
अॅनफील्डच्या गॅलरीत साठ हजार घसे एका सुरात गातात,’यू’ल नेव्हर वॉक अलोन’. बार्सिलोनाच्या काम्प नोऊमध्ये सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियम गाण्याने दणाणून जातं. डॉर्टमुंडची ‘यलो वॉल’ उभी राहते, तेव्हा तो केवळ चाहता-वर्ग नसतो. तो एक धर्म असतो, एक कुटुंब असतं. या गाण्यांचे बोल कुणी लिहिले, चाल कुणी दिली, हे बहुतेकांना माहीतही नसतं. पण प्रत्येकाला ते तोंडपाठ असतं. आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत तीच चाल, तोच अभिमान. ही असतात त्या त्या क्लब किंवा देशाच्या फुटबॉल टीमची गाणी.
अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांत मिळून फिफा विश्वचषकाची रंगत सगळ्या जगाने अनुभवली गेल्या आठवड्यापर्यंत. तब्बल ४८ संघ, १०४ सामने आणि ३९ दिवसांचा हा प्रवास. या काळात जगभरातील अब्जावधी नजरा त्या एका चेंडूवर खिळलेल्या असतात प्रत्येक सामन्यात. आणि याच क्षणी भारत कुठे होता? मैदानावर नाही; प्रेक्षक म्हणूनही जेमतेम. भारताने १९५०च्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवूनही, प्रवासखर्च आणि प्राधान्याच्या मुद्द्यांवरून सहभाग नाकारला होता. त्यानंतरच्या पाऊणशे वर्षांत भारत पुन्हा कधीही फुटबॉल विश्वचषकाच्या मुख्य फेरीत पोहोचू शकलेला नाही.
१९११ साली मोहन बागानने आयएफे शील्डच्या अंतिम फेरीत ब्रिटिश ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंटला २-१ असं हरवलं, तेव्हा अनवाणी पायांनी खेळणार्या त्या अकरा जणांना ‘अमर अकरा’ म्हटलं गेलं. तो विजय केवळ क्रीडाक्षेत्रातला नव्हता, तो स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारा एक राष्ट्रीय क्षण होता. पुढे १९५१ ते १९६२ हा भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ मानला जातो. सय्यद अब्दुल रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशियाई स्पर्धांत दबदबा निर्माण केला होता. पण साठच्या दशकानंतर हा दबदबा हळूहळू विरत गेला. पायाभूत सुविधांचा अभाव, आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण न मिळणं, आणि क्रिकेटकडे वाढता ओढा, यामुळे मोहन बागान, ईस्ट बंगाल, मोहमेडन स्पोर्टिंग, गोव्याचा डेम्पो यांसारखे ऐतिहासिक वारसा असलेले क्लब केवळ प्रादेशिक अस्मितेपुरते उरले. २०१३ साली सुरू झालेली इंडियन सुपर लीग ही आयपीएलच्याच धर्तीवरची फुटबॉल आवृत्ती होती; पण ती दहा वर्षांनंतरही तितकी राष्ट्रीय भूक निर्माण करू शकलेली नाही, जितकी क्रिकेटमधील आयपीएलने काही वर्षांतच केली. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, फुटबॉलचा शंभर वर्षांहून जुना वारसा बाळगणारा देश आणि तरीही आत्ता जगभर रंगलेल्या या सर्वांत मोठ्या क्रीडा-महोत्सवात केवळ प्रेक्षकाची भूमिका? हा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे, प्रश्न वेडाचा नाही, गुंतवणुकीचा आणि सातत्याचा आहे.

अलीकडे भारतात एखाद्या क्रिकेट कसोटी सामन्याचं तिकीट काढून कुणी रांगेत उभं राहिलेलं कधी पाहिलंत? गेल्या वर्षी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिज कसोटीच्या पहिल्या दिवशी जेमतेम सहाशेहून थोडे अधिक प्रेक्षक होते- भारतीय भूमीवरील कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वांत कमी उपस्थितीची नोंद. देशाच्या राजधानीतल्या मध्यवर्ती, ऐतिहासिक मैदानावर हे घडावं, हा योगायोग नाही, तो एक इशारा आहे. भारतात क्रिकेटवेड आहे, यात शंका नाही. पण हे वेड नेमकं कशासाठी आहे, हे तपासण्याची वेळ आली आहे. मैदानावर घाम गाळलेल्या खर्या क्रिकेटप्रेमीला माहीत असतं की खेळाडूची खरी कसोटी टी-२० च्या चार षटकांत नाही, तर पाच दिवसांच्या कसोटीत असते, जिथे कंटाळवाण्या तासांतही एकाग्रता टिकवावी लागते आणि चुकीला दुसरा चेंडू लगेच मिळत नाही. राहुल द्रविडची ‘भिंत’ उभी राहिली ती अशाच परीक्षेत- ही चौकार-षटकारांच्या जल्लोषाशिवाय केलेली खरी क्रिकेटीय तपस्या.
