
‘टिकी-टाका २.०’ स्पेनच्या यशोगाथेचं प्रमुख सूत्र होतं. २०१०मधील त्यांच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची पुनरावृत्ती करताना स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस डे ला फुएंटे यांनी अचूक रणनीती आखली. त्यांच्यातल्या एकीच्या बळावर रोनाल्डो, लुकाकू, एम्बापे, मेसी यांच्यासारख्या दिग्गजांचं कर्तृत्व मातीमोल ठरलं. स्पेनचा ‘लाल सलाम’ म्हणूनच आपलं वेगळेपण सिद्ध करतो.
न्यू जर्सीच्या मैदानावर जे घडलं, ते विश्वसनीय सत्य स्वीकारण्याजोगं होतं, जे घडलं नाही ते भावनिकदृष्ट्या मान्य करणं जड गेलं नाही. संपूर्ण १२० मिनिटांवरील स्पॅनिश आर्मीचं वर्चस्व फुटबॉल विश्वचषकावर त्यांच्या लाल सलामाची मोहोर उमटवण्यासाठी पुरेशी होती. पण तशीही संपूर्ण स्पर्धेमधील त्यांची कामगिरी ही एकीचं बळ मांडणारीच होती.
स्पेननं २०१०मध्ये विश्वविजेतेपदावर पहिल्यांदा नाव कोरलं. २००८ ते २०१४ हा कालखंड गाजला, तो ‘टिकी-टाका’नं. चेंडूवरील वर्चस्व राखण्यासाठी वेगानं छोट्या आणि अचूक पासिंगवर आधारित स्पेनचं हे तंत्र. महाभारतामधील चक्रव्यूहाप्रमाणेच ते भेदणं अवघड. या बळावर स्पेन आणि क्लब फुटबॉलमधील एफसी बार्सिलोना या स्पॅनिश संघानं त्या काळात मोठा पराक्रम गाजवला. स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस डे ला फुएंटे यांनी ह्याच रणनीतीला आधुनिक रूप दिलं. चेंडूवरील नियंत्रणाचं मूळ तत्त्व कायम ठेवत अधिक उभा (व्हर्टिकल) खेळ, विंगमधून वेगवान आक्रमणं आणि मोकळ्या जागांचा झपाट्यानं वापर यांची भर घातली. जे ‘टिकी-टाका २.०’ म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याशिवाय, मजबूत बचाव फळीची उभारणी करून स्पेननं प्रतिस्पर्ध्याकडे चेंडू गेल्यानंतरही आपल्यावर गोल होऊ नये, यासाठी प्रभावी योजना आखली. त्यामुळे स्पेनचा खेळ अन्य संघांपेक्षा वेगळा ठरला. सामन्याच्या उत्तरार्धात गोल साधणारा संघ, असा लौकिक असणार्या अर्जेंटिनानं जंग जंग पछाडूनही त्यांना स्पॅनिश संघासमोर शरणागती पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. म्हणून लिओनेल मेसी आणि त्याच्या अगतिक संघाला हे नैराश्य पचवणं अवघड गेलं. आता स्पेनचा संघ विश्वविजेता, ऑलिम्पिक विजेता आणि युरोपियन विजेता आहे, इतकंच नव्हे तर तो महिला विश्वविजेताही आहे.
स्पेनला पहिल्याच सामन्यात केप व्हर्देसारख्या किरकोळ संघानं गोलशून्य बरोबरीत रोखलं, तेव्हा त्यांच्याकडून माफक अपेक्षा केल्या जात होत्या. पण त्यांनी कोणताही मोठेपणा न मिरवता आगेकूच कायम राखली. उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेननं क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला धूळ चारली. मग उपांत्यपूर्व फेरीत रोमारीओ लुकाकूच्या बेल्जियमला नामोहरम केलं. उपांत्य फेरीत किलियन एम्बापेच्या फ्रान्सला सलग तिसर्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापासून रोखलं आणि अंतिम फेरीत मेसीच्या अर्जेंटिनाला जगज्जेतेपद टिकवू दिलं नाही.
