आज आपण ज्या मराठमोळ्या पद्धतीने सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतो, त्याची सुरुवात प्रबोधनकारांनीच केली. तोवर सार्वजनिक गणेशोत्सव ब्राह्मणी वर्चस्वात अडकलेला होता. त्यात बहुजनांना अपमान होता. अस्पृश्यांना तर उभंही केलं जात नव्हतं. त्यामुळे प्रबोधकारांनी त्याला पर्याय दिला आणि सार्वनजिक उत्सव साजरा करण्याची पद्धतच बदलून टाकली.
ठाकर्याने गणपती बंद पाडला, हा दादरमधल्या सनातन्यांनी घेतलेला आळ एक इष्टापत्ती ठरला. त्यातून सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना झाली. सध्या आपण महाराष्ट्रात जसा मराठी पद्धतीने सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतो, त्याची सुरुवात प्रबोधनकारांनी १९२८च्या नवरात्रीत दादरमध्ये केली. त्याची तयारी कशी जय्यत झाली होती, ते आपण पाहिलंच. मुंबईतल्या मराठी बहुजन समाजाचा उत्साह शिगेला पोचला होता. इतका जबरदस्त प्रतिसाद मिळण्यासाठी मुळात आवाहन कसं केलं गेलं असेल, याचा अंदाज येण्यासाठी पुढच्या वर्षीचा म्हणजे ६ सप्टेंबर १९२९चा बहिष्कृत भारत पाक्षिकाचा अंक उपलब्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपादक असणार्या या अंकात लोकहितवादी संघा`ने सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्याचं केलेलं आवाहन प्रसिद्ध झालंय. त्यात हा उत्सव का करावा, याची वैचारिक भूमिका तर सांगितली आहेच. पण आदल्या वर्षी म्हणजे १९२८ साली हा नवरात्रौत्सव कसा पार पडला हेदेखील सांगितलं आहे. ते वाचून इतरांना हा उत्सव कसा साजरा करावा हे कळावं, अशी यामागची भूमिका आहे. `मुंबई लोकहितवादी संघाची स्वाभिमानी ब्राह्मणेतरांना विनंती या शीर्षकाखाली असणार्या या स्फुटाची सुरुवात वैचारिक भूमिकेने होते. या आवाहनाखाली संस्थेतल्या सगळ्या प्रमुख पदाधिकार्यांची नावं असली, तरी हे टिपण प्रबोधनकारांनी लिहिलंय हे वेगळं सांगावं लागत नाही, इतकी त्याची शैली स्पष्ट आहे. आपण याआधी पाहिलेल्या राष्ट्रीय उत्सवाची चिकित्सा या लेखाच्या तुलनेत या आवाहनात वैचारिक मांडणीचं एक पाऊल पुढे पडलं आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
गणपत्युत्सवाची सार्वजनिक धूम निघाल्या दिवसापासून, हिंदू समाजाची संघटना न होता, जातिभेदाप्रमाणेच अनेक भेदांनी हा समाज आरपार पोखरला गेला. या उत्सवाचा उपयोग सर्वत्र ब्राह्मणी वर्चस्व कायम टिकविण्याकडेच असल्यामुळे, ठिकठिकाणी तंटेबखेडे व मारामार्या होऊन, आज सार्वजनिक गणेशोत्सवाला भाद्रपती शिमग्याचे कायम स्वरूप आलेले आहे. गणपत्युत्सवांत कसलेहि चैतन्य नाही. विशेषतः ब्राह्मणेतरांना आकर्षक किंवा हिंदू संघटनेला पोषक असे कसलेच आकर्षण त्यांत नाही. शिवाय, हा उत्सव फक्त महाराष्ट्रातल्या कांहीं थोड्या ठराविक जातींचे आपापल्या घरी करीत असल्यामुळे, तो ‘राष्ट्रीय’ उत्सव होणे शक्य नाही अलिकडे कांहीं वर्षे गणेशोत्सवाच्या नांवाखाली ब्राह्मणेतर चळवळ हाणून पाडण्याचा, ब्राह्मणेतर पुढार्यांची बदनामी करण्याचा आणि हिंदूसंघटनेच्या सबबीवर ब्राह्मणी वर्चस्वाचे थेर माजविण्याचा धूमधडाका सर्वत्र चाललेला असतो. बिचार्या अस्पृश्यांची तर सर्रास पायमल्ली केली जाते. अशा या उत्सवाला स्वाभिमानी ब्राह्मणेतरांनी गांवोगांव कायमचा बहिष्कार घालून आपल्या खर्याखुर्या प्राचीन श्रीशिव-भवानी नवरात्र महोत्सवाचा जीर्णोद्धार करावा. याचा धडा लोकहितवादी संघाने गुदस्त साली दादर येथे घालून दिलाच आहे. दादरच्या प्रोत्साहनाने महाराष्ट्रांत गुदस्त साली दादर गावीं नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे.
