
संजीव साबडे गातो मस्त. पश्चिम महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात उधळपट्टीमुळे गाजलेल्या एका राजकीय नेत्याच्या लग्नावरचा उपहासानं गाजलेला ‘लक्षभोजनाचा पोवाडा’ हे त्याचं अत्यंत लोकप्रिय गाणं. शिवाय, जातींचा पोवाडाही तो खणखणीत आवाजात गातो. त्याचवेळी भगवानदादांची गाणीही तो तितक्याच तडफेनं गातो आणि पूर्वी तर तो गात असताना थेट भगवानदादांच्या स्टाईलनं नाचायचाही! शिवाय, या अक्राळविक्राळ मुंबापुरीत कुठं नेमकं काय खायला मिळेल, तेही त्याला ठाऊक असतं.
मध्यंतरी एकदा उत्तमराव कांबळे यांचा फोन आला. ठाणे-मुलुंड भागात चांगले मासे कुठे मिळतील, म्हणून. मला काय ठाऊक? पण मला ते कोण सांगू शकेल, हे ठाऊक होतं. मी उत्तमरावांना फोन लावला आणि साबडेच्या हातात दिला. त्यानं एक नव्हे तर चार जागा क्षणार्धात सांगितल्या!
साबडेचं अख्खं घराणं हे समाजवादी तसंच ‘राष्ट्र सेवा दल’वालं. गोरेगावात असताना तो कलापथकात स्टेजवरही चमकायचा, यात नवल काहीच नव्हतं. त्याचबरोबर मुंबईत अस्सल जाफरानी १२० बनारस उत्तम पान कुठं मिळेल, अशा जागा तर तो झोपेतही सांगू शकतो. एकदा त्याच्याबरोबर ओला कारनं जुहूवरून जात असताना तो म्हणाला, इथं एक उत्तम पानवाला आहे. तेव्हा तो उत्तर भारतीय ड्रायव्हर म्हणाला : वो पिछे गया. तेव्हा आमचे साबडे साहेब त्याला म्हणाले : वो यादव. मै मिश्रा पानं भंडार की बात कर रहा हूं… आणि खरोखरच पुढच्या काही क्षणात डाव्या बाजूला ‘मिश्रा पान भंडार’ अशी पाटी झळकली!
मुंबईतले असंख्य बार आणि त्यांची खासीयतही त्याला खडा न खडा ठाऊक आहे. अगदी डान्स बारचीही. कुठल्या बारमध्ये ऑर्वेâस्ट्रा आहे आणि कुठं कोण चांगली गाते, तेही तो अनेकदा खाजगी बैठकांत सांगायचा… आता वय उलटून चाललं असलं, तरी आपली या ‘सांस्कृतिक मुंबापुरी’ची माहिती तो अद्ययावत ठेवत असतो.
शिवाय, साबडे पत्रकारही आहे!
‘महाराष्ट्र टाइम्स’ या सुप्रतिष्ठित दैनिकात त्यानं मानाची अनेक पदं भूषवली आणि त्या दैनिकाच्या एकविसाव्या शतकातील भरभराटीत सिंहाचा वाटा उचलला. पण त्याचा मूळ पिंड हा बातमीदाराचाच. मुंबईत असताना महापालिका तसंच मंत्रालय येथील अनेक खणखणीत बातम्या त्यानं दिल्याच. शिवाय, दोन वर्ष राजधानी दिल्लीत काम करीत असतानाही त्यांना आपल्या बातम्यांचा तडाखा सुरूच ठेवला होता. ‘मटा’नंतर त्यानं ‘पुढारी’, ‘सकाळ’ तसंच ‘लोकमत’ या तीन राज्यव्यापी दैनिकांतही महत्त्वाची पदं भूषवली. ‘लोकमत’मधून निवृत्ती घेतल्यानंतरही प्रदीर्घ काळ तो त्या दैनिकात विविध विषयांवर स्फुटलेखन करतच असायचा. जुनी मुंबई तसंच महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण हे त्याचे आवडीचे विषय. पण आज साबडे हे नाव घेतलं की आठवतं ते त्याचं खाद्यजीवन आणि मुंबईच्या दूरदूरच्या खाऊ गल्ल्यांची तो आपल्याला घडवत असलेली सफरच. बरं साबडे आपल्याला कुठं काय मिळतं, तेवढंच सांगून थांबत नाही. तर कधी ओणम तर कधी विशू, पोंगल, उगाडी अशा दक्षिणेकधील सणांची आणि त्यानिमित्तानं बनवल्या जाणार्या विशिष्ट खाद्यपदार्थांची अत्यंत चवदार आणि रसदार पद्धतीनं ओळखही करून देतो.