पण आज बीसीसीआयचं वेळापत्रक, प्रसारकांचं गणित आणि प्रायोजकांचा ओघ, हे सगळं आयपीएलभोवती फिरतं. पुजारासारखा कसोटी-विशेषज्ञ लीगमध्ये जागा शोधतो, तर टी-२० तारे कोट्यवधींचे लिलाव गाजवतात; रणजी सामन्यांना कधी कधी खेळाडूंपेक्षा प्रेक्षक कमी! थोडक्यात, आपलं क्रिकेटप्रेम आता ‘फास्ट फूड’ झालं आहे; तीन तासांची चटपटीत चव हवी, पाच दिवसांचं पौष्टिक जेवण नको. झगमगाट हवा, तपस्या नको. आणि इथेच एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. ज्या देशाला आपल्या लाडक्या खेळाच्याच खर्या, कठीण रूपाचा कंटाळा येतो, तो देश इतर खेळांशी कसा वागत असेल? क्रिकेटचं हे वेड इतकं एकांगी आहे की त्याच्या सावलीत बाकीचे खेळ खुरटले आहेत आणि त्यातला सर्वात मोठा बळी म्हणजे फुटबॉल. जगातल्या दोनशेहून अधिक देशांना वेड लावणारा, केवळ एक चेंडू आणि मोकळं मैदान एवढ्याच भांडवलावर खेळता येणारा हा खेळ — दीडशे कोटींच्या देशात मात्र ‘बघण्याचा’ (ते करणारेही क्रिकेटच्या तुलनेत मोजकेच) खेळ राहिला आहे, ‘खेळण्याचा’ नाही. युरोपियन फुटबॉल लीगचे सामने रात्र जागून पाहणारे लाखो भारतीय आहेत, पण गल्लीत फुटबॉल खेळणारी मुलं शोधावी लागतात. असं का? हे केवळ क्रिकेटच्या सावलीचं कारण आहे की आपल्या समाजरचनेत, मैदानांत आणि मानसिकतेतच याची मुळं आहेत?
सांस्कृतिक कारण : वसाहतकाळात क्रिकेट हा ‘सभ्य’ खेळ मानला गेला आणि संस्थानिकांनी, नंतर दूरदर्शनने त्याला राजाश्रय दिला. १९८३ चा विश्वचषक विजय आणि पाठोपाठ आलेलं खासगी प्रसारण युग यांनी क्रिकेटला एकहाती राष्ट्रीय भावनेचं वाहन बनवलं. फुटबॉलला असा एकसंध राष्ट्रीय क्षण कधी लाभलाच नाही, तो बंगाल, गोवा, केरळ, ईशान्य भारत या प्रादेशिक कोशातच अडकून राहिला.
शारीरिक/पायाभूत कारण : फुटबॉल खेळण्यासाठी सुसज्ज मैदानं, तिथे गवताची सतत निगा, आणि लहान वयातच सुरू होणारी शास्त्रशुद्ध अकादमी-रचना लागते. ला मासियासारख्या युरोपीय यंत्रणा वयाच्या सहाव्या वर्षापासून मुलांना घडवतात. भारतात मात्र शहरी मैदानं इमारतींखाली गाडली गेली, शाळांमध्ये क्रीडा-तासिका दुय्यम ठरल्या आणि प्रतिभा-शोध हा सरकारी नव्हे तर खासगी क्लासेसवर अवलंबून राहिला.
