
काही चित्रपट असे असतात की जे केवळ त्या वेळेपुरते मनोरंजन न करता कायम आपल्या सोबत राहतात, आपल्या मनाच्या खिडक्या उघडतात, आपल्याला विचार करायला भाग पाडतात. मुख्य म्हणजे आपल्यातला ‘आत्मकेंद्रीपणा’ जरा बाजूला सारून वास्तवाची ओळख पटवून देतात. मी नेहमीच अशा चित्रपटांच्या शोधात असते. मग अगदी डोळ्यातून गंगा-यमुना जरी वाहिली तरी हरकत नसते. माझ्या अनेक छंदांपैकी आणि अनेक आनंद देणार्या गोष्टींपैकी एक म्हणजे, काही वेगळे, अर्थपूर्ण, हृदयस्पर्शी, मनाला भावणारे, मनाला स्पर्श करणारे आणि मनात घर करून राहणारे चित्रपट पाहणे!
इंग्रजी, इटालियन, फ्रेंच, इराणी, चायनीज अशा अनेक भाषांमधले चित्रपट आम्ही बघत असतो. यामध्ये हिंदी भाषेचा विशेष उल्लेख नाही, कारण सध्या हिंदी सिनेमे म्हणजे प्रेमकथा, मारामारी, हिंसा किंवा काहीतरी भयपट हे समीकरणच बनलं आहे. अर्थात अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील प्रेमकथा, हिंसा, हॉरर मूवी हे विषय असतातच. पण त्याचसोबत त्यांनी नाजूक विषय काळजीपूर्वक हाताळून केलेले सिनेमेही नेहमीच खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मुख्य फरक आहे तो म्हणजे इंग्रजी चित्रपटांची एक स्वतंत्र मांडणी असते. माझ्या निरीक्षणानुसार त्यांच्या चित्रपटांमध्ये विषयाला, जॉनरला धरून चित्रपटनिर्मिती केली जाते आणि त्यालाच पूर्ण महत्त्व दिले जातात. मग त्यात दिग्दर्शक उगीचच मध्ये प्रेमकथा, मारामारी घुसवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळेच तो चित्रपट खूप अर्थपूर्ण बनतो आणि म्हणूनच प्रेक्षकांना चित्रपटातील मुख्य कथेच गांभीर्य लक्षात येतं, ते जाणवतं. पण तेच हिंदी सिनेमात चित्रपटात मसाला टाकून त्याला वेगळीच दिशा दिल्याचे जाणवते. अर्थात या चौकटीत न बसणारे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल चाहता है, डियर जिंदगी, दिल धडकने दो, तारे जमीन पर, स्वदेस’ असे काही अफलातून सिनेमे आहेतच. त्यात वादच नाही.
इंग्रजी सिनेमासृष्टीतील माझे सगळ्यात आवडते चित्रपट सांगायचे तर,’true spirit, the boy in the striped pyjamas, Nonnas, Life is beautiful, pursuit of happyness, the children’s train…’ हे सगळे उत्कृष्ट सिनेमे आहेत. आणि ही माझ्या आवडत्या चित्रपटांची यादी खरंतर कधी संपतच नाही. त्यात नेहमी भर पडत जाते. तसेच नुकतीच या यादीत आणखीन एका चित्रपटाची भर पडली आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘ Wonder. ‘

हा चित्रपट एका अशा मुलाची कथा सांगतो, अशा एका मुलाचं विश्व मांडतो ज्याला Facial deformity म्हणजे चेहर्याचं एका प्रकारचं व्यंग असतं. ह्या चित्रपटात ऑगी नावाच्या मुलाच्या मनातील भावभावना, रोजच्या जीवनात त्याला अनुभवा लागणारा न्यूनगंड, सतत ऐकाव्या लागणार्या लोकांच्या वेगवेगळ्या, विचित्र कमेंट्स आणि प्रतिक्रिया…. शिवाय इतकंच नाही तर आपल्याच वर्गातल्या, आपल्याच वयाच्या मुला-मुलींकडून, वर्गमित्रांकडून होणारी हेटाळणी, थट्टा, रोजची होणारी चिडवा चिडवी, ‘self-doubt’ निर्माण होईल अशी ऐकावी लागणारी अनेक वाक्यं…. या सगळ्याला त्याला सामोरे जावं लागत असतं. ऑगी, त्याची मोठी बहीण आणि आई-बाबा हे त्यांचं कुटुंब. अर्थातच हे सगळे मात्र त्याला नेहमी प्रोत्साहित करणारी, भरभरून प्रेम देणारी आणि ‘You’re not at all ugly Auggie, you are a very good looking boy.’ ह्या आणि अशा बर्याच वाक्यांनी त्याच्या मनाला उभारी देणारी ही त्याची आपली माणसं.