मागच्या वर्षी दादरमध्ये नवरात्रौत्सव साजरा झालेला असून त्यानुसार महाराष्ट्रभर हा सोहळा साजरा करावा अशा या आवाहनात प्रबोधनकार पुढे लिहितात, श्रीभवानीचा नवरात्र महोत्सव फार प्राचीन काळापासून आसेतुहिमाचल सर्व हिंदुस्थानांत साजरा होत असतो. महाराष्ट्रांत गांवोगांवी या उत्सवाला ग्रांट्स (वर्षासनें) चालू आहेत. बंगालमध्ये तर कालीचे नवरात्र दसर्यापर्यंत दहा दिवस धूमधडाक्याने साजरे केले जातात. गुजरात, मध्य व उत्तर हिंदुस्थान, दक्षिणेकडे मद्रास इलाखा वगैरे सर्व हिंदुस्थानभर साजरा होणारा नवरात्र महोत्सव हाच खरा राष्ट्रीय उत्सव आहे. शिवाजीने श्रीभवानीचीच आराधना करून, तिच्या शक्तीच्या साधनांनीच स्वराज्य स्थापन केले. श्रीमंत रामकृष्ण परमहंसांनी काली मातेचीच उपासना केली आणि विवेकानंदांनी तिचाच शक्तीचा सांप्रदाय वाढविला. असला हा ‘शक्ती’चा राष्ट्रीय उत्सव शिवाजीच्या अभिमानी ब्राह्मणेतरांनी दृष्टीआड करून, गणेशोत्सवाच्या शुद्ध दंगलींत निष्कारण भाग घेऊन आपल्या पैशाची आणि प्रतिष्ठेची भटांकडून पायमल्ली करून घ्यावी हा केवळ आत्मघात आहे. स्वाभिमानी ब्राह्मणेतरांनो, गणेशोत्सवावर बहिष्कार घाला आणि गांवोगांव श्रीशिवभवानी नवरात्र महोत्सव साजरा करा. ब्राह्मणांचा गणपती आणि ब्राह्मणेतरांची भवानी असा ठळक भेद केला, तर निदान भाद्रपदी शिमग्याचे गलिच्छ रूप बदलून, दोघांच्याही उत्सवाचे स्वातंत्र्य निर्मळ राहील. कोणी कोणाच्या स्वातंत्र्याच्या किंवा हौशीच्या आड येऊ नये, इतकें जरी साध्य साधले तरी सद्यःस्थितीत पुष्कळ झाले. परंतु गणेशोत्सवांत दरसाल होणारी ब्राह्मणेतरांची आणि अस्पृश्यांची मानखंडना आणि भटी वर्चस्वापुढे मान वाकविण्याची बळजबरी, ब्राह्मणेतरांनी यापुढे क्षणमात्र चालू देतां कामा नये. ज्या ब्राह्मणेतरांचा स्वाभिमानच ठार मेलेला असेल, त्यांनी खुशाल गणेशोत्सवांत भूमिका घ्यावी. असल्या विवेकभ्रष्टांना लोकहितवादी संघाचा काहींच सवाल नाही.
हे अत्यंत स्पष्ट शब्दांत केलेलं आवाहन वाचल्यावर प्रबोधनकार आणि त्यांच्या सहकार्यांनी १९२८च्या नवरात्रौत्सवाला मुंबईतल्या बहुजन समाजाने इतका उत्स्फूर्त प्रतिसाद का दिला, याचं उत्तर सापडू शकतं. त्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद टिपेला पोचला होता. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ब्राह्मणी कंपू देशभक्तीचं अधिष्ठानही गमावून बसला होता. त्यांच्या सर्व कृतींमध्ये फक्त त्यांच्या जातीच्या अहंकाराचा आणि वर्चस्वाचा दर्प दिसत होता. गणेशोत्सवाचं स्वरूप खरंच सर्वसमावेशक असतं, तर सार्वजनिक नवरात्रौत्सवाचं आवाहन इतकं यशस्वी झालंच नसतं. बहुजनांना त्यांचा स्वतःचा सार्वजनिक उत्सव हवा होता, तो त्यांना प्रबोधनकारांनी दिला. त्यांनी पहिल्या वर्षीच्या नवरात्रौत्सवाचं अत्यंत फर्मास वर्णन माझी जीवनगाथमध्ये सविस्तर केलंय.
