
अमित शहा
शिंदेसेना हीच शिवसेना
मीच देतो सर्टिफिकेट
सुप्रीम मारू फाट्यावरती
मीच पंच घेतो विकेट

सगळे पक्ष फोडून झाले
ठाकरेसेना आहे टणक
शिंद्यांसारखे नाही सगळे
पाहून डोक्यात जाते सणक
मुळासकट उपटून टाकू
ठाकरेसेनेचे हे रोपटे
मुळे रुजलीत खोलवर त्याची
हात माझे झाले चपटे
एकनाथ शिंदे
आनंद दिघे असते तर
माझी हिंमत झाली नसती
केला असता खोपकर माझा
आता नव्हती कसलीच भीती

त्यांच्या हयातीत नव्हता कधीही
फितुरीला तर मुळीच थारा
खाल्ल्या मिठाला जागलो नाही
कानात शिरला स्वार्थी वारा
सात जन्म पुरेल एवढे
सहकार्यांनी खाऊन घ्यावे
मोदी-शहा हे दैवत आपुले
त्यांच्या चरणी नाक घासावे
देवेंद्र फडणवीस
मोदी-शहांच्या चरणी वाहिल्या
गद्दारांच्या प्रचंड राशी
करून घ्यावे त्यांना पावन
जरी ते असले कितीही दोषी

एकेकाचे ध्यान बघा तुम्ही
चेहर्यावरुनी वाटती भंपक
सत्तेपुरतीच यांची निष्ठा
सत्ता जाता पळतील चंपक
फुग्यासारखा पक्ष फुगविण्या
गरज असते या फितुरांची
नको काळजी मोदी-शहाजी
हवा भरुया सिलेंडराची
नरेंद्र मोदी
इतके देश फिरुन झाले
तरीही हौस भागत नाही
आणखी किती फिरेन याचा
अजून अंदाज लागत नाही

सर्वाधिक देश फिरण्याचाही
करायचा आहे विश्वरेकॉर्ड
एकदा वाटते बस् झाले
जनता पसरत आहे भोकाड
तिकडे गेल्यावरती देतो
मेलोडीचे गोड गोड चॉकलेट
सगळेच कसे सांगू तुम्हाला
हौस फिटते अगदी भरपेट
मतदार
कोण कशाला करील मतदान
उमेदवारांना नाही थारा
निवडून आल्यावरती जातील
सत्तेचा त्या खाण्या वारा

पक्षनिष्ठा नाही राहिली
बेइमानीचे आले पीक
भाजपवाले देती पैका
म्हणती स्वत:ला आधी विक
पाहून यांचे रोज तमाशे
मतदार चोळत बसतो हात
असेच नेते असती तत्पर
घटनेचाही करण्या घात