ऑगी हा खूप हुशार आणि निरागस, उत्साही, अगदी गोड, मिश्किल स्वभावाचा आणि प्रत्येकाला मदत करणारा मुलगा असतो. पण त्याच्यातले गुण, त्याचा स्वभाव, ‘तो’ याकडे बाहेरच्या जगाचं लक्षच न राहता, त्याचा चेहरा, त्याचं रूप आणि त्यावरून करता येणारी थट्टामस्करी याकडेच त्याच्या वर्गातील बर्याच जणांच लक्ष असतं. त्यामुळे ऑगीला छळलं जात असतं. फटकन समोरच्याच्या तोंडावर बोलणं हे मुळी त्याच्या स्वभावातच बसत नसल्यामुळे तो कधीकधी या सगळ्या गोष्टी मनातच ठेवतो आणि कधी कधी तो स्वतःकडे संशयाने देखील पाहू लागतो… मात्र तरीही तो त्याचा आत्मविश्वास कायमचा अजिबात डगमगू देत नाही!
समाजात, आपल्या आजूबाजूला, आपल्याकडून सुद्धा कळत-नकळत बरेचदा ऑगीसारख्या मुलांची, गतिमंद मुलांची सतत मस्करी केली जाते. बरं!… जरी नेहमी मस्करी केली जात नसली, तरी अशी मुलं समोर आल्यावर आपले हावभाव बदलू शकतात, आपली देहबोली बदलू शकते आणि ती सहजच लक्षात येते. या सगळ्याचा ऑगीसारख्या मुलांवर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो, ही गोष्ट का सुटते बरं आपल्याकडून?… प्रत्येकच मूल, प्रत्येकच गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल, कणखर मनाचंच असेल ही अपेक्षा करणं देखील चुकीचं नाही का? आणि याची जाणीव होण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून एकदा डोकावून पाहणं खूप गरजेचे आहे. अशा मुलांना गरज ही केवळ सहानुभूतीची मुळीच नसते तर ते किती सुंदर आहेत आणि त्यांच्यात किती क्षमता आहेत याची त्यांना जाणीव करून देण्याची गरज असते. आणि प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.
वंडर हा चित्रपट आपल्याला सगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो.
ऑगीसारख्या मुलांना ते ‘किती बिचारे आहेत..’ हे समजून त्या भावनेने त्यांना पूर्ण मदत करून परावलंबी बनवण्याची गरज नसते, तर त्यांना अखंड प्रोत्साहन, प्रेम आणि मैत्री देण्याची गरज असते, असं हा चित्रपट आपल्याला सांगतो आणि तो
ऑगीप्रमाणेच आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायलाही सांगतो. हा चित्रपट काही प्रसंगात आपल्या डोळ्यात चटकन पाणी आणतो, ऑगीच्या कमाल विनोदबुद्धीमुळे मध्येच हसवतो, कदाचित त्याला त्रास देणार्या त्याच्या वर्गमित्रांना पाहून रागही मनात आणतो, पण शेवटी मात्र पूर्ण चित्रपट बघून झाल्यावर ‘केवळ उत्तम आणि अप्रतिम सिनेमा पाहिल्याचे’ समाधानही देतो!
अॅमॅझॉन प्राइमवर असलेला हा चित्रपट तुम्हा-आम्हा सगळ्यांनी, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने नक्की बघण्यासारखा आहे.
ऑगीसारख्या प्रत्येक सुंदर मुला-मुलीला माझा सलाम आणि भरभरून प्रेम!
(लेखिका नाशिक येथे ११वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे.)

