‘नम्या ये बस!’ बस स्टँडवरच्या शिमिटच्या बाकड्यावर अर्ध्या रविवार सुट्टी असल्याने निवांत बसलाय. घरात तणतण होतच असते ती टाळण्यासाठी असं गावात कुठं फिरत राहिलं म्हणजे डोकं खराब होत नाही. त्यामुळं अर्ध्या आज इथं आलाय.
‘हां जसं बसायला घरून घेऊन आला तू!’ नम्यानं टोमणा मारला.
‘पण मला माहीत होतं ना? तू कॉलेजच्या पोरींमागं फिरत इथं येतो ते! म्हणून जागा धरून ठेवली.’ अर्ध्या हटणारा थोडाच आहे का?
‘अय काही बोलू नको. इथं पोलीस स्टेशनला नव्या मॅडम आल्याय. टवाळ पोरं अशे पट्टे मारताना दिसले रे दिसले का भर रस्त्यात तुडवतात त्या! त्यांना असं कुणी कुणाचं नाव सांगितलं आणि तसं त्या परिसरात चुकून आढळलं तरी वरात निघालीच समजायची. अन् तू माझं नाव घेतोय असं ओपनमधी, माझे लाईटं लावशील ना?’ नम्यानं सुनावलं.
‘आयला अवघड आहे नाही, आपली जिंदगी? शाळा, कॉलेजात असताना घरचे संस्कार, शिक्षकांचा धाक यामुळे साधं मुलींकडे बघायची हिंमत झाली नाही. आता बरेच नातेवाईक पोरी बघायला घेऊन जातात तर पोरींपेक्षा खाली नजर आपलीच असते. च्यायला प्रकरणं फार गंडलेत रे!’ अर्ध्या हळहळला.
‘नको रडू! आवर! एखादी फुटक्या नशिबाची पडेल तुझ्या गळ्यात! अन् नाहीच पडली तर कुंभमेळा आहेच नाशिकला!’ नम्या अर्ध्या शेजारी बसला. पण नुसता बसेल कसा? चिमटा घ्यायची त्याची सवय सुटेल कशी?
‘आयुष्यात बाबाच बनावा असं वाटतं. साले इथं स्टार्टअप सुरू करायचं म्हंटलं तर बापाचे कागद द्या! आज्याचे कागद द्या! हा स्कोअर चेक करा. तो टॅक्स भरा. अश्या एवढ्या झंझटी राहत्या का स्टार्टअप सुरू करतोय का कोकेन-गांज्याची फॅक्टरी? हा सवाल पडतो. त्यापेक्षा बाबा सोप्पंय! चारदोन गाण्यांवर निरूपण सादर करायचे. पोथ्या वाटेल त्या पद्धतीने तोडून-मोडून रंगवून सांगायच्या. एक आश्रम, चारदोन गाड्या आणि जमीनजुमला चारदोन वर्षांत सहज मिळतं. एवढा भक्कम रिटर्न मोठ्या इंटरनॅशनल कंपनीत पैसे गुंतवल्यावर पण मिळायचा नाही.’ अर्ध्या साचलेलं सारं भडभडला.
‘चल इथं भारी कपड्याच्या दुकानाचं ओपनिंग झालंय, तिथं जाऊ?’ नम्या एकाएक उठला.
‘कुठं? पण काय घ्यायचंय?’ अर्ध्या गोंधळला आणि उभा राहिला.
‘भगवे कपडे बघू ना तुला? बाबा बनायचंय ना? तेव्हढीतरी इन्व्हेस्टमेंट पाहिजे का नको?’ नम्या बोलला तसा अर्ध्या चिडला, तो हात उगारणार तर नम्या लांब जाऊन उभा राहिला.
‘यार मी सिरीयस काही बोलतोय. तू मजाक करतोय? जाऊ दे!’ अर्ध्या परत बसला.
‘तू कुठं सीव्ही फॉरवर्ड केला होता ना?’ नम्या जरासा गंभीर झाल्याचा भाव चेहर्यावर दाखवत परत जवळ आला.
‘आपण सीव्ही पाठवतो की शिवी हेच कळत नाही. ते सरळ कचर्यात फेकतात रे! साला, आधी बघा तरी? काही येतंय की नाही? डायरेक्ट रिजेक्ट!’ अर्ध्या काळजाचं काही बोलला.
‘हां हे रिजेक्शनला काय क्रायटेरिया लावतात काय कळत नाही बाबा!’ नम्यानं सहमती दाखवली.
‘साला बायोडाटा कुठलाही असो. वधूकडे पाठवलेला असो की कंपनीत सारख्याच स्पीडने फेकतात हे त्र्ॅ्र!’ अर्ध्या डोक्याला हात लावून बसला, ती संधी साधून शेजारी नम्या बसला.
‘काय परत एखादी मुलगी नाही म्हणाली का?’ नम्यानं जवळ जात विचारलं.
‘नाही नाही म्हणाली! पण काहीच कळवलं नाही रे! किमान नाही म्हणायला तरी एवढा वेळ नको लागायला!’ अर्ध्या पुन्हा हळहळला.
‘अलीकडं काही न बोलणं हे नाहीच्या बरोबर आहे. आपलं सरकार कसं काहीच बोलत नाही. हा नाही म्हणायचा राजमार्ग झालाय.’ नम्या सामाजिक, राजकीय काही बोलू लागला.
‘एकतर अर्ज लिहून लिहून बोटं झिजले. त्यात मुली नाही सुद्धा म्हणत नाहीत. घरचे ‘बरं’ बघत नाहीत. समाज खरं ऐकत नाही. सगळं बकवास आहे रे! आपल्या नशिबात!’ अर्ध्यानं कपाळाला हात मारला.
‘आपल्या नशिबात नाही. आपण बकवास आहोत.’ एकाएक मागून आवाज आला, तशे अर्ध्या आणि नम्या मागं वळून बघू लागले. ‘अध्वर्यू शेठ, आज काय नशिबाला फाशी द्यायची तयारी आहे का?’ मागे दर्शन उभा. हा नावाप्रमाणेच क्वचितच पण अवचित दर्शन देणारा प्राणी. आज इथं कुठून उगवला? याच्या कोड्यात अर्ध्या आणि नम्या पडले.
‘अरे तू कधी आला?’ नम्यानं त्याचा हात हातात घेतला.
‘हे काय आताच!’ दर्शननं सहज उत्तर दिलं. डोळ्यावरला चष्मा सावरला.
‘तुझं काय चालुय? एवढ्यात रील्स वगैरे दिसत नाहीत तुझे?’ अर्ध्यानं प्रश्न केला.
‘आंदोलनं, चळवळ हेच!’ दर्शन हसून बोलला.
‘काय मिळतं असे आंदोलन करून? नोकरी-धंदे करायचे! आपण भलं! आपली जिंदगी भली!’ नम्या सल्लावजा समजावणीच्या सुरात बोलला.
‘तुम्हाला रे असं चडफडत बसण्यानं काय मिळतं?’ दर्शन उलटा प्रश्न केला.
‘आता बघ नोकरी नाही. आणि लग्न नाही. मिळवायचे प्रयत्न करतोय, दोन्ही मिळायचे चान्सेस तितकेच भयानक बिकट. मग करणार काय?’ नम्यानं अगतिकता सांगितली.
‘मग तुला वाटत नाही? नोकरी मिळवण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे?’ दर्शन लगेच त्याच्या भूमिकेवर आला.
‘हां, आंदोलनं करा! घ्या पोलीस केस अंगावर! म्हणजे कुठंच नोकर्या मिळायला नको. त्यापेक्षा आणखी चार वर्षे काँट्रॅक्ट बेसिसवर काम केलेलं काय वाईट?’ अर्ध्यानं लगेच नकारघंटा वाजवली.
‘आणि चार वर्षांनी नाही मिळाली चांगली नोकरी तर..?’ दर्शन मागंच लागला. तसाही तो चळवळ्या चिवट!
‘तर… बघू तेव्हाचं तेव्हा!’ अर्ध्याला पुढं सुचेना!
‘पण हे आंदोलन करून काय होतं? उगाच टाईमपास! जा बोंब ठोका! या परत! सगळे पुन्हा सवानसारखे!’ नम्यानं हात झटकले.
‘ठीक आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण गप्प बसू या! पण हा समोर स्टँडसमोर कचर्याचा ढीग आहे. तो तसाच साचत गेला तर…’ दर्शनला लगेच जागेवर काही सुचलं.
‘त्याला काय बाजूने जायचं…’ अर्ध्या सहज उत्तरला.