अश्विन शुद्ध प्रतिपदेचा म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस. दादरच्या काळ्या मैदानातला भव्य मंडप सजला होता. पहाटेच सनई चौघडा वाजू लागला. उदबत्त्यांचा घमघमाट सर्वत्र दरवळत होता. जणू काही इतके दिवस वाटच पाहिली जात आहे, अशा उत्साहाने लहानमोठे स्त्रीपुरुष मुलामुलींची गर्दी जमू लागली. सकाळीच लोकहितवादी संघाचे सगळे पदाधिकारी हजर झाले. संघाचे अध्यक्ष असणार्या रावबहाद्दूर बोलेंनी अध्यक्ष या नात्याने येणार्यांचं स्वागत सुरू केलं. सर्वात पहिला कार्यक्रम होता तो ध्वजवंदनाचा. छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा उभारण्याचा मान त्यावेळच्या अस्पृश्य समाजातील आमदार सोळंकी यांना देण्यात आला होता. टाळ्यांच्या आणि सनई चौघड्याच्या कडकडाटात भगवा ध्वज उंच फडफडू लागला. तो सहा फूट लांब आणि पाच फूट रुंद होता. जवळपास पन्नास फूट उंच स्तंभावर तो फडकत होता. त्यामुळे तो एल्फिन्स्टन रोडच्या पुलावरूनही सहज दिसायचा.
त्यानंतर घटस्थापनेचा धार्मिक विधी एका महार समाजाच्या दाम्पत्याच्या हस्ते पार पडला. गणेशोत्सवात हे होत नव्हतं, म्हणून तर नवरात्रौत्सवाचं बंड उभं राहिलं होतं. पण ते न विसरता अस्पृश्यांना आघाडीचं स्थान देण्याचं क्रांतिकारकत्व या उत्सवात दिसून आलं. दादरचे प्रसिद्ध विद्वान पालयेशास्त्री यांनी यथाविधी यथाशास्त्र मंत्रोच्चारांनी साजरा केला. पालयेशास्त्री प्रबोधनकारांचे स्नेही होते. पुढेही हा स्नेह सुरू राहिला. मातोश्री रमाबाईंच्या निधनानंतर सर्व प्रकारच्या विधींना फाटा देऊन पालयेशास्त्रींचंच प्रवचन ठेवलं होतं आणि मातोश्री बंगल्याच्या भूमिपूजनाचं पौरोहित्यही त्यांच्याकडेच होतं, असे संदर्भ सापडतात.
या नवरात्रौत्सवातली प्रत्येक गोष्ट वेगळी होती. प्रबोधनमध्ये नियमित कविता लिहिणारे कवी वसंत विहार यांनी जगदंबेची नवीन आरती लिहिली होती. त्याच्या छापील प्रती उपस्थितांना वाटण्यात आल्या. त्याचं गायन सर्व उपस्थितांनी केलं. रावबहाद्दूर बोलेंच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर सबंध दिवसभर दर्शनासाठी लोकांची गर्दी सुरू राहिली. एक नवा उत्सव सुरू झाला होता. त्यात महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. प्रबोधनकार त्यांच्या शैलीत लिहितात, मुंबईची महालक्ष्मीच दादरला अवतरली म्हणा ना, दररोज लोकांचा उत्साह दुथडीवजा काय शतथडी वाहू लागला. स्पृश्यास्पृश्य भेद कोणाच्या खिजगणतीतही उरला नाही. एकजात मर्हाठी माणूस एका जगदंबेचे कन्यापुत्र नात्याने सरमिसळ वावरू लागला. एकमेकां भेटू लागला. जगदंबेच्या दर्शनासाठी येणार्या भक्तजनांनी दोन्ही रेल्वेच्या गाड्या भरगच्च भरून येऊ लागल्या. देवीसमोर ठेवलेल्या पेटीत देणग्यांच्या राशी पडू लागल्या.
