‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा टीव्हीवरचा कार्यक्रम महाराष्ट्रात अफाट लोकप्रिय आहे. मात्र, या कार्यक्रमाने आता गाशा गुंडाळायला हरकत नाही. कारण आता ‘गद्दारांची हास्यजत्रा’ हा त्याहूनही हास्यस्फोटक कार्यक्रम महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहे. आपण गद्दारी का केली, याची इतकी बोगस आणि बकवास कारणं ही मंडळी सांगत फिरतात की त्यांच्यावर खो खो हसूही येतं आणि त्यांची कीवही येते.
या हास्यजत्रेचे सर्वात ज्येष्ठ कलाकार आहेत ठाण्याचे गद्दारनाथ. सुरत-गुवाहाटी अशी पळापळ करून लपत, छपत मागच्या दाराने सत्तेत आलेले आणि दिल्लीच्या बोळ्याने दूध पिणारे हे गृहस्थ स्वत:ला ‘शेणापती’ मानतात आणि आपणच बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत, असा दावा करतात, तेव्हा महाराष्ट्रात गगनभेदी हास्यस्फोट होतो तो उगाच नव्हे! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, त्यांची काळजी वाहात नाहीत, असा एक आरोप ते वारंवार करत असतात. साधारणपणे या हास्यजत्रेतल्या ‘कलाकारां’च्या या तक्रारी पाहिल्या तर उद्धव ठाकरे यांनी सकाळी जागे झाल्यापासून आधी ठाण्यात जा, बाळाचं डायपर बदल, मग आणखी पुढे जा, पुढच्या बाळाला काजळतीट लावा, त्यापुढे जाऊन एखाद्याला खांद्यावर घेऊन जोजवा, असं करतच फिरायला हवं होतं, अशी त्यांची अपेक्षा दिसते. तुम्हाला पक्षात स्थान दिलं, उमेदवारी दिली, निवडून आलात, पदं ग्रहण केलीत, आता पुढचा कारभार तुमचा तुम्ही कराल की नाही? आणखी काय द्यायचं पक्षाने आणि पक्षप्रमुखाने.
या पळपुट्यांना असं किंवा तसं, पळूनच जायचं होतं, त्यामुळे समजा उद्धव ठाकरे यांनी दर आठवड्याला लोकप्रतिनिधींच्या बैठका घेऊन काय करायचं, काय नाही करायचं वगैरे शिकवण्या घेतल्या असत्या, तर हे म्हणाले असते, पक्षप्रमुख आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, आम्हाला स्वतंत्रपणे कामच करू देत नाहीत. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून, कशाला घाबरून किंवा कोणत्या आमिषाला बळी पडून मातृपक्षाशी गद्दारी करत आहात, हे सगळ्या जगाला माहिती आहे. उगाच फालतू कारणं सांगून नसलेली इज्जत कशाला घालवता!
यांचे नेते अनेक दशकं उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली कधी सरकारचा भाग होते, कधी विरोधी पक्षात होते, कधी युती सरकारमध्ये होते, कधी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते. या सर्व काळात उद्धव ठाकरे तेच होते, त्यांची कार्यपद्धती तीच होती. काही गोष्टी विश्वासाने तुमच्यावर सोपवल्या होत्या, पक्षात ते स्थान तुम्हाला दिलं होतं. तुम्ही ती कामं करत होतात, हे ना पक्षावर उपकार होते, ना ‘मातोश्री’वर. तेव्हा हे सगळं सुविहित सुरू होतं तेव्हा ‘सेनापतींनी आघाडीवर राहून नेतृत्त्व करायचं असतं’ वगैरे आपल्या तोंडी न शोभणारं ज्ञान वाटलं जात नव्हतं. एका रात्रीत उद्धव यांची कार्यपद्धती बदलली आणि मग तुम्हाला इथे राहणंच असह्य झालं, असं काही झालं का?
