जागतिक वर्षावन दिन दरवर्षी २२ जून रोजी साजरा केला जातो, यंदाही तो साजरा झाला.’The Forest Within You’ हे २०२६चे ‘घोषवाक्य’ आहे. हे घोषवाक्य आपल्याला सांगते की आपले वनाशी जैविक नाते आहे. आपण जो श्वास म्हणजे ऑक्सिजन घेतो, तो ऑक्सिजन ही वने तयार करत असतात. म्हणजेच, जंगलाने दिलेल्या श्वासावर आपले शरीर चालू असते. वैज्ञानिकदृष्ट्या, आपल्या फुफ्फुसांमधील रक्तवाहिन्यांचे जाळे हुबेहूब झाडांच्या फांद्यांसारखे दिसते. थोडक्यात आपल्या प्रत्येकाच्या श्वासात आणि शरीरात ‘जंगलाचा हा एक अंश अस्तित्वात आहे.’ ही संकल्पना आपल्याला आठवण करून देते की, पर्जन्यवने ही केवळ दूर कुठेतरी असलेली झाडेझुडपे नाहीत, तर ती आपल्या आरोग्याचा, संस्कृतीचा, श्वासाचा आणि भविष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. जंगल वाचवणे म्हणजे स्वतःला वाचवणे होय.
या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे वर्षावनांचे महत्त्व आणि त्यांच्या संरक्षणाची गरज याबद्दल समाजात व्यापक वैज्ञानिक जागरुकता निर्माण करण्याचा आहे. वर्षावने ही पृथ्वीवरील सर्वात समृद्ध परिसंस्थांचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आरोग्यासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामुळेच वर्षावनांना ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ असेही म्हटले जाते. या वनांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा केवळ सहा टक्के भाग व्यापलेला असून हा भाग जगातील निम्म्याहून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे हक्काचे घर आहे. यामुळेच त्यांना जैवविविधतेचे अथांग भांडार मानले जाते, या घरात अनेक दुर्मिळ व लुप्तप्राय प्रजातींचे अस्तित्व आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या वैज्ञानिक आकडेवारीनुसार, भारताचे एकूण वनाच्छादन ७,१३,७८९ चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या २१.७२टक्के आहे. परंतु खर्या अर्थाने वर्षावने म्हणता येतील अशी ‘अति घनदाट जंगले’ केवळ तीन टक्क्यांच्या आसपास आहेत. भारताच्या एकूण वनस्पतींच्या ४५,००० प्रजातींपैकी जवळपास एक-तृतीयांश प्रजाती केवळ याच मर्यादित वर्षावनांमध्ये एकवटलेल्या असल्याने त्यांचे मूल्य अनन्यसाधारण आहे.
या जंगलांचे हवामान संतुलनातील योगदान हे जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण आहे. ही वने वातावरणातील कार्बन
डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषून घेतात आणि प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्याला शास्त्रीय भाषेत ‘कार्बन सिक्वेस्ट्रेशन’ म्हटले जाते. प्रति हेक्टर अनेक टन कार्बन साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या या परिसंस्थेमुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मोठी मदत होते. याशिवाय, ती पर्जन्यमान नियंत्रित करतात आणि स्थानिक तसेच जागतिक हवामानावर थेट सकारात्मक परिणाम करतात.
वर्षावने हा मौल्यवान औषधी वनस्पतींचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत. आज कर्करोगासारख्या विविध गंभीर रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक आधुनिक औषधांचे मूळ स्रोत याच वर्षावनांमधील वनस्पतींमध्ये आढळतात. त्यासोबतच, ही वने स्पंजासारखे काम करून मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवतात आणि ते हळूहळू नद्या व इतर जलस्रोतांमध्ये सोडतात, ज्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक चक्राचे संतुलन उत्तम प्रकारे राखले जाते. तसेच, अनेक स्थानिक आदिवासी समुदाय उपजीविकेसाठी आणि सांस्कृतिक वारशासाठी आजही या वर्षावनांवर पूर्णपणे अवलंबून आहेत.
भारताचा विचार केला तर आपल्या देशात उष्णकटिबंधीय वर्षावने प्रामुख्याने तीन प्रमुख प्रदेशांमध्ये आढळतात. पहिला प्रदेश म्हणजे जागतिक पातळीवरील प्रमुख जैवविविधता हॉटस्पॉट असलेला ‘पश्चिम घाट’. भारताच्या पश्चिम किनार्याला समांतर असलेल्या या पर्वतीय क्षेत्रात, विशेषतः कर्नाटक, केरळ, तामिळनाडूचा काही भाग, गोवा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये (कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे) जैवविविधतेने नटलेली उष्णकटिबंधीय सदाहरित वने पसरलेली आहेत. येथे वार्षिक सरासरी २५०० मिमी ते ५००० मिमी इतका प्रचंड पाऊस पडतो. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे संपूर्ण जगात केवळ याच भागात आढळणार्या वनस्पतींच्या १५०० हून अधिक प्रजाती येथे उत्क्रांत झाल्या आहेत. भारतातील या वर्षावनांमध्ये बंगाल वाघ, भारतीय हत्ती, निलगिरी ताहर आणि सिंह-शेपूट माकड (लायन-टेल्ड मॅकाक) यांसारखे दुर्मिळ प्राणी आढळतात. शास्त्रीय अभ्यासानुसार, पश्चिम घाटातील ही वर्षावने म्हणजे दक्षिण भारताचे मुख्य ‘जलकुंभ’ आहेत, कारण गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या प्रमुख नद्यांचे उगमस्थान आणि जलस्रोत याच वनांवर अवलंबून आहेत.
