
२००५ साली राज ठाकरे यांनी संपादन केलेल्या ‘बाळ ठाकरे अ फोटो बायोग्राफी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन म्हणाले होते की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणात २५ वर्षांखालचा युवा वर्ग आहे. कारण बाळासाहेब हे युवावर्गाच्या समस्या जाणतात, त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधतात. म्हणून बाळासाहेबांना आणि शिवसेनेला युवा वर्गाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतो.’ तसे पाहिले तर मुंबई-महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी-व्यवसायात प्राधान्य देण्यासाठी शिवसेना या लढाऊ संघटनेची स्थापना ‘मार्मिक’कार बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. युवकांच्या समस्या, वेदना बाळासाहेबांना समजल्या. या वेदनेतून शिवसेनेचा जन्म झाला. तेव्हापासून मुंबई-महाराष्ट्रातील युवक शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटला गेला. तो आजपर्यंत कायम आहे. युवाशक्ती हे शिवसेनेचे बलस्थान आहे. हे ठाकरे बंधूंनी गेल्या आठवड्यात दिलेल्या आवाहनानंतर लाखो युवक-युवती दादरच्या शिवाजी पार्कवर रविवारी जमले, त्यातून त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. निमित्त होते, दिल्लीतील जंतर-मंतर विद्यार्थ्यांना/युवकांना मिळालेल्या यशाचे.
दिल्ली येथे युवाशक्तीने नीट पेपर फुटीवरून उभारलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह इतर दोन-तीन मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी गेली ३६ दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवले. २० जुलै रोजी युवा आंदोलकांवर पोलीसांनी आणि पोलीसांच्या गणवेशातील भाजप-संघाच्या गुंडांनी लाठीमार केला. अश्रूधुर सोडला, वॉटर कॅनन फोडले, विद्यार्थ्यांवर हल्ला केला. तसेच सर्वार्थाने विद्यार्थी आंदोलकांची कोंडी करून आंदोलन दाबण्याचा/संपवण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकारने केला असा विरोधकांचा आरोप आहे. गेल्या १२ वर्षांत फक्त भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनाच ‘मी टू’ प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला होता. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी काही वर्षांपूर्वी दर्पोक्ती केली होती की तुम्ही कितीही आरोप करा, मागण्या करा, पण भाजपचा कुठलाही केंद्रीय मंत्री राजीनामा देणार नाही. हे भाजपाचे सरकार आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार नाही. या अहंकारामुळे आणि सत्तेच्या माजामुळे जंतर-मंतरवरील आंदोलकांना भेटण्यासाठी कुठलाही मंत्री-नेता गेला नाही. त्यांनी विद्यार्थी आंदोलकांना कमी लेखले, हलक्यात घेतले. ३५ दिवस झाले तरी आंदोलक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होते. भाजपने गोदी मीडियाच्या साहाय्याने आंदोलनकांविरुद्ध अपप्रचार केला गेला. भाजपा प्रवक्ते आंदोलकांना अर्बन नक्षल, तुकडे-तुकडे गँग, शाहिन बागवाले, पाकधार्जिणे म्हणून टीका करीत होते. आंदोलक देशविरोधी कृत्य करीत आहेत, असे नाना आरोप भाजपचा आयटी सेल तसेच देशातील व महाराष्ट्रातील अपरिपक्व प्रवक्ते करीत होते. तर भाजपा व त्यांच्या सहकारी पक्षातील अर्धवटराव यांनी आंदोलन बदनाम व्हावे म्हणून जंग-जंग पछाडले, बदनामीच्या मोहीमा चालवल्या. पण अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी आंदोलक घाबरले नाहीत.
जंतर-मंतर वरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून शिवसेनेने पाठिंबा दिला. २० जुलै रोजी झालेल्या या विद्यार्थी आंदोलकांवरील अमानुष लाठी हल्ल्यानंतर देशात सर्वत्र चीड-संताप व्यक्त झाला. त्याच रात्री दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते व खासदारांसह आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना धीर, आधार दिला. तेव्हा जमलेल्या युवकांना लढण्यासाठी बळ मिळाले. ठाकरे म्हणजे ऊर्जा, शक्ती व आधार पुन्हा अधोरेखित झाले. मुंबई-महाराष्ट्रात शिवसेना व मनसेने ठिकठिकाणी युवाशक्तीबरोबर निदर्शने केली. शेवटी ३६ दिवसानंतर शनिवारी २५ जुलै रोजी केंद्र सरकारला उपरती झाली आणि त्यांनी प्रधान यांचा राजीनामा घेतला.
जंतर-मंतरसह सार्या देशातील युवकांनी आनंदोत्सव साजरा केला. तोच साजरा करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील यशाला अभिवादन करण्यासाठी रविवारी २६ जुलै रोजी शिवाजी पार्कवर जमण्याचे आवाहन उद्धव व राज ठाकरे यांनी केले. मुंबईतील युवकांनी प्रदेश, जात, धर्म विसरून त्यांच्या आवाहनाला प्रचंड-अति प्रचंड प्रतिसाद दिला. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न संपला आहे. रविवार आहे, तेव्हा ठाकरे बंधूंच्या आवाहनाला प्रतिसाद मिळणार नाही असे भाजप व शिंदे सेनेच्या नेत्यांना वाटत होते. काही राजकीय पंडिताचा होराही तसाच होता. ठाकरे बंधूंना सेलेब्रेशनसाठी एक कारण मिळाले अशी कुत्सित टीकाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर विद्यार्थ्यांच्या आयत्या आंदोलनावर स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम शिवसेना आणि मनसेने केले आहे, ‘बेगाने शादीमें अब्दुल्ला दिवाना’ असे म्हणत उद्धव ठाकरेंची खिल्ली शिंदे यांनी उडवली. तर जुम्मे-जुम्मे पत्रकारिता केलेल्या भाजपच्या नव्या प्रवक्ताने पक्ष वाचविण्यासाठी ठाकरे यांची केलेली केविलवाणी धडपड आहे, असे म्हटले.
पण मुंबईतील युवाशक्ती लाखोंच्या संख्येने शिवाजी पार्क येथे तिरंगा झ्ोंडा हाती घेऊन जमली. हाती उंचावलेला तिरंगा आणि संविधानाची प्रत, राष्ट्रगीताची गुंज, ‘वंदे मातरम’चा जयघोष, ‘जय भीम’ आणि ‘आजादी’चे बुलंद नारे, मनातील भावना व्यक्त करणारे हट के पोस्टर्स असे देशभक्तीने भारावलेले वातावरण छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दिसून आले. तरुणाईच्या मनातील आनंद आणि जल्लोषाचे विराट दर्शन झाले! भरपावसात मुंबईच्या कानाकोपर्यातून आलेल्या तरुणांनी अक्षरशः मैदान मारले. आता थांबायचं नाय, असा निर्धार केला. ठाकरे बंधूंच्या एका आवाहनाने एवढी प्रचंड युवाशक्ती जमते हे पाहून विरोधकांचा पोटशूळ उठला हे मात्र निश्चित.
ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी युवाशक्ती जमली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी आणि तरुणांचे कौतुक केले. आज अभिनंदन नाही, तर तमाम देशभक्तांना अभिवादन करतो. आज कोणतीही निवडणूक कुणी जिंकले नाही, पण अंधभक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले. भाजपा विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात आता झाली आहे. ही ठिणगी आता जागती ठेवा आणि देश पुन्हा कुणालाही कमजोर करू देऊ नका, असे आवाहन करतानाच तरुणाईच्या एकजुटीची नोंद हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल असे प्रशंसोद्गारही उद्धव ठाकरे यांनी काढले. या संघर्षात सर्वजण जातपात, धर्म, पक्ष विसरून मी हिंदुस्थानी आहे, मी देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झाले. ही ठिणगी आता जागती ठेवा. तिचा वणवा झालाय. ही जाग जाऊ देऊ नका. सत्ताधार्यांची मस्ती सहन करू नका, असेही ते म्हणाले.

‘जेन झी’ सरकारच्या कशा झिंज्या उपटतात ते या आंदोलनातून कळले असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. जमलेल्या सर्व तरुणांनो आणि तरुणींनो… अशी सुरुवात करत त्यांनी तरुणाईचे अभिनंदन केले. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल राज यांनी यावेळी आभार व्यक्त तेले. हाच महाराष्ट्रातला आणि दिल्लीतला फरक आहे. महाराष्ट्रातले आणि दिल्लीतले पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळले आहे असे राज ठाकरे म्हणाले. आता भाजप सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या भाषणानंतरही जवळ-जवळ पाऊण तास ही लाखोंची गर्दी शिवाजी पार्क परिसरात दिसत होती. ठाकरे आणि युवा शक्तीच्या अतूट नात्याचे दर्शन घडवत होती. युवा नेते आदित्य व अमित ठाकरे यांना युवकांनी गराडा घातला होता. मुंबईतील युवाशक्तीचा ठाकरे कुटुंबावर असलेला भरवसा, प्रेम, आदर दिसत होता. युवकांच्या न्यायासाठी ठाकरेच मैदानात उतरू शकतात हा भरोसा युवाशक्तीला आहे, म्हणूनच ठाकरे बंधूंच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. युवाशक्तीने हे विरोधकांचे सर्व दावे फोल ठरवले. जिकडे ठाकरे तिकडे युवाशक्ती हे दाखवून दिले.
