• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बये, दार उघड

सचिन परब प्रबोधन-१००

marmik by marmik
July 11, 2026
in प्रबोधन १००
0
विक्रमाच्या साडेसातीचं फॅक्टचेक

प्रबोधनकारांनी सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना केली. हा उत्सव कशासाठी साजरा करायचा, याची वैचारिक मांडणी केली. त्याशिवाय तो कसा साजरा करायचा याचा पायलट प्रोजेक्टही तीन वर्षं दादरमध्ये राबवला. ही सांस्कृतिक क्रांती होती. आत्मविश्वास हरवलेल्या बहुजन समाजाच्या अस्मितेला दिलेलं बळ होती. त्याने महाराष्ट्रातले सगळेच सार्वजनिक उत्सवांची संकुचितता संपवली.

 

प्रबोधनकारांनी स्थापन केलेला शिवभवानी नवरात्रौत्सव खर्‍या अर्थाने सार्वजनिक होता. इथे कुणी स्पृश्य नव्हतं की अस्पृश्य. फक्त एका जातीच्या वर्चस्वाला सार्वजनिक म्हणण्याचा प्रघात या उत्सवाने मोडून काढला. १९२६च्या दादर सार्वजनिक गणेशोत्सवात बहुजन समाजातल्या कलाकारांना संधी मिळत नसल्यामुळे क्रांतीची पहिली ठिगणी पडली होती. त्यामुळे आजपर्यंत ज्यांचे कलागुण केवळ जातींमुळे लोकांसमोर येऊ शकले नव्हते, त्यांना प्राधान्य मिळालं. बहिष्कृत भारतातल्या आवाहनात हा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो, तो असा- पोवाडे, गायन, कीर्तने, व्याख्याने, मेळे वगैरे रोजच्या कार्यक्रमांसाठी ब्राह्मणेतर विद्वान स्त्री-पुरुषांचीच योजना केल्यामुळे, अनेक झाकलेली ब्राह्मणेतर रत्ने लोकांच्या नजरेस पडली.

नवरात्रौत्सवात रोज रात्री कार्यक्रम असत. त्याला पाच सहा हजारांची गर्दी होत असे, असं प्रबोधनकार म्हणतात. मंडप तर महिलांच्या गर्दीनेच भरून जायचा. पुरुषमंडळी बाहेर उभी राहायची. प्रबोधनकारांचे मित्र स्काऊटचे अधिकारी वसंतराव कीर यांनी बंदोबस्तासाठी ७५-१०० स्काऊट स्वयंसेवकांची टीम कामाला लावली होती.

दादरच्या प्रसिद्ध दशहरा भजन मंडळींचे पंचमबुवा यांचं भजन रोज रात्री ९ वाजता होत असे. त्यांची ललकारी पंचमात व्हायची आणि त्याचा मृदुंगही पंचमात लागलेला असायचा म्हणून त्यांना दादरकरांनी पंचमबुवा असं नाव दिलं होतं. पंचमीच्या रात्री भजन सुरू असताना रात्री साडेअकराच्या सुमारास पंचमबुवांनी एकाएकी पंचमात आरोळी ठोकून ‘दार उघड बये दार उघड` या संत एकनाथांच्या भारूडाला सुरुवात केली. प्रबोधनकार या रचनेला अस्सल मर्‍हाठ्यांचं राष्ट्रीय गीत असं म्हणतात. पंचमबुवांच्या भजनी मंडळाने ते जवळपास अर्धापाऊण तास रंगवलं. प्रबोधनकार म्हणतात, तो अर्धापाऊण तास आम्ही शेदीडशे श्रोते देहभान विसरून, प्रत्यक्ष श्री शिवरायाच्या मायभवानीपुढे एकतान दार उघडण्याची त्या बयेला आळवणी करीत आहोत, अशा वातावरणात अगदी न्हाऊन निघालो. त्या भजनाचा तसा रंग पुन्हा अनुभवायला मिळाला नाही.

पोवाड्यांसाठी तर प्रबोधनकारांनी रस्त्यावर हुतात्मा उमाजी नायकांचा पोवाडा गाणारे पाच सहा कलाकार गोळा केले. नेहमी फाटक्या कपड्यांत असणार्‍या या कलावंतांना पहिल्यांदाच नाटकांसारखे भरजरी कपडे मिळाले. पायघोळ चुणीदार अंगरखे, कंणगीदार पगड्या या वेषामुळे त्यांना मोठंच प्रोत्साहन मिळालं. त्यांनी पोवाड्यांचा कार्यक्रम इतका रंगवला की रात्री बारा वाजेपर्यंत कुणी हललं नाही. प्रबोधनकार सांगतात, रात्रीच्या कार्यक्रमातले वक्ते, गायक, कवी, शाहीर, प्रवचनकार, कीर्तनकार सगळे बामणेतर.
रात्री १०नंतर भजनी मंडळाचं गायन असे. अष्टमीच्या दिवशी भजनी मंडळांची स्पर्धा झाली. मंडळांनी हिरीरीने भाग घेतला. त्यामुळे ही स्पर्धा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली ती रात्री अकरा पर्यंत सुरू राहिली. दरवर्षी शेवटच्या नवमीच्या रात्री गिरगावातल्या महाराष्ट्र संगीत नाटक मंडळीच्या एखाद्या नाटकाचा प्रयोग होत असे. त्याच्या अस्पृश्योद्धार या नाटकाला तर इतकी गर्दी झाली की स्वयंसेवकांच्या सोबतीला पोलिसांनाही बोलवावं लागलं. याशिवाय रोज संध्याकाळी मैदानी आणि ताकदीच्या खेळांचे प्रयोग होत. त्यामुळे दादर परिसरात तरुणांमध्ये व्यायामाचं वातावरणच बनलं.

या सगळ्या कार्यक्रमात कडी केली ती एका व्याख्यानाने. त्या दिवशी भायखळा मार्वेâटमध्ये भाजी विकणार्‍या यमुनाबाई घोडेकर या माळी समाजाच्या महिलेचं व्याख्यान ठेवल्याची घोषणा झाली. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. भाजी विकणारी बाई व्याख्यान कसं देईल? त्यामुळे मोठी गर्दी झाली. व्याख्यानाचं प्रबोधनकारांनी केलेलं वर्णन फर्मास आहे – व्याख्याती बाई व्यासपीठावर येऊन उभी राहिली. एक साधे जाडेभरडे लुगडे. कोपरापर्यंत चोळी, माथ्यावर पदर घेतलेला. कपाळावर ़कुंकवाची लांबलचक चीर. डोळे किंचित चकणे. अशी घाटवळ बाई नि ती व्याख्यान देणार? बाई बोलू लागली. उच्चार खणखणीत. स्वच्छ आणि विवेचनाचा पहाडी झपाटा पहिल्या पाचदहा मिनिटातच श्रोत्यांवर छाप मारून चालू झाला. संस्कृत प्राकृत संदर्भांचे उतारे भराभर दिले जाताच, त्या साध्या मराठमोळ्या बाईच्या विद्वत्तेची श्रोत्यांना चांगलीच साक्ष पटली. तब्बल तीन तास भाषण झाले. सगळी मंडळी यमुनाबाईंचे गुणगान करीत घरोघरी रात्री बारा वाजता परतली.

उत्साहात पार पडलेल्या या उत्सवाची सांगता दसर्‍याच्या दिवशी मिरवणुकीने होणार होती. प्रबोधनकार त्याला विसर्जनाची मिरवणूक म्हणत नाही. कारण उत्सवमूर्ती समुद्रात कोसळवण्याचा प्रघात बंगाली लोकांमध्ये आहे, मराठी माणसांत नाही, असा प्रबोधनकारांचा ऐतिहासिक तर्क होता. त्यामुळे विसर्जन नाही तर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम हा या सोहळ्याचा अखेर असणार होता. त्यामुळे दसर्‍याची मिरवणूक विसर्जनाची नाही, तर त्यांच्यासाठी शिलंगणाची म्हणजे सीमोल्लंघनाची स्वारी होती. पण या मिरवणुकीला पोलिस परवानगीच द्यायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलेलं कारण गमतीशीर होतं, अशी मिरवणूक दादरला पूर्वी कधी झाली नाही.

