
व्यक्तीगत जीवनात शरदराव अत्यंत श्रद्धाळू गृहस्थ! कोणत्याही परिस्थितीत कितीही उशीर झालेला तरी आणि कितीही अडचणीच्या ठिकाणी स्नानाची सोय असली तरी ही स्नान करून, पोथीमधला काही भाग वाचल्याशिवाय शरदराव रंगमंचावर पाऊल टाकत नसत. अगदी लहान खेडगावातही गेले तरी ही…
मिरजेच्या `हंसप्रभा’ थिएटरमध्ये मी `अखेर जमलं’ हा चित्रपट पाहिला. बेबी शकुंतला आणि सूर्यकांत हे नायिका आणि नायक होते. एका चाळीत ही नायिका रहात असते आणि त्याच चाळीतल्या तळमजल्यावरील एका खोलीत नायक आणि त्याचे तीन तरुण सहकारी रहात असतात. `नको करू तू बंद खिडकी’ हे गाणं ही चार तरुण पोरं नायिकेला उद्देशून गात असतात. दिग्दर्शक- दत्ता धर्माधिकारी, पटकथा, संवाद, गीते- मधुसूदन कालेलकर संगीत- शंकरराव कुलकर्णी आणि हे चार तरुण म्हणजे सूर्यकांत, राजा गोसावी, जगदीश पेंढरकर आणि शरद तळवलकर. शरद तळवलकरांना मी प्रथम रुपेरी पडद्यावर बघितले ते या चित्रपटात, अगदी छोट्या भूमिकेत. `अखेर जमलं’, ’जगाला नाही रे मंजूर’, ’राधा आपुली प्रीती’, ’नको करू ती बंद खिडकी’ अशी काही गीते आजही माझ्या स्मरणात आहेत. त्यानंतर शरद तळवलकरांना मी रुपेरी पडद्यावर आणि रंगमंचावर नित्यनियमाने पाहतच आलो आणि त्याच्या सहज अभिनयाने आणि तल्लख विनोदनिर्मितीमुळे त्यांचा चाहता बनलो. दिवसेंदिवस या कलाकाराविषयी माझ्या मनात आदराची भावना वाढू लागली. त्यांचा परिचय व्हावा, त्यांच्याबरोबर एखाद्या नाटकात, चित्रपटात भूमिका करावी, त्यांच्या सहवासात राहावे अशी इच्छा बळावत गेली. पण तो योग काही केल्या साधत नव्हता.
पुण्याच्या टिळक रस्त्यावरील घराच्या तळमजल्यावरील एका खोलीत ज्यांचे बोट धरून मी पुण्यातल्या हौशी रंगमंचावर पाऊल टाकले ते `कलाभारती’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेचे ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक मुरलीधर कानविंदे यांच्या घरीही मी जात होतो. गो.नी. दांडेकर लिखित `शितू’ या नाटकात मी त्यांच्यासमवेत राज्य नाट्यस्पर्धेत भागही घेतला होता. पण शरद तळवलकरांची काही भेट होत नव्हती. टिळक रस्त्यावर मित्रांबरोबर फिरायला जाताना किंवा माधवराव करंदीकर यांच्या `भारत सायकल मार्ट’मध्ये ते कधी कधी दिसायचे पण पुढे होऊन- ‘ मी राम रानडे. मला आपल्याबरोबर नाटकात काम करायचं आहे. मला संधी द्याल का?’ असे विचारण्याचं धाडस मात्र काही होत नव्हतं.
अखेर तो योग आला चित्तरंजन कोल्हटकर यांच्यामुळे. त्यांच्यासमवेत मी सायंकाळी कधी कधी फिरायला जात असे. एके सायंकाळी आम्ही सारसबागेत गणपतीच्या दर्शनासाठी निघालो होतो. बागेत शिरलो तो पाठमोरे शरद तळवलकर दिसले. हात पाठीमागे बांधून संथगतीने चालत होते. शरदराव आणि चित्तरंजन दोघेही छान मैत्रीतले. अरे-तुरेची सलगीतली भाषा वापरणारे.
