हे मुखपृष्ठचित्र आहे २४ मे १९८१ या तारखेचे. या चित्रातल्या तरुण शेख हसीना आज पंचाहत्तरीपार आहेत, बांगलादेशात बंड झाल्यावर पळून भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. देशाच्या कोणत्याही भागातून कोणाही बांगला भाषक मुसलमानाला बांगलादेशी घुसखोर ठरवून त्याची हकालपट्टी करत असल्याचा देखावा गेली १२ वर्षे उभा करणार्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने या बांगलादेशी राजकारणी महिलेसाठी मात्र पायघड्या अंथरल्या आहेत. त्यांच्यासाठी बांगलादेशातल्या विद्यमान सरकारशी संबंध बिघडले तरी हरकत नाही, असा आपला आविर्भाव आहे. आता शेख हसीना लवकरच बांगलादेशात परतणार आहेत आणि तिथे कदाचित मृत्युदंडाची शिक्षा त्यांची वाट पाहात असेल… या शेख हसीना म्हणजे पाश्चिम पाकिस्तानापासून (आत्ताचा पाकिस्तान) पूर्व पाकिस्तानची (आताचा बांगलादेश) मुक्तता करणारे बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या. शेख मुजीबुर यांच्या हत्येनंतर बांगलादेशाच्या राजकारणात त्यांचा दबदबा राहिला, त्या पंतप्रधानही बनल्या. पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात आणि बांगलादेश स्वतंत्र करण्यात सर्वात प्रमुख भूमिका तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची होती. मात्र, या देशाचे लष्करशहा भारताच्या उपकाराची जाण ठेवणारे नव्हते, याचा प्रत्यय इंदिराजींRना लगेचच आला. त्यांनी म्हणूनच शेख हसीना यांनी लष्करशाहीविरोधात बंड पुकारलं, तेव्हा त्याला भारताचं पाठबळ पुरवायला नकार दिला… याचेच चित्रण बाळासाहेबांनी या मर्मभेदी व्यंगचित्रात केले आहे. मात्र, सत्तेचे हे राजकीय शहाणपण काळाच्या ओघात हरवलं आहे आणि आपण शेख हसीना यांची पाठराखण करून बांगलादेशाच्या विद्यमान सत्ताधीशांना अकारण डिवचून ठेवलं आहे. त्यांच्यामागून चीन शांतपणे सोंगट्या हलवतो आहे आणि आपण त्याच्या डावपेचांना बळी पडत आहोत.

