• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पराजित अजिंक्य आणि ‘निवृत्तीनाथां’ची फॅक्टरी!

प्रशांत केणी खेळियाड

Marmik Team by Marmik Team
August 11, 2026
in खेळियाड
0
पराजित अजिंक्य आणि ‘निवृत्तीनाथां’ची फॅक्टरी!

भारतीय क्रिकेट सध्या संक्रमणाच्या दुसर्‍या टप्प्यातून जात आहे. दिग्गज क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या ताज्या लाटेत चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन यांच्यानंतर अजिंक्य रहाणेची भर पडली आहे. संकटमोचक फलंदाज, अपराजित कर्णधार अशी ठोस कामगिरी करूनही त्याची कारकीर्द झाकोळली गेली. त्याच्या निवृत्तीच्या निमित्ताने या संक्रमणाचा आढावा!

तोहरला होता, तो खचला होता म्हणूनच निरोपाचं भाषण देताना ढसाढसा रडला. ‘माझं नाव अजिंक्य; पण आयुष्याच्या लढाईत मी अनेकदा पराभूत झालो,’ हे त्याचे उद्गार भावोत्कट होते. अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीच्या समाजमाध्यमांवरील घोषणेतील अनेक वाक्यांचे अर्थ-अन्वयार्थ हे सखोल-गंभीर. म्हणूनच क्रिकेटरसिकांनी आपुलकीनं अजिंक्यची क्रिकेट कारकीर्द आणखी बहरायला हवी होती, अशी मतं प्रकट केली. याचप्रमाणे सध्या ‘संक्रमण’ ह्या नावाखाली चालू असलेल्या

‘निवृत्तीनाथां’च्या फॅक्टरी’तील हे आणखी एक उत्पादन, असा शिक्काही मारला. कसोटी क्रिकेटमध्ये देशात आणि विशेषत: परदेशात हिंमतीनं उभा राहणारा हा ‘अजिंक्यतारा’ असा का ढासळला? म्हणजे अजिंक्यनं निवृत्ती का घेतली? ह्या प्रश्नाचं उत्तर सोप्पं आहे. जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला. त्याआधी बरीच वर्षं एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी त्याला निरुपयोगी ठरवलं गेलं होतं. पण किमान कसोटी क्रिकेटमधील उपयुक्तता गाठीशी होती. पण ते अंतरही जुलै २०२६मध्ये तीन वर्षांचं झालं. या कालखंडात वयानं ३८ वर्षांचा टप्पा ओलांडला. आता आपली भारतीय क्रिकेटमधील उपयुक्तता संपली आहे. आता संघात निवड होणार नाही, याची पूर्णत: खात्री झाल्यावर मगच अजिंक्यने क्रिकेटला योजनापूर्वक अलविदा केला.

सौरव गांगुलीच्या कालखंडानं भारतीय संघ परदेशांत हिंमतीनं लढू शकतो, हा विश्वास दिला. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ह्या भारतीय क्रिकेटमधील ‘राम-लक्ष्मण जोडीनं’ कसोटीत कसं खेळायचं, हे दाखवून दिलं. पुढे विराट कोहलीच्या युगात परदेशात कसोटी सामने आणि मालिका जिंकता येतात, हे भारतानं सिद्ध केलं. द्रविड-लक्ष्मण जोडीचा वारसा यावेळी चालवू लागली, ती चेतेश्वर पुजारा आणि रहाणे ही जोडी. जसा द्रविडचा तिसरा क्रमांक पुजारानं घेतला, तसाच लक्ष्मणचा पाचवा क्रमांक रहाणेनं. कालौघात तंत्रशुद्ध फलंदाजीच्या बळावर किल्ले लढवणं, हे कसोटी क्रिकेटच्या लौकिकासाठी अयोग्य मानलं जाऊ लागलं. पांढर्‍या चेंडूंच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कमालीचा घेतलेला वेग कसोटी क्रिकेटमध्येही आला. म्हणूनच पुजारा-रहाणे नकोसे झाले. शेवटच्या काही वर्षांत अतिधिम्या फलंदाजीचा शिक्काही दोघांवर बसला. रहाणेच्या बॅटमधून शेवटचं शतक डिसेंबर २०२०मध्ये आलं होतं. मग २०२३च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद लढतीत द ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही डावांत भारताकडून सर्वाधिक अनुक्रमे ८९ आणि ४६ धावा अजिंक्यनंच फटकावल्या होत्या. गतवर्षी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या कसोटी संघानं इंग्लंडमध्ये कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याचा पराक्रम गाजवला. नव्या पिढीनं आता सूत्रं स्वीकारलीयत, याचंच हे द्योतक. काळाची पावलं ओळखून रहाणेनंही निवृत्ती जाहीर केली.

