• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सतत युद्धग्रस्त गाझा!

निळू दामले युद्धाची चटक

marmik by marmik
July 2, 2026
in युद्धाची चटक
0
सतत युद्धग्रस्त गाझा!

इस्रायलची आधुनिक सशस्त्र सेना वि. गाझातले निःशस्त्र नागरिक आणि गाझा-हमासजवळची केव्हाच मागं पडलेली शस्त्रं.
युद्ध अजून संपलेलं नाही.
गाझातले ७० हजार नागरिक इस्रायलच्या हल्ल्यात मेले. तीन चतुर्थांश गाझा उद्ध्वस्त झालं.
इसरायलचे २०० सैनिक मेले. इसरायलचं झालेलं नुकसान नगण्य आहे.
00000

गाझा हा भूभाग पॅलेस्टाईन या एका ऐतिहासिक भूभागाचा तुकडा आहे. १९४८ साली जगभरातले ज्यूंनी पॅलेस्टाईनमध्ये स्वतःचा इस्रायल हा देश तयार केला. या विभागात इसवी सनापूर्वी अनेक शतकं ज्यूंची वस्ती होती, त्यामुळं पॅलेस्टाईनवर ज्यूंचाच अधिकार आहे असं जगातल्या ज्यूंचं म्हणणं होतं. हिटलरनं लाखो ज्यू मारल्यानंतर जगभर ज्यूंबद्दल सहानुभूतीची लाट होती. त्या लाटेवर अमेरिका, ब्रिटन इत्यादी लोक आरूढ झाले, त्यांनी स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना न विचारता पॅलेस्टाईनमध्ये इस्रायल स्थापन केला.

इस्रायल स्थापन झाल्यावर ज्यूंनी स्थानिक पॅलेस्टिनी लोकांची गावं घरं नष्ट करून त्यांना परागंदा केलं, त्या जागी ज्यूंच्या वस्त्या उभारायला सुरुवात केली. नाना खेड्यावाड्यांतून बेघर झालेले पॅलेस्टिनी गाझा या विभागात स्थायिक झाले. जगातल्या सर्व देशांनी इस्रायलआणि पॅलेस्टाईन असे दोन देश तयार करावेत असे ठराव केले. इस्रायलनं ते ठराव धाब्यावर बसवले.
पॅलेस्टाईनमधल्या पॅलेस्टिनींना मारून, बाहेर घालवून, कोंडवाड्यात कोंबूनइस्रायलचा विस्तार करण्याचं धोरण इसरायलनं अवलंबलं. अमेरिकेनं आर्थिक आणि लष्करी सत्ता वापरून इसरायलच्या विस्ताराला पाठिंबा दिला, पॅलेस्टिनच्या समर्थकांना इस्रायलच्या तंबूत पोचवलं.

गाझा संपवण्याच्या मोहिमेचा अंतिम टप्पा इसरायलनं ताज्या युद्धापासून सुरू केला आहे.

गाझावर हल्ला करण्याची संधी हमास या गाझात राज्य करणार्‍या हिंसावादी संघटनेनं इस्रायलला दिली. इसरायलच्या नेत्यांनीच हमासला पोसलं, वाढवलं आणि इस्रायलवर हल्ला करण्याच्या बिंदूपर्यंत आणून ठेवलं. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केला. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलनं गाझावर लष्करी आक्रमण करून युद्ध आरंभलं.

0000

युद्धाचा पूर्वार्ध ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाला. गाझामधून हमास गनीम आणि गाझाचे नागरिक गाझा-इस्रायलच्या हद्दभिंतींना भोकं पाडून इस्रायलच्या प्रदेशात घुसले. त्यांनी १२०० इस्रायली मारले आणि २५० इस्रायली पकडून गाझात बंदिस्त केले.