स्पेनचं २०१०चं जेतेपद आणि २०२६चं यात अनेक साम्यं आहेत. त्यावेळी आंद्रेस इनिएस्ताने ११६व्या मिनिटाला विजयी गोल केला होता, तर यावेळी फेरान टोरेसने १०६व्या मिनिटाला तो पराक्रम केला. दक्षिण आप्रिâकेत २०१०मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत स्पेनचा कर्णधार आणि भक्कम गोलरक्षक इकर कॅसिलासनं स्पेनची अभेद्य भिंत असा रुबाब मिरवला. संपूर्ण स्पर्धेत त्यानं केवळ दोन गोल स्वीकारले आणि पाच सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला गोल साधू दिला नाही. अंतिम सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध आर्जेन रॉबेनचा केलेला निर्णायक बचाव फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच कॅसिलास गोल्डन ग्लोव्हज पुरस्काराचा मानकरी ठरला. तोच वारसा यावेळी उनाई सायमननं चालवला आणि ‘स्पेनची अभेद्य भिंत क्र. २’ ही ओळख निर्माण केली. स्पेनच्या विजेतेपदाच्या प्रवासात त्याचा सिंहाचा वाटा आहे. सायमनने सलग ६३९ मिनिटे गोल न पत्करण्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम केला. संपूर्ण स्पर्धेत एकच गोल त्यानं स्वीकारला, तर सात सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल नोंदवू न देण्याची (क्लीन शीट) कामगिरी साकारली.
लॅमिन यमाल आणि पाऊ कुबार्सी हे स्पेनच्या यशातले दोन प्रमुख शिलेदार. दोघंही १९ वर्षांचे. ‘फिफा’चा सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार कुबार्सीनं पटकावला. ‘गोट’ म्हणजे सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत किंवा गोलसंख्येच्या शर्यतीत त्यांचा कोणताही खेळाडू नाही. मिकेल ओयार्झबालच्या नावावर सर्वाधिक ५ गोल आहेत. बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरत सामन्याचं चित्र पालटण्यात मिकेल मेरिनो वाकबगार. पेड्रो पोरोसुद्धा रुबाबात खेळणारा. त्यांचा कर्णधार रॉड्री हा ‘गोल्डन बॉल’चा विजेता ठरला.
ट्रम्प यांची मनमानी जागतिक नकाशावर आपलं अधिराज्य असल्याच्या अविर्भावात वावरणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मनमानी विश्वचषकात प्रकर्षाने दिसून आली. त्यांच्या राजकारणाचा फटका अमेरिकाविरोधी राष्ट्रांना प्रामुख्याने बसला. ट्रम्प यांनी चक्क ‘फिफा’ला वेठीस धरून बेल्जियमविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी अमेरिकेचा आक्रमक फोलारिन बॅलोगनला देण्यात आलेलं लाल कार्ड मागे घ्यायला लावलं. परिणामी ट्रम्प यांच्यावर जगभरातून टीका झाली. पण त्यानंतर अमेरिका हरून त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आणि न्याय झाला. विश्वचषकाला काही िदवस असताना ‘फिफा’नं नेमलेले सोमालियाचे पंच ओमार आर्टन यांना अमेरिकेच्या दूतावासाकडून प्रवेश नाकारण्यात आला. म्हणून ‘फिफा’ला बदली पंच नेमावा लागला. दक्षिण आप्रिâकेच्या संघालाही ‘व्हिसा’ मिळण्यास कमालीचा उशीर झाल्यानं त्यांच्या प्रवास योजनेवर आणि तयारीवर परिणाम झाला. देशाच्या क्रीडामंत्र्यांनी यावर ताशेरे ओढले. काही चाहत्यांनाही अमेरिकेच्या नियमावलीचा अडथळा सहन करावा लागला. इराण, इराक आणि इजिप्तच्या खेळाडूंना विमानतळावर प्रक्रियेसाठी बराच काळ थांबवण्यात आलं. इराकचा आक्रमक आयमेन हुसेनची शिकागो विमानतळावर तब्बल ७ तास चौकशी करण्यात आली. इराणचे खेळाडू प्रत्येक सामन्यासाठी मेक्सिकोमधून अमेरिकेत प्रवास करून येत होते आणि सामना संपवून पुन्हा मेक्सिकोला परत जात होते. ज्यामुळे त्यांना प्रचंड प्रवासाचा त्रास सहन करावा लागला.
