एकीकडे क्रिस्टीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांच्या युगाचा अस्त होत असताना किलियन एम्बापे हा ‘नवा फुटबॉल महानायक’ म्हणून उदयास आला आहे. २०१८मधील जगज्जेतेपद असो वा २०२२मधील उपविजेतेपद असो- तो प्रâान्सच्या यशाचा शिल्पकार आहे. या धडाकेबाज फुटबॉलपटूच्या कारकीर्दीचा आढावा.
तोसहा वर्षांचा असताना अन्य मुलांप्रमाणेच त्याचाही क्रिस्टीयानो रोनाल्डो हा आवडता फुटबॉलपटू होता. पुढील काही वर्षांत त्याच्या घराच्या भिंती रोनाल्डोच्या छायाचित्रांनी व्यापू लागल्या. रोनाल्डो आवडणार्या काही मुलांचे रोनाल्डोला भेटण्याचे किंवा त्याची स्वाक्षरी घेण्याचे स्वप्न पूर्ण होतेही; पण किलियन एम्बापे त्याला फक्त भेटला नाही, तर त्याच्याविरुद्ध खेळण्याचेही त्याचे स्वप्न पूर्ण झाले. हे यश मिळवण्याइतके कर्तृत्व त्याने कमावले. १९ वर्षांचा असताना जागतिक दर्जाच्या ‘टाइम’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत एम्बापेने फुटबॉलमधील प्रगतीसाठी किशोरवयात केलेल्या त्यागाबाबत भाष्य केले होते. ‘किशोरवयात इतरांप्रमाणे मित्रांसोबत बाहेर फिरणे, आनंद साजरा करणे, असे क्षण माझ्या वाट्याला आले नाहीत, कारण माझे पूर्ण लक्ष फुटबॉलमधील विकासावर होते. पण प्रसिद्धी मिळाल्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले,’ असे तो म्हणाला होता.
एम्बापे हा पॅरिसच्या मध्यवर्ती भागापासून ईशान्येकडे सुमारे ११ किमी अंतरावर स्थित बाँडी ह्या गजबजलेल्या उपनगरात जन्मला. हा भाग मोठ्या प्रमाणावर कामगार आणि कृष्णवर्णीय समुदायासाठी ओळखला जाणारा. सामाजिक संघर्ष, दंगली आणि गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर सदैव चर्चेतला. अशा आव्हानात्मक वातावरणातच त्याचे बालपण गेले. त्याच्या कुटुंबाचे मूळ आफ्रिका खंडातले. वडील विल्फ्रेड हे कॅमेरूनचे, तर आई फ्रैजा लामारी ही अल्जेरियाची. वडील फुटबॉल प्रशिक्षक आणि युवकांच्या विकासासाठी धडपडणारे, तर आई माजी हँडबॉलपटू. वयाच्या सहाव्या वर्षीच एम्बापेला फुटबॉलची आवड जडली ती वडिलांमुळेच. असामान्य वेग आणि तंत्र ही गुणवत्ता त्याच्यात उत्तमपणे भिनली होती. त्यामुळे कॅरीफाँटेन या फ्रान्समधील नावाजलेल्या फुटबॉल अकादमीत तो दाखल झाला. निकोलस अॅनेल्का,
ऑलिव्हर गिरूड, ब्लेस मॅट्युडी आणि थिएरी हेन्री हे याच अकादमीत घडलेले. इथे त्याच्यावर पैलू पाडण्यात आले आणि त्याचा खेळ आणखी विकसित झाला. मग युरोपातील मातब्बर क्लबपर्यंत त्याचा नावलौकिक पसरला.