हवामान व भूगोल : अनेकजण भारतातील उष्ण हवामानाला दोष देतात, पण हे कारण फार टिकत नाही. ब्राझील, अर्जेंटिना, नायजेरियासारखे उष्णकटिबंधीय देश फुटबॉलमध्ये जगज्जेते आहेत. खरा अडथळा हवामान नसून हंगामाचं वेळापत्रक आहे. भारतातला पावसाळा आणि फुटबॉल हंगाम एकमेकांवर आदळतात आणि मैदानं चिखलात रुतून राहतात, कारण त्यांना निचरा-व्यवस्थेत गुंतवणूकच झालेली नाही.
फुटबॉलमध्ये पैशाची शिडी दिसत नाही. भारतीय पालक व्यवहारी आहे. क्रिकेटमध्ये त्याला स्पष्ट शिडी दिसते— शालेय संघ, वयोगट स्पर्धा, रणजी, आयपीएल लिलाव, कोट्यवधींची कमाई. फुटबॉलमध्ये अशी शिडी कुठे आहे? सुनील छेत्रीसारखा दिग्गज फुटबॉलपटू दीड दशक झुंजूनही त्याची कमाई आयपीएलच्या एका नवोदिताएवढीही नाही. ‘फुटबॉल खेळून पोट भरेल का?’ या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आजही ‘नाही’ असंच आहे आणि पालक मुलाच्या हातातला चेंडू काढून पुस्तक देतात, ते याचमुळे.

आपल्या शालेय व्यवस्थेत खेळ हा ‘ऑफ पीरियड’चा उपक्रम आहे. युरोपात प्रत्येक गावात एक क्लब असतो आणि पाच वर्षांचं मूल तिथल्या अकादमीत दाखल होतं— तळापासून वर जाणारा पिरॅमिड. आपल्याकडे नेमकं उलटं: आयएसएलसारखी लीग ही वरून खाली लादलेली प्रँâचायझी आहे, पण तिची मुळं शाळा-गल्लीपर्यंत पोहोचलेली नाहीत. शाळेत पीटीचा तास गणिताच्या ‘एक्स्ट्रा क्लास’ला बळी पडतो आणि दहावी-बारावीच्या वर्षी तर मैदानाशी संबंधच तुटतो. जिथे खेळ हा अभ्यासाचा शत्रू मानला जातो, तिथे कुठलीही क्रीडासंस्कृती रुजणार कशी?
आणि सर्वात महत्त्वाचा फरक : बघणं आणि खेळणं यांची फारकत. मेस्सी-रोनाल्डोसाठी रात्र जागणारे, युरोपियन क्लबांच्या जर्सी घालणारे लाखो तरुण आपल्याकडे आहेत. पण त्यांचं फुटबॉलप्रेम स्क्रीनवर सुरू होऊन स्क्रीनवरच संपतं. युरोपात सामना पाहून आलेला मुलगा दुसर्या दिवशी मैदानात तेच ड्रिबल करून पाहतो; आपल्याकडे तो मीम बनवतो! खेळाचा ‘कंटेंट’ झाला की तो हातापायांतून निघून बोटांत येतो आणि हीच आपल्या क्रीडासंस्कृतीची खरी शोकांतिका आहे.
क्रिकेट एके क्रिकेट
भारताची शोकांतिका ही आहे की आपण आपलं सारं क्रीडाप्रेम एकाच खेळात— क्रिकेटमध्ये— गुंतवून बसलो आहोत. जगातल्या इतर क्रीडा-संस्कृती पाहिल्या की हे विशेष ठळकपणे जाणवतं— तिथे वेड हे एका खेळापुरतं मर्यादित नसतं, ते समाजाच्या अनेक स्तरांत, अनेक खेळांत विखुरलेलं असतं.
जपान- शालेय बेसबॉलचं राष्ट्रीय वेड: दरवर्षी ऑगस्टमध्ये कोशिएन स्टेडियमवर होणार्या शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी रोज सुमारे पन्नास हजार प्रेक्षक मैदानावर हजर असतात, आणि दूरचित्रवाणीवरील प्रेक्षकसंख्या इतकी मोठी असते की काही क्षणी टीआरपी ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचतो-हे प्रमाण एरवी केवळ ऑलिंपिकसारख्या राष्ट्रीय प्रसंगीच दिसतं. जपानचा एक व्यावसायिक संघ, हान्शिन टायगर्स, दरवर्षी दोन आठवडे स्वतःचं स्टेडियम रिकामं करून शालेय स्पर्धेसाठी सोडून देतो, इतका आदर या ‘शालेय’ स्पर्धेला आहे.
