• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पत्रास कारण की…

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

marmik by marmik
July 3, 2026
in गावगप्पा, गावची गजाल, विनोदी लेख
0
पत्रास कारण की…

नमितराव संध्याकाळचा चौकातल्या पुतळ्याखाली बाकड्यावर बसलाय. हातात मोबाईल. मोबाईलमधी रील, आणि नमित त्यात मग्न! तोच धावतपळत अर्ध्या तिथं आला.
‘ऐ, ऐक ना नम्या..!’ अर्ध्या ऊर्फ अध्वर्यू आला तसा नमितपुढं उभा ठाकला.
‘अँ..?’ नम्याचं अख्खं लक्ष मोबाईलमधल्या रीलमधी.
‘अरे घोनाटा झाला रे… ऐक ना..!’ अर्ध्या गयावया करायला लागला.
‘तुझं हे नेहमीचंच! तुला घोळ, घोनाटे करायला फार आवडतं. त्यात काय नवीन?’ नम्या नजरही न हलवता अर्ध्याची खेचायला लागला.
‘तू ऐकणार आहे का? फार सिरीयस आहे रे!’ अर्ध्या अगदी विनवणी करायला लागला.
‘सिरीयस? तुझं रे काय फुटलं?’ नम्या विनोदाच्या मूडमधी!
‘नशीब!’ कपाळाला हात लावत अर्ध्या त्याच्या शेजारी बसला.
‘नीट सांग काय झालं ते?’ नम्या मोबाईल खिश्यात सरकवत अर्ध्याकडं चिंतेनं पाहू लागला.
‘अरे, घरच्यांनी एक मुलगी बघितली. मला स्थळ म्हणून…’ अर्ध्या सांगायला लागला.
‘मग लग्न व्हायच्या आधीच तुझं नशीब कसं फुटलं? हे पन्नाशीच्या माणसांचे वाक्य आहेत, येड्या!’ नम्यानं हसून विचारलं.
‘अरे पाहुण्यांनी, जे मध्यस्थ आहेत त्यांनी, खोटी माहिती दिली मुलीकडच्यांना!’ अर्ध्या पुढं सांगायला लागला.
‘काय तू गांजेकस, गुटखेबाज, बेवडा, लफडेबाज आहे असं सांगितलं की काय?’ नम्या अजूनही टवाळी करायच्या मुडमधी.
‘नाही रे! मी जिथं काम करतो तिथं मॅनेजर आहे, मला ऐंशी हजार पगार आहे, स्वतःचे दोन प्लॉट एक फ्लॅट आहे, अन् लवकरच मी कार घेणार आहे, असं सांगितलं.’ अर्ध्यानं खालमानेनं इतिवृत्त ऐकवलं.
‘आयला, हे तर काहीच्या काही भयानक आहे. ते सोड, पण हे तुझं तोंड बघून समोरच्यांना पटणार आहे का? तेव्हा हे शक्य आहे का?’ नम्या त्याला धीर देत बोलला.
‘त्यांना पटलंय. ते बोलणी करायला तयार झालेत.’ अर्ध्यानं आणखी पुढली बातमी दिली.
‘काँग्रॅच्युलेशन! मग लग्न कुठं? जयपूर की बालीला?’ नम्या त्याची फिरकी घेऊ लागला.
‘लोहगडावर ठेवतो. येतो का? एकतर तू मला धक्का दे नाहीतर मी तुला धक्का देतो. साल्या, इथं बुडाखाली जाळ लागलाय. तू कवाचा मजाक करतोय. मित्र न् तू माझा?’ अर्ध्यानं चिडून लटक्या रागाने नम्याच्या पाठीवर चापट मारली.
‘अरे खोटं बोलून का होईना, कुणी तुला पोरगी देतंय, तुझं लग्नं जुळतंय- आणखी काय पाहिजे.’ नम्या तरी टिंगल करायला लागला, पण अर्ध्याचा कोमेजलेला चेहरा बघून त्यानं आवरत घेतलं. ‘मग तुझं काय मत आहे?’ नम्यानं अर्ध्याच्या पाठीवर हात ठेवत विचारलं.
‘त्या मुलीला खरं सांगावं की बाई असं नाहीये काही!’ अर्ध्या तळमळीने बोलला.
‘मग कर की फोन तिला!’ नम्यानं पहिला सल्ला दिला.
‘हां, डायरेक अनोळखी पोरीला कसा फोन करायचा? माझी नाही भौ हिंमत.’ अर्ध्या गळपटला.
