इन्स्पेक्टर काळे यांनी पुन्हा संपूर्ण घरात फिरून प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची तपासणी केली. त्यांच्या लक्षात आले की किचनजवळचे डस्टबिन अद्याप कोणी चेक केलेले नाही. ते उघडून पाहिले असता, वर माशांचे काटे आणि भाजीचा कचरा पडलेला होता, ज्यातून उग्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे कदाचित पोलिसांनी त्याला हात लावला नसावा. परंतु काळे हे हाडाचे पोलीस होते. ‘तपास अधिकारी दुर्गंधीला घाबरत नसतो आणि जिथे दुर्गंधी असते तिथेच काहीतरी लपलेले असते,’ हा त्यांचा अनुभव होता.
सकाळचे नऊ वाजले होते. इन्स्पेक्टर काळे टेबलवर उद्याच्या व्हीआयपी दौरा बंदोबस्ताचे प्लॅनिंग करत होते. कमिशनर साहेबांनी स्पष्ट सांगितले होते, व्हीआयपी दौर्यामध्ये काही गडबड झाली, तर ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे काहीशा तणावाखालीच इन्स्पेक्टर काळे ‘कोणाला कुठे ड्युटी द्यायची?,’ ‘कोणी काय करायचे?’ या विचारात मग्न होते.
तितक्यात ठाणे अंमलदार पाटील धावत काळे साहेबांकडे आले आणि म्हणाले, ‘साहेब, विजय नगरमध्ये डबल मर्डर झाला आहे! जबरी चोरी आणि खून असा प्रकार दिसतोय. वायरलेसवर आत्ताच कॉल आला आहे, आपल्याला तिकडे तात्काळ जावे लागेल.’
हे ऐकताच इन्स्पेक्टर काळे यांनी वैतागलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ‘अरे यार! उद्या महत्त्वाचा बंदोबस्त आहे, आता हे काय नवीन लफडे आपल्या पाठीशी लागले?’ त्यांनी लगेच ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. सोबत डिटेक्शन टीम आणि काही अंमलदारांना घटनास्थळी येण्याचे आदेश दिले.
इन्स्पेक्टर काळे घटनास्थळावर पोहोचले, तेव्हा बिल्डिंगखाली लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दीतून रस्ता काढत साहेबांना जिन्याने वर नेले. दुसर्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २०३ मध्ये प्रवेश करून पाहतात तर काय, हॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचे वय साधारण ३५ ते ४० वर्षे असावे. बेडरूममध्ये साधारण ३० ते ३५ वयोगटातील एका महिलेचा मृतदेह बेडवर पडलेला होता. दोन्ही मृतदेहांच्या गळ्यावर, पाठीवर आणि अंगावर धारदार शस्त्राने वार केलेले होते. आजूबाजूला सगळीकडे रक्त सांडले होते. घरातील कपाट आणि टेबलचे ड्रॉवर उघडून कपडे अस्ताव्यस्त फेकलेले होते. दरवाजाचा कोंडा तोडलेला होता. ही सर्व परिस्थिती पाहता, हा दरोड्याचा प्रकार असावा आणि प्रतिकार केल्यामुळेच या दोघांचा खून केला गेला असावा, अशी दाट शक्यता दिसत होती. किचनमधील कडधान्यांचे डबे देखील उघड्या अवस्थेत होते. कोणीतरी संपूर्ण किचन, हॉल, बेडरूम आणि संपूर्ण घराची जणू झाडाझडतीच घेतली होती.
इन्स्पेक्टर काळे यांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आणि संपूर्ण घरामध्ये काही पुरावे किंवा हाताचे ठसे मिळतात का, याचा शोध घेण्यास सांगितले. किचनमध्ये जेवण होऊन बेसिनमध्ये भांडी पडलेली होती, यावरून हे कुटुंब सकाळपासून घरातच होते हे स्पष्ट होत होते. काळे यांनी बिल्डिंगच्या सेक्रेटरींना बोलावून घेतले आणि या फ्लॅटमध्ये राहणार्या व्यक्तींविषयी विचारणा केली. तेव्हा सेक्रेटरींनी सांगितले की, हा फ्लॅट गणेश भोसले यांच्या मालकीचा असून हे भाडेकरू मागील तीन महिन्यांपासून येथे राहत होते. नावे विचारल्यावर सेक्रेटरी म्हणाले, ‘आमच्याकडे रेंट अॅग्रीमेंटची कॉपी आहे, मी ती घेऊन येतो.’
त्याच वेळी काळे यांनी पुन्हा मृत व्यक्तीच्या खिशाची तपासणी केली असता, त्याच्या पँटच्या पाठीमागील खिशात एक पाकीट (वॉलेट) सापडले. त्यात त्या माणसाचे आणि एका महिलेचे आधार कार्ड मिळाले. आधार कार्डवरील फोटो आणि मृत व्यक्तींचे चेहरे पडताळून पाहिले असता हे आधार कार्ड त्या पती-पत्नीचेच असल्याचे स्पष्ट झाले. मृत इसमाचे नाव राजेश माने आणि त्याच्या पत्नीचे नाव गीता माने असे होते. ते दोघेही ‘किडवी, तालुका जामनेर, जिल्हा बुलढाणा’ येथील रहिवासी असल्याचे त्यावर नमूद होते.
मृतदेहांची ओळख पटल्यामुळे काळे यांना जरा हायसे वाटले. कारण मृतदेह अनोळखी राहिले, तर मारेकर्यांऐवजी ओळख पटवण्यातच जास्त वेळ आणि प्रयत्न त्यांची ओळख पटवण्यात खर्च होतात. गुन्हा घडल्यानंतरच्या पहिल्या ४८ तासांत (गोल्डन अवर्स) जो तपास होतो, त्यात महत्त्वाचे पुरावे मिळण्याची आणि गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ओळख पटल्यामुळे आता केवळ मारेकर्यांचा शोध घेणे आणि खुनामागील कारण शोधणे, या दोनच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे काळे यांनी ठरवले.
थोड्याच वेळात सेक्रेटरी अॅग्रीमेंटची कॉपी घेऊन आले. अॅग्रीमेंटमधील फोटो, पत्ता आणि आधार कार्डवरील पत्ता एकच होता. त्यांनी लगेच बुलढाणा कंट्रोल रूमला फोन करून पत्ता आणि मृतांचे फोटो पाठवले. स्थानिक पोलिसांना तो पत्ता व्हेरिफाय करून त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्याच्या सूचना केल्या.
खून झाला होता, त्या मजल्यावर एकूण चार फ्लॅट होते. त्यातील एक फ्लॅट बंद होता (ते लोक गावी गेले होते). इतर दोन फ्लॅटमधील लोकांकडे काळे यांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ‘काल सकाळपासून आम्ही त्यांना पाहिले नाही. ते सहसा कोणाशी बोलत नसत आणि त्यांच्याकडे कधी कोणी येतही नव्हते. त्यांच्याकडे काम करणार्या मोलकरणीशिवाय आम्ही कधीच कोणाला तिथे येताना पाहिले नाही. काल दिवसभरात कोणताही आरडाओरड किंवा भांडणाचा आवाजही ऐकला नाही.’
इन्स्पेक्टर काळे यांनी तपासाच्या दृष्टीने काही महत्त्वाचा पुरावा मिळतो का, हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण घरात फेरफटका मारला. परंतु, या सर्व परिस्थितीवरून काहीतरी ‘मिसिंग’ असल्याचे त्यांच्या अंतर्मनाला जाणवत होते. त्यांचा २० वर्षांचा अनुभव आणि त्यांच्यातील कसलेला पोलीस अधिकारी जे डोळ्यांना दिसत होते, त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. ‘काहीतरी चुकतेय, आपली दिशाभूल केली जात आहे किंवा आपण चुकीच्या दिशेने तपास करतोय,’ अशी भावना काळे यांच्या मनात निर्माण झाली. त्याला कारणही तसेच होते. मृत व्यक्ती आधीपासूनच घरात होत्या, तर मग बाहेरून दरवाजाचा कोंडा उचकटण्याचे कारण काय? मारेकरी जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न करत होते, तर नक्कीच आत राहणार्यांना ते कळले असते. त्यांनी प्रतिकार केला असता तर शेजार्यांना काहीतरी आवाज आला असता. हा विचार त्यांच्या मनात घोळत असतानाच तिथे फॉरेन्सिक टीम आली. त्यांनी पूर्ण तपासणी करून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिले.
