
सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी।
निरभिमाने सज्जनवृंदे आधी वंदावी ।।१ ।।
संतसंगे अंतरंगे नाम बोलावे।
कीर्तनरंगी देवासन्निध सुखे डोलावे ।।२ ।।
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या।
मनोभावे वैराग्याच्या युक्ति विवराव्या ।।३ ।।
जेणे सत्वर मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची।
ऐसी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची ।।४ ।।
श्रवण कीर्तने अद्वैतभजने वाजवी कर टाळी।
एकाजनार्दनी मुक्त होय तत्काळी ।।५ ।।
प्रस्तुत अभंगात एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाची कीर्तनाची मर्यादा सांगितलेली आहे. वारकरी संप्रदाय कीर्तनभक्तीला प्राधान्य देणारा आहे. ‘सांडोनि कीर्तन । न करी आणिक साधन ।।’ असं सेना महाराज म्हणतात. वारकरी परंपरा कीर्तनभक्तीवरच उभी आहे. वारकरी कीर्तनात संतांनी घालून दिलेली मर्यादा जोपासण्याची जबाबदारी कीर्तनकारावर असते. ती मर्यादा एकनाथ महाराज सांगतात.
कीर्तनात पवित्र सगुण चरित्रे वर्णन करावीत असा एकनाथ महाराजांचा दंडक आहे. सगुण चरित्रे म्हणजे देवाची आणि संतांची चरित्रे. त्यातही संतचरित्रे हा तर वारकरी कीर्तनाचा गाभाच असायला हवा. मुळात संतांची चरित्रे ही प्रेरणादायी, आदर्श आणि अनुकरणीय अशी आहेत. त्यामुळेच नामदेवराय, जनाबाई, एकनाथ महाराज, तुकोबाराय, बहिणाबाई आणि निळोबाराय या संतांनी इतर संतांची चरित्रे अभंगरूपात लिहिलेली आहेत. आत्मचरित्रेही लिहिलेली आहेत. संतांच्या चरित्रातून इतरांना जगण्याचा आदर्श मिळतो. निळोबारायांनी नारायण महाराजांकडून तुकाराम महाराजांचं चरित्र श्रवण केलं होतं. त्यातूनच त्यांना तुकाराम महाराजांविषयी आदरभाव निर्माण झाला. त्यानंतर ते तुकाराम महाराजांना गुरू मानून वाटचाल करायला लागले. साहजिकच संतचरित्र हा वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. ‘ते हे प्राणापरौते। आवडती हे निरुते। जे भक्तचरित्राते। प्रशंसती गा ।।’ अशी एक ओवी ज्ञानेश्वरीत आलेली आहे. या ओवीचा अर्थ असा की जे संतांच्या चरित्राची प्रशंसा करतात ते देवाला प्राणाहून प्रिय असतात. संतांचे कार्यच मुळात लोकशिक्षणाचे आहे. त्यामुळे संतांनी आपल्या आचरणातून लोकांसमोर आदर्श ठेवलेला आहे.