दुसरा प्रमुख प्रदेश म्हणजे ‘ईशान्य भारत’, जिथे आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही हिमालयीन पर्वतरांगांच्या पायथ्याशी व मैदानी भागात घनदाट वर्षावने पसरली आहेत. हा प्रदेश ‘इंडो-बर्मा’ जैवविविधता क्षेत्राचा भाग असून, मेघालयातील चेरापुंजी आणि मावसिनराम या भागात वर्षाला ११,००० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने येथील वर्षावनांची रचना अत्यंत गुंतागुंतीची आणि बहुस्तरीय आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये भारताच्या एकूण बांबूच्या प्रजातींपैकी ५० टक्क्यांहून अधिक प्रजाती आढळतात.

भारतातील तिसरा भाग म्हणजे ‘अंदमान आणि निकोबार बेटे’, जिथे अद्वितीय सागरी आणि भूभागावरील जैवविविधतेने नटलेली उष्णकटिबंधीय सदाहरित व अर्ध-सदाहरित वने मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. येथील ९२ टक्के भाग वनाच्छादित असून त्यातील तब्बल ८६ टक्के भाग हा संरक्षित वन क्षेत्रात येतो. या बेटांवर आढळणार्या प्राण्यांच्या ९,००० प्रजातींपैकी सुमारे १० टक्के प्रजाती जगात इतर कुठेही आढळत नाहीत. इथे केंद्र सरकार जो विकास राबवणार आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामधील या अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्वच्छ समुद्रकिनारे, खारफुटीची वने, अद्वितीय जैवविविधता, महाकाय लेदरबॅक कासवांच्या संरक्षित प्रजाती आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी आणि त्यांच्या संस्कृतीचा बळी दिला जाऊ शकतो. नीती आयोगाने २०२१मध्ये ७२,००० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली होती.
भारतात वनसंवर्धनासाठी खूप गंभीर प्रयत्न होणे गरजेचे आहे. या वर्षावनांना तथाकथित विकासापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. वर्षावनांना सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे. उद्योग, खाणकाम, बांधकाम, इंधनाचे लाकूड आणि शेतीसाठी जमिनीचा विस्तार करण्यासाठी होणारी अवैध वृक्षतोड हा एक मोठा धोका उत्पन्न झाला आहे. या वनांमधील दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांची होणारी तस्करी हा देखील या परिसंस्थेसाठी एक मोठा धोका आहे. वाढती लोकसंख्या आणि रस्ते, धरणे, खाणकाम यांसारख्या विकास प्रकल्पांमुळे वनांचे क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत चालले आहे. उपग्रहीय सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, सलग जंगलांचे मोठ्या प्रमाणावर तुकडीकरण होत असून ईशान्येतील पारंपरिक ‘झूम शेती’चा वाढलेला वेग आणि अनियंत्रित खाणकामामुळे घनदाट जंगलांचा दर्जा खालावून ती ‘खुली जंगले’ बनत चालली आहेत. त्यातच जागतिक हवामान बदलामुळे वाढणारे तापमान आणि अनियमित पर्जन्यमान यांचा या नाजूक वर्षावनांच्या परिसंस्थेवर अत्यंत नकारात्मक परिणाम होत असून कमी काळात अतिवृष्टी आणि प्रदीर्घ कोरडे कालखंड अशी तीव्र लक्षणे दिसत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर भारताने प्राधान्याने वर्षावनक्षेत्र वाढवण्यासाठी आणि अधिक सुरक्षित संरक्षित क्षेत्रांची निर्मिती करण्यासाठी आता ठोस, शास्त्रीय व कायदेशीर पावले उचलली पाहिजेत. भारतीय संविधानातील कलम ५१A(प्)नुसार समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि कलम ५१A(ु)नुसार वने, वन्यजीव व नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले मूलभूत नागरिक कर्तव्य आहे. उपग्रहाच्या माध्यमातून वनांच्या नुकसानीवर चोवीस तास आधुनिक लक्ष ठेवणे, नष्ट झालेल्या भागात केवळ स्थानिक प्रजातींचीच शास्त्रीय पुनर्रोपण मोहीम राबवणे आणि वनवासी समुदायांना वनांचे रक्षक बनवून त्यांचे सक्षमीकरण करणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. या अमूल्य नैसर्गिक खजिन्याचे जतन करणे आज अत्यंत आवश्यक आहे. यासाठी निसर्गाकडून घेणारी पण निसर्गाला काहीएक परत न देणारी नफेखोर विकास नीती नाकारून निसर्ग आणि माणूस यांच्या समतोलावर आधारित विकास नीती स्वीकारावी लागेल तरच भविष्यातील पिढ्यांनाही या समृद्ध पर्यावरणाचा लाभ घेता येईल. म्हणूनच, वर्षावनांचे हे अफाट महत्त्व ओळखून त्यांचे काटेकोरपणे संरक्षण करणे ही आपल्या संपूर्ण पिढीची सामूहिक जबाबदारी आहे.