ट्रम्प यांनी बर्याचदा विश्वचषकाच्या व्यासपीठावरून अमेरिकेचं नेतृत्व आणि राष्ट्राचा अभिमान हे कसं यजमानपदासाठी पूरक आहे, हे मांडण्याची संधी साधली. याशिवाय ‘फिफा’चे राष्ट्राध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची ट्रम्प यांच्याशी जवळीकही अनेकांना खटकली. ‘फिफा’च्या धोरणानुसार विश्वचषक आयोजित करणार्या देशाने सर्व देशांतील खेळाडू, अधिकारी आणि चाहत्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय देशात प्रवेश देणे बंधनकारक असते. मात्र, अमेरिकेच्या कठोर धोरणांसमोर ‘फिफा’ने शरणागती पत्करली, असा थेट आरोप काही मानवाधिकार संघटनांनी केला.
छोट्या संघांनाही मोठी संधी!
यंदा प्रथमच तीन देशांनी यजमानपद सांभाळलं. त्यामुळे प्रवास, वेळा अशा अनेक कारणांमुळे संघांची दमछाक झाली. जागतिक सहभाग वाढवण्याच्या हेतूनं यंदा प्रथमच ४८ संघांचा विश्वचषक खेळवण्यात आला. यापैकी फक्त १६ संघ युरोप खंडातले होते. १९९०मध्ये १६ संघांच्या विश्वचषकात युरोपच्या देशांची संख्या १४ होती. क्लब फुटबॉलमधील पाचही महत्त्वाच्या स्पर्धा युरोपात होत असतानाही ही संख्या वाढली नाही. पण उपांत्यपूर्व फेरीतील आठपैकी सात संघ हे युरोपचे आणि अर्जेंटिना हा एकमेव दक्षिण अमेरिका खंडातला, हेच युरोपियन सामर्थ्य.संघ वाढल्यानं अनेक हवशे-गवशे संघ सहभागी होतील आणि स्पर्धा कंटाळवाणी होईल, असे इशारे अनेक जाणकारांनी दिले होते. पण ते स्पर्धा जसजशी पुढे गेली, तसतसे पूर्णत: फोल ठरले. माजी विश्वविजेत्या जर्मनी आणि नेदरलँड्सचं आव्हान सोप्प्या गटसाखळीतच संपुष्टात आलं. पॅराग्वेनं जर्मनीवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्यांच्या देशात राष्ट्रीय सुट्टी घोषित करून तो साजरा करण्यात आला.
पुढे अव्वल-३२ टप्प्यापासून बाद फेरीनं स्पर्धेची उत्कंठा आणखी वाढवली. केप व्हर्दे ह्या पाच लाख लोकसंख्येच्या देशानं पहिल्याच सामन्यात स्पेनला बरोबरीत रोखून जगाचं लक्ष वेधलं. मग उरुग्वे आणि सौदी अरेबियाशीही बरोबरी साधली. त्यांचा चाळीशीतला गोलरक्षक व्होझिन्या मैदानावर आणि समाजमाध्यमांवरही विलक्षण लोकप्रिय झाला. अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळेपर्यंत झुंजायला लावून त्यांनी सामना भलेही गमावला; पण स्वप्नवत कामगिरीनं मनं जिंकली. डीआर काँगोनंही अशीच आश्चर्यकारक कामगिरी केली. पण निर्भय आणि शिस्तबद्ध कामगिरीच्या बळावर नॉर्वे ही नवी महासत्ता या विश्वचषकात उदयास आली. त्यांचा संघनायक एर्लिंग हालँडनं गोलकौशल्य आणि नेतृत्वानं छाप पाडली. नॉर्वेच्या ‘व्हायकिंग रो’ ह्या विजयशैलीनं समाजमाध्यमं आणि देशोदेशीच्या रस्त्यांवर धुमाकूळ घातला.