संकटमोचक आणि अपराजित कर्णधार
संकटमोचक फलंदाज ही अजिंक्यची प्रमुख ओळख. जिद्द आणि परिस्थितीनुसार खेळाशी जुळवून घेण्याची क्षमता ही त्याची खासियत. भारतीय कसोटी फलंदाजाचं मोठेपण हे देशातल्या सामन्यांत नव्हे, तर परदेशात, विशेषत: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आप्रिâका आणि न्यूझीलंड ह्या ‘सेना’ राष्ट्रांत सिद्ध होतं. नेमकं तेच रहाणेचं बलस्थान. त्याने मायदेशातील ३२ कसोटी सामन्यांत ३५.७३च्या सरासरीनं ४ शतकं आणि ८ अर्धशतकांच्या सहाय्यानं एकूण १,६४४ धावा केल्या. पण परदेशातील ५३ कसोटी सामन्यांत ३९.९२च्या सरासरीनं ८ शतकं आणि १८ अर्धशतकांच्या बळावर ३,४३३ धावा काढल्या. विशेषतः मेलबर्न, लॉर्ड्स आणि वेलिंग्टन येथील कसोटी सामन्यांतील महत्त्वपूर्ण खेळींमुळे त्याची कारकीर्द संस्मरणीय ठरते. याशिवाय १०२ कसोटी झेलसुद्धा त्याच्या नावावर आहेत. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल (यष्टिरक्षक नसलेल्या खेळाडूने) घेण्याचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे.

अजिंक्यचं नेतृत्वही भारतासाठी फळलं. त्यानं ६ कसोटी सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं. यापैकी ४ सामने जिंकलेत, तर २ सामने अनिर्णित राखले. २०२०-२१च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत जे २-१ असं ऐतिहासिक यश मिळवलं, त्याचं श्रेय रहाणेच्या नेतृत्वाला जातं. तो कालखंड करोनाच्या क्रूर साथीतला होता. त्यात भारतीय संघाला एकापाठोपाठ एक असे दुखापतींचे हादरे बसत होते. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे नियमित कर्णधार विराट कोहली फक्त पहिली कसोटी खेळून पितृत्वाच्या सुटीवर गेला. याहून वाईट म्हणजे ह्या पहिल्या कसोटीत भारताचं पानिपत झालं. भारताचा डाव फक्त ३६ धावांत गडगडला. मेलबर्नच्या दुसर्‍या कसोटीत रहाणेनं (११२, नाबाद २७) शतकी खेळी साकारत भारताला ८ गडी राखून विजय मिळवून दिला आणि सामनावीर किताब पटकावला. मग सिडनीतली तिसरी कसोटी भारतानं अनिर्णित राखली. पुढे ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीत भारतानं वर्चस्व मिळवत मालिका जिंकण्याची किमया साधली. ह्या मैदानावर ऑस्ट्रेलिया तब्बल ३२ वर्षांनी हरला. त्या मालिकेत अजिंक्यनं भारताकडून तिसर्‍या क्रमांकाच्या २६८ धावा (३८.२८ सरासरी) काढल्या. भारताच्या पहिल्या फळीतल्या अनेक खंद्या वीरांनी दुखापती वा अन्य कारणास्तव माघार घेतली, तरी अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं झोकात पुनरागमन करीत हे अनपेक्षित यश मिळवलं. पण ह्या ऐतिहासिक यशाचं आणि असंख्य कर्तबगारीचं अपेक्षित श्रेय अनेकदा त्याला मिळालं नाही. तसंच सातत्यपूर्ण कामगिरी करूनही रहाणेला अनेकदा संघातील निवडीबाबत अनिश्चिततेला सामोरं जावं लागलं.