यानंतरही काळे घटनास्थळावरच घुटमळत होते. त्यांचा वरवर दिसणार्या परिस्थितीवर विश्वास बसत नव्हता. ‘ज्या पद्धतीने ही घटना घडल्याचे दाखवले जात आहे, तशी ती नक्कीच घडलेली नाही. जे दिसत आहे, ते केवळ आपल्याला दाखवण्यासाठी रचलेले नाटक आहे. पोलिसांनी दिसणार्या गोष्टीपेक्षा समजणार्या गोष्टींवर विश्वास ठेवला, तरच तो चोरापर्यंत पोहोचू शकतो,’ हे ते अनुभवातून शिकले होते. त्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारले.
काळे बिल्डिंगच्या सेक्रेटरीशी बोलत बाहेर आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या बिल्डिंगमध्ये प्रत्येक जिन्यात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यांनी लगेच सेक्रेटरीला त्याचा अॅक्सेस कोणाकडे आहे, असे विचारले. सेक्रेटरींच्या घरातील कॉम्प्युटरवर अॅक्सेस असल्याने तात्काळ ते दोघे सेक्रेटरींच्या घरी गेले आणि त्यांनी फुटेज चेक केले. ते पाहून इन्स्पेक्टर काळे यांना धक्काच बसला! जे रेकॉर्ड झाले होते, ते काहीसे अनपेक्षित पण त्यांच्या संशयाला खात्रीत बदलणारे होते.
आदल्या दिवशी दुपारी १:३५ वाजता डोक्यावर टोपी होती आणि चेहरे मास्कने झाकलेले दोन तरुण जिन्यातून वर येत होते. सीसीटीव्ही कॅमेर्यात चेहरा येऊ नये अशा अँगलने त्यांनी टोपी घातली होती. दुसर्या मजल्यावर येऊन त्यांनी बेल वाजवली. आतून दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडणार्या व्यक्तीचे आणि या दोघांचे साधारण अर्धा-एक मिनिट बोलणे झाले आणि त्यानंतर ते दोघे सहज घरात गेले. यावरून स्पष्ट होते की त्यांची जबरदस्तीने एन्ट्री नव्हती.
त्यानंतर ४५ मिनिटांनी पुन्हा दरवाजा उघडला गेला. बाहेर पडताना त्या दोघांनी त्यांच्याकडील लोखंडी रॉडने दरवाजाचा कोंडा तोडल्यासारखे केले (दिशाभूल करण्यासाठी). जाताना त्यांच्याकडे फक्त एक छोटी बॅग होती, पण घरातून बाहेर पडताना दोघांच्या हातांत मोठ्या, किराणा मालासारख्या जड बॅगा होत्या. त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्या बॅगा फार जड असल्याचे जाणवत होते. ते तात्काळ बिल्डिंगमधून बाहेर पडले आणि उजव्या बाजूला असलेल्या मैदानाच्या झाडीतून पसार झाले.
यावरून काळे यांची खात्री झाली की हा दरोडा नसून मृत व्यक्ती आणि मारेकरी हे एकमेकांच्या नक्कीच ओळखीचे होते. मारेकर्यांना हे माहीत होते की घरात काहीतरी मौल्यवान वस्तू किंवा पैसे आहेत. मग त्यांची हत्या का करण्यात आली, हा प्रश्न काळे यांना सतावत होता. असे काय होते की त्यांना मारूनच त्या वस्तू घेऊन जावे लागले? काळे यांच्या लक्षात आले की ही केस वाटती तेवढी सोपी नाही, यात अनेक पैलू आहेत.
तेवढ्यात बुलढाणा कंट्रोल रूममधून फोन आला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली होती, परंतु त्या पत्त्यावर अशा नावाचा कोणीही व्यक्ती राहत नव्हता. तसेच गावातील सर्वांना या दोघांचे फोटो दाखवले असता, कोणीही त्यांना ओळखलं नाही. आता मात्र काळे यांचे डोके चक्रावून गेले. या गुन्ह्यातील मृत व्यक्तीही स्वतःची ओळख लपवून राहत असतील, तर मग ते नक्की कोण होते? त्यांना ओळख का लपवावी लागली? आणि मारेकर्यांना ते या ठिकाणी राहत असल्याचे कसे समजले? या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणे गरजेचे होते.
इन्स्पेक्टर काळे यांनी या सर्व बाबी वरिष्ठांना सांगितल्या आणि या केसमध्ये अधिक मनुष्यबळाची गरज असल्याचे सांगितले. तपास क्लिष्ट असल्यामुळे वेगवेगळ्या टीम बनवाव्या लागणार होत्या. वरिष्ठांनी देखील त्यांना आवश्यक ते सर्व मनुष्यबळ आणि साधने पुरवण्याचे आश्वासन दिले. इन्स्पेक्टर काळे यांनी काहीतरी पुरावा नक्की मिळेल या आशेने पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली. कपाट, किचन, बाथरूम सगळे काही त्यांनी चेक केले, पण काहीच हाती लागले नाही. परंतु, त्यांची नजर सहज बेडरूममधील भिंतीवर असलेल्या देवघराकडे गेली. त्या देवघरात कोणतीही देवाची मूर्ती नव्हती, परंतु काही नाणी आणि काही छोट्या हत्यारांची (अवजारांची) पूजा केलेली दिसत होती. त्यावरून काळे यांच्या डोक्यात प्रकाश पडला; कोणताही मनुष्य आपल्ाा पेहराव बदलतो, राहणीमान बदलतो, परंतु श्रद्धास्थाने आणि परंपरा बदलत नाही. देवघरात एका टोपलीमध्ये हे पूजन केलेले होते. काळे यांनी महाराष्ट्रातील बर्याच जिल्ह्यांमध्ये काम केले असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, मृत व्यक्ती नक्कीच आदिवासी समाजातील असून त्या राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भागातील असाव्यात. आता तपासाला एक नवी दिशा मिळाली. इन्स्पेक्टर काळे यांनी एक टीम तात्काळ सीमेलगतच्या परिसरात नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रवाना केली.
आता इन्स्पेक्टर काळे यांचा उत्साह वाढला होता. आपण या गुन्ह्याची उकल करणार, याची त्यांना खात्री वाटू लागली. त्यांनी पुन्हा संपूर्ण घरात फिरून प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची तपासणी केली. त्यांच्या लक्षात आले की किचनजवळचे डस्टबिन अद्याप कोणी चेक केलेले नाही. ते उघडून पाहिले असता, वर माशांचे काटे आणि भाजीचा कचरा पडलेला होता, ज्यातून उग्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे कदाचित पोलिसांनी त्याला हात लावला नसावा. परंतु काळे हे हाडाचे पोलीस होते. ‘तपास अधिकारी दुर्गंधीला घाबरत नसतो आणि जिथे दुर्गंधी असते तिथेच काहीतरी लपलेले असते,’ हा त्यांचा अनुभव होता. त्यांनी एका कर्मचार्याला बोलावून संपूर्ण डस्टबिन फरशीवर उलटे केले. प्रत्येक गोष्ट चेक करत असताना, त्यांच्या हाताला निळ्या रंगाच्या छोट्या कागदाचे काही तुकडे लागले. ते पाहताच त्यांच्या लक्षात आले की, अशा प्रकारचा कागद आणि त्यावरील मजकूर बँकेत नोटांच्या बंडलवर लावला जातो. त्यांनी लगेच सर्व तुकडे गोळा केले आणि ते व्यवस्थित एका कागदावर चिकटवून जोडले. सुदैवाने त्या कागदांना जास्त घाण लागली नसल्यामुळे त्यावरील मजकूर स्पष्ट वाचता येत होता. त्या कागदावरील शिक्का ‘एसबीआय (एँघ्) शिखरपूर’ शाखेचा होता. हे लोक पुण्यात राहत होते, तर त्यांच्याकडे शिखरपूर बँकेच्या नोटांच्या बंडलचा तुकडा कसा आला? त्यांनी एक टीम तात्काळ शिखरपूरला रवाना केली.
फ्लॅट सीलबंद करणे, मृतदेहांचे शवविच्छेदन, साक्षीदारांचे जबाब आणि प्रेस नोट तयार करण्यात संपूर्ण दिवस गेला. त्या रात्री काळे यांच्या डोक्यात याच गुन्ह्याचे विचार घोळत होते. सकाळ होताच वर्तमानपत्रात या घटनेविषयी बातम्या छापून आल्या होत्या. नेहमीप्रमाणे ‘पुन्हा एकदा निरपराध व्यक्तींचा बळी’, ‘निष्क्रिय पोलीस’, ‘कायद्याचा धाक राहिला नाही’ अशा पोलिसांचे मनोधैर्य खचवणार्या हेडलाईन्स आल्या होत्या. या बातम्या वाचत असतानाच काळे यांचा मोबाईल वाजला. डीसीपी साहेबांचा फोन होता. नेहमीप्रमाणे साहेबांनी खडे बोल सुनावले, ‘या गुन्ह्याचा तपास लवकर करून आरोपी पकडले नाही, तर तुमची बदली केली जाईल. तुम्हाला कंट्रोलला हजर व्हावे लागेल. मला संध्याकाळपर्यंत या गुन्ह्याचा रिपोर्ट पाहिजे, वरून वरिष्ठांचे प्रेशर आहे.’ जणू काही पोलीस होऊन काळे यांनीच मोठा अपराध केला होता. ‘आता तपास करू की रिपोर्ट लिहीत बसू?’ असे त्यांना वाटू लागले. पण काही क्षणांतच ते सावरले. जेव्हा अशी मोठी घटना घडते, तेव्हा सर्व बाजूंनी दडपण येते; अशा वेळी
पॅनिक न होता कामावर एकाग्रता ठेवली तरच मार्ग निघू शकतो, हे त्यांनी ओळखले आणि डीसीपींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते पोलीस ठाण्याकडे निघाले. इन्स्पेक्टर काळे यांची गाडी पोलीस ठाण्यात पोहोचत असतानाच बँकेची माहिती घेण्यासाठी गेलेले पीएसआय लोंढे यांचा फोन आला. त्यांनी दिलेली माहिती तर फारच धक्कादायक होती. ते म्हणाले, ‘साहेब, बँकेमध्ये चौकशी केल्यानंतर आणि फोटो दाखवल्यानंतर समजले की मृत व्यक्तीला बँकेतील लोक ओळखत होते. तो दिनेश शहा या मोठ्या व्यापार्याकडे अकाउंट्सचे काम पाहायचा. तो पैसे डिपॉझिट करण्यासाठी आणि काढण्यासाठी नेहमी बँकेत यायचा. त्याचे नाव अतुल वर्डेकर आहे. त्याची आधार कार्ड आणि पॅन कार्डची कॉपी बँकेतून मिळाली आहे, त्यावर ‘डोंगरगाव, हिंगोली’ असा पत्ता आहे.’ हे ऐकताच काळे यांच्या मनात विचार आला की, ही केस अजूनच गुंतागुंतीची होत चालली आहे. या गुन्ह्यात ‘खून कोणी केला’ यापेक्षा ‘नक्की खून कोणाचा झाला’ हे सिद्ध करणे अवघड झाले होते. त्यांनी पीएसआय लोंढे यांना लगेच दिनेश शहाकडे जाऊन माहिती घेण्यास सांगितले. त्याचबरोबर एक टीम डोंगरगाव, हिंगोली येथे पाठवली.