वारकरी कीर्तनातून संतांची चरित्रे सांगताना संतांचा वर्णवर्चस्ववादी सनातन्यांकडून झालेला छळ, संतांची जातीभेदाच्या विरोधातील ठाम भूमिका, त्यांचा यज्ञयागादी कर्मकांडाला असलेला विरोध, त्यांनी सांगितलेला भक्तीचा महिमा आणि अशाच इतरही अनेक गोष्टी उलगडत जातात. चरित्र म्हणजे मुळात गोष्ट. कीर्तनकाराकडे कोणतीही गोष्ट फुलवण्याची एक हातोटी असते. ती फुलवताना त्यातला खलनायक जास्तीत जास्त क्रूर रंगवला जाणार हे उघड आहे. बहुतेक संतांच्या चरित्रातील खलनायक हे वर्णवर्चस्ववादी मानसिकतेचे सनातनी धर्मपंडित होते. साहजिकच संतचरित्रातली या पंडितांची वर्णनं एकदम भडक असणार. अठराव्या शतकात महिपतींनी वारकरी संप्रदायातील काही संतांची चरित्रे लिहिली. महिपतींची भाषा एकदम रसाळ असली तरी ती स्पष्ट ठाशीवही होती. त्यामुळेच त्यांनी लिहिलेल्या संतचरित्रांविषयी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लिहितात- ‘महिपतीने मूर्तीपूजा, वर्णाश्रमधर्म, कर्मठ सोवळेपणा, संस्कृतचे बंड, धार्मिक मध्यस्थांचा जुलूम इत्यादि गोष्टींची उघडउघड निंदा हल्लीच्या सत्यशोधकांहूनही किती तरी अधिक स्पष्ट व फटकळ भाषेत केली आहे.’ जातिभेद, धर्मभेद, अतिकर्म, अतिज्ञान, अतिवैराग्य, राजकारण, ग्रंथप्रामाण्य, गुरूपुजा इ. गोष्टींना भागवत धर्माचा विरोध आहे हे महिपतींच्या ग्रंथांचा आधार घेऊनच महर्षी शिंदे सांगतात. त्यांच्यासारखा एक निर्भीड आणि अभ्यासू सत्यशोधक विचारवंत महिपतींच्या मांडणीला आणि भाषेला सत्यशोधकांहूनही फटकळ म्हणतो यातून संतचरित्रातलं क्रांतिकारकत्व स्पष्ट दिसतं. त्यामुळेच संतांनी संतचरित्रावरही भर दिला.
कीर्तनातूनही संतचरित्रे रसाळपणे रंगवून सांगावीत अशी वारकरी कीर्तनाची एक संहिता एकनाथ महाराज प्रस्तुत अभंगात सांगतात. महिपतींनी आणि संतांनीही लिहिलेल्या संतचरित्रात अनेक चमत्कार कथा आलेल्या आहेत. त्या काळात या पौराणिक धाटणीने चरित्र लिहिण्याची ती पद्धतच होती. त्या कथांमधून संतांना जो बोध श्रोत्यांच्या अंतःकरणावर ठसवायचा होता तो महत्त्वाचा आहे. पुढच्या काळात दुर्दैवाने त्याचाच विसर पडत गेला.
कीर्तनात संतांच्या संगतीत अंतरंगातून नाम बोलावं असं एकनाथ महाराज म्हणतात. कीर्तनात देवाच्या नामाचा महिमा सांगावा. मुळात वारकरी कीर्तन हे नामसंकीर्तन आहे. त्यामुळे कीर्तनात आतून देवाच्या नामावर निष्ठा ठेवावी. देवाच्या प्रेमसुखाचा अनुभव घ्यावा आणि कीर्तनाच्या रंगात डोलत रहावं. कीर्तनातून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीवर बोलू नये. धगधगीत वैराग्याची भूमिका श्रोत्यांच्या अंतःकरणावर बिंबत जावी यासाठी युक्ती सांगाव्यात. अंतरात विठ्ठलाची मूर्ती ठसावी हीच संतांच्या घरच्या कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तन श्रवण करणार्या लोकांनी कीर्तनातील भजनावेळी टाळी वाजवावी. कीर्तनातील भजनात जो टाळी वाजवतो तो मुक्त होतो असं नाथराय प्रस्तुत अभंगात सांगतात.
एकनाथ महाराजांनी कीर्तनाची संहिता सांगणारा हा अभंग रचण्याची काही कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. साधारणपणे तेराव्या शतकात वारकरी कीर्तनाची एक नवी परंपरा नामदेवरायांनी निर्माण केली. ते तेराव्या शतकातील संतमंडळीतील प्रमुख कीर्तनकार होते. त्यांचा कीर्तनाचा हेतू ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी ।।’ हाच होता. वारकरी कीर्तनात नाचणं, गाणं आणि ज्ञानार्जन या तीन गोष्टी आहेत. इथे ज्ञानार्जन म्हणजे संतांचा बोध आत्मसात करणं. ज्ञानार्जनाची पंडिती प्रवचनाची रुक्ष पद्धत नाकारून गाण्या-नाचण्यातून ज्ञानार्जन करण्याचा नवा पायंडा नामदेवरायांनी पाडला. कीर्तनातून जो संतांचा बोध मिळतो तो पापनाशाला कारणीभूत ठरतो. पाप करण्याची बुद्धी कीर्तनश्रवणाने पालटते. त्यामागची तात्त्विक भूमिका ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत मांडली आहे. ज्ञानेश्वरीत कीर्तनाचं महिमान सांगणार्या या ओव्या वाचल्यानंतर आपल्याला नामदेवरायांच्या कीर्तनाचं स्वरूप लक्षात येतं.
तरी कीर्तनाचेनि गा नडनाचे।
नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे।
जेथ नावचि नाही पापाचे। ऐसे केले ।।
अर्थ – कीर्तनातील नाचण्याने नावालाही पाप शिल्लक ठेवले नाही. त्यामुळे प्रायश्चिताचे व्यवसाय नष्ट करून टाकले.
कीर्तनामुळे चित्तात केलेल्या पापकर्माविषयी अनुतापाची भावना निर्माण होते. अनुताप म्हणजे पश्चातापाची भावना. हा पश्चाताप हे खरं प्रायश्चित आहे. ‘हेची प्रायश्चित। अनुतापी न्हाय चित्त ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. साहजिकच कीर्तनातून अनुतापाच्या भावनेचं प्रायश्चित मिळाल्यानं पाप नष्ट होतं. त्यामुळं कर्मकांडी प्रायश्चिताची गरजच उरत नाही. त्या काळात पुरोहित वर्गाने पापकर्मासाठी प्रायश्चित म्हणून यज्ञयाग, तीर्थाटन आणि पूजापाठाचे कर्मकांडी उपाय चालवलेले होते. तत्कालीन हेमाद्री पंडिताने लिहिलेल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात विविध खंड आहेत. त्यातील एका खंडात प्रायश्चिताच्या कर्मकांडाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. यावरून त्या काळात प्रायश्चिताच्या कर्मकांडाच्या नावाखाली पुरोहितांची दुकानदारी जोरात चाललेली होती. वारकरी कीर्तनामुळे प्रायश्चिताची ही दुकानदारीच बंद झाली. त्यामुळेच ज्ञानोबाराय ‘नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे।’ असं म्हणतात.
यमदमा अवकळा आणिली।
तीर्थे ठायावरोनी उठविली।
यमलोकिची ठाकविली।
राहाटि आघवी ।।
अर्थ – या ओवीचा ह.भ.प. तुकाराम महाराज ठाकूरबुवा यांनी लावलेला अर्थ महत्त्वाचा आहे. ते म्हणतात- ‘यम म्हणजे चित्तनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रियनिग्रह या दोघांनाही निस्तेजपणा आणला. चित्ताला आणि इंद्रियांना सहजच भगवत् प्रेमाची आणि भगवद् कामाची आवड उत्पन्न झाली. त्यामुळे ते शहाण्यासारखे यमदमाच्या छडीशिवाय नीट वागतात. तीर्थांना आपल्या स्थानावरून उठवले. त्यांची प्रतिष्ठा कमी केली. पापक्षालनार्थ तीर्थयात्रा करणे करणे हा विषयच राहिला नाही. भगवंताचे भक्तच तीर्थरूप झाले.
ऐसे माझेनि नामघोषे ।
नाही करीत विश्वाची दुःखे।
आघवे जगचि महासुखे।
दुमदुमित भरले ।।
अर्थ- कीर्तनातल्या नामगजराने विश्वातील दुःख नाहीसे होऊन संपूर्ण जग महासुखाने दुमदुमून भरले आहे.
