांच्या मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत यापैकी मूकनायक वगळता सर्वच वर्तमानपत्रांत त्यांनी योगदान दिलेलं आढळतं. ते बहिष्कृत भारतच्या संपादक मंडळात होते. जनताची प्रत्यक्ष जबाबदारी ते सांभाळत असत आणि प्रबुद्ध भारतचे तर ते प्रकाशकच होते. त्यांनी मराठी पत्रकारितेत मोठं योगदान दिलं. त्या पत्रकारितेचे मूळ धडे त्यांनी प्रबोधनमध्येच गिरवलेले दिसतात.