साधारण संध्याकाळी पाच वाजता डोंगरगावला गेलेल्या टीमचा फोन आला. त्यांनी सांगितले, ‘इथे या नावाचा कोणीही राहत नाही.’ त्यानंतर पीएसआय लोंढे यांनी कॉल करून माहिती दिली, ‘दिनेश शहा यांनी मयताचा फोटो पाहून सांगितले की तो सहा महिन्यांपूर्वी आमच्याकडे कामाला होता, पण आता नोकरी सोडून गेला आहे.’ शहा उलट पोलिसांनाच विचारू लागला होता, ‘तुम्हाला माहीत आहे का तो कुठे आहे? माझी भेट घालून द्या.’ त्यामुळे लोंढे यांना दिनेश शहा याच्यावर संशय आला. त्यांनी खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, पण शहाने जास्त माहिती देणे टाळले.
पीएसआय लोंढे अनुभवी होते, त्यांनी वेगळ्या मार्गाने माहिती काढण्याचे ठरवले. त्यांनी शहांच्या दुकानात झाडलोट करणार्या गणपतला गाठले. बोलताना लक्षात आले की गणपतला बरीच माहिती आहे, पण तो सर्वांसमोर सांगणार नाही. त्यातच तो रोज दारू पिणारा होता, याच गोष्टीचा फायदा उठवण्याचे लाेंढे यांनी ठरवले. त्यांनी गणपतला विचारले, ‘कुठे चांगली देशी दारू मिळेल?’ त्याने उत्साहाने पत्ता सांगितला. लोंढे म्हणाले, ‘चला मग, टाकूया थोडी थोडी!’ गणपतने त्यांना पुढे जाऊन थांबायला सांगितले आणि काम संपवून तो नाक्यावर भेटला. देशी दारूच्या दुकानात लोंढे यांनी त्याला दारू पाजली आणि स्वतः पिण्याचे नाटक करत माहिती विचारली. तेव्हा गणपतने गुपित उघड केले, ‘अतुल आमच्या शेठकडेच काम करायचा. आमच्या शेठचा होलसेल कपड्याचा धंदा फक्त दाखवण्यापुरता आहे, खरा धंदा ‘हवाला’चा आहे! अतुल शेठचा विश्वासू माणूस होता. तोच हवालाचे पैसे आणणे-नेणे आणि बँकेत भरणे ही कामे करायचा. सहा महिन्यांपूर्वी शेठने अतुलला हवालाचे मोठे पैसे ट्रान्सफर करण्याचे काम दिले होते. ते पैसे घेऊन अतुल अचानक गायब झाला. पैसे पोहोचलेच नाहीत! शेठला स्वतःच्या बायकोचे दागिने विकून ते पैसे भरावे लागले. हवालाचे काळे पैसे असल्यामुळे शेठने पोलिसांत तक्रारही केली नाही. आमचा शेठ आणि त्याची माणसे त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या गावीही जाऊन आले, पण तो तिथे मिळाला नाही; त्याने खोटा पत्ता दिला होता. आमचा शेठ तर म्हणतोय की, तो कुठे आहे हे कळले तर त्याला संपवूनच टाकेन!’
ही माहिती लोंढे यांनी ताबडतोब इन्स्पेक्टर काळे यांना कळवली. काळे यांच्या डोक्यात चक्र चालले; कदाचित दिनेश शहाला अतुलचा पत्ता मिळाला असेल आणि त्याच्या माणसांनीच हा खून करून आपले पैसे परत नेले असावेत. इन्स्पेक्टर काळे यांनी संशयाची सुई शहाकडे वळवली. त्यांनी लोंढे यांना तिथेच थांबून शहाच्या हालचालींवर, तो कोणाला भेटतो यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. काळे यांना माहीत होते की शहा प्रतिष्ठित व्यापारी आहे, पुराव्याशिवाय त्याला उचलले तर गोंधळ निर्माण होईल.
पण अजूनही एक मुख्य प्रश्न उभा होता—ज्याला मारले आहे तो नक्की कोण होता? त्याचे खरे नाव काय? काळे यावर विचार करत असताना, अचानक त्यांची नजर समोरील वर्तमानपत्रातील ‘हरवले आहे’ या कॉलमवर पडली, जिथे एका व्यक्तीचा फोटो आणि मजकूर होता. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला!…
(पुढे काय झालं ते जाणून घेऊ या गोष्टीच्या पुढच्या भागात, ४ जुलैच्या अंकात!)