त्याची बायको आहे दाक्षिणात्य ख्रिश्चन. तिचं नाव मेरी. तो कधी कधी चेष्टेनं तिला ‘ब्लडी मेरी’ असंही म्हणतो. (‘ब्लडी मेरी’ हे व्होडका आणि टोमॅटो ज्यूस यांच्या मिश्रणातून घडवून आणलेलं चविष्ट कॉकटेल आहे, हे खरं तर या पुस्तकाच्या वाचकांना सांगायलाच नको!) तर साबडेचं ख्रिश्चन संस्कृती आणि दाक्षिणात्य सण रीती-रिवाज यांच्याशी त्याच्या खाण्या- आणि हो पिण्याच्याही आवडीमुळे आधीच असलेलं नातं मेरीमुळे अधिकाधिक घट्ट होत गेलं… आणि आपल्यालाही त्याच्या लेखनातून हे सारं खाद्यपदार्थ न खाताही त्यांचा आस्वाद घेतल्याचा आनंद मिळत राहतो.
साबडेचं देशभरातील खाद्यसंस्कृतीवरचं हे आख्यान जवळपास तीन दशकांपूर्वी ‘मटा’त त्यानं सुरू केलेल्या ‘आस्वाद’ सदरातून सुरू झालं. (तोपावेतो दादरच्या सेनाभवनासमोरील ‘आस्वाद’ उपहारगृह सुरू झालेलं नव्हतं, हे नमूद करणं जरुरीचं आहे!) तेव्हा ‘खाऊगल्ल्यां’चं प्रस्थही आजच्या इतकं नव्हतं. त्यामुळे तो अनोख्या चवीच्या हॉटेलांना भेट देऊन आणि भरपेट खाऊन (हो, कारण अनेकदा त्याला त्याच्या या खाद्यभ्रमंतीत मीही साथ दिली आहे!) त्यावर रसाळ पद्धतीनं लिहीत असे. पण या सदराचा आस्वाद खर्या अर्थानं घेतला तो पु. ल. देशपांडे यांनी! क्रॉफर्ड मार्वेâटजवळची उत्तुंग ‘हज हाऊस’ होण्यापूर्वी तिथं एक छोटेखानी वास्तू होती. त्या आवारातील एका साध्याशा टपरीवजा हॉटेलमधील ‘खिमा-पाव’ची कीर्ती मुंबईभर पसरली होती. समोरच्या पोलिस मुख्यालयात पोलिस हजेरी लावण्यापूर्वी हाच नास्ता करत. त्यामुळे त्या हॉटेलचं नावच ‘पोलिस कॅण्टिन’ असं पडून गेलं होतं. साबडेचा ‘पोलिस
कॅण्टिनचा खिमा-पाव’ हा लेख एका रविवारी पुलंनी वाचला आणि योगायोगानं पुलंना भेटायला त्याच रविवारी ‘मटा’चे संपादक गोविंदराव तळवलकर ‘एनसीपीए’मध्ये गेले. ‘तुम्ही हा खिमा-पाव खाल्ला आहे काय, या पुलंच्या प्रश्नावर तळवलकरांचं नकारार्थी उत्तर येताच, हा खिमा-पाव ‘एनसीपीए’त मागवण्यात आला आणि दोघांनीही त्यावर ताव मारला! पुलंनी या खिमा-पावला दणदणीत दाद दिली ती एक पत्र लिहून. ते पत्र अर्थातच ‘मटा’नं प्रसिद्ध केलं! हज बिल्डिंग शेजारच्या इमारतीत ‘ग्रॅण्ट हाऊस’ हे मूळ नाव असलेल्या त्याच हॉटेलात हे पत्र फ्रेम करून लावण्यात आलं आहे आणि आपल्याला ते दिसतं.
यथावकाश साबडेचं हे सदर बंद झालं. पण या ‘पोटार्थी’ पत्रकाराची खाद्ययात्रा मात्र ‘सामना’ दैनिकाच्या व अधूनमधून साप्ताहिक सकाळच्या माध्यमातून आणि पुढे ‘फेसबुक’वरून अविरत सुरूच राहिली. ‘पोटार्थी’ या शब्दाचा मूळ अर्थ केवळ पोटासाठी पाट्या टाकणारा… पण त्या अर्थानं साबडे हा कधीच ‘पोटार्थी’ पत्रकार नव्हता. केवळ ‘उदरभरण’ नव्हे, तर आपण जे जे चवीनं खातो, त्याची माहिती इतरांनाही व्हावी आणि त्यांचंही ‘यज्ञकर्म’ सफल व्हावं, या हेतूनं साबडे यांनी ही यात्रा जवळपास तीन-साडेतीन दशकं सुरू ठेवली आहे. त्यामुळे त्यांचं पोट मात्र चांगलंच वाढलं, यात शंकाच नाही. तरीही मुंबईतल्या खाऊगल्ल्यांच्या चवीची अनुभूती आपल्याला केवळ शब्दांच्या माध्यमातून आणून दिल्याबद्दल आपण साबडेला धन्यवादच द्यायला हवेत.
साबडेची ही खाद्यभ्रमंती अशीच पुढे अविरत सुरू राहो, अशा मन:पूर्वक शुभेच्छा!