युद्धाचा उत्तरार्ध. इस्रायलनं गाझाशी युद्ध जाहीर केलं. सैनिक आणि राखीव सैनिक गोळा केले. सेना गोळा केली. आखणी केली. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझावर आक्रमण सुरू केलं.
00000

७ ऑक्टोबर.रेईम किबुत्झ. हे किबुत्झ १९४८ साली स्थापन झालं होतं.
कासम ब्रिगेडच्या दोन तुकड्यांनी गाझा आणि इस्रायलमधही हद्द तोडली. हद्दीवरच्या भिंतीला खिंडारं पाडली. बाईक आणि पिकअपमध्ये बसलेले सशस्त्र हमासी इस्रायलच्या हद्दीत शिरले. सकाळी ६.३० ची वेळ. रेईम किबुत्झच्या लोकांना आकाशात तेल अवीवच्या दिशेनं निघालेली रॉकेट दिसली. कारवाईचं व्यवस्थित नियोजन केलेलं होतं, कोणती किबुत्झ, कोणती शहरं लक्ष्य करायची ते ठरलेलं होतं. कित्येक महिने नियोजन झालं होतं, तालमी झाल्या होत्या. बाईक, पिकअप, पॅरा ग्लायडर अशी वाहनं हमासीनी वापरली.

रेईम किबुत्झची लोकसंख्या ४४०. सेक्युलर ज्यूंचं गाव. गावाबाहेर इस्रायल सुरक्षा दलाचा तळ आहे. हे गाव पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतं. नाचगाणं या गावात आयत्या वेळी आलं होतं. सुपरनोवा या सांगीतिक गटानं आयत्या वेळी, दोन दिवस आधी या गावात कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं. गावाच्या परिसरात संगीत उत्सवाची उभारणी करण्यात आली होती. एका भागात खाण्यापिण्याची व्यवस्था, एका भागात राहण्यासाठी तंबू आणि एक भाग प्रत्यक्ष उत्सव. २० ते ३० या वयोगटातले सुमारे ३५०० तरुण उत्सवासाठी जमले होते.
ज्यूंचा सुक्कोट नावाचा एक सण असतो. त्या सणाचा शेवटला दिवस ६ ऑक्टोबरला होता. ७ तारखेला शनिवार म्हणजे शेब्बाथ, आरामाचा दिवस होता. सण साजरा केल्यानंतर आराम. उत्सवात भरपूर नाचगाणं, मद्यप्राशन, ड्रग्ज, धमाल होती. कासम ब्रिगेडचे लोक रेईमजवळ पोचले तेव्हांही नाच गाणं सुरू होतं.

आकाशात रॉकेटं दिसल्यावर रेईमच्या पोलीस प्रमुखानं लाऊड स्पीकरवरून रेड अलर्ट जाहीर केला, जमलेल्या लोकांना सांगितलं की त्यांनी पटापट सुरक्षित वास्तूमध्ये पोचावं, जमिनीवर पालथं पडावं, गाव सोडून निघून जावं, कशाचा तरी आश्रय घ्यावा. गाझामध्ये गेली वीस वर्षांपेक्षा अधिक काळ कमी अधिक तीव्रतेच्या लढाया चाललेल्या असल्यानं इस्रायली नागरिक जागरूक असतात. सुरक्षितेचा सराव इस्रायली नागरिक नित्य नियमानं करत असतात, सुरक्षेचे नियम पाळणं त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं. त्यामुळं सायरन वाजून अलर्टची घोषणा झाल्या झाल्या उत्सवींनी पटापट खटपट सुरू केली. उत्सवी आपापल्या गाड्यांत बसून हायवेच्या दिशेनं निघाले. अनेक जण गावाबाहेरच्या झाडंझुडुपांत लपायला गेले. अनेक जण भांबावून दिशाहीन पळू लागले.

हमासी पोचले तेव्हा रस्त्यावर वाहतूक जॅम झाला होता. गाड्या अडकून पडल्या होत्या. हमासींना अगदी आयतीच असहाय्य गिर्‍हाईकं मिळाली. गोळीबाराला ती माणसं बळी पडली. सैरावैरा पळणारी माणसंही हमासच्या गोळीबारात सापडली. हमासींनी भिंत फोडून इस्रायल्ामध्ये प्रवेश केल्यावर निरीक्षण मनोरे तोडले, त्यावरची निरीक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. सुरक्षा तळावरच्या निरीक्षण चौक्या नष्ट केल्या. त्यामुळं रेईममधल्या घटनांच्या सूचना, खबरी, बाहेर पोचू शकल्या नाहीत. दुर्घटनेत सापडलेल्या लोकांनी सेलफोनवरून सोशल मिडियात टाकलेल्या पोस्टमुळं जगाला या घटनेची कल्पना आली. लष्करी यंत्रणेजवळ स्वतःची कोणतीच माहिती नव्हती.
हमासींच्या एका तुकडीनं गोळीबार केला, मॉर्टर फायर केले, हँड ग्रेने फेकले, भरपूर माणसं मारली. ती तुकडी पुढल्या गावाकडं सरकली. रेईममधल्या सुरक्षा सैनिकाला वाटलं की रेईम आता शांत झालंय. तोवर त्याच्या सेलफोनवर मेसेज आला की त्याच्या स्वतःच्या रहात्या गावात हमासी घुसलेत. तो रेईम सोडून आपल्या गावाकडं रवाना झाला. सुरक्षा यंत्रणेला मेसेज गेला की रेईममधून ९० टक्के लोक पांगले आहेत, रेईम आता आटोक्यात आहे. त्यामुळं सुरक्षा दलानं रेईमकडं सैनिक पाठवले नाहीत, ते अन्यत्र पाठवले.