परवानगी नाही म्हटल्यावर सत्यशोधक चळवळीतली ज्येष्ठ मंडळी सरसावून पुढे आली. त्यात रावबहाद्दूर सी. के. बोले, टी.आर. नवलकर वकील यांच्या बरोबरीने कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींसारखे ऋषीतुल्य विचारवंतही होते. या तिघांनी पोलिसांना सांगितलं, अहो, पुत्रच जन्माला आला नव्हता, तेव्हा बारश्याचा प्रश्नच नव्हता. पण यंदा तो जन्मलाय तेव्हा बारसे झालेच पाहिजे नि आम्ही ते करणारच करणार. असा युक्तिवाद झाल्यानंतर परवानगी मिळाली नसती तरच नवल. दसर्‍याच्या दिवशी सकाळीच सबंध मुंबईतून लेझीमवाल्यांची पथकं, विविध व्यायामशाळांतल्या मल्लखांबांचे संघ, भजनी मंडळं आपापले ताफे घेऊन दादरला हजर झाले. दुपारी १२ वाजता भवानीची महापूजा झाली. सार्वजनिक आरती झाली. पाठोपाठ शिलंगणाच्या स्वारीची म्हणजे मिरवणुकीची तयारी सुरू झाली.
भवानीमातेच्या उंच कटआऊट गाडीवर चढवला. त्याची सजावट करून रथ तयार करण्यात आला. सभोवार मावळ्यांच्या वेशात तरुण उभे राहिले. मिरवणुकीच्या आघाडीवर तेव्हाच्या प्रथेप्रमाणे चौघड्याची गाडी होती. त्या पाठोपाठ बँडवाले होते. मिरवणुकीला इतकी गर्दी झाली की सुरुवातीची चौघड्याची गाडी भवानीशंकर चौकात म्हणजे आजच्या कबुतरखान्याजवळ पोचली, तेव्हा टिळक पुलाजवळच्या काळ्या मैदानातून देवीचा सजवलेला रथ हलला.

भवानी शंकर रोडवरच्या ब्राह्मणदेव मंदिराच्या गल्लीतून पोर्तुगीज चर्चकडे (आज तिथे प्रबोधनकारांचा पुतळा दिमाखात उभा आहे.), तिथून तेव्हा नव्याने तयार झालेल्या गोखले रोडवरून कोहिनूर मिलच्या म्हणजे शिवसेना भवनाच्या नाक्यावर, तिथून उजवीकडे वळून थेट टिळक पुलावरून हिंदू कॉलनीतल्या किंग जॉर्ज इंग्लिश स्कूल म्हणजे आजच्या राजा शिवाजी विद्यालयाचं मैदान, असा मिरवणुकीचा मार्ग ठरला होता. त्यानुसार मोठ्या दिमाखात मिरवणूक निघाली. तोपर्यंत इतकी मोठी मिरवणूक दादरमध्ये झालेली नव्हती.

हिंदू कॉलनीतल्या मैदानात रावबहाद्दूर बोलेंच्या हस्ते सुवर्णपूजन झालं. दसर्‍याचं सोनं लुटलं गेलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छोटंसं भाषण झालं. नंतर कुठेही विसर्जन न होता, मिरवणूक आल्या मार्गाने पुन्हा वाजत गाजत काळ्या मैदानावर आली. तिथे आरती झाली. जोंधळ्याच्या लाह्या आणि पावलीच्या आकाराचे मावळी बत्तासे असा प्रसाद वाटण्यात आला. विसर्जन न होता मिरवणूक पुन्हा मंडपात का आली, यावर प्रबोधनकार लिहितात, स्वारी परत का आणली? जगदंबा सीमोल्लंघन करून मुलुखगिरी गाजवते आणि लुटलेले सोने घेऊन स्वराज्यात येते, तेथे तिचा यथोचित सत्कार होतो नि मगच श्री शिवभवानी नवरात्र महोत्सवाची पूर्णता होते. उत्सवमूर्तीला समुद्रात कोसळविण्याचा प्रघात बंगाल्यांत आहे. आम्हा मर्‍हाठ्यांचा नव्हे.

या मिरवणुकीचं वर्णन बहिष्कृत भारत`मधल्या लोकहितवादी संघाच्या आवाहनातही आहे, `घटस्थापनेच्या दिवशी शिवरायांचा जरतारी भगवा झेंडा अस्पृश्य वर्गाचे एक पुढारी डॉ. सोलंकी यांनी फडकवला व त्याला अखिल हिंदु जनांनी आदराने मुजरा केला. विजयादशमीच्या दिवशी हा झेंडा मिरवणुकीच्या अग्रभागी मिरवत गेला व सीमोल्लंघनाचें सोनें लुटून अनंत वाद्यांच्या गजरांत मिरवत स्वस्थानी परत आला. दसर्‍याची मिरवणूक म्हणजे दादरच्या इतिहासांतील अभूतपूर्व चमत्कारच म्हटला तरी चालेल. इतकी प्रचंड परंतु शिस्तीची मिरवणूक दादरमध्येच काय परंतु मुंबईमध्येहि पहिलीच, असे पोलिस अधिकार्‍यांनीहि उद्गार काढले! मिरवणुकींत स्पृश्यास्पृश्य भेद मुळासकट छेदला जाऊन, हिंदू संघटनेचा श्रीगणेशा संघटनवादी ब्राह्मणांना लोकहितवादी संघानेच शिकविला.
याच आवाहनात शेवटी लोकहितवादी संघ म्हणतो, संघाला आशा आहे की, यंदापासून श्रीशिवभवानी नवरात्र महोत्सव उपरोक्त नमुन्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रभर साजरा करण्याची स्वाभिमानी ब्राह्मणेतर बंधुभगिनी झटापट करतील. अस्पृश्यता विध्वंसक आणि खरेखुरे असलें हिंदुसंघटन साधून, अखिल भारतखंडांत भवानीच्या ‘शक्ती’चा संचार करण्याच्या या राष्ट्रीय नवरात्र महोत्सवावरच ब्राह्मणेतरांनी जोर देणें अगत्याचें आहे.