‘ती दिसायला कशी आहे? काय करते? कुठं रहाते?’ नम्या माहिती घ्यायला लागला.
‘सुंदर दिसते रे फार ती! फोटोच बघितलेत. पण साल्या… तू गावभर करशील!’ एकाएक अर्ध्याचा मूड पालटला.
‘तुला मदत करतोय, ठोंब्या! एकदम तुला इंचू डसला का?’ नम्यानं त्याला उत्तर दिलं. आणि पुन्हा मूळ मुद्द्यावर येत तो बोलायला लागला. ‘म्हणजे ती डायरेक नाही म्हणायला नकोय. फक्त तिला खरं कळलं पाहिजे. असंच ना?’
‘खरं कळल्यावर ती हो म्हणेल? इथं महिन्याला एक गड्डी खात्यात येते. घराचं छत नीट पाऊस आला तर धडधड करत गळतं. भिंतींना ओल येते. आज ताटात पडणार्‍या भाकरीला भाजायला जे जळण पाहिजे त्याला रोज माझ्याच धपल्या करून दिल्या तरी कमी पडतील अशी परिस्थिती! अश्यात ती मला स्वीकारेल कशी?’ अर्ध्याचा सवाल.
‘ती काय करते पण अशी? नावबिव माहीत आहे का तिचं?’ नम्या पुन्हा खोद घालायला लागला.
‘नाव नाही बघितलं. पण स का काय वरून आहे ब्वॉ! आणि सिरिअल कोडर आहे ती! कुठल्या कंपनीत! पगार दणकेबाज आहे. बाकी बघितलं नाही.’ अर्ध्या आठवंल तशी माहिती देऊ लागला.
‘नाही माहीत म्हणतो अन् एक एक गोष्ट सांगतो. हे सिरिअल कोडर म्हणजे काय असतं? काही खास प्रोफेशन एवढ्यात जल्मलं आहे का? ते मरू दे! तू ठरव. तिनं नाही म्हंटलं तर चालेल का?’ नम्यानं अर्ध्याला निर्वाणीचं विचारलं.
‘चालेल की! मी थोडाच सिरिअल चीटर आहे का? खोटं रेटून न्यायला.’ अर्ध्यानं ताबडतोब संमती दिली.
‘मग काय करतो? फोन मेसेज
व्हॉटसअप? की मेसेंजरवर कळवतो?’ नम्यानं पुढली स्टेप विचारली.
‘मेल करू?’ अर्ध्यानं भलतंच विचारलं!
‘माझ्या अनुभवावरून सांगतो, मुली मेल बघत नाहीत. ऑफिसचे बघत नाहीत. इतर काय बघणारेत?’ नम्यानं त्याचं दुःख मांडलं.
‘मग पत्र लिहू का? मी दोन कागद सोबत घेऊन आलोय. तू करशील का मदत?’ अर्ध्या तयारीनंच आलाय बहुतेक.
‘तू ठरवूनच आलाय, मग माझे कसले सल्ले घेतोय. लिही की मग! पण देशील कसं तिला?’ नम्या तटस्थपणे बघायला लागला.
‘ते सगळं सॉर्ट आऊट केलंय मी! तू फक्त मदत कर,’ अर्ध्याच्या बोलण्यावर नम्याला नवल वाटतंय. पण प्रेमात येतोच की
कॉन्फिडन्स?
‘मी काही पत्र लिहिली नाही ब्वॉ कुणाला! हां ते मराठीचे सर होते ना? त्यांनी लिहिली होती ती काही वाचलीय, एखादा फोटो पण चोरून घेयेल असंल. थांब बघतो,’ म्हणत नम्या मोबाईलमधी बघायला लागला.
‘सुरुवात कशी करू?’ अर्ध्या पेन परजून कागद धरून बसला.
‘प्रिय स्वाती…’ नम्या मोबाईलमधी बघत बडबडायला लागला.
‘अरे तिचं नाव असं काकुबाईसारखं नसंल रे!’ अर्ध्यानं पहिल्याच शब्दावर आक्षेप घेतला.
‘हे त्या मराठीच्या सरांचं लिहिलेलं आहे रे! बहुतेक मॅडमचं नाव असंल ते! तू तुझं नाव टाक की!’ नम्यानं समजावलं.
‘प्रिय स्वाती. हं बोल पुढं!’ अर्ध्या पुन्हा पेन सावरत बोलला.
‘तू मला वेड्यात काढणार असशील तर ते चॅटजीपीटी वापर. मी निघतो.’ नम्या चिडला.
‘हां, मला काय बारीक फॉन्टमधला शोकप्रस्ताव पाठवायचा आहे का? नाव माझं मी बदलून घेईल, तू पुढलं वाच!’ अर्ध्यानं नम्याचा रुसवा काढला.
