
पहाट अजून पूर्ण उजाडलेली नसते. रात्रभर कोसळलेल्या पावसाच्या सरींनी झाडांची पाने चिंब भिजलेली असतात. प्रत्येक पानावर दवबिंदू मोत्यांसारखे चमकत असतात. मंद वार्यावर डोलणार्या फांद्यांमध्ये निसर्गाचं एक वेगळंच विश्व जागं झालेलं असतं. एखादी बुलबुल पिल्लांच्या चोचीत अन्न भरवत असते. शिंपी पक्षी पानं शिवून बांधलेल्या छोट्याशा घरट्याची डागडुजी करत असतो. सूर्यपक्षी कोळ्याच्या जाळ्याने विणलेल्या नाजूक घरट्यात पिल्लांना ऊब देत असतो. कावळा अंड्यांवर बसलेला असतो. चिमणी नव्या संसाराची स्वप्नं पाहत असते. झाडावरचा प्रत्येक पाला, प्रत्येक फांदी आणि प्रत्येक घरटं नव्या जीवनाचा उत्सव साजरा करत असतं. त्या झाडाला आवाज नसतो, पण त्याच्या प्रत्येक फांदीवर जीवन धडधडत असतं. प्रत्येक घरट्यात एक स्वप्न वाढत असतं. प्रत्येक चिवचिवाटात उद्याच्या निसर्गाची चाहूल दडलेली असते.
आणि अचानक… त्या शांततेला करवतीचा कर्कश आवाज चिरत जातो. काही क्षणांत एकामागोमाग एक फांद्या जमिनीवर कोसळतात. त्यासोबत कोसळतात घरटी… फुटतात अंडी… तडफडतात पिल्लं… आणि आकाशात असहायपणे घिरट्या घालणारे आई-वडील पक्षी आपल्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराकडे पाहत राहतात. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमाने उभारलेलं त्यांचं छोटंसं विश्व काही मिनिटांत मातीमोल झालेलं असतं…
…आपल्यासाठी ती केवळ एक फांदी असते; पण त्या छोट्याशा पक्ष्यासाठी तीच त्याची दुनिया असते. तेच त्याचं घर, तेच त्याचं कुटुंब, तेच त्याच्या पिल्लांचं भविष्य आणि तेच त्याच्या अस्तित्वाचं एकमेव आश्रयस्थान असतं. म्हणूनच झाडाच्या एका फांदीवर पडणारा करवतीचा घाव हा केवळ लाकडावर बसत नाही; तो एका कुटुंबावर, एका आईच्या ममतेवर आणि निसर्गाच्या एका जिवंत अध्यायावर बसत असतो.
गेल्या काही वर्षांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस, वेगवान वारे, हवामानातील बदल, सिमेंट-काँक्रीटच्या जंगलामुळे झाडांच्या मुळांना मिळणारा कमी श्वास, रस्त्यांच्या कामांमुळे झालेले नुकसान आणि शहरीकरणाचा वाढता वेग यामुळे अनेक झाडे कमकुवत झाली आहेत. परिणामी पावसाळा सुरू होताच महापालिका, वृक्ष प्राधिकरण, उद्यान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग धोकादायक फांद्या छाटण्याची मोहीम हाती घेतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे काम आवश्यक आहे, याबाबत कोणाचंही दुमत नाही. मात्र या कामात पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू दुर्लक्षित राहतो. फांदी धोकादायक आहे का, हे पाहिलं जातं; पण त्या फांदीवर एखाद्या पक्ष्याचा संसार फुलला आहे का, याची पाहणी किती वेळा केली जाते? झाडांची मोजणी होते, फांद्यांची नोंद होते, पण त्या झाडावर किती घरटी आहेत, किती अंडी आहेत, किती पिल्लं आहेत, याची नोंद कोण ठेवतं? हा प्रश्न आज अत्यंत गंभीर बनला आहे. कारण शहरात उरलेल्या मोजक्या मोठ्या झाडांवरच हजारो पक्ष्यांचं आयुष्य अवलंबून आहे. 
पावसाळा हा पक्ष्यांच्या प्रजननाचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. याच दिवसांत बुलबुल, शिंपी, सूर्यपक्षी, मैना, चिमणी, कावळा, पोपट, दयाळ, नाचण, घार आणि अनेक पक्षी घरटी बांधतात. शिंपी पक्षी चोचीने पानं शिवून सुंदर घर तयार करतो. सूर्यपक्षी गवत, कापूस आणि कोळ्याच्या जाळ्याच्या धाग्यांच्या साह्याने नाजूक लटकणारं घर विणतो. बुलबुल मऊ गवत आणि मुळांपासून मजबूत घर बनवते. कावळा काटक्या गोळा करून संसार उभा करतो. या प्रत्येक घरट्यामागे शेकडो फेर्या, अनेक दिवसांची मेहनत आणि पिल्लांना सुरक्षित ठेवण्याची धडपड असते. पण काही मिनिटांच्या छाटणीत हे सर्व संपून जातं.
घरटी खाली पडतात. अंडी फुटतात. उडता न येणारी पिल्लं जमिनीवर तडफडतात. अनेकदा कुत्रे, मांजरे किंवा इतर प्राणी त्यांना खातात. काही पिल्लं जखमी होऊन मरतात. आई-वडील पक्षी मात्र त्या परिसरात बराच वेळ फिरत राहतात. त्यांना आपलं घर कुठे गेलं, आपली पिल्लं कुठे गेली, हेच समजत नाही. त्या चिवचिवाटात वेदना असते, असहाय्यता असते आणि माणसाच्या असंवेदनशीलतेविषयीचा निःशब्द प्रश्नही दडलेला असतो. आज महापालिका, वृक्ष प्राधिकरण आणि संबंधित सरकारी यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे.
नागरिकांची सुरक्षितता राखणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच शहरातील जैवविविधता जपणंही महत्त्वाचं आहे. झाडांची छाटणी थांबवण्याची मागणी कोणी करत नाही; पण ती शास्त्रीय, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावी, एवढीच अपेक्षा आहे. छाटणीपूर्वी प्रत्येक झाडाची पर्यावरणीय पाहणी व्हावी. घरटी आढळल्यास त्या फांदीची छाटणी काही दिवस पुढे ढकलावी. आवश्यक असल्यास पक्षीमित्र, वन विभाग किंवा पर्यावरण अभ्यासकांची मदत घ्यावी. छाटणी करणार्या कर्मचार्यांना घरटी ओळखण्याचे प्रशिक्षण द्यावे. वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयप्रक्रियेत पर्यावरणतज्ज्ञांचा सहभाग वाढवावा. अशा छोट्या उपाययोजनांनी हजारो पक्ष्यांचे संसार वाचू शकतात.

आपण झाडांना ‘हरित संपत्ती’ म्हणतो; पण त्या हरित संपत्तीमध्ये राहणार्या जीवांकडे दुर्लक्ष करतो. झाड म्हणजे केवळ खोड, पाने आणि फांद्या नव्हेत. झाड म्हणजे एक जिवंत परिसंस्था आहे. त्या एका झाडावर असंख्य जीवांचं आयुष्य फुललेलं असतं. त्या झाडावर चिवचिवाट नसेल, तर हिरवाईही निस्तेज वाटते. आज विकासाच्या शर्यतीत आपण उंच इमारती उभारत आहोत, रुंद रस्ते बनवत आहोत आणि शहरं अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या विकासाच्या प्रवासात जर पक्ष्यांची घरटीच हरवली, तर हा विकास अपुरा ठरेल. कारण निसर्गाशिवाय शहरांचं सौंदर्य अपूर्ण आहे आणि पक्ष्यांशिवाय निसर्गही अपूर्ण आहे.
झाडांच्या फांद्या पुन्हा फुटतील… झाड पुन्हा हिरवंगार होईल… पण तुटलेलं घरटं, हरवलेली पिल्लं आणि उद्ध्वस्त झालेला पक्ष्यांचा संसार पुन्हा कधीच उभा राहणार नाही. म्हणून आज गरज केवळ झाडे वाचवण्याचीच नाही, तर झाडांवर विसावलेल्या प्रत्येक जीवाचं अस्तित्व जपण्याची आहे. कारण पर्यावरण म्हणजे केवळ हिरवाई नव्हे, तर त्या हिरवाईत दररोज घुमणारा चिवचिवाट आहे. तो चिवचिवाट कायम राहिला, तरच आपल्या शहरांचा श्वास जिवंत राहील.
झाडांची छाटणी पर्यावरणपूरक हवी!
शहरांमधील झाडांची छाटणी हा केवळ अभियांत्रिकी किंवा आपत्ती व्यवस्थापनाचा विषय नाही, तर तो शहरी परिसंस्थेच्या संवर्धनाशी थेट संबंधित आहे. एका परिपक्व झाडावर पक्षी, खारी, फुलपाखरे, मधमाशा, उपयुक्त कीटक आणि असंख्य सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास निर्माण झालेला असतो. त्यामुळे झाडाच्या प्रत्येक फांदीकडे केवळ धोकादायक संरचना म्हणून नव्हे, तर एका सजीव परिसंस्थेचा भाग म्हणून पाहणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात बहुतेक स्थानिक पक्ष्यांचा प्रजनन हंगाम सुरू असतो. या काळात घरट्यांचा नाश होणे म्हणजे केवळ काही अंडी किंवा पिल्लांचे नुकसान नव्हे, तर त्या पक्ष्यांच्या संपूर्ण प्रजनन चक्रावर परिणाम होणे होय. अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास शहरांतील स्थानिक पक्ष्यांची संख्या हळूहळू कमी होऊ शकते. त्याचा परिणाम कीटक नियंत्रण, परागीभवन, बियांचा प्रसार आणि जैवविविधतेच्या नैसर्गिक साखळीवर होतो.
महापालिका आणि वृक्षप्राधिकरणांनी छाटणीची कार्यपद्धती अधिक वैज्ञानिक करण्याची गरज आहे. प्रत्येक झाडाची जोखीम तपासणी करण्याबरोबरच त्यावरील जैवविविधतेचेही मूल्यमापन झाले पाहिजे. आधुनिक शहरी व्यवस्थापनात ‘ट्री रिस्क असेसमेंट’ सोबत ‘बायोडायव्हर्सिटी असेसमेंट’ ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची मानली जाते. पर्यावरण तज्ज्ञ, पक्षी अभ्यासक आणि वृक्षतज्ज्ञ यांच्या सहभागातून छाटणीचे नियोजन झाले, तर मानवी सुरक्षितता आणि निसर्ग संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांमध्ये योग्य समतोल साधता येईल.
विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसतो; संघर्ष असतो तो नियोजनाच्या अभावाचा. संवेदनशील नियोजन केले, तर नागरिकांची सुरक्षितताही जपता येते आणि झाडांवर विसावलेल्या असंख्य मुक्या जीवांचे अस्तित्वही सुरक्षित ठेवता येते. हीच खरी शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहर विकासाची दिशा आहे.
वीरेंद्र घरत (पक्षी अभ्यासक, महाराष्ट्र)