फ्रान्ससाठी युगप्रवर्तक
फ्रान्स हा १९३०मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभाग घेतलेल्या चार युरोपियन राष्ट्रांपैकी एक देश. पण पहिली फ्रेंच फुटबॉल क्रांती होण्यासाठी म्हणजेच पहिल्या वहिल्या विश्वविजेतेपदासाठी त्यांना १२ जुलै १९९८पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर सहा महिन्यांनी २० डिसेंबर १९९८ या दिवशी किलियन एम्बापेचा जन्म झाला. २०१७मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पण पुढच्या विजेतेपदासाठी त्यांना फार प्रतीक्षा करावी लागली नाही. बरोब्बर दोन दशकांनी म्हणजे २०१८मध्ये फ्रान्सच्या विश्वचषक मोहिमेत हा शिलेदार सामील झाला. पेरूविरुद्ध खेळताना विश्वचषकात गोल नोंदवणारा तो देशातला सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला. मग एक सामन्यात दोन गोल साकारणारा तो जगातला दुसरा युवा फुटबॉलपटू ठरला. या यादीत फुटबॉलसम्राट पेले (१९५८) पहिला होता. मग क्रोएशियाला ४-२ असे हरवून फ्रान्सने दुसर्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. ही दुसरी फ्रेंच फुटबॉल क्रांती. अंतिम सामन्यातील चार गोलपैकी एक गोल १९ वर्षीय एम्बापेच्या खात्यावरही होता. हे युवा गोलकर्तृत्व दाखवणाराही तो पेलेनंतरचा दुसराच. त्याच्या याच कर्तबगारीमुळे ‘फिफा’चा स्पर्धेतील सर्वोत्तम युवा फुटबॉलपटूचा पुरस्कार त्याने पटकावला. एकंदर ४ गोल या स्पर्धेत त्याने झळकावले. त्याला वर्षातील सर्वोत्तम फ्रेंचफुटबॉलपटूच्या पुरस्कारानेही त्याला गौरवण्यात आले. जागतिक व्यासपीठावर त्याने सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी हे यश पुरेसे होते.
मग आले २०२२. यावेळी फ्रान्स पुन्हा रुबाबात अंतिम फेरीत दाखल झाला. दुर्दैवाने यावेळी पराक्रमी लिओनेल मेसीने फ्रेंच स्वप्नपूर्ती पुन्हा होऊ दिली नाही. हा सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. फ्रान्सचे हे तिन्ही गोल एम्बापेकडून साकारलेले होते. विश्वचषक अंतिम सामन्यातील हा नवा विक्रमही त्याने नावावर केला. पुढे पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला ४-२ असे नामोहरम केले. या स्पर्धेत सर्वाधिक ८ गोल (आणि २ गोल सहाय्य) एम्बापेचे होते. त्यामुळेच ‘गोल्डन बूट’ आणि ‘सिल्व्हर बॉल’ पुरस्कारांवर त्याने नाव कोरले.
यंदा तिसर्यांदा फ्रान्सला अंतिम फेरीत नेण्याच्या निर्धाराने तो उतरलाय. गटसाखळीत ४ गोल त्याच्या खात्यावर जमाही झालेत. याशिवाय २०२१मध्ये फ्रान्सला त्याने ‘युएफा’ नेशन्स लीगचे जेतेपदही जिंकून दिले. यावेळीही अंतिम सामन्यात फ्रान्सने स्पेनला २-१ असे पराभूत केले. या सामन्यातील ८०व्या मिनिटाला एम्बापेने साकारलेला गोलच निर्णायक ठरला. गतवर्षी स्पेनने त्या पराभवाचा वचपा काढताना फ्रान्सवर ५-४ अशी मात केली. उपविजेत्या फ्रान्सचे या सामन्यात एम्बापेनेच गोलखाते उघडले होते.’

हे झाले, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधले कर्तृत्व. क्लब फुटबॉलमध्ये २०१५मध्ये मोनॅकोकडून पदार्पण करीत एम्बापेने सर्वात युवा खेळाडू आणि २०१६मध्ये लीग-१ विजेता हा बहुमान मिळवला. २०१७मध्ये तो पॅरिस सेंट-जर्मेनला हस्तांतरित झाला. त्यासाठी १८ कोटी पौंडचा व्यवहार झाला. जगातील दुसर्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरल्यामुळे स्वाभाविकपणे एम्बापेबाबत सर्वांची उत्सुकता वाढली. आपल्या दुसर्याच हंगामात त्याने २९ सामन्यांत ३३ गोलची नोंद केली. लीग-१मध्ये त्याने पहिल्या सहा हंगामांत सर्वाधिक गोल केले. यापैकी पहिल्या पाच हंगामांत तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला. एम्बापेच्या पराक्रमामुळे पॅरिस सेंट-जर्मेनने सहा लीग-१ विजेतेपदे पटकावली. २०२४मध्ये तो रेयाल माद्रिद संघात सहभागी झाला आणि स्पॅनिश फुटबॉलमध्ये नव्या युगाला प्रारंभ झाला. २०२५मध्ये युरोपियन गोल्डन शूज पुरस्कार प्राप्त केला.
