• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ई २०विरोधी दणक्याने ई २५ रखडले!

राजू वेर्णेकर स्पेशल रिपोर्ट

Marmik Team by Marmik Team
August 11, 2026
in स्पेशल रिपोर्ट
0
ई २०विरोधी दणक्याने ई २५ रखडले!

अब्जावधी डॉलर्स खर्च करून केली जाणारी कच्च्या तेलाची (क्रूड ऑईल) आयात कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे ई-इथेनॉल (ई २०) धोरण अंमलात आणले असले तरी इंजिनमध्ये बिघाड, कमी मायलेज, वाहन सुरू होण्यास लागणारा विलंब पाहता, केंद्र सरकार वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

ई-इथेनॉलमुळे पेट्रोलच्या टाकीत कार्बन जमा होऊन इंजिन खराब होत असल्याच्या बर्‍याच तक्रारी पुढे येत आहेत. ‘स्कोडा
स्लॅव्हिया’ कार ई-२० इंधनामुळे बंद पडल्याची तक्रार दिल्लीतील एका नेत्याने केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. ई-२०मुळे या कारचे इंजिन बिघडल्याचा दावा सर्विस सेंटरमधील कर्मचार्‍यांनी केला. मुंबईतही ई-२० मुळे मोटर बाईक्स बिघडल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. इथेनॉलमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने मायलेज कमी मिळते, ही बाबही आता उघड झाली आहे. इंजिनमध्ये कार्बन जमा झाल्याने इंजिन खडखडाट करते आणि शक्ती उत्पादनातही घट होते. जुन्या किंवा उच्च-कार्यक्षमतेच्या इंजिनांमध्ये हे दोष आढळून येतात, कारण ती मुळात इथेनॉल मिश्रित इंधनांच्या वापरासाठी तयारच केलेली नाहीत. जुन्या आणि असुसंगत वाहनांमध्ये इथेनॉलमुळे रबर/
प्लॅस्टिकचे भाग आणि इंजिनही खराब होत असल्याच्या तक्रारी आहेत.

मुंबई बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी ई-२०मुळे इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारीला दुजोरा दिला. मुंबईत साधारणपणे आठ वर्षानंतर बस आणि व्हॅन्सची तपासणी करावी लागते. मुंबईबाहेर वाहने १५ ते २० वर्षांपर्यंत चालू शकतात. मात्र, ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांच्या मते ई-२०मुळे इंजिन बंद पडण्याच्या तक्रारी क्वचित आढळून येतात. या परिस्थितीत हळुहळू सुधारणा होईल, असा त्यांचा दावा आहे. सध्या भारतीय पेट्रोल पंपांवर केवळ २० टक्के इथेनॉल मिसळलेले इंधनच मिळते.

२० टक्के वाहनांना धोका
भारतात अंदाजे ४० कोटी वाहने असून त्यांत २६ कोटी दुचाकी आणि ०५ कोटी चार चाकी वाहनांचा समावेश आहे. यांत ईलेक्ट्रिक कार आणि स्पोर्ट युटीलीटी व्हेईकल्सची (एसयूव्ही) दरवर्षी भर पडत आहे. सध्या देशांत २० वर्षाहून अधिक जुनी २.१ कोटी वाहने असून १५ वर्षाहून अधिक जुनी ४ ते ६ कोटी वाहने आहेत. त्यांच्या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे.

केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात १०० टक्के इथेनॉल इंधनाच्या वापराला कायदेशीर मान्यता देणार्‍या नियमांना १२ जून २०२६ रोजी मंजुरी दिली. पर्यायी इंधनांचा अधिक अवलंब करण्यास सरकार प्रोत्साहन देत असून या मागे आयात केलेल्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले. गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी हे सियान अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी कृषी-प्रक्रिया आणि इथेनॉल उत्पादनावर काम करते. त्यांचे दुसरे सुपुत्र सारंग गडकरी, मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजशी संबंधित आहेत. ही कंपनी बायो-फ्युएल आणि इथेनॉल निर्मिती करते. या कंपन्यांवर १६०० कोटी रुपये कर्ज असल्याचे म्हटले जाते. गडकरी यांच्यावर त्यांच्या मुलांच्या व्यावसायिक फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधक व सोशल मीडियावर केला गेला. गडकरींनी सर्व आरोप फेटाळून लावून त्यांच्या मुलांच्या कंपन्यांचा इथेनॉल उत्पादनातील हिस्सा आणि नफा अत्यंत नगण्य असल्याचा दावा केला.

वाहनचालकांचे आंदोलन
वाहनचालकांना इथेनॉल मिश्रण नसलेले १०० टक्के पेट्रोल घेण्याचा अधिकार द्यावा या मागणीसाठी ‘दिल्ली टॅक्सी अँड टूरिस्ट एण्ड टूर ऑपरेटर्स’ आंदोलन करावयाच्या तयारीत आहेत. या मागणीला ‘ई २० जनता पार्टी’ने पाठिंबा दिला आहे. या पक्षाने गडकरींच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. मात्र पेट्रोलच्या घटकांमध्ये बदल करावयाचा अधिकार केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही, असा पवित्रा आता गडकरींनी घेतला आहे. इथेनॉलची कमी ऊर्जा घनता इथेनॉलची ऊर्जा घनता शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असते, पण त्यात स्वतःचा ऑक्सिजनचा रेणू असतो. जुने कार्बोरेटर हे फिक्स्ड-जेट सिस्टीम असतात, जे भेसळरहित पेट्रोलमधील ऊर्जा आणि ऑक्सिजनच्या प्रमाणानुसार अचूकपणे जुळवलेले असतात. जुन्या कार्बोरेटरमधून ई २० पाठवल्याने इंजिन जास्त गरम होते आणि यामुळे इंजिनचा जोर कमी होऊन व्हॉल्व्ह किंवा पिस्टनवर विपरीत परिणाम होऊ शकतो. उच्च-इथेनॉल मिश्रण सुरक्षितपणे वापरण्यासाठी, जुन्या वाहनांना संपूर्ण इंधन प्रणालीची दुरुस्ती करणे आवश्यक असते, ज्यामध्ये टेफ्लॉन लाईन्स बसवणे, इंधन पंप बदलणे आणि कार्बोरेटरमध्ये बदल करणे यांचा समावेश आहे. याच बरोबर ई २० पेट्रोलमधील ओलावा आणि कार्बनचे थर काढून टाकण्यासाठी उच्च-गुणवत्तेचे ‘फ्यूएल अ‍ॅडिटिव्ह’ आवश्यक आहे. इथेनॉल हे ज्वलनशील रसायन असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी बायो-इथेनॉल नेहमी थेट सूर्यप्रकाश आणि उघड्या ज्वालांपासून दूर, थंड आणि कोरड्या जागी साठवतात.

ई २०चा इतिहास
इथेनॉलचा पहिला वापर १८२६मध्ये इंजिन चालवण्यासाठी करण्यात आला आणि १८७६मध्ये, आधुनिक ‘फोर-सायकल’अंतर्गत ज्वलन इंजिनचे संशोधक निकोलस ओटो यांनी एका सुरुवातीच्या इंजिनला ऊर्जा देण्यासाठी इथेनॉलचा वापर केला. १८५०च्या दशकात इथेनॉलचा वापर दिव्यांसाठी इंधन म्हणूनही केला जात होता, पण त्यावर कर लावल्यामुळे त्याचा वापर नंतर कमी झाला. भारतात
इथेनॉल मिसळण्याची प्रथा २००१ साली सुरू झाली. आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे अधोरेखित करुन ई २० पेट्रोलची रूपरेषा १२ ऑगस्ट २०२५ रोजी केंद्र सरकारने मांडली आणि एप्रिल २०२६पासून, सर्व ‘भारत स्टेज-’ वाहनांना ई २० उत्सर्जन मानकांची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले.