स्पर्धेच्या बदललेल्या आराखड्यानं छोट्या राष्ट्रांनाही दिग्गज देशांशी भिडण्याची संधी दिली. त्यामुळेच धक्कादायक निकाल आणि संस्मरणीय कामगिरी नित्यनव्यानं पाहायला मिळाली. त्यामुळे १०४वा अंतिम सामना होईपर्यंत हा ‘गोलथरार’ टिकून राहिला. प्रक्षेपण जाहिरातींना वाव मिळावा म्हणून ४५ मिनिटांच्या मध्यावर दोन्ही सत्रांत घेण्यात येणार्या ‘हायड्रेशन ब्रेक’वर जगभरातून टीका-टिपण्णी झाली. सरतेशेवटी त्याचा पुनर्विचार करण्यात येईल, असं आश्वासन ‘फिफा’कडून देण्यात आलं.
‘झी नेटवर्क’चा डाव यशस्वी!
‘डर्टी पिक्चर’ चित्रपटात विद्या बालन कधीही न जिंकू शकणार्या घोड्यावर पैसे लावते. त्याला कानमंत्र दिल्यावर तो अनपेक्षितपणे जिंकतो. यावेळी ती १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचं उदाहरण देते. झी नेटवर्कच्या बाबतीत तसंच काहीसं घडलं. ‘फिफा’ला प्रारंभी क्रिकेटवेड्या भारतामधील प्रक्षेपणाचे हक्क विकण्यासाठी कमालीचे झगडावे लागले. देशातील महत्त्वाच्या प्रक्षेपण कंपन्यांनी अनास्था दर्शवली. भारतात फुटबॉलच्या व्यावसायीकरणाला मर्यादा असल्याचे सांगून ‘जिओस्टार’ने अनुत्सुकता प्रकट केली. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि प्रसार भारती यांनीही विश्वचषकाकडे पाठ फिरवली. अखेरीस ‘फिफा’नं एक शिष्टमंडळ भारतात पाठवलं. स्पर्धा जवळ येत असताना अचानक झी नेटवर्कनं पूर्ण ताकदीनिशी मैदानात पाऊल ठेवलं. डिजिटल माध्यमातलं ‘झी-५’ अॅप त्यांच्याकडे होतंच. पण या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी युनाइट-८च्या दोन नव्या क्रीडावाहिन्या सुरू केल्या. स्पर्धा पुढे जाऊ लागली, तशी काही दिवसांतच झीचा डाव यशस्वी झाल्याची प्रचिती येऊ लागली. प्रेक्षकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. भलेही भारताचा ‘फिफा’ क्रमवारीत १३८वा क्रमांक असला तरी जागतिक फुटबॉल पाहण्याची संस्कृती देशात उत्तमपणे रुजली आहे, हेच सिद्ध झालं. समाजमाध्यमांवरील जागतिक
फुटबॉलचाहत्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि त्यांचा वाटा जवळपास ११ टक्क्यांचा आहे. त्यामुळे ‘फिफा’नं मराठी आणि काही भारतीय भाषांमध्ये विशेष पोस्ट करीत हे नातेसंबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला. ‘रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय’, ‘ओ नाखवा बोटीनं फिरवाल का?’, ‘लय भारी!’ अशा काही मराठी पोस्ट ‘इन्स्टाग्राम’वर करीत धुरळा उडवून दिला.
तात्पर्य : पुढील विश्वचषक स्पर्धा आणखी विस्तारून ७२ संघांची करण्याची योजना ‘फिफा’कडून अभ्यासली जातेय. असं झाल्यास भारताला संधी मिळेल, असं स्वप्न पाहण्यास काहीच हरकत नाही. इन्फॅन्टिनो यांनी झी नेटवर्कचं प्रक्षेपण कराराबद्दल आभार मानताना विश्वचषकात सामील व्हा, तुमचं स्वागत असो, असा संदेशही दिला. तूर्तास, जगज्जेत्या स्पेनच्या जल्लोषात आणि अर्जेंटिनाच्या शोकपर्वात आपण सहभागी होऊया!