‘त्यातून दुर्गंधी यायला लागली तर?’ दर्शनचा पुढला प्रश्न!
‘माझं तर काही कामंच नसतं ब्वॉ! इकडं स्टँडकडं!’ नम्यानं पुन्हा हात झटकले.
‘तुझं काम असतं-नसतं. हा मुद्दा नाही. उद्या तिथं भटकी कुत्री जमली, जनावरं फिरायला लागली. त्यातून हवा प्रदूषित झाली. तर गावकरी म्हणून त्रास तुला मलाच आहे ना? उद्या तिथं फिरणारं भटकं कुत्रं तुझ्या अवचित स्टँडवर उतरलेल्या कुठल्या पाहुण्याला चावलं, एखादं तिथलं जनावर अंगावर धावलं. झालं कमी जास्त, तर तू काय करशील? गप्प बसशील?’ दर्शन मुद्द्यावर बसला.
‘हां, पण आपल्यासारख्याचं ऐकतं कोण?’ नम्याची सरळ साधी पळवाट!
‘मागल्या आठवड्यात फक्त सरपंचाच्या दारात पब्लिकमागून गेलो तर तो माझ्यावर गुरगुरला.’ अर्ध्या अनुभव सांगायला लागला.
‘मी गेल्यावर तो मला चहा पाजिल. येतो का सोबत बंगल्यावर?’ दर्शननं दावा केला.
‘आम्हाला त्या फंदात पडायचंच नाही. राजकारण तर मुळीच नको.’ नम्या अजून पळतोच आहे.
‘आपलं असंच आहे. आपल्या समाजाचे आदर्श कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आम्ही जन्मानी मराठी माणसं. सांगताना दुनियेला ओरडून सांगतो. आमच्या मातीत लढाऊ बाणा आहे. आणि लढायची वेळ आली का, नको रे बाबा! आमचं कुठं काम आहे ते? किंवा राजकारण फार गढूळ झालं हो, म्हणत कण्हणार! बस! संपली आमची मर्दुमकी!’ दर्शन बोलता झाला. त्यातला नेता दिसायला लागला.
‘पण नोकरी वगैरेसाठी कुठं आंदोलन करावं का? नसंल कुठं ओपनिंग?’ अर्ध्या चाचरत बोलला.
‘का नसेल? आपल्या इथे टॅलेंट कमी आहे? मग नोकर्या का येईनात? नोकर्या नुसत्या येतील कश्या? आधी उद्योग यायला हवेत. त्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला हवेत. करतंय सरकार? उद्योग नाहीत म्हणून नोकर्या नाहीत. किंवा सरकारी आस्थापनांत जागा आहेत तर भरती नाही. भरती काढली तर पेपर फुटतात. बरं, एवढं होऊन देखील आम्ही मख्ख! आम्हाला साधा प्रश्न विचारावा वाटत नाही. का फुटतात पेपर? का पदं भरत नसेल सरकार? का नवीन उद्योग आणत नसेल सरकार? आज तरुण वार्यावर का? बेरोजगार का? याची उत्तरं कोण देणार? बरं नोकर्या राहू दे! तू किंवा हा किंवा मी नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करू शकतो का रे? नाही ना? का? हे प्रश्न मराठी तरुणाला पडू नये? सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली. आम्ही तिसाव्या वर्षी रिझ्युम घेऊन भटकतो दारोदार. आमच्या मनगटात रग नाहीय का? आम्ही आमच्या हक्कांसाठी लढूच शकत नाही का? आम्ही फक्त बातम्या बघणार, इथे आंदोलन तिथे मोर्चा. मराठी तरुण आहे कुठे? आम्ही अस्वस्थ होतच नाही का? आम्ही लढणार कधी? मग आम्ही आमचा जाज्वल्य इतिहास सांगत फिरणं बंद करावं का? काय वाटतं?’ दर्शन अक्षरशः आग ओकला.
‘आपण निदान आपल्या हक्कांसाठी बोललं पाहिजेच…’ अर्ध्या आणि नम्या दोघं चाचरत बोलू लागले.
‘सुरुवात करूयात? दिल्लीची आग गल्लीत आणायला?’ दर्शननं शेवटचा प्रश्न केला, त्यावर दोघांनी फक्त माना डोलावल्या.