बहिष्कृत भारतातल्या आवाहनात याचं वर्णन अधिक तपशीलात आलं आहे – नवरात्र महोत्सव अब्राह्मण अस्पृश्यांना खुला. उत्सवांत सर्व हिंदूंनी अभेदाने भाग घेतला. स्पृश्य-अस्पृश्य भेद तीळमात्र पाळण्यांत आला नाही. शेकडों अस्पृश्यांनी स्वतः घटाचे पूजन व आरत्या केल्या. त्या आरत्यांचा अखिल हिंदुस्थानांने प्रमाणपूर्वक सत्कार केला. पंचमीच्या दिवशी दोन प्रहरी स्त्रियांच्या हळदी-कुंकवाचा समारंभ झाला. ३००-४०० स्पृश्यास्पृश्य भगिनी हजर राहिल्या. व्याख्यानें झाली. हळद, कुंकू, प्रसाद व फुले सर्वांनी एकमेकींस दिली.
पण हे काही सहज घडलं नव्हतं. ते प्रबोधनकारांनी घडवून आणलं होतं. दिवस ललितापंचमीचा होता. सकाळी ८ वाजताच हळदीकुंकवाचा समारंभ सुरू झाला. त्यासाठी दैवज्ञ सोनार समाजातल्या एका चौदा वर्षांच्या मुलीचं कीर्तन ठेवलं होतं. लहान मोठ्या मानल्या जाणार्या जातींच्या महिला एकत्र आल्या होत्या. मंडप भरगच्च भरला होता. त्यात सहभाग घेण्यासाठी प्रबोधनकारांनी महार समाजातल्या १०-१५ महिलांना मुद्दामहून घरी बोलवलं होतं. त्यांच्या पत्नीने, रमाबाईंनी या दलित महिलांचे कपडे नीट केले, केस नीट विंचरले आणि त्यांना मंडपातल्या गर्दीत सरमिसळ करून बसवलं. तिथे संत दामाजींच्या आख्यानाचं कीर्तन रंगलं होतं. कीर्तन करणारी मुलगी उत्तम गात होती. तिचा एक भाऊ तबल्यावर तर दुसरा पेटीवर होता. सगळे दोन तास तिच्या कीर्तनात सगळे दंग झाले होते. स्वयंसेविका मुलींनी हळदीकुंकू, शेवंतीची फुलं आणि प्रसाद वाटला. साक्षात पांडुरंग दामाजींसाठी महार झाल्याची कथा ऐकता ऐकता त्या महिला कळत नकळत समतेच्या वाटेनं एक पाऊल पुढे टाकत होत्या.
कीर्तन संपलं, तसं प्रबोधनकार आभार मानण्यासाठी मंचावर आले. प्रबोधनकारांना इतका आनंद झाला होता की पट्टीचे वक्ते असूनही त्यांच्या तोंडून क्षणभर शब्दच फुटले नाहीत. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, माता, भगिनी, मुलींनो, नवरात्र महोत्सवाची कल्पना सहज मला स्फुरली आणि आज तर येथे श्रीजगदंबेने मला ज्या विराट स्वरूपात या संमेलनाने दर्शन दिले, त्याचे वर्णन मी करूच शकत नाही. आज येथे अनेक अस्पृश्य भगिनीही आलेल्या आहेत. गंगा यमुना एकत्र होऊन या समारंभाला प्रत्यक्ष पवित्र क्षेत्राचे माहात्म्य आलेले दिसत आहे. आज जातपात वरिष्ठ कनिष्ठ सारे भेद लयाला गेले. जगदंबेच्या या दरबाराने महाराष्ट्राचा मर्हाठा आज खडबडून जागा केला आहे. या जागरणाचा प्रसाद तुम्ही माता भगिनी मुलींनी घरोघर पोहचवावा, अशी मी आपली याचना करतो.
प्रबोधनकारांच्या शिवभवानी नवरात्रौत्सवाने काय घडवलं? तो इतर उत्सवांसारखा फक्त एक इवेंट नव्हता. जातीपातीत, जुन्या रूढींमध्ये अडकलेल्या माणसांना नवा विचार करायला लावणारा हा उत्सव खर्या अर्थाने सार्वजनिक होता.