काय शर्या, हात अगदी पाठीमागे बांधून चालला आहेस, चित्तरंजन यांनी सवाल केला. शरदराव गर्रकन वळले आणि उत्स्फूर्तपणे म्हणाले, काय करणार बन्या? मागून नाटकवाला येतोय! काय करील, काय भरवसा?’ आणि टाळीसाठी त्यांनी चित्तरंजन यांच्यापुढे हात केला. एकमेकांना टाळ्या देऊन झाल्या आणि चित्तरंजन कोल्हटकरांनी माझी आणि शरद तळवलकरांची ओळख करून दिली. सारसबागेतल्या श्रीगजाननाच्या साक्षीने ती ओळख झाली.
माझी नोकरी सांभाळून मी नाटक, चित्रपट, कलापथक या माध्यमातून माझी हौस भागवत होतो. चित्तरंजन कोल्हटकरांच्या सहवासामुळे या क्षेत्रातील लोकांच्या ओळखी वाढू लागल्या. त्यातील एक प्रमुख व्यक्ती म्हणजे नारायण गणेश करमरकर उर्फ नाना करमरकर. नाना गोष्टीवेल्हाळ. पुणे मराठी ग्रंथालयातील एका खोलीत त्यांचे वास्तव्य! त्या खोलीत अनेक कलावंतांचा राबता. शरद तळवलकर, विवेक, चित्तरंजन कोल्हटकर, प्रभाकर मुजुमदार, मधू आपटे, केशवराव काळे, वसंत दाते, श्रीनिवास भणगे, दत्ता धर्माधिकारी, अजित सातभाई असे अनेक कलाप्रेमी तिथे आवर्जून हजेरी लावत. मीही मधून-मधून त्यांच्या गप्पांत सहभागी होऊ लागलो. नानांच्यापाशी इंग्रजी सिनेमातील गोष्टींचा प्रचंड खजिना, गोष्ट सांगण्याचीही हातोटीही उत्तम! `अशी वस्ती अशी माणस’ हे त्यांनी लिहिलेलं नाटक चित्तरंजन कोल्हटकरांनी दिग्दर्शित केलं आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली. त्याच्या तालमी नानांच्याच पहिल्या मोठ्या घरात व्हायच्या. प्रॉम्टर म्हणून मी तिथे जात असे. नाना एकटेच सडेफटिंग. त्यांनी आपली मोठी जागा ग्रंथालयाला दिली आणि त्याच इमारतीत एक खोली स्वतःसाठी `मठी’ म्हणून ठेवली. त्या मठीत त्यांच्या चाहत्यांचा आणि मित्रांचा राबता सुरू झाला.
शरदराव आणि नाना जानी दोस्त! `बायको नसावी शहाणी’ हे विनोदी नाटक नानांनी लिहिले आणि शरदरावांनी ते करायचे ठरवले. पात्रांची जमवाजमव सुरू झाली. स्वत: शरद तळवलकर, लता थत्ते, राम नगरकर, विजया चांदर, कांचन काळे, अरुण भट अशी कलाकारांची निवड झाली. त्यात `गोपाळराव’ नावाचे एक वकीलाचं पात्र होतं. काम छोटसंच होतं. गणपती उत्सवातले प्रयोग ठरले होते. पण गोपाळराव मिळत नव्हते. एके दिवशी सकाळी मी नानांच्या मठीत गेलो होतो. तेथे शरदराव आणि नाना गोपाळराव कोण? यावर चर्चा करीत होते. मला पाहताच नाना म्हणाले- `हा राम करेल की ते काम.’ मला विचारल्यावर मी लगेचच होकार भरला. आणि अशा रीतीने अगदी लहानशा का होई ना भूमिकेत मी शरदरावांच्या समवेत रंगभूमीवर उभा राहिलो. त्या गणपतीच्या दिवसांत शरदरावांचा सहवास लाभू लागला आणि थोड्याच दिवसात शरदराव रंगभूमीवरील आणि शरदराव व्यक्तिगत जीवनातले, असे चित्र माझ्यापुढे स्पष्ट होऊ लागले.
व्यक्तिगत जीवनात शरदराव अत्यंत श्रद्धाळू गृहस्थ! कोणत्याही परिस्थितीत कितीही उशीर झालेला तरी आणि कितीही अडचणीच्या ठिकाणी, स्नानाची सोय नसली तरीही स्नान करून, पोथीमधला काही भाग वाचल्याशिवाय शरदराव रंगमंचावर पाऊल टाकत नसत. अगदी लहान खेडगावातही गेले तरी पत्र्याच्या डब्यात पाणी तापवून घेत. उघड्यावर चार तांबे अंगावर ओतून घेत. पंचा लावून, पूजा पाठ करून मगच रंगपटात येत. नाटकाच्या निमित्तानं त्यांनी खूप प्रवास केला. त्याबद्दल ते सांगत की,`माझे डोळे बांधून मला मध्यरात्री कोणत्याही मोटार रस्त्यावर उभे करा. हा रस्ता कोठून कुठे जातो हे मी सांगू शकतो. इतक्या छोट्या-छोट्या वाडीवस्तींमधून त्यांनी नाटकांचे प्रयोग केले आहेत की त्यांचे खास मित्र म्हणायचे, या शरदने महाराष्ट्रात नवी-नवी गावं निर्माण केली आहेत. प्रवासात असताना गाडीत कधीही झोपत नसत. ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसत. पुण्यात मुक्काम असेल तर हमखास सारसबागेतील गणपतीच्या दर्शनाला जात. खांद्यावर पिशवी टाकून मंडईत जात. कपडे अगदी साधे. लेंगा आणि नेहरू शर्ट.माफक प्रमाणात मद्यपान. गप्पांची आवड. वेगवेगळे किस्से रंगवून सांगण्याची हातोटी आणि हशा पिकल्यावर हात पुढे करून टाळी मागण्याची सवय. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांशी अत्यंत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध!
त्यांच्या सहवासात जसजसा मी येत गेलो, तसतसे त्यांच्यामधील अनेक गुण मला दिसून येऊ लागले. वास्तविक त्यांच्यापेक्षा मी कितीतरी ज्युनिअर. शेखर भागवत, चंद्रकांत जोशी हे माझ्यापेक्षाही लहान. पण शरदराव आमच्याबरोबर ज्येष्ठ मित्रासारखेच वागत. कोल्हापूरला `खरं कधी बोलू नये’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांच्या खोलीतच माझा मुक्काम होता. आपले अनुभव, नाटकातलं पदार्पण, शिक्षण, प्रेमविवाह आणि रंगभूमीवरील गंमती-जमती, चित्रपटाच्या शूटिंगप्रसंगी घडलेले किस्से शरदराव रंगवून रंगवून कथन करीत. मुंबईतील त्यांचा मुक्काम दादरच्या `रामनिवास’मध्ये असायचा. मीही त्यावेळी मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा नाट्यसंस्थेत `रामशास्त्री’ या नाटकात भूमिका करीत होतो. एके सायंकाळी मी त्यांना भेटायला रामनिवासमध्ये गेलो. दूरदर्शनचे काही लोक त्यांना भेटायला आले होते. `चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका दूरदर्शनवर सादर करण्याचा आणि त्यात शरदरावांनी चिमणराव साकारावा असा प्रस्ताव होता. नाटक, चित्रपटांमध्ये त्याकाळात ते अत्यंत बिझी होते. महिन्याच्या सर्व तारखा बुक! त्यांना चिमणराव करण्याची तीव्र इच्छा होती, पण योग काही साधला गेला नाही. (या बाबतचा अधिक तपशील आणि माझ्या लिहिण्यातील सत्यतेचा पडताळा त्याकाळी जे कोणी अधिकारी दूरदर्शनवर होते, तेच देऊ शकतील.) पुढे हीच भूमिका माझे मित्र दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आणि तुफान गाजली. त्याची `काऽऽऊ’ ही हाक घराघरात घुमली. गुंड्याभाऊच्या भूमिकेत होते बाळ कर्वे. ’चिमणराव’ या मालिकेने दूरदर्शनवर एक नवा लोभस मालिकेचा नजराणा बहाल केला हे सत्य आहे.
शरदरावांबरोबर काम करत असताना मी माझे स्वत:चे `घरकुल’ उभारत होतो. लोखंड, सिमेंट, विटा, लाकूड, सुतार-गवंडी, मुकादम, कॉन्ट्रक्टर आणि अपुरा पैसा यांच्याबरोबर झगडत होतो. दर शनिवारी आठवड्याच्या कामाचे पैसे द्यावे लागायचे. पार मेटाकुटीला आलो होतो. अखेर कसेबसे घरकुल उभे राहिले. बागेत चार फुलझाडे डोलू लागली. शरदरावांच्या भेटीला गेलो, जाताना एक पत्र, बागेतीलच फुलांचा गुच्छ, श्रीफळ, शाल घेऊन गेलो. त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि पत्र हाती ठेवले. त्यांनी पत्र उघडले आणि वाचू लागले. शेजारीच वहिनी उभ्या होत्या, मी लिहिले होते, `शरदराव आपण दिलेल्या नाट्यप्रयोगाच्या नाईट्समधूनच माझ्या घराच्या भिंतीच्या विटा आणल्या आहेत.’ शरदरावांनी ते वाक्य वाचले, सौभाग्यवतींनाही मोठ्यांदा वाचून दाखविले. आम्हा तिघांच्याही डोळ्यातून अश्रू पाझरू लागले. शरदरावांनी मला पोटाशी धरले.
शरदरावांची नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभले. वास्तविक माझ्यापेक्षाही अधिकारी व्यक्तीने हे काम आनंदाने स्वीकारले असते, पण शरदरावांनीच माझ्या नावाचा आग्रह धरला. एका अर्थाने त्यांनी माझ्या पाठीवर मारलेली ही शाबासकीची थापच होती. एका रात्री माझे घरी ते आवर्जून भोजनासाठी आले. माझा मित्र आणि उत्तम छायाचित्रकार कुमार गोखले (हा आमचा कलाकार मित्र फार लवकर या जगातून गेला) असे दोघे आले होते. उत्तम गप्पा झाल्या. माझ्या घरच्या व्यक्तींनाही शरद तळवलकर आपल्या घरी आवर्जून आले, याचा आनंद झाला.
शरदरावांचा आणि माझा जसजसा अधिक सहवास वाढत गेला तस तशी त्यांच्या जिंदगीची पटकथा अधिकाधिक उलगडत गेली. पुण्यातील भावे स्कूलचा हा विद्यार्थी! आचार्य अत्रे म्हणत `भावे स्कूल म्हणजे नाटकासाठी आणि खेळांसाठी प्र्ासिद्ध. योगायोगाने `रणदुंदुभी’ नाटकात शाळकरी शरदने काम केले. भूमिकेला हशा-टाळ्यांची दाद मिळाली. मुळात खोडकर स्वभावाच्या शरदला नाटकाची चटक लागली. मॅट्रिक झाल्यावर कॉलेजला दांड्या मारून त्यांनी केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत नोकरी धरली. कॉलेजकडून हा मुलगा कॉलेजातच येत नाही अशी तक्रार आली. वडिलांनी खडसावून विचारल्यावर मी नाटक कंपनीत नोकरी करतो असे त्यांनी उत्तर दिले. सकाळचा घरात जेवलास ते ठीक आहे, पण संध्याकाळचे जेवण आता इथं नाही. या घरात रहायचं नाही, असं वडिलांनी बजावल्यावर त्या दिवशी शरदरावांनी घर सोडलं.
मग केशवराव दाते यांच्या कंपनीत पडतील ती कामे, अगदी कपड्यांच्या घड्या घालण्यापासून ते नाटकातील बारीकसारीक भूमिका! नाटक कंपनी बंद पडली, उपासमार सुरू झाली. सकाळी एक बटाटेवडा आणि चहा. रात्री एक बटाटेवडा आणि चहा यावर पोटाची अर्धवट खळगी भरणे सुरू होते. पोटभरीचं काहीही खाल्लं जात नसल्यामुळे चक्कर येऊन एक दिवस ते कोसळले. वाई मुक्कामी नाटकाचे एकूण उत्पन्न रुपये तीन झाले. आणि शरदरावांनी वाईच्या ढोल्या गणपतीसमोर शपथ घेतली, यापुढे कधीही तोंडाला रंग लावणार नाही! पण नियतीच्या मनात काही वेगळेच स्वप्न होते. शरदरावांनी एका मित्राच्या ओळखीने मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी मिळविली आणि एस.पी. कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून नावही नोंदवले. पण कॉलेजची वेळ आणि नोकरीची वेळ यांचं गणित जमेना. रुपये तीस महिना ही पोटाला भाकरी देणारी नोकरी सोडणे अशक्य! आपल्या कॉलेजचा सतत गैरहजर असणारा विद्यार्थी व्यावसायिक नाटकातून काम करतो, अशी कुणकुण वसंत बापट यांना लागली. त्यावेळी ते एस.पी.मध्येच शिकत होते. अतिशय प्रतिष्ठेची `वाळवेकर ट्रॉफी’ या वर्षी आपल्या कॉलेजला मिळालीच पाहिजे ही बापटांची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. त्यांनी शरदरावांची भेट घेतली. शरदरावांनी त्यांना `आपण तोंडाला रंग लावणार नाही’ या शपथेची आठवण त्यांना करून दिली. तू व्यावसायिक नाटकात काम करू नकोस. पण कॉलेजच्या हौशी कलाकारांच्या नाटकात काम करायला काय हरकत आहे, असा तोडगा बापटांनी काढला आणि `खडाष्टक’ नाटकात कर्कशरावची भूमिका साकारली. कॉलेजला त्या वर्षीचा आळतेकर करंडक मिळाला आणि पुढील चार वर्षे शरदरावांनी कॉलेजच्या नाटकांतून कामे केली.

त्यानंतर शरदराव जुन्या व्यावसायिक नाटकात काम करू लागले. भावल्या (संशयकल्लोळ), फाल्गुनराव (संशयकल्लोळ), कामण्णा (भावबंधन), तळीराम (एकच प्याला), धैर्यधर (मानापमान) अशा नाटकांतून त्यांनी विविध भूमिका रंगवल्या. १९५२ साली प्रदर्शित झालेल्या `पेडगावचे शहाणे’ या चित्रपटात दिग्दर्शक राजा परांजपे यांनी त्यांना छोटीशी भूमिका दिली आणि लेखाच्या प्रारंभी मी ज्या चित्रपटाचा उल्लेख केला त्या `अखेर जमलं’ या चित्रपटात शरदरावांना काम मिळाले. राजा गोसावी यांचाही हा पहिलाच चित्रपट होता.
बाबूराव गोखले लिखित आणि दिग्दर्शित `करायला गेलो एक’ या १९५५मध्ये रंगभूमीवर आलेल्या नाटकामुळे शरदरावांचे नाव अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यातील हरिभाऊ हर्षे ही प्रमुख भूमिका राजा गोसावी करीत आणि शंखनाद या पत्रकाराची भूमिका शरदराव करीत. राजा गोसावीचं आणि बाबुरावांचं बिनसलं आणि राजाभाऊंनी ही भूमिका करण्यास नकार दिला. नगरचा प्रयोग ऐनवेळी रद्द करणे अशक्य होते. शरदरावांनी प्रवासात नक्कल चोख पाठ केली. सहकारी कलावंताबरोबर तालीम केली आणि प्रयोग धडाकेबाज पद्धतीने सादर झाला. पुढील साडेपाचशे प्रयोगात शरदरावच हरिभाऊ हर्षे म्हणून गाजले.या सगळ्या धावपळीत शरदरावांनी एम.ए.ची पदवी मिळवली आणि पुणे विद्यापीठात कुलगुरू बॅरिस्टर जयकर याचा सहाय्यक या पदावर रुजू झाले.
बॅरिस्टर जयकर स्वत: अत्यंत कलाप्रेमी! शरदरावांच्या कामावर बेहद्द खूष. नाटकासाठी ते शरदरावांना भरपूर सवलतीही देत. खुर्चीला कोट अडकवून शरदराव नाटकं करीत. गावोगाव हिंडत. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर होते तोवर हे खपवून घेतलं जाई, पण त्यांच्या निवृत्तीनंतर विद्यापीठ अधिकार्यांच्या डोळ्यात या गोष्टी खुपू लागल्या. त्यातील एक अधिकार्याने त्यांचे प्रयोग कोणत्या गावी, कोणत्या वेळी, कोणत्या थिएटरात आहेत याची एक जंत्रीच तयार ठेवली. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर शरदरावांनी नोकरीचा राजीनामा देण्याचाच निर्णय घेतला. त्यासंबंधी त्यांनीच मला हा किस्सा सांगितला होता… `मी नोकरीचे राजीनामा पत्र घेऊन ऑफिसात गेलो.
जाताना मी एक भांगेची गोळी चढवूनच गेलो होतो. ऑफिसरच्या टेबलावर राजीनामा ठेवला. ऑफिसर राजीनामा कशाला? अशा प्रकारची बोलणी करीत होता, पण मी माझ्या निर्णयावर ’ठाम’ होतो. कारण भांगेच्या गोळीचा परिणाम. ही नशा अशी आहे की ती आपल्या निर्णयावर ठाम असते. `डोक्यात एक विचार- नोकरीचा राजीनामा! राजीनामा!! राजीनामा!!!

महिन्याच्या महिन्याला पगार देणारी विद्यापीठातील मानाची नोकरी आपणहून सोडलेली आणि ती देखील अत्यंत बेभरवशाचा नाट्य-चित्रपट व्यवसायासाठी. दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे वयाच्या तिशीतच शरदरावांचे डोक्यावरील केस गळून गेले आणि त्यांना चक्क टक्कल पडलं. आपोआपच त्यांचेकडे तरुण वयातच म्हातार्या व्यक्तींच्या भूमिका येऊ लागल्या. सुरुवातीला शरदराव थोडे नाराज झाले खरे, पण त्यांनी आपल्या निरीक्षणशक्तीने, अभ्यासाने आणि उपजतच असलेल्या स्वाभाविक अभिनयशैलीने असे काही अजरामर म्हातारे उभे केले की त्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे `मी रंगवलेले म्हातारे’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागले. त्याच्या मनोगतात शरदराव लिहितात- माझ्या डोक्यावरील जावळाने तारुण्यातच माझा केसाने गळा कापल्यामुळे मला बहुतेक वयस्कर गृहस्थांच्या भूमिका वाट्याला आल्या. दहा तरुण एकत्र उभे असले आणि दहा म्हातारे उभे असले, तरी सर्व तरुणांचे बोलण्याचा विषय, हातवारे, पेहराव वगैरे बहुतेक एकच असतात. परंतु प्रत्येक म्हातारा हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक वृद्ध भूमिका वेगळी दिसावी, यासाठी मी सतत जागृत राहिलो. त्याचीच फलश्रुती म्हणजे `मी रंगवलेले म्हातारे’ हे चिरतरुण पुस्तक! या पुस्तकात त्यांनी वेगवेगळ्या प्रकृतीचा आणि प्रवृत्तीच्या सोळा म्हातार्यांच्या भूमिका साकारताना त्यांचा कसा अभ्यास केला किंवा म्हातारचळाचा ध्यास घेतला याचं अत्यंत खुसखुशीत आणि खेळकर शैलीत वर्णन केलं आहे. फाल्गुनराव (नाटक- संशयकल्लोळ), कर्कशराव (नाटक-खडाष्टक), गोकर्ण (नाटक- लग्नाची बेडी), दादूमिया (चित्रपट-रंगल्या रात्री अशा), प्रवासी तात्या (चित्रपट- एकटी), गोळेमास्तर (नाटक- अपराध मीच केला), गुप्तेकाका (नाटक- दिवा जळू दे सारी रात), बाप्पा वेंकटगिरी (नाटक- हे फूल चंदनाचे), दाजीबा (नाटक –घरोघरी हीच बोंब), अप्पाजी (नाटक- अप्पाजीची सेक्रेटरी), देसाई गुरुजी (चित्रपट- वैâवारी), बापूसाहेब घोरपडे (चित्रपट- लेक चालली सासरला), अण्णा (चित्रपट- धाकटी सून), धनाजीराव वाकडे (चित्रपट– धूमधडाका), भाऊराव (चित्रपट- मामला चोरीचा) या सार्या म्हातार्या व्यक्ती आणि वल्ली ही शरदरावांनी नाट्य-चित्रपट सृष्टीला बहाल केलेली चिरस्मरणीय देणगी आहे. `चणे खावे लोखंडाचे तेव्हाच ब्रह्मपदी नाचे’ ही उक्ती शरदरावांनी शब्दश: जगून, स्वकर्तृत्वाने सिद्ध केली.
अशा महान कलाकाराचा काही काळ तरी प्रत्यक्ष सहवास घडाला त्यांच्या संगतीने चार पावले चालण्याची संधी मला मिळाली, ही त्या नटेश्वराची माझ्यावर कृपाच!
तुम्हा तो सुखकर हो शंकरा!