तेवढ्यात हमासींच्या दुसर्‍या तुकड्या बाईक आणि पिकअपमधून रेईममध्ये पोचल्या. ही सुमारे ८.३० ची वेळ होती. हमासी तुकड्या घराघरात पोचल्या. उत्सवासाठी आलेल्यांपैकी शिल्लक असलेले आणि लपलेले लोक त्यांना सापडले. खुद्द गावातली माणसं तर गावातच होती. हमासी घराघरात गेले. घराघरातल्या सुरक्षित खोलीत जाऊ न शकलेले लोक सरळच सापडले. हमासींनी त्यांना गोळ्या घातल्या. कुत्र्यांनाही त्यांनी गोळ्या घातल्या. सुरक्षित खोल्यांना धडका मारल्या. काही खोल्यांचे दरवाजे तुटले, आतली माणसं मारली. दरवाजे तुटले नाहीत तिथं दरवाजांच्या फटीतून धूर सोडून आतली माणसं घुसमटवण्याचा प्रयत्न हमासींनी केला.
दुपारनंतर चित्र स्पष्ट झालं. इस्रायलचे सैनिक रेईममध्ये पोचले. काही हमासींनी रेईममध्ये मुक्काम केला होता. त्यांच्याशी इस्रायली सैनिकांची लढाई झाली. रात्रीच्या सुमाराला हमासी पळून तरी गेले, शिल्लक होते ते मारले गेले. रेईम शांत झालं. रेईममध्ये ३४४ नागरिक, ३४ इस्रायली सैनिक, २० हमासी ठार झाले. हमासींनी ४४ नागरिकांना बेड्या घालून बाईकवरून आणि पिकअपमधून गाझात नेलं, ओलीस ठेवलं.
हमासच्या सैनिकांच्या टोपीवर कॅमेरे लावलेले होते. तसंच अनेक हमासी स्वतंत्रपणे घटनांचं चित्रीकरण करत होते. हे चित्रण हमासीनी टेलेग्राम व इतर अनेक चॅनेलवर टाकलं. सुरुवात ते शेवट अशा रूपात पूर्ण कारवाई जगभरच्या लोकांना पहायला मिळाली. गाझातून मोटार सायकली सज्ज करून निघाले; रक्ताळलेली शरीरं फरफटत नेली; कुत्रे केविलवाणे पहात असताना त्यांना गोळ्या घातल्या; रस्त्यावर पसरलेली प्रेतं; जखमी आणि मृत शरीरावर थुंकलेलं; बेड्या घातलेली माणसं; सतत अल्ला हो अकबर घोषणा; जागोजागी गोळा झालेल्या हमासी आणि गाझावासींचा उन्माद. सर्व घटना हमासींनी सोशल मिडियावर टाकल्या. पॅलेस्टाईनमुक्तीची अंतिम लढाई सुरू झालीय, आता इस्रायलला खतम करणार, लोकांनी या लढाईत सामील व्हावं अशी घोषणा हमासनं सोशल मिडियावर दाखवली.

00000

८ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलनं आणीबाणी जाहीर केली. इस्रायलमधल्या सर्व राखीव सैनिकांना ताबडतोब तयार रहायला सांगण्यात आलं. पाच डिव्हिजन सैन्य (१ लाखापेक्षा जास्त सैनिक) सिद्ध करण्यात आले. गाझाची नाकेबंदी जाहीर करण्यात आली. गाझाची वीज तोडण्यात आली. हमासचं निर्दालन असं मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट जाहीर झालं.

९ ऑक्टोबरला हमासनं जाहीर केलं, इस्रायलनं प्रस्तावित युद्ध रद्द करावं, हमास ओलीसांना सोडेल. हमासची ही ऑफर सांगोवांगी होती, हमासचा कोणी प्रतिनिधी-इस्रायलचा कोणी अधिकृत प्रतिनिधी यांच्यात भेट-संवाद झाल्याचा पुरावा नाही.

९ ऑक्टोबरपासून इस्रायलनं गाझावर हवाई हल्ले सुरू केले. हमासचे अड्डे उडवणं असं या हल्ल्यांचं उद्दिष्ट होतं. २० दिवस दररोज पाच पन्नास विमानं दिवसात पाच पन्नास फेर्‍या करून बाँब टाकत होते. इमारती, मशिदी, हॉस्पिटलं, शाळा, काही काही म्हणून इस्रायलच्या बाँबरनी वगळलं नाही. १३ ऑक्टोबर रोजी इस्रायलनं जाहीर केलं की गाझा शहरातल्या नागरिकांनी २४ तासात शहर सोडून दक्षिणेकडं जावं. कुठं जावं, काय करावं हा त्यांचा प्रश्न असेल. संचारबंदी जाहीर झाली, शहर सोडून जाण्यासाठी सहा तास देण्यात आले. म्हातारे स्त्री पुरुष, गरोदर महिला, छोटी मुलं चंबुगवाळं आवरून, जमतील तेवढ्या वस्तू हाताशी घेऊन चालत निघाली. त्यांनी जाऊ नये असं हमासनं सांगितलं. गेला नाही तर दुसर्‍या दिवशीपासून बाँबिंग होणार आहे, असं पत्रकं वाटून, लाऊड स्पीकरवरून इस्रायली सैनिकांनी जाहीर केलं. माणसं निघाली. वाटेत स्फोट झाले. पळून जाणारी माणसं मारली गेली.

१७ ऑक्टोबरला गाझा शहरात बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला. शेकडो नागरिक, रूग्ण ठार झाले. इस्रायलचं म्हणणं की हमासनं लपवून ठेवलेल्या रॉकेटचा स्फोट झाला, हमासचं म्हणणं इस्रायलच्या सैन्यानं स्फोट केला. गाझामध्ये कोणाही स्वतंत्र पत्रकाराला प्रवेश नसल्यानं काय घडलं ते निश्चित सांगता येत नाही.

२७ ऑक्टोबरला इस्रायलचे १ लाख सैनिक गाझात पसरले. गाझातल्या अल कुड्स हॉस्पिटलवर बाँब टाकण्यात आले, नंतर तिथं सैन्य घुसलं. हॉस्पिटल व परिसरात १४ हजार पॅलेस्टिनी होते. २८ ऑक्टोबरला जबालिया निर्वासित छावणीवर बॉम्बफेक झाली, नंतर सैन्य घुसलं. ३१ ऑक्टोबरला ग्ााझा शहरातली ६ मजली इमारत उद्ध्वस्त करण्यात आली. इमारतीत १०६ माणसं होती, त्यात ५४ मुलं होती.
दररोज कुठं ना कुठं तरी इस्रायल हल्ला करत होतं. युनोचे कार्यकर्ते जखमीना मदत करण्यासाठी, म्हातार्‍या स्त्री पुरुषांना मदत करण्यासाठी फिरत होते, त्यातले कित्येक रेड क्रॉसच्या वाहनांमध्ये होते. इस्रायली सैन्यानं त्यांच्यावर हल्ला केला. युनोचं चिन्ह असलेल्या, रेड क्रॉसचं चिन्हं असलेल्या वाहनांवर हल्ले झाले. शहरामध्ये या संस्थांच्या कार्यालयांवर गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं या कृत्यांचा निषेध केला आणि हे युद्ध गुन्हे असल्याचं जाहीर केलं.

0000

२ नोव्हेंबर जबालिया छावणी.

विमानं बाँब टाकून गेली. इमारत जमीनदोस्त झाली. इमारत ढिगारा झाली. काही मिनिटातच कार्यकर्ते आणि छोट्या अँब्युलन्स पोचल्या. कार्यकर्ते हातानंच माती दूर करू लागले. कुंपणाची भिंत कोसळली होती. तिच्यात एक मुलगा अडकला होता. तो दिसत नव्हता पण त्याच्या रडण्याचा आवाज येत होता. कार्यकर्त्यांनी पटापट ढिगारा उपसला, विटा दूर केल्या. त्या मुलाला बाहेर काढलं. अँब्युसन्समध्ये सरकवलं.

एक माणूस धुळीच्या खकाण्यातून ढिगार्‍यातून बाहेर पडला. शोध घेऊ लागला. ढिगार्‍यात त्याला त्याचा तीन वर्षाचा मुलगा सापडला. तो जिवंत होता की कसं ते कळायला मार्ग नव्हता. डोळे उघडे होते पण बुब्बुळांची हालचाल नव्हती. बापानं त्याला उचललं. एकादं पोतं असावं असा त्या मुलाचा देह होता. धावत धावत मुलाला घेऊन इंडोनेशियन हॉस्पिटलमध्ये पोचला. हॉस्पिटलमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. जखमी येत होते, जखमींना ठेवायला जागा नव्हती, अनेक जखमी जमिनीवरच विव्हळत होते. कधी
डॉक्टर येणार आणि उपचार करणार? डॉक्टर संख्येनं अगदीच अपुरे होते.

बापानं मुलाला जमिनीवर ठेवलं तोवर अँब्युलन्स आली. तिच्यातून एक माणूस उतरला. त्याच्या हातात त्याची सहा वर्षाची मुलगी होती. अंगभर धूळ पसरली होती, धुळीमुळं रक्त घट्ट झालं होतं. मुलगी जिवंत होती. विव्हळत होती पण आवाज बसला होता, फुटत नव्हता.
आणखी एक माणूस. त्याच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. त्याच्या हातात एका टॉवेलमध्ये काही तरी गुंडाळलेलं होतं. ते तान्हं मूल होतं. काही आठवडे वय असावं त्या मुलाचं. ते बहुदा गेलेलं असावं. माणसाची आशा मरत नसते. तो डॉक्टर डॉक्टर ओरडत होता.
रक्तबंबाळ मुलं, वृद्ध. जमिनीवर पडलेले,एकाला एक असे चिकटून. एखाद्या मुलाचं किंवा माणसाचं नशीब असे. डॉक्टर तिथं पोचे. कधी शस्त्रक्रिया करे. इंजेक्शन देऊन. पण अनास्थेशिया देणं शक्य नसे. रोगी आकांत करत असे. डॉक्टर पटापट बँडेज करून कुठल्याशा दुसर्‍या जखमीकडं सरके.

जबालिया छावणी.
ब्लॉक नंबर ६. इमारती रांगेनं एकाला लागून एक अशा ओळीनं बांधलेल्या होत्या. सकाळी विमानं आली. बाँब टाकले. सर्व इमारतींचा ढीग झाला. एका ठिकाणी बाँबची संख्या जास्त असावी किंवा बाँबची क्षमता जास्त असावी. जमिनीत तीन चार मीटर खोलीचं आणि दहा मीटर व्यासाचं विवर झालं होतं.

इस्रायल सरकारनं या घटनेची बातमी बातमीदारांना एवढीच दिली ‘जबालियात दहशतवादी मारले गेले’ स्फोटात १००पेक्षा जास्त माणसं मेली आणि ४०० जखमी झाली ही बातमी लष्करानं बातमीदारांना दिली नाही. इस्रायली नागरिकांना या घटनेबद्दल काही कळलं नाही. काही धाडसी बातमीदार त्या ठिकाणी होते. इस्रायली लष्कराची नजर चुकवून. त्यांनी घटनेची बातमी इस्रायलमधल्या एका दैनिकाला पाठवली. दैनिकांनी ती छापली नाही. इस्रायलमधली दैनिकं छापण्याआधी लष्करी सेन्सॉरकडं जात असत आणि लष्करानं मंजूर केलेल्याच बातम्या प्रसिद्ध होत असत. परदेशी वृत्तसंस्था आणि वाहिन्यांना मज्जाव होता.
२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात गाझात ३९०० मुलं मेली.

 

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

`तरणेबांड म्हातारे’ शरद तळवलकर

Next Post
`तरणेबांड म्हातारे’ शरद तळवलकर

`तरणेबांड म्हातारे' शरद तळवलकर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.