
दिवाळीची धामधूम संपली तसा लग्नाचा सीझन सुरू झाला. पहिल्या मुहूर्तावरच काही गुढघ्याला बाशिंग बांधलेले नवरदेव बोहोल्यावर चढू लागले. ज्या मंडळींनी आपली सर्व ‘कामे’ आधीच उरकून घेतली होती आणि फक्त लग्न करायचे तेवढे बाकी ठेवले होते असेही उमेदवार लग्नाचा हॉल बुक करू लागले होते. पावसाळा संपल्यात जमा होता. परतीचा पाऊसही पडून गेला होता. थंडी अजून पडायची बाकी होती. अशा वातावरणात अशाच एका ‘तातडीच्या’ लग्नाचे आमंत्रण आले होते. एवढ्या तातडीने लग्न करायचे वधू-वरांचे काहीही प्रयोजन असो, आपल्याला काय त्याचे? त्यांचे ते निस्तरतील. आपण आपला ‘दिला आहेर- अन् (जेवण करून) चला बाहेर’ हा बाणा ठेवायचा! हाच सुज्ञ विचार करून मी तडीपार गुंड पोलिस स्टेशनला भोळा चेहरा करून हजेरी लावायला जातात तसा त्यांचं लगीन लावायला गेलो होतो.
थाळीत इतर नेहमीच्या पदार्थांसोबतच ‘आमरस’ही होता हे पाहून चकित झालो. बाहेर आंब्याच्या झाडाला मोहरसुद्धा आला नव्हता आणि येथे चांगला पिवळा धम्मक घट्ट आमरस तयार करून वाढलेला!
कॅटरिंगवाल्याला, ही जादू कशी काय केलीस बाबा, असे विचारल्यावर त्याने आम्ही आंब्याचा प्रâोझन पल्प वापरतो असे लाजत-लाजत कबूल केले. आमरस आता म्हणे बाजारात वर्षाचे बाराही महिने आणि दिवसाचे चोवीस तास कधीही, कुठेही मिळतो. कांदे दहा रुपयांनी महाग झाले तरी सॅलडमध्ये कांद्यांच्या जागी ‘पत्तागोभी’ वापरणारे हॉटेलमालक ऑफ सीझनमध्ये सुद्धा आमरसाच्या किंमती न वाढवता असा अगदी घट्ट आमरस ग्राहकांना कसा काय देत असतील याचे मला नेहमीच आश्चर्य वाटे. आंब्याच्या ऑफ सीझनमध्ये हे हॉटेलवाले इतके दिलदार कसे काय होत असतील बरे, ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले.
बाजारात टेट्रा पॅकमध्ये मिळणारे रेडिमेड आंब्याचे ज्यूस चक्क पपईच्या गरापासून बनवलेले असतात असे समजले. त्यावर ‘प्रâूट पल्प’ असे छापलेले असते. पण कोणते फळ आहे त्याचे नाव नसते. पपईसुद्धा एक फळ आहेच ना? म्हणजे कायदेशीररित्या ते खोटेही बोलत नाहीत. त्यात भरपूर प्रमाणात साखर, सिट्रिक अॅसिड आणि कृत्रिम गंध (फ्लेवर) आणि हे सगळे टिकवून ठेवणारी रसायने वापरली जातात. अन्न व औषध प्रशासन दर मोसमामध्ये आंबा पिकवण्यासाठी कृत्रिम आणि मनुष्याच्या आरोग्यास घातक अशी रसायने वापरल्यामुळे छापे टाकून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करते. मुळात हे आंबेच आपल्या प्रकृतीस हानीकारक असतात. त्यात त्याचा आमरस असा घातक रसायने वापरून तयार केलेला असतो. तोंडाला फक्त चव चांगली लागते, पण आरोग्याचे काय?