स्व. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत, त्यांनीच अनेक वेळा काँग्रेसशी हातमिळवणी केली होती, आणीबाणीला पाठिंबाही दिला होता. त्यांचा काँग्रेसला विरोध होता, जळकुद्री अॅलर्जी नव्हती. तेव्हा आता शिवसेनेने जणू नव्यानेच काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना हरताळ फासला, असा घंटाळीचा जावईशोध कुठे लावता! बाकी सोडा. आज तुम्ही ज्यांची लाचारी पत्करली आहे, त्यांच्याबरोबर जीव घुसमटला म्हणून राजीनामा द्यायला निघाला होतात ना? त्यांची शय्यासोबत आता एकदम ग्वाड आणि गारगार वाटायला लागली का? महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही सत्तेची खुर्ची उबवली, तेव्हा काँग्रेसबरोबर सत्तेत राहणार नाही, म्हणून बाणेदारपणे राजीनामा देऊन शेती करायला निघून कसे गेला नाहीत?
पक्षप्रमुख गंभीर आजाराने जखडलेले असताना, राजकीय परिस्थिती नाजुक असताना आपण त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो आहोत आणि वर महाशक्तीच्या बळावर पक्षावर दावा सांगतो आहोत, हे सत्य आणि गद्दारीचा शिक्का कितीही थापा मारल्या तरी पुसला जाणार नाही. आसपासची कंत्राटदारी बगलबच्च्यांची भोंगळ गर्दी बाजूला सारून कधी गावखेड्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनाचा अदमास घ्या, खरी शिवसेना ठाकर्यांचीच, हा हुंकार कानात शिरेल आणि सत्तेच्या मस्तीचा थोडा मळ निघून जाईल.
या गद्दारांच्या हास्यजत्रेत अलीकडेच नव्याने भरती झालेले कलाकार सांगतात, आमचं कुणाशी वैर नाही, आम्हाला कुणाबद्दल राग नाही, पण आमच्या मतदारसंघातल्या जनतेचा विकास व्हायचा असेल तर सत्तेबरोबर राहण्याशिवाय पर्याय नाही. जनतेने येऊन तुमच्या कानात सांगितलंय की तुम्ही सत्तेबरोबर राहिला नाहीत तर आमचा विकास होणार नाही, त्यामुळे लगेच गद्दारी करा आणि महाशक्तीची लाचारी पत्करा! मग, राजीनामे द्यायचे होते आणि पुन्हा लढायचे होते. पक्षाशी गद्दारी करता ते करताच, तुम्हाला निवडून देणार्या जनतेशीही गद्दारी करता!
तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं तेव्हा पक्ष महाविकास आघाडीचा भाग होता. ती सत्तेत आली असती किंवा विरोधात बसली असती. जनतेला हे माहिती होतं. महाशक्तीची पाशवी सत्ताकांक्षा आणि सर्व यंत्रणांच्या गैरवापरातून निवडणुका चोरण्याची वृत्ती पाहता तुम्ही विरोधी बाकांवरच बसाल, याची लोकांना खात्री होती. तरीही त्यांनी सत्ताधार्यांच्या बाहुल्यांना मतं दिली नाहीत, शिवसेनेचा प्रखर विचार पाहून तुम्हाला मतं दिली. लोकशाहीत सत्ताधार्यांइतकाच विरोधी पक्षही महत्त्वाचा असतो. तो शहाण्या जनतेने सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी निवडून दिलेला असतो. आपल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांमध्ये विकास करायचा आणि विरोधी लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांना विकासापासून वंचित ठेवायचं, असलं हलकट राजकारण विद्यमान सत्ताधीश करतातच, कारण लोकशाहीची उदारमतवादी संस्कृतीच त्यांना कोणी शिकवलेली नाही. विरोधी पक्षाचं महत्त्व मान्य करण्याइतका उमदेपणा त्यांच्या किरट्या विचारधारेमध्ये कधीच नव्हता. पण, संसदीय लोकशाहीची सगळी हत्यारं वापरून सत्ताधार्यांना जेरीला आणायचं, त्यांची घाणेरडी वृत्ती लोकांसमोर मांडायची, हे काम तुम्हाला करता आलं असतंच ना! शिवसेनेचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य विधिमंडळात असायचे, तेव्हा ते खरे वाघ सभागृह दणाणून सोडायचे एकेकाळी. ते विसरलात?
आपण वाघ नाही, वाघाचे कातडे ओढलेले लबाड कोल्हे आहोत आणि ‘भंडारा तिकडे चांगभलं’ एवढीच आपली लायकी आहे, हे निदान स्वत:शी तरी मान्य करा आणि ही केविलवाणी हास्यजत्रा बंद करा!
