
जंगलात भटकंती करताना आपलं लक्ष बहुतेक वेळा जमिनीकडे असतं. पायाखाली खडखडणारी वाळलेली पानं, झुडपातून सळसळत जाणारा सरडा, एखादं रंगीबेरंगी फुलपाखरू किंवा पक्ष्यांचा मधुर किलबिलाट यांच्यामुळे आपलं लक्ष वेधलं जातं. पण कधी मान वर करून झाडांच्या फांद्यांकडे पाहिलं, तर निसर्गाची एक वेगळीच दुनिया नजरेस पडते. पानांच्या आड, फांद्यांच्या बेचक्यात आणि मानवी नजरेपासून दूर एक अद्भूत विश्व नांदत असतं. अशाच एका भटकंतीदरम्यान ओळख झाली ती झाडांवर घर बांधणार्या एका विलक्षण जीवाशी, पॅगोडा अँटशी.
पहिल्यांदा हे घरटं पाहिलं तेव्हा ते एखाद्या मातीच्या गोळ्यासारखं वाटलं. पण जवळून निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की ते हजारो मुंग्यांचं गजबजलेलं शहर आहे. एका झाडाच्या फांदीवर उभं राहिलेलं हे साम्राज्य पाहताना मनात एकच विचार आला, एवढ्याशा मुंगीने (तिच्या मानाने) एवढं भव्य स्थापत्य उभारलं तरी कसं?
आपण रोज पाहतो त्या मुंग्या. घरात साखरेभोवती रांग लावणार्या काळ्या मुंग्या किंवा चावल्यावर चावल्या जागी आग लावणार्या लाल मुंग्या. त्यांचं विश्व बहुतेक वेळा जमिनीत, भिंतींच्या फटीत किंवा लाकडाच्या पोकळीत असतं. पण पॅगोडा अँटची गोष्ट वेगळी आहे. तिला जमिनीचा आधार नको. तिचं जग झाडांच्या उंच फांद्यांवर वसलं आहे. पॅगोडा अँट स्वतःचं घर झाडावर बांधते. हे घरटं पाहिलं की एखाद्या प्राचीन पॅगोडाची आठवण होते. थरावर थर चढवलेली रचना, गोलाकार आकार आणि मजबूत बांधणी यामुळे या मुंगीला ‘पॅगोडा अँट’ हे नाव मिळालं आहे. बाहेरून साधं दिसणारं हे घरटे आतून मात्र आश्चर्यकारक असतं. त्यामध्ये अनेक कप्पे, खोल्या आणि मार्ग असतात. कुठे अंडी ठेवलेली असतात, कुठे अळ्यांची काळजी घेतली जाते, कुठे अन्नसाठा असतो, तर राणीसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित कक्ष असतो.
हे घरटं बांधण्यासाठी मुंग्या स्वतःच्या लाळेत माती, लाकडाचा कीस, वाळलेली पानं आणि इतर सेंद्रिय पदार्थ मिसळतात. हे मिश्रण नैसर्गिक सिमेंटसारखं काम करतं. एकदा वाळल्यानंतर ते इतकं मजबूत होतं की मुसळधार पाऊस, वादळी वारा किंवा उन्हाचा तडाखा यांचाही त्यावर फारसा परिणाम होत नाही. पावसाळ्यात घरट्यात पाणी शिरत नाही आणि उन्हाळ्यात आत गारवा टिकून राहतो. आज आपण वातानुकुