• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

निश्चयाचा महामेरू : उद्धव ठाकरे!

योगेश वसंत त्रिवेदी (विशेष लेख)

Marmik Team by Marmik Team
July 27, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
निश्चयाचा महामेरू : उद्धव ठाकरे!

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसि आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी।। हे वर्णन हिंदवी स्वराज्य संस्थापक, गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात करण्यात येते. हे वर्णन या पृथ्वीतलावर दुसर्‍या कुणासाठीही उपयोगात आणणे सर्वस्वी अनाठायी ठरेल. परंतु हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. कालांतराने भारतवर्षाची आवश्यकता म्हणून कडवट हिंदुत्व स्वीकारले. महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली, या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, ही हिंदुत्वाची सरळसोट सुस्पष्ट व्याख्या बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७च्या विलेपार्ले येथील विधानसभा पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर कमळाबाई (बाळासाहेबांच्या भाषेत) सोबत आल्यावर १९९० साली गिरगाव चौपाटीवर विराट जाहीर सभेत मांडली होती.
बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव हे सहा वर्षांचे होते. २७ जुलै १९६० रोजी उद्धव यांचा जन्म झाला. हे बाळासाहेब ठाकरे यांच्या खर्‍याखुर्‍या शिवसेनेचे हीरक महोत्सवी वर्ष आहे तर शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. ‘निश्चयाचा महामेरु’ हे बिरुद शिवसेनाप्रमुखांना जसे लागू पडत होते तद्वतच ते उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सुद्धा चपखल बसते.

उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनाप्रमुखांचा आणि वात्सल्यसिंधू माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचाही स्वभाव जन्मतःच आलेला आहे, असे शिवसेना नेते माजी मंत्री दिवाकर रावते यांनी नमूद केले आहे, ते सर्वार्थाने योग्य आहे. बाळासाहेबांचा आक्रमक, रोखठोकपणा आणि मीनाताईंचा शांत, संयमी, सुसंस्कृतपणा यांचा मिलाफ उद्धव यांच्या ठायी आहे. शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच संघर्ष, संकटांचे, हलाहल पचवून उद्धव हेही ठामपणे मार्गक्रमण करीत आहेत. शिवसेनागीतात म्हटल्याप्रमाणे ‘वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’ या न्यायाने उद्धव यांनी घोडदौड सुरूच ठेवली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतच छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे इतकेच नव्हे तर त्यांचा स्वतःचा पुतण्या (स्वर)राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. एका व्यक्तीने शिवसेनेतून बाहेर पडून राज यांच्या आश्रयाला जाताना ‘मला शिवसेना उद्ध्वस्त करायची आहे’, अशा आशयाचे उद्गार काढले. तेव्हा राज यांनी त्या व्यक्तीला सणसणीत चपराक लगावत खडसावले की ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आहे, माझे काही मतभेद झाले म्हणून मी बाहेर पडलो आहे. मला शिवसेना उद्ध्वस्त करायची नाही आणि शिवसेना कुणीही संपवू शकत नाही.’ आजही त्या व्यक्तीचे इकडून तिकडे राजकीय पर्यटन सुरूच आहे.

सांगायचा मुद्दा हा की भले भले आले आणि गेले पण शिवसेना आपल्या ठिकाणी भरभक्कमपणे वाटचाल करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीश्वरांच्या पाठबळावर शिवसेनेतून बाहेर पडण्याचे धाडस केले असले आणि निवडणूक आयोगाने जरी पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे दिले असले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरी त्यांच्या आमदारांना पात्र ठरविले असले तरी सर्वोच्च न्यायालयात हा विषय प्रलंबित आहे. कायदेपंडित अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल या दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या वतीने भरभक्कम बाजू मांडली आहे. परंतु उदय लळित, धनंजय चंद्रचूड, भूषण गवई या सरन्यायाधीशांनी निकाल दिला नसल्याने नको नको ते ‘राजकीय खेळ’ सुरू आहेत. आता न्या. सूर्यकांत यांच्याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.

खासदार-आमदार जरी स्वार्थासाठी उद्धव यांची साथ सोडून शिंद्यांच्या कळपात सामील झाले असले तरी कोणत्याही पदाची लालसा नसलेले, शिवसेनाप्रमुखांचे तळागाळातील कट्टर, कडवे, निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात गेली बारा वर्षे असतानाही आणि त्यांच्याच हस्ते भूमिपूजन, लोकार्पण, ध्वजारोहण होऊनही आज प्रभू रामचंद्राच्या मंदिरात त्यांचेच लोक लूट करत आहेत. तमाम हिंदूंना आणि राष्ट्रभक्त, रामभक्त देशवासियांना चीड आणणार्‍या या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील रामरक्षा, हनुमान चालीसा आंदोलनाने हिंदुस्थानातील तमाम नागरिकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भर पावसात दादरच्या प्राचीन हनुमान मंदिरासमोर रामभक्तांचे आंदोलन झाले, ते पाहून अंधभक्त आणि गोदी मीडियाच्या लोकांनी बोटे मोडणे सुरू केले आहे. कडवट शिवसैनिकांनी देशभरात रामरक्षा हनुमान चालीसा आंदोलनाने भगवे वादळ निर्माण केले आहे.

ज्या सहा खासदारांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवून लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला, त्यांनी पदाच्या आणि हिरव्या कागदाच्या हव्यासापोटी पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी प्रचंड जाहीर सभा घेत या तमाम मतदारांची माफी मागितली. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार महेश कुळकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चेत एक मुद्दा ठामपणे पुढे आला की खासदारांनी गद्दारी केली असली तरी शिवसेनेचा मतदार तसूभरही हललेला नाही. शिवसेनाप्रमुखांची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कोणत्याही संकटांचा, परिणामांचा मुलाहिजा न ठेवता जोमाने वाटचाल करीत आहे. शिवसैनिक आणि मतदारांमधला हाच जोश, हाच उत्साह शिवसेनेला पुनश्च अच्छे दिन आणल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.

उद्धव ठाकरे यांनी मनात नसतानाही महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले आणि मुख्यमंत्रीपद अतिशय वाकबगार राजकारण्याप्रमाणे उत्तम प्रकारे सांभाळले. मुख्यमंत्री झाल्यामुळे नियमानुसार विधिमंडळाच्या एका सभागृहात सदस्य असणे आवश्यक असते म्हणून त्यांना विधान परिषद सदस्यत्व स्वीकारावे लागले. या सदस्यत्वाची मुदत संपतांना त्यांनी सभागृहात सगळ्यांचे हिशेब चुकते केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सभागृहात पुन्हा आलेले पहायला निश्चित आवडेल असे सांगून त्यांचा गौरव केला. फडणवीस यांनी उद्धव यांच्या कलागुणांचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी ‘साजिश की सौगात पकडकर बैठ गए और जिनको मेरा हाथ पकडकर चलना था, हैरत हैं वो बात पकडकर बैठ गए’ हा शेर सांगितला. त्यानंतर उद्धव यांनी, ‘ऐसी कौनसी बात थी की किसी औरका हाथ पकडना पडा,’ अशा शब्दांत हा चेंडू टोलविला. आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वच घटनांचा थोडक्यात आढावा घेत, विंदा करंदीकर, ग. दि. माडगुळकर, ना. धों. महानोर अशा दिग्गज कवीवर्यांच्या काव्यरचनेचा चपखल उपयोग करून त्या त्या प्रसंगांचे त्यांनी समयोचित उत्तर दिले. ते म्हणाले, ‘विंदा करंदीकरांनी कवितेत लिहिलं आहे, केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे, जो अनुभव मी घेतोय. डोक्यावरी जे घेवूनी आजही इथे नाचती, घेतील ते पायतळी त्याला तयारी पाहिजे, हे सगळं आयुष्य आहे. जे डोक्यावर घेऊन नाचतात, तेच एकदिवस पायदळी तुडवायला मागेपुढे बघत नाहीत. कारण त्यांना स्वत:ला काही पाहिजे असतं. त्यावेळी कोणी काय दिलं हे न पाहता पुढे जात असतात’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मित्र कोण आणि शत्रू कोण गणितं साधे कळले नाही, नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, अशी सुरेश भटांची गजल म्हणत आपल्या वेदनेलाही त्यांनी वाट मोकळी करून दिली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘उद्धव ठाकरे साहेब’ असा उल्लेख करीत त्यांना दीर्घायु, आरोग्य तसेच राजकीय वाटचालीत यश मिळो, एवढ्या त्रोटक शब्दांत शुभेच्छा दिल्या. राजकीय वळणावर कुठे ना कुठे भेट होईल, असे शिंदे म्हणाले, तेव्हा उद्धव यांनी केवळ हात जोडून ‘कुठेही नको’, असे संकेत दिले होते.
पु. ल. देशपांडे यांच्यानंतर चपखल ‘कोट्या’करणारे खरे ‘कोट्या’धीश म्हणजे उद्धव ठाकरे, ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सर्वोत्तम छायाचित्रणाची ओळख आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा गौरव केला. त्यावेळी उद्धव एकदमच दिलखुलास दिसत होते. मी जर इतका चांगला आहे तर मग असे का आणि कसे घडले, असा सुस्पष्ट सवाल ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कौतुकावर केला.

मी दैनिक सामनामधून निवृत्त झाल्यावर गुजरात समाचारमध्ये विशेष राजकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. २०१४मध्ये मी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची गुजरात समाचारसाठी प्रदीर्घ मुलाखत घेतली. आम्ही दोघे मराठीत गप्पा मारत होतो आणि गुजरात समाचारचे निवासी संपादक भालचंद्र जानी हे ऐकत होते. सुमारे पाऊण पानाच्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी तत्कालीन राजकीय घडामोडींचा आढावा घेतला होता. ते आजही आठवते. प्रसंगी आक्रमक, लढाऊ तर प्रसंगी धीरोदात्त, संयमी असे नेतृत्वगुण उद्धव ठाकरे यांच्या अंगी असल्याने शिवसेनेची आगामी वाटचाल सुद्धा जोमाने होणार हे निःसंशय. त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, ही करवीर निवासिनी आई जगदंबा आणि कुलस्वामिनी आई एकवीरेच्या चरणी विनम्र प्रार्थना. जय महाराष्ट्र!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

Previous Post

सीमा प्रश्नावरही कोते राजकारण?

Next Post

उद्धव ठाकरे होणे नाही सोपे!

Next Post
उद्धव ठाकरे होणे नाही सोपे!

उद्धव ठाकरे होणे नाही सोपे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.