‘यात बरंच लिहिलंय रे! काही मुद्दे कामाचे नाहीत तुझ्या! पार कविता-बिविता टाकल्यात त्यांनी!’ नम्या मोबाईलवर नजर फिरवत बोलला.
‘हां, त्यांना होकार पाहिजे होता. नकारासाठी लिहिणारा मी पहिला असेल. मग काय लिहावं रे मी?’ अर्ध्या विचारात पडला.
‘प्रिय स्वाती,
मी अमुकधमुक, इथं तिथं राहतो. आपल्या सग्यासोयर्‍यांनी आपले लग्न जुळवायचे प्रयत्न चालवले आहेत. ते तुला माहीत असेलच. अशी सुरुवात चालेल?’ नम्यानं काही वाक्य तयार केली, ती ऐकवली.
‘चालेल, पुढलं सुचव!’ अर्ध्या अधीरतेने बोलला.
‘मधी काय लिहावं हे कळेना रे! स्वाती, तू कशी आहेस, तू काय करते? असं लिहावं की सरळ सांगावं. तुला सांगितलं गेलं ते सगळं खोटंय. बाई तू फक्त नकार कळव. नाहीतर मी जसा आहे तसा स्वीकार…’ नम्यानं भरवश्याच्या म्हशीला टोणगा असल्यासारखं केलं. सगळा विरस.
‘बकवास झालं ते! त्यापेक्षा असं लिहू का?
प्रिय स्वाती,
मी तुझा फोटो बघितला, तू खूप सुंदर दिसते. इतकी की तुला मिळवावं ही इच्छा अनावर व्हावी. पण मी माझ्या परिस्थितीचा विसर पडू देऊ शकत नाही. तुला जे सांगितलं गेलंय, पैपाहुण्यांनी. त्यात खोट आहे. मी खरोखर गरीब घरातला आहे. काँट्रॅक्ट बेसवर त्याच कंपनीत जातो, जिथं तुला
मॅनेजर सांगितलं गेलंय. पगारही वाढवून सांगितला गेलाय. ह्याही पावसाळ्यात मला ओलावणार्‍या भिंतीचं टेन्शन आहे. केवळ तू हवी म्हणून मी खोटं बोलू शकत नाही. मी साधा आहे. खरा आहे. आणि तसंच रहायला मला आवडेल.
तू, तुझं नाव काही क्षण माझ्यासोबत जोडलं जाणं, माझं सौभाग्य होतं. पण ते खोट्याच्या आधारावर नको. इतकीच माझी अपेक्षा आहे. मी विग लावत नाही. मी अडखळत नाही. तू नाही म्हणाली तर मी पिसाट होऊन तुझ्या मागे अ‍ॅसिड घेऊन पळणार नाही वा कोयते घेऊन येणार नाही. तुलाही मी पसंत नसेल तर तू थेट नाही म्हणून सांगावं हीच अपेक्षा राहील. कारण तुझ्यावर दबाव आणावा एवढा माझा बाप गर्भश्रीमंत नाही आणि मीही हट्टी नाही. मी तुझ्या निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याचा आदर करीन. फक्त आजकाल आपली पिढी नाही म्हणायला कचरतेय. ते खरंच एवढं अवघड आहे का? की काही जीव त्यासाठी पणाला लावावे लागतील? याचा विचार करून तू उत्तर द्यावं ही गरज आहे. बोलणं ही गरज आहे.
माझी समोरासमोर बोलण्याची हिंमत कदाचित नसेलही. पण माझी मतं स्पष्ट आहेत. तशी तुझीही असतील, आणि असावीत अशी अपेक्षा ठेवतो. आणि तू तुझा निर्णय लवकर कळवावा, ही इच्छा व्यक्त करतो.
चालेल ना रे असं?’ अर्ध्यानं नम्याकडं बघत विचारलं.
‘लोहगडावर चाल तिथं सांगतो.’ नम्यानं टिंगल केली तसा अर्ध्या त्याच्यामागं पळायला लागला.

Previous Post

एम्बापे : नवा महानायक!

Next Post

‘पोटार्थी’ पत्रकाराची खाद्ययात्रा!

Next Post
‘पोटार्थी’ पत्रकाराची खाद्ययात्रा!

‘पोटार्थी’ पत्रकाराची खाद्ययात्रा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.