कधी कामानिमित्त व्यावसायिक मित्रांना हॉटेलात घेऊन गेलो की त्यांची पहिली पसंती असणारी डिश म्हणजे ‘पनीर टिक्का मसाला’! त्याला त्यांनी ‘पीटीएम’ असा कोडवर्डसुद्धा दिलेला आहे. तुम्ही कोणत्याही शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जा- ऐंशी टक्के डिश पनीर वापरूनच बनवलेल्या असतात. दुग्धजन्य पदार्थ मला पचत नसल्यामुळे मी नेहमीच ह्या पनीरच्या पदार्थापासून अंतर राखून आहे. वेटरला ऑर्डर देतानाही पनीर नसलेली कोणतीही भाजी आण- अशीच ऑर्डर देत असे. मित्र कुत्सितपणे ‘गाढवाला गुळाची काय चव?’ अशा नजरेने पाहायचे आणि त्यांच्या दृष्टीने सात्विक आणि चविष्ट अशी पनीरची डिश मागवायचे. आता अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकून नकली पनीर नष्ट केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. मला माझी ती व्हेज कोल्हापुरी किंवा वांगे-बटाटा भाजी खाताना पाहून नाक मुरडणार्या सर्व ‘पनीर-प्रेमी’ मित्रांना मी हे व्हिडिओ पाठवून त्यांची मस्त जिरवत आहे!
एक नामांकित अॅपल ज्यूस म्हणजे सफरचंदाचा रस असलेले ‘ड्रिंक’ तर पूर्णपणे केमिकल फ्लेवर टाकून केलेलं तयार केलेले असते. त्यात औषधाला म्हणतो तेवढ्या अल्प प्रमाणात सुद्धा सफरचंद नसते. नवल म्हणजे त्या कंपनीने ते प्रामाणिकपणे त्यावर छापलेलं पण असते. तरीसुद्धा लोक ते ड्रिंक आरोग्यदायी असावे असे समजून मिटक्या मारत पितात. त्यांच्या डोक्यात रोज एक सफरचंद खाल्ल्यावर डॉक्टरची गरज भासत नाही अशा अर्थाची ती म्हण पक्की बसलेली असते.
पूर्वी केक करताना त्यात अंडे वापरले जायचे. त्याची एक व्यवस्थित साधी सोपी रेसिपी असायची. आता तर एवढ्या प्रकारच्या केकच्या रेसिप्या आल्यात की मूळ केकची चव कशी असायची हेच विसरून गेलोय. त्यात भर त्यावर सजावटीसाठी लावलेल्या क्रीमची. मूळ ओरिजिनल क्रीम म्हणजे दुधावरची साय होती. त्यात साखर टाकून तिचा गोडवा वाढवला जायचा. आता ही जी केकवरची क्रीम असते ती चक्क पामोलीन तेलापासून बनवली जाते. तिच्यामध्ये साय तर दूरच, दुधाचा थेंबसुद्धा नसतो! फसवणुकीचा दावा लागू नये म्हणून ह्या पदार्थाचे नाव सुद्धा ‘क्रीम’ऐवजी ‘क्रेम’ असे ठेवलेले असते. काही बिस्किटांमध्ये सुद्धा हेच ‘़क्रेम’ वापरलेले असते.
आपल्या सर्वांच्या आवडीचे ‘आईसक्रीम’सुद्धा आता पूर्वीचे राहिले नाही. ह्या क्रेमसारखेच नकली क्रीम वापरून आणि आईसक्रीमऐवजी ‘प्रâोजन डेझर्ट’ अशा नावाने बाजारात ते आता मिळते. मुळात आजकाल दुधातच एवढी भेसळ असते तर दूध वापरून केलेल्या पदार्थात काय घातलं जात असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आता बिनअंड्याचा केव्ाâ तयार केला जातो. आदिवासी लोकांच्या जमिनीवर हळूहळू कब्जा करून त्यांना हाकलून देऊन स्वत: तेथे वस्ती करणार्या वसाहतवादी लोकांप्रमाणे शाकाहारी लोकांनी बर्याचशा मांसाहारी पदार्थातून मूळ मांसाहारी घटक बाहेर काढले आहेत. केकमधून अंडे बाहेर काढले. बिर्याणीमधून चिकन-मटन बाहेर काढून सात्विक आणि सोज्वळ अशी ‘व्हेज-बिर्याणी’ तयार केली! न जाणो भविष्यात ‘फिश करी’ऐवजी शेवग्याच्या शेंगा वापरून ‘शेंगा करी’ किंवा ‘पाया सूप’ ऐवजी ‘दोडका सूप’ सुद्धा करतील!
असाच एकदा एका ‘प्युअर व्हेज’
रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा योग आला. (तेथे एक राजस्थानी ग्राहक त्या हॉटेलला ‘पुरे व्हेज’ असे म्हणत होता, हे ऐकून मौज वाटली!) तेथील मेनूमध्ये ‘व्हेज अंडा करी’ असा एक बुचकळ्यात पाडणारा पदार्थ होता. हा काय प्रकार असावा हे पाहण्यासाठी मुद्दाम ती डिश आम्ही
ऑर्डर केली. कुठलं तरी पीठ वापरून अगदी अंड्यामधील पिवळ्या बलकासकट हुबेहूब उकडलेल्या अंड्यासारखीच दिसणारी ती कलाकृती होती. पाहताना जरी अगदी उकडलेल्या अंड्यासारखेच दिसत असले तरी खाताना मात्र ती पिठाळ चव आमची जीभ काही स्वीकारायला धजली नाही. चिकन लॉलीपॉपसारखे व्हेज लॉलीपॉप सुद्धा मिळतात. चवीतही काही जास्त फरक नसतो! चवीला विचित्र लागत असले तरी असे नकली नॉनव्हेज पदार्थ खाऊन करमणूक होते एवढे मात्र खरे!
एकदा वाचनालयात असंच पुस्तक शोधता शोधता ‘१०० उद्योग आयडिया’ असे काहीसे नाव असलेले पुस्तक हाती पडले. एखादा चांगला उद्योग हाती पडला तर करायला काय हरकत आहे, असे म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतले. इतर ९९ उद्योगांपैकी आपण एकच उद्योग निवडू. ब्रेडला जो जॅम चोपडून खातो तो उद्योग म्हणजे बाटलीबंद जॅम कसा तयार करायचा त्याची रेसिपी त्यात दिलेली होती. रेसिपी वाचून असे समजले की हा जॅम तयार करण्यासाठी मुख्य सामुग्री म्हणून ‘दुधी भोपळा’ लागतो! दुधी भोपळ्याचा लगदा साखरेच्या पाकात आणि इतर सामग्री टाकून एक बेस तयार करायचा. त्या बेसमध्ये किंवा मुख्य पदार्थांमध्ये वेगवेगळे ‘एसेन्स’ म्हणजे ‘गंध’ टाकून त्या त्या प्रकारचे
जॅम तयार करता येतात. म्हणजे तुम्ही संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबा, अननस, पेरू असे कुठलेही फ्लेवरचे जॅम खाल्ले तरी त्याच्यात फक्त फ्लेवर सोडल्यास दुसरे सर्व घटक सारखेच असतात. तुम्ही ह्यापैकी काहीही प्रत्यक्ष खात नसता, दुसरेच काही खाता! ही तर शुद्ध फसवणूक आहे, नाही का?
माणसाचे नुसते खाण्याचे आणि दाखवायचे दातच वेगळे नसतात, तर दाखवायचा पदार्थ वेगळा आणि खाण्याचा वेगळा असे सुद्धा असते! आपण काय समजून खातो आणि प्रत्यक्ष आपल्या पोटात काय जाते हे लक्षात घेता पूर्वीचे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ऐवजी ‘अन्न हे पूर्ण भ्रम’ हे म्हणणेच योग्य ठरते!