कही एकाधेनि वैकुंठा जावे।
तिही वैकुंठचि केले आघवे।
ऐसे नामघोषे बरवे।
धवळिले विश्व ।।
अर्थ- कधीतरी एखादा माणूस वैकुंठाला जात असे पण संतांनी नामसंकीर्तनाच्या बळावर संपूर्ण विश्व ढवळून काढले आणि इहलोकीच्या जगालाच वैकुंठ बनवून टाकले. वैकुंठ म्हणजे दुःखमुक्ती. कीर्तनाने इहलोकातील दुःखमुक्ती केल्यानं हे जगच वैकुंठ बनले.
ज्ञानोबारायांच्या या कीर्तनभक्तीचा महिमा सांगणार्या ओव्या म्हणजे कीर्तनाची सामाजिक-धार्मिक फलश्रुतीच आहे. ती संतांनी प्रत्यक्ष समाजात रुजवून दाखवली. तुकोबारायांनी एका अभंगात त्यांच्या स्वतःच्या कीर्तनाचा महिमा सांगताना स्वानुभवाने हीच मांडणी केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात की कीर्तनाने संपूर्ण शरीर ब्रह्मरूप होतं. तुकोबाराय सांगतात की माझ्या कीर्तनामुळे तीर्थ, यज्ञ, तप, ब्रह्मज्ञान आणि दान अशा कर्मकांडाला न्यूनता आली आहे. तुकोबारायांचा तो अभंग प्रसिद्ध आहे,
घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती।
मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ।।१ ।।
ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी।
भाग्य तरी ऋणी देव ऐसा ।।२ ।।
तीर्थभ्रामकासी आणीन आळस।
कडू स्वर्गवास करीन भोग ।।३ ।।
सांडवीन तपोनिधा अभिमान।
यज्ञ आणि दान लाजवीन ।।४ ।।
भक्तीभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ।
ब्रह्मीचा जो अर्थ निजठेवा ।।५ ।।
धन्य म्हणवीन इहलोकी लोका।
भाग्य आम्ही तुका देखियेला ।।६ ।।
तुकोबारायांच्या कीर्तनाने ब्रह्मज्ञानी, तीर्थभ्रामक, तापसी, याज्ञिक आणि दानवीर यांनी त्यांचा प्रचलित मार्ग सोडून दिला आणि ते तुकोबारायांच्या कीर्तनाची गोडी अनुभवायला लागले. ज्ञानोबारायांनी कीर्तनांचा जो परिणाम कथित केलेला आहे तो तुकोबारायांच्या या अभंगातून प्रत्यक्ष अनुभवता येतो. अलीकडे ‘कीर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही’ असं एक प्रसिद्ध वाक्य सांगितलं जातं. हे वाक्य अलीकडच्या कीर्तनकारांसाठी खरं आहे. संतांच्या कीर्तनाने मात्र समाजात कोणता बदल घडत होता याचं चित्र ज्ञानोबारायांनी आणि तुकोबारायांनी रेखाटलं आहे. कीर्तनाने तीर्थयात्रा, योगयाग, जपतप, प्रायश्चितादी विधी आणि दानधर्म अशा गोष्टी समाजातून बंद व्हायला हव्यात. किमान कमी तराr व्हायला हव्यात. तरच संतांना अपेक्षित असलेली कीर्तने घडतात असं आपल्याला म्हणता येईल. आज उलट या कर्मकांडाला कीर्तनातूनच उत्तेजन दिलं जातं. त्यामुळे कीर्तनाचा संतांना अपेक्षित असलेला परिणाम आज समाजावर झालेला दिसत नाही. संतांना अपेक्षित असलेला परिणाम दिसण्यासाठी नाथरायांनी प्रस्तुत अभंगातून सांगितलेली कीर्तनाची संहिता सांभाळण्याची गरज आहे.

