
अंगठ्याच्या साहाय्याने तो गोल-गोल फिरवत पारीचा द्रोण करायचा. चिमटीत पारी पकडून नाजूकपणे जवळ-जवळ कळ्या करायच्या. त्यात सारण भरून पाच बोटांवर अलगद तोलत दुसर्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने पारी पकडून मोदकाचे नाक सुंदरपणे वर आणून, पाण्यात बुडवून चाळणीत ठेवायचा. हुश्श… हे लिहायला फार सोपे पण करताना अक्षरशः त्रेधा तिरपीट उडायची.
माहेरी आम्हा वैद्य मंडळींचा एकच गणपती असे आणि तोही दीड दिवसांचा. आम्ही सर्व सख्खे-चुलत मिळून २५-३० जण बोरिवलीतील आमच्या मोठ्या घरी जमायचो. पहिल्या दिवशीच्या मोदकांच्या नैवेद्याचे नियोजन आमची मोठी काकू करायची. तिचा शब्द प्रमाण मानून आम्ही सर्वजण या प्रक्रियेत आनंदाने सहभागी होत असू. काका आणि चुलत भावंडे १५ ते २० मोठे गुहागरी नारळ आधी सोलून धुवून ठेवत. हे सर्व नारळ मधली काकू शिताफीने कोयता वापरून बरोबर मधोमध फोडी. नारळाचे पाणी वाया जाऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाई. एखादी बहीण हे पाणी पातेल्यात धरण्याचे काम करी. मग सर्वजणी गोलाकार बसून नारळ खोवत. ’नारळ बारीक खोवा, तुकडे पाडू नका, केसर व काळी पाठ खोबर्यात नको’ – मोठी काकू!
इकडे खोबरे खोवताना तिकडे गप्पांचा कीस पडे. राजकारण, समाजकारण, मुलंबाळं आदी अनेक विषय यात यायचे. एकीकडे मोठ्या चुलत बहिणी गूळ बारीक चिरत आणि वेलचीची पावडर बनवत. सारण म्हणजे मोदकाचा आत्मा. अर्थात सारण भाजण्याचे काम आमची कॅप्टन अर्थात मोठ्या काकूचे. मिश्रण मंदाग्नी गॅसवर केशरी होईपर्यंत ती भाजे. तो केशरी रंग पाहून मन हरखून जाई.
शेंडेफळ असल्याने या सर्व कामात मी मात्र लिंबू टिंबू… मागणीप्रमाणे चहा, सरबत न सांडता, कपबश्या व ग्लास न फोडता पुरवणे, नारळाच्या करवंट्या उचलून बंबाजवळ व्यवस्थित रचणे अशी बाराव्या गड्याची सर्व कामे माझी. मोदक करण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत माझा प्रवेश थोडा उशिराच झाला. मोठ्या चार बहिणींची लग्ने झाली आणि माझे शिक्षण सुरू झाले. ’वीणा (माझे माहेरचे नाव), मोदक वळायला आमच्या समोरच बस हो!’ मोठ्या काकूच्या या फर्मानातील शेवटच्या ‘हो’ने अक्षरशः घाबरगुंडी उडायची. उकड कशी काढायची, कल्हईच्या पातेल्यात मापाच्या ़कुंड्याने पिठी आणि तेवढेच पाणी घ्यायचे. पातेलं धरायला गावी न घेता जाड फडकी वापरायची, म्हणजे उकड नीट हलवता येते. दणकून वाफ द्यायची. परातीत उकड घेऊन हाताला तेल आणि पाणी लावून ती कढत असताना मळायची, म्हणजे पारीला चिरा जात नाहीत.
इथपर्यंत सगळं ठीक आहे हो! आता खरी परीक्षा सुरू! उंडा हातात घेऊन लंबगोल करायचा. अंगठ्याच्या साहाय्याने तो गोल-गोल फिरवत पारीचा द्रोण करायचा. चिमटीत पारी पकडून नाजूकपणे जवळ-जवळ कळ्या करायच्या. त्यात सारण भरून पाच बोटांवर अलगद तोलत दुसर्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने पारी पकडून मोदकाचे नाक सुंदरपणे वर आणून, पाण्यात बुडवून चाळणीत ठेवायचा. हुश्श… हे लिहायला फार सोपे पण करताना अक्षरशः त्रेधा तिरपीट उडायची. मोदक नकटा झाला तर तोच मोदक सारण काढून तीच उकड घेऊन परत करायचा. नियम म्हणजे नियम.
मी केलेला मोदक वेगळा ठेवून नैवेद्याच्या वेळी काकू त्याचे कौतुक करी. त्यानंतर साग्रसंगीत आरती व पंगत.