ब्राझील- फुटबॉल आणि कार्निव्हलचं अद्वैत : ब्राझीलमधील सुमारे ७०–७७ टक्के जनता फुटबॉल बारकाईने फॉलो करते, असं तिथल्या सर्वेक्षणांत दिसून येतं. तिथे प्रत्येक शहराला किमान एक व्यावसायिक क्लब असतो, गल्लीबोळात मुलं उघड्या पायांनी चेंडू खेळत मोठी होतात, आणि विश्वचषकाच्या काळात रस्तेच्या रस्ते राष्ट्रध्वजाच्या रंगांत रंगून जातात. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलसाठी फुटबॉल हा केवळ खेळ नसून सांबा-कार्निव्हलइतकाच राष्ट्रीय अस्मितेचा भाग आहे.

केनिया- धावण्याची संस्कृती : केनियाच्या रिफ्ट व्हॅलीतील इटेन या छोट्या गावात दररोज पहाटे पन्नासेक धावपटू एकत्र येऊन सराव करतात. यात ऑलिंपिक व जागतिक विक्रमवीरही असतात आणि नवशिके गावकरीही. तिथे मुलं शाळेत जाण्यासाठी रोज अनेक किलोमीटर धावतच जातात, आणि जवळजवळ प्रत्येक गावात परदेशातून पदक व बक्षिसाची रक्कम घेऊन परतलेला एक तरी धावपटू असतो, जो पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरतो. एकाच जमातीतून- कालेंजिन समाजातून-जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय पदकांचा मोठा वाटा येतो, हे विशेष उल्लेखनीय आहे.
या तिन्ही उदाहरणांतून एक समान धागा दिसतो. क्रीडा-संस्कृती ही शाळेपासून, गल्लीपासून, गावापासून रुजते; ती केवळ एका व्यावसायिक लीगपुरती किंवा एका खेळापुरती मर्यादित नसते. भारतात मात्र क्रिकेट वगळता कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स यांसारख्या खेळांना तुलनेने खूपच कमी सामाजिक प्रतिष्ठा आणि गुंतवणूक मिळते. हे एकाच खेळावरचं अवलंबित्व दीर्घकाळात धोकादायक ठरू शकतं, कारण एका खेळाचं वेड ओसरलं, किंवा त्या खेळात अपयश आलं, की समाजाच्या क्रीडाप्रेमालाच खीळ बसण्याचा धोका असतो.
मुद्दा युरोप (फुटबॉल)भारत (क्रिकेट)
चाहत्यांचे गाणे प्रत्येक क्लबचे स्वतःचे राष्ट्रगीतासारखे अँथम- लिव्हरपूलचे ‘यू’ल नेव्हर वॉक अलोन’, बार्सिलोनाचे क्लब-भजन फक्त आयपीएल फ्रँचायझींची जिंगल्स; कसोटी संघाला असे एकही गाणे नाही. निष्ठेचा आधार शहर व परिसर- पिढ्यानपिढ्या तोच क्लब, तेच स्टेडियम, तोच परिसर व्यक्तिपूजा — सचिन, धोनी, कोहली सारखे तारे; संघ नव्हे, चेहरा महत्त्वाचा शालेय पाया वयाच्या ६-७ व्या वर्षापासून अकादमी प्रवेश; ला मासिया, आयाक्ससारख्या ‘यूथ फॅक्टरी’ शालेय स्तरावर क्रिकेट मैदानेही तुटपुंजी; प्रतिभा शोध खासगी क्लासेसवर अवलंबून दीर्घ प्रकाराचा दर्जा९० मिनिटांचा सामनाच मूळ प्रकार- संक्षिप्त आवृत्तीचा दबाव नाही कसोटी ‘खर्या कसोटी’चा दर्जा गमावतेय- प्रेक्षक, प्रायोजक, तरुण खेळाडूही टी-२० कडे फुटबॉल क्रांती शक्य आहे का?
