इलॉन मस्कने तुम्हाला ब्लँक चेक दिला आणि सांगितलं की तुला पाहिजे तो आकडा टाक. ती रक्कम तुझी. तर तुम्ही कितीचा आकडा टाकाल?-वरुण जैन, अहिल्यानगर
मस्कच्या नावाने गरीबाची मस्करी करताय का? की त्याच्या मुलीला आम्ही नादाला लावलंय आणि तिला सोडण्यासाठी तो आम्हाला ब्लँक चेक देणार आहे? आणि समजा, मस्कने आम्हाला चेक दिला, त्याच्यावर आम्ही रक्कम लिहिली, ती रक्कम आम्हाला मिळाली… तर इन्कम टॅक्स आणि ईडीला काय सांगू? पुरावे जळून नष्ट होणारा योगायोग सगळ्यांच्याच नशिबात नसतो.
चोरी हे पाप आहे ना? मग मंदिरात चोरी हे तर महापाप असायला हवं. मंदिरात काम करणारे लोकच मंदिरात चोरी करत असतील तर त्याबद्दल देव त्यांना शिक्षा करणार नाही, याची त्यांना इतकी खात्री कशी वाटत असेल?- वैशाली पाटील, रोहा
तुम्ही आम्ही काहीही झालं तरी आपल्या जन्मदात्याला शिक्षा करतो का? मग देवबाप्पा आपल्या जन्मदात्याला शिक्षा कसा करेल? याचीच खात्री देवाच्या जन्मदात्यांना असेल… जाऊदे बाबा, देवधर्माच्या विषयावर आपण नको बोलू या… देवबाप्पा कान कापेल म्हणून घाबरून राहू या… उगाच नको तो हिशोब मागायला जाऊ नका, तुमचा हिशोब केला जाईल तेव्हा तुम्हाला कळेल…
एका मुलीने तिच्या भावी नवर्याचा निर्घृण खून केला, तर लगेच स्त्रीमुक्तीवादावर आणि स्वतंत्र बाण्याच्या स्त्रियांवर त्याचं खापर फोडणार्या लोकांना देशात दर काही तासांना एक हुंडाबळी, एक बलात्कार, एक स्त्री अत्याचार होत असतो, हे आठवत कसं नाही?-अनुराधा जोशी, ठाणे
कोणालाही प्रश्न विचारण्याची हिंमत नसणार्यांना एवढी तरी हिंमत करू द्या ताई… वडाचे तेल वांग्यावर काढतात बिचारे… बलात्कार, स्त्री अत्याचार अशा विषयांवर बोलल्यावर काय होतं हे त्यांना आठवत असेल… दरवेळी डोकं आपटायला त्यांना नवीन दगड लागत असेल. आज या विषयावर बोलतील, उद्या दुसरा विषय मिळाला की त्या विषयावर बोलतील…
एक लोकप्रतिनिधी पत्रकारांना उघडपणे शिव्या देण्याची, बाँब टाकण्याच्या, जिवे मारण्याच्या धमक्या देतो आणि त्यावर राज्याचे गृहमंत्री कसलीच कारवाई करत नाहीत, याला काय म्हणायचं?-एस. आर. फातर्पेकर, चेंबूर
धमक्या देणारा, गृहमंत्र्यांच्याच जिवावर धमक्या देतो असं समजायचं किंवा आपल्याला धमकी दिली नाही ना, मग जाऊ दे मरू दे… आपल्याला काय करायचंय असं बोलून गप्प बसायचं… समजा धमकी दिल्याप्रमाणे झालं, तर ते ऑपरेशन लायन आहे असं जाहीर होईल की मग आपण त्या ऑपरेशनवर बोलायचं… आता रुटीन झालय ना सगळं? मग सवय करून घ्या की राव…
माझ्या मित्राला मी माझ्या मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदाच घेऊन गेलो, तेव्हा त्याचा मोबाइल तिच्या वायफायला आपोआप कनेक्ट झाला. अनोळखी घरांमध्ये असं कसं होतं? वायफाय कंपनीकडे तक्रार करावी का?-सुजय पेंडसे, पालघर
कदाचित तुमच्या मैत्रिणीने खानावळ सुरू केली असेल… तुमचा मित्र अधून मधून तिकडे जेवायला जात असेल किंवा त्याने तिच्याकडे मेसच लावली असेल…तिने त्याला पासवर्ड दिला असेल… वायफायचा.. नेहमीचंच गिर्हाईक आहे म्हणून… चांगला विचार करा की! प्रत्येक वेळी उलटा विचार करण्याची गरज नाही…
सगळ्याच परीक्षांचे पेपर फुटतायत देशात. आता परीक्षेचे पेपर फुटू नयेत यासाठी काय करायला हवं, याचीच एक परीक्षा घ्यायला हवी का?-प्रवीण भांडारे, चिपळूण
तुम्ही म्हणताय तशा परीक्षेचेही पेपर लीक होणार नाहीत असं तुम्हाला वाटतं? प्रवीणजी, तुम्ही या पेपरफोड्यांना नीट ओळखलेलं दिसत नाही… उगाच त्यांना आव्हान देऊ नका… शहाणे बना, फोडाफोडी करणार्यांच्या वाटेला जाऊ नका, पेपरफुटीबद्दल बोलताना तुमचं घर कधी फुटलं हे तुमचं तुम्हाला कळणार नाही…
एकाच घरात वडील एका पक्षात, मुलगी दुसर्या पक्षात, मुलगा तिसर्या पक्षात… हे लोक ब्रेकफास्टला, जेवताना एकमेकांना भेटल्यावर काय बोलत असतील? राजकीय पक्ष म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या आहेत का यांच्यासाठी?-शैलेंद्र बर्वे, चिंचपोकळी
ते एकमेकांचं तोंडही पाहत नसतील… ‘जाऊ तिथेच खाऊ’ या तत्त्वाशी ते खूप प्रामाणिक असतील. त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेताना तुम्हा आम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि त्यांचे पक्ष कॉर्पोरेट कंपन्या चालवत असताना, ते पक्षाला कॉर्पोरेट कंपनी कशाला समजतील? उलट कॉर्पोरेट कंपन्या डायरेक्ट पक्षाच्या नावाने कशा चालवता येतील याचा अभ्यास करत असतील ते.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