मेसी-रोनाल्डोपेक्षा सरस
एकीकडे मेसी आणि रोनाल्डो यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण, ही सर्वकालिक सर्वोत्तम फुटबॉलपटूची (गोट- ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) चुरस रंगात आली आहे. पण या दोन महानायकांची कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करते आहे. त्याच काळात २७ वर्षांचा एम्बापे ज्या वेगाने वाटचाल करतो आहे, ते पाहता तो आपले मोठेपण सिद्ध करील ही खात्री वाटते. ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक १९ गोल (२९ सामने) मेसीच्या खात्यावर आहेत, तर रोनाल्डोने १५ गोल (१९ सामने) नोंदवले आहेत. हे दोघेही कारकीर्दीतील सहावा विश्वचषक खेळत आहेत. पण तिसर्या विश्वचषकात एकूण १७ सामने खेळणारा एम्बापे १६ गोलसह या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. मेसी आणि रोनाल्डो यांची प्रति सामन्यातील गोलसरासरी अनुक्रमे ०.६६ आणि ०.७९ अशी आहे. पण एम्बापेची या दोघांपेक्षा सरस, ०.९४ इतकी आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल झळकावणार्यांच्या यादीत रोनाल्डो १४५ गोल (२३१ सामने) अग्रस्थानावर आहे, तर मेसी १२३ गोल (२०२ सामने) दुसर्या स्थानावर आहे. पण या यादीत ४१व्या स्थानावरील एम्बापेने १०१ सामन्यांत ६० गोल साकारले आहेत. एम्बापे २० वर्षांचा असताना त्याने एकंदर ११६ गोल केले होते; पण विशीत असताना मेसी आणि रोनाल्डोने अनुक्रमे ५१ आणि ३६ गोल केले होते. एम्बापे २७ वर्षे आणि ६ महिन्यांचा असताना त्याने एकूण ४२९ गोल केले आहेत. याच वयाचे असताना मेसीने ४२२ गोल, तर रोनाल्डोने फक्त ३०४ गोल केले होते. एम्बापेचे (१५४) गोल सहाय्यसुद्धा प्रभावी आहे. पण इथे त्या वयाचा असताना मेसीने १६५ गोल सहाय्य केले होते. या तिघांमध्ये सर्वात स्वार्थी ठरतो, तो ११४ गोल सहाय्य करणारा रोनाल्डो. मोनॅको, पॅरिस सेंट-जर्मेन आणि आता रेयाल माद्रिदचे प्रतिनिधित्व करणार्या एम्बापेने क्लब फुटबॉलमध्ये ४८३ सामन्यांत ३७३ गोल केले आहेत. ‘फोर्ब्स’च्या २०२६मधील सर्वाधिक कमाई करणार्या क्रीडापटूंच्या यादीत एम्बापे (९.५ कोटी डॉलर्स) १२व्या क्रमांकावर आहे. या यादीतील तो चौथा फुटबॉलपटू आहे.
तात्पर्य, ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ३२ संघांच्या बाद फेरीतून ४ जुलैपर्यंत १६ संघ निश्चित होतील. मेसी आणि रोनाल्डो यांच्यातले गोलद्वंद्व एकीकडे रंगात येईल. पण एम्बापे ह्या दोघांपेक्षा वरचढ ठरत आघाडी घेतोय. त्यामुळेच तो नवा महानायक म्हणून उदयास येतोय!