भारतात फुटबॉल क्रांती घडवण्याचा प्रयत्न आधीच झाला आहे. इंडियन सुपर लीग हीच आयपीएलची फुटबॉल-प्रतिकृती म्हणून जन्माला आली. पण आयपीएलचं यश केवळ ग्लॅमरमुळे नव्हतं. त्यामागे दशकांची शालेय व गल्ली क्रिकेट संस्कृती, रणजी करंडकासारखी पायाभूत रचना, आणि दूरदर्शनने रुजवलेली राष्ट्रीय भूक होती. फुटबॉलसाठी तेच पायाभूत काम अजून व्हायचं आहे. फुटबॉलमध्ये आयएसएलचा वरचा झगमगाट उभा राहिला, पण मधल्या पायर्याच गायब आहेत. गल्लीतल्या गुणवंताला आयएसएलपर्यंत नेणारा मार्गच नसेल, तर पालक मुलाच्या हातातला चेंडू काढून पुस्तक देणारच. म्हणून जिल्हा लीग, शालेय स्पर्धा आणि स्थानिक क्लब हा पाया बांधणं ही फ्रँचायझींची आणि महासंघाची पहिली जबाबदारी. सोबतच शाळेत खेळाचा तास गणिताइतकाच ‘अस्पृश्य’ हवा आणि प्रत्येक नव्या गृहसंकुलाला पार्किंगची सक्ती असते तशी मैदानाची का नसावी, हा प्रश्न धोरणकर्त्यांनी स्वतःला विचारावा.
मोहन बागानच्या १९११च्या विजयाने एका वसाहतीखालच्या राष्ट्राला उभं राहण्याचं बळ दिलं होतं. डेम्पो, चर्चिल ब्रदर्ससारख्या गोमंतकीय क्लबांनी दशकानुदशकं फुटबॉलची ज्योत तेवत ठेवली आहे. हा वारसा विसरलेला नाही, तो फक्त दुर्लक्षित आहे. ज्या देशाने क्रिकेटला घराघरात नेलं, त्याच देशाकडे फुटबॉललाही, आणि इतर खेळांनाही, तितकीच उंची देण्याची क्षमता आहे. गरज आहे ती शालेय मैदानांत गुंतवणुकीची, प्रादेशिक क्लबांना राष्ट्रीय व्यासपीठ देण्याची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विजयाइतकाच खेळावरचा प्रेमाचा दीर्घकालीन संयम बाळगण्याची. अॅनफील्डचं गाणं एका रात्रीत जन्मलं नाही; ते शंभर वर्षांच्या निष्ठेतून घडलं आहे. आपल्या मैदानांनाही तेवढाच वेळ आणि तेवढंच प्रेम दिलं, तर उद्या कुठल्या तरी भारतीय स्टेडियमवरही असंच एक सामूहिक गाणं घुमू शकतं, याची खात्री बाळगायला हरकत नाही. आणि सर्वात मूलभूत गोष्ट अशी आहे की ही लढाई फुटबॉल विरुद्ध क्रिकेट अशी नाहीच. क्रिकेटवर रागावण्याचं कारण नाही; रागवायचंच तर ‘एकाच खेळाच्या, त्यातही एकाच झटपट रूपाच्या’ आहारी गेलेल्या आपल्या मानसिकतेवर रागवावं. म्हणून बदलायची आहे ती खेळाकडे पाहण्याची दृष्टी. खेळ हा ‘करिअरला पर्याय’ नसून ‘जगण्याचा भाग’ आहे, ही जाणीव. मैदानावर मिळणारी चिकाटी, संघभावना आणि पराभव पचवण्याची ताकद कुठल्याही ‘एक्स्ट्रा क्लास’मध्ये मिळत नाही, हे पालकांनी स्वीकारावं; आणि सरकारने ‘खेलो इंडिया’चा रोख पदकांच्या मोजणीवरून खेळणार्या हातापायांच्या संख्येकडे वळवावा. ऑलिम्पिक पदकं ही संस्कृतीची फळं असतात, बियाणं नव्हे. बियाणं म्हणजे संध्याकाळी पाचला मुलांनी भरलेलं गावचं मैदान- मग त्या मैदानावर बॅट असो वा चेंडू. ते जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत आपलं क्रीडाप्रेम स्क्रीनवरचंच राहील; मातीतलं होणार नाही.
(सर्व उल्लेखित घटना प्रकाशित वृत्तांतांवर आधारित)
(लेखक अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथे राहणारे राजकीय विश्लेषक असून ते २५ वर्षांहून अधिक काळ परदेशात वास्तव्य करीत आहेत.
ईमेल पत्ता : [email protected])