ह्याला संक्रमण ऐसे नाव
भारतीय क्रिकेट सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे, हे कारण देत अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माची कारकीर्द समाप्त होणार आणि इंग्लंडविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना त्याचा निरोपाचा सामना ठरणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्या सामन्यात त्याने शतक झळकावलं आणि ती शक्यता तूर्तास तरी टळली. पण रोहित आणि विराट यांची कसोटी कारकीर्द योजनापूर्वक संपुष्टात आणण्यात आली आहेच. यापैकी रोहितकडून उत्तरार्धात धावा होत नव्हत्या; पण विराट आणखी काही काळ कसोटी क्रिकेट खेळू शकला असता. पुजारा, रविचंद्रन अश्विन यांनी सर्वच प्रकारातून निवृत्ती पत्करली, नव्हे तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. २०२७ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा एक वर्षाच्या अंतरावर आली आहे. पण ‘रो-को’ जोडी म्हणजेच रोहित-कोहली खेळायला हवेत, याची खात्री त्यांना अद्याप पटलेली नाही. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन यांचं नेमकं धोरण काय आहे, हेच कळत नाही.

बरं, खेळाडूला निवृत्ती घ्यावीशी वाटत असेल किंवा निवड समितीला त्याची आवश्यकता नसेल तर निदान सामोपचारानं त्याच्या निरोपाच्या सामन्याचं नियोजन करायला काय हरकत आहे? पुजारा, रहाणे आणि अश्विन यांच्या वाट्याला निवृत्त होताना किमान सन्मानपूर्वक विदाईचं सुख तरी आलं असतं. पण सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यासारखे अपवाद वगळता आणखी किती जणांच्या वाट्याला ते भाग्य आलं? द्रविड-लक्ष्मण जोडीलाही गरज संपल्यावर वनवासात धाडण्यात आलं. २०१५मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खानची कारकीर्द अशीच संपली. मग २०१८मध्ये गंभीर, २०१९मध्ये युवराज सिंग, २०२१मध्ये हरभजन सिंग, २०२०मध्ये करोनाच्या टाळेबंदीच्या काळात महेंद्रसिंह धोनी, २०२४मध्ये शिखर धवन ह्या दिग्गजांनी निरोपाच्या सामन्याशिवाय आपापल्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला. विराट, रोहित, जडेजा यांच्या वाट्याला तरी यापुढे हे सुख येईल का, हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. असंच एक संक्रमण एका दशकापूर्वी झालं होतं. तेव्हा गांगुली, सचिन, सेहवाग, राहुल आणि लक्ष्मण हे ‘फॅब फाइव्ह’ असं बिरूद मिरवणारे खेळाडू निवृत्त झाले होते.

तूर्तास, अजिंक्यला त्याच्या निवृत्तीच्या दुसर्‍या डावासाठी शुभेच्छा देऊया. काही वर्षांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी महाराष्ट्र सरकारला परत केलेला वांद्रे-कुर्ला संकुल येथील इनामाचा भूखंड त्याने क्रिकेट प्रशिक्षण अकादमी काढण्यासाठी भाड्याने घेतला आहे. तिथे तो मुंबईची ओळख असलेले खडूस खेळाडू नक्की निर्माण करेल!

Previous Post

फांदी तुटली… अन् हजारो चिवचिवाट कायमचे हरवले!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.