हा सार्वजनिक नवरात्रौत्सव अनेक अर्थांनी वेगळा होता. त्यामागे केवळ उत्साह नव्हता, तर विचार होता. सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने बहुजन समाजात निर्माण केलेला न्यूनगंड संपवून त्यांना आत्मविश्वास देणारी ही क्रांती होती. त्यामुळे बहुजनांच्या अस्मितेला बळ मिळालं. ते बळ नवरात्रौत्सवाच्या तयारीपासून दसर्‍याच्या मिरवणुकीपर्यंत स्पष्टपणे दिसलं. प्रबोधनकार दादरमध्ये असेपर्यंत म्हणजे दोन किंवा तीन वर्षं हा उत्सव उत्साहाने चालला. पुढे आजारपणामुळे प्रबोधनकारांना दादर सोडावं लागलं. त्यामुळे उत्सवामागची प्रेरणाच निघून गेली. पुढे दादरच्याच खांडके बिल्डिंगमधल्या तरुणांनी प्रबोधनकारांचा हा उत्सव सुरू ठेवला. आजही हा नवरात्रौत्सव उत्साहात सुरू आहे. आता त्यात प्रबोधनकारांचा विचार फारसा उरलेला नाही. हे इतर नवरात्रौत्सवांसारखंच एक मंडळ आहे. पण त्याच्या मंडपात प्रबोधनकारांचा फोटो दर्शनी भागावर लावलेला असतो. प्रबोधनकारांपासून आजच्या पिढ्यांपर्यंत ठाकरेंच्या घरातल्या सगळ्या मान्यवरांनी या मंडळाला नियमित हज्ोरी लावलेली आहे. दिवंगत शिवसेना नेते मनोहर जोशी दीर्घकाळ या मंडळाचे अध्यक्ष होते.

प्रबोधनकार सांगतात की पुढे महाराष्ट्रभर या उत्सवाचं लोण पसरलं. आज मराठी पद्धतीचा सार्वजनिक नवरात्रौत्सव महाराष्ट्रभर साजरा होतोच. पण त्यात प्रबोधनकारांनी सांगितलेला आदर्शवाद उरला आहे का, हा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. पण यामुळे एकाच जातीपुरत्या असूनही स्वतःला सार्वजनिक म्हणवणार्‍यांचं दुकान कायमचं बंद पडलं. महाराष्ट्रातल्या सार्वजनिक उत्सवांमध्ये सगळ्यांना मोकळं मैदान मिळालं. बहुजन समाजातल्या प्रतिभावंतांना हक्काचा मंच मिळाला. ही एक प्रकारे मोठी क्रांती होती.
ज्या सार्वजनिक गणेशोत्सवावर प्रबोधनकारांनी बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं, त्याचा वापर करून शिवसेनेने मुंबईत आणि मुंबईबाहेरही आपली संघटना बांधल्याचं पुढे दिसून आलं. त्यामुळे बहुजन समाजातलं नेतृत्व महाराष्ट्रभर उभं राहिलं, ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही. दुसरीकडे ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी याच सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा थाट मांडून तोवर तिथे प्रभावी असलेलं ब्राह्मणी वळणाचं राजकारण मोडून काढलं, हाही इतिहास आहेच. शिवाय विचारांचं सोनं लुटण्यासाठी दादरला दसरा मेळाव्यासाठी येण्याचं मूळ सार्वजनिक नवरात्रौत्सवातल्या शिलंगणाच्या स्वारीत शोधावं लागतंच.

Previous Post

रा.स्व.संघ संविधानापेक्षा मोठा आहे का?

Next Post

अर्थ आणि पाठांतर

Next Post
नामयाचा तुका!

अर्थ आणि पाठांतर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.