भारतात इथेनॉल प्रामुख्याने उसाच्या मळीपासून मिळवले जाते, जे उसाच्या रसाचे साखरेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेतील एक उप-उत्पादन आहे. इथेनॉलच्या कच्च्या मालामध्ये मका, ज्वारी, बार्ली आणि साखर बीट यांसारख्या उच्च स्टार्च आणि साखरयुक्त धान्यांचा आणि पिकांचा समावेश होतो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक यांसारखी राज्ये उसाचे प्रमुख उत्पादक असून
येथील बरेच साखर कारखाने इथेनॉलवर प्रक्रिया देखील करतात. ऊर्ध्वपातन प्रक्रियेमध्ये बाष्पीभवन आणि संघनन केले जाते. या प्रक्रियेतून ९५ टक्के शुद्ध इथेनॉल तयार होते. शुद्ध इथेनॉल मिळवण्यासाठी हे मिश्रण गाळले जाते आणि त्यातील पाणी, जे जवळ जवळ ०५टक्के असते, ते काढून टाकले जाते. इथेनॉल जरी देशांतर्गत उत्पादित आणि अनवीकरणीय ऊर्जा स्रोतांपेक्षा कमी हरितगृह वायू उत्सर्जन करणारे असले तरी, ते कमी ऊर्जा-घनतेचे आणि उत्पादनासाठी महाग आहे.

इथेनॉलचा सर्वात मोठा एकल वापर इंजिन इंधन आणि इंधन मिश्रक म्हणून होतो. विशेषतः ब्राझील, इंजिन इंधन म्हणून इथेनॉलच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. अमेरिकेपासून थायलंड, कॅनडा, चीन आणि भारतापर्यंत, अनेक देशांनी त्यांच्या वाहन तंत्रज्ञानानुसार इथेनॉलची वेगवेगळी मिश्रणे आधीच स्वीकारली आहेत. सध्या जगात ई १०, ई २०, ई २७ आणि ई ८५चा वापर होतो. दुसरीकडे भारताने जीवाश्म इंधनेतर स्रोतांपासून ५० टक्के पेक्षा जास्त स्थापित वीजनिर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट गाठल्यामुळे यापुढे इलेक्ट्रिक वाहने कोळशावर आधारित विजेऐवजी या ऊर्जेचा वापर करून चार्ज केली जाण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांसाठी इथेनॉलचे फायदे
ज्या शेतकर्‍यांना काढणीनंतर पिकांच्या विक्रीत प्रामुख्याने अडचणी येतात, ते आपला माल इथेनॉल कंपन्यांना विकू शकतात. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मंडईव्यतिरिक्त, मध्यस्थ नसलेला हा बाजारपेठेचा पर्याय शेतकर्‍यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढवू शकतो.
इथेनॉल-मुक्त इंडियन ऑइलर्-XP100 भारतात सध्या विकल्या जाणार्‍या सर्व इंधनांमध्ये, इंडियनऑईल XP100 वेगळे ठरते. ते इथेनॉलमुक्त म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे इथेनॉल-मिश्रित पेट्रोल टाळू इच्छिणार्‍या उत्साही व्यक्ती, विंटेज वाहनांचे मालक आणि परफॉर्मन्स-कार मालकांसाठी हा एक पर्याय आहे. ई २०च्या दुष्परिणामांविषयी चिंतित असलेले ग्राहक, उत्तम इंधन बचत आणि सुलभ ड्रायव्हिंगसार्ठी XP100 पेट्रोलकडे वळत आहेत. ई १० हे १० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन आहे. सर्व वाहने ई १० वर चालू शकतात. मात्र ते निवडक पंपांवर दिले जाते. हे इंधन साधारणपणे विशिष्ट इंजिन असलेल्या किंवा जुन्या गाड्यांसाठी उपयोगी आहे. वाहनचालकांचा ई २०ला विरोध असल्यामुळे केंद्र सरकार आता २५ टक्के इथेनॉल मिश्रणाच्या (ई-२५) इंधनाची बाजारपेठेतील प्रवेश कांही काळासाठी लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे आणि ७५ टक्के पेट्रोल आणि २५ टक्के इथेनॉलचे मिश्रण असलेल्या या इंधनासाठी सरकारने अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. खरे तर, सरकारने या इंधनाच्या उद्घाटनाची तयारी केली होती. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ने या श्रेणीतील पेट्रोलसाठीचे आवश्यक निकषही जाहीर केले होते. शिवाय या इंधनाचे दर आधीच कमी केले होते. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना वाहन उत्पादक आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून जुनी वाहने या नवीन इंधनासाठी कितपत सक्षम आहेत, याचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post

ठाकरे तिथे युवाशक्ती!

Next Post
ठाकरे तिथे युवाशक्ती!

ठाकरे तिथे युवाशक्ती!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.