मोदक करण्याचे काम प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंत बाप्पासमोर रात्रभर जागरण करून आरास केलेली माझी भावंडे अथर्वशीर्षाचे आवर्तन करायला बसत. त्यामुळे कधीही कोणाच्याही डोळ्यावर चुकूनसुद्धा झोपेची झापड आलेली मी पाहिली नाही. गणेशोत्सवाचे वातावरण प्रत्येकाच्या अंगात संचारलेले असायचे. एक एक आवर्तन चढत चढत म्हणायची प्रथा होती. बेंबीच्या देठापासून म्हणणे म्हणजे काय ते मी प्रत्यक्ष ऐकले आहे. या भावंडांना इतक्या आरत्या येत होत्या की कमीत कमी ११ आरत्या म्हणल्या जायच्या आणि त्या सुद्धा सुरात टाळ वाजवीत. आरती संपल्यानंतर बाप्पापुढे फेर धरून तालावर ’मोरया मोरया‘चा गजर करत नाचायचे.
या सर्व धामधुमीत नैवेद्याचे ताट आणि २१ मोदकांचे वेगळे ताट बाप्पापुढे ठेवले जायचे. सजावटीला वापरले गेलेले सोनटक्का, सोनचाफा, गुलाब, जास्वंद, दुर्वांचे हार, शमीची पाने, वेगवेगळ्या झाडांच्या पत्री यामुळे रंगांची बहार उडालेली असायची. या सर्व वेगवेगळ्या फुलांचा मंद सुवास त्यात मोदकाच्या स्वादाची भर. केवळ अलौकिक!

यातसुद्धा एक गंमत असे. काही मोदकांत मीठ, गुळाचा खडा, मिरची ठेचा, असे वेगळेच सारण असे. हे’ खास’ मोदक कोणाच्या वाट्याला येतात हा कुतूहलाचा विषय असे. यथेच्छ आग्रह व भोजन झाल्यावर नंतर बराच वेळ तारसप्तकात घोरण्याचे आवाज येत. नंतर सर्व काकू मंडळी अन्न मध्ये घेऊन गोलाकार जेवायला बसत. ’वहिनी, दमलीस हो. वाढ गं अजून एक मोदक तिला.’ कोणाच्याही चेहर्यावर कामाचा शिणवटा नसायचा तर एक वेगळेच समाधान असायचे. मोदक करणे हा माझ्यावर माझी आई आणि सर्व काकवा यांनी केलेला एक संस्कारच आहे.
साहित्य
- ४ वाट्या तांदूळ (आंबेमोहोर, बासमती, इंद्रायणी यापैकी एक)
- २ नारळ
- ३ वाट्या बारीक चिरलेला गूळ
- १/४ वाटी भाजलेली खसखस
- १ मोठा चमचा वेलची पूड
- ४ चमचे साजूक तूप
- चवीनुसार मीठ
कृती
प्रथम तांदूळ धुवून, निथळून फडक्यावर पसरवून ठेवा. थोडे दमट असतानाच दळून पिठी करावी, म्हणजे पिठी बारीक होते.
खोवलेला नारळ, बारीक चिरलेला गूळ, भाजलेली खसखस हे एकत्र करून चांगले कढईत शिजवावे. शिजत आल्यावर त्यात दोन चमचे तांदळाची पिठी घालावी. सारण गार झाले की वेलची पूड घालावी.
उकड– जितकी भांडी पीठ तितकीच भांडी पाणी पातेल्यात घेऊन उकळत ठेवावे. उकळी आल्यावर त्यात ४ चमचे तूप व मीठ घालावे. आता तांदळाची पिठी आधण आलेल्या पाण्यात घालावी. शक्यतो गुठळी होऊ न देता उकड चांगली हाटावी. मग त्यावर झाकण ठेवून दणकून वाफ आणावी. आता परातीत उकड काढून पाण्याचा आणि तेलाचा हात लावून उकड गरम असतानाच चांगली मळावी. जितकी मळाल तितकी पारी छान होईल आणि चिरणार नाही. आता हे काम फूड प्रोसेसरवरही होऊ शकते. आधणात तांदळाची पिठी घालताना उलथण्याच्या मागच्या बाजूने एकाच दिशेने उकड हलवायची म्हणजे गुठळी होत नाही.
लिंबाएवढा उकडीचा गोळा हातात घेऊन अंगठ्याने मधोमध दाबून फिरवत फिरवत द्रोणासारखा आकार करावा. आता दोन बोटांच्या चिमटीत पारी पकडून जास्तीत जास्त कळ्या करा. मधोमध सारण भरा. अलगद गोल गोल फिरवत छान नाक वर आणा. आता मोदक पाण्यात बुडवून मोदकपात्रात वाफवायला ठेवा. चांगली १० मिनिटे वाफ आणा. वरील साहित्यात ३५ तरी मोदक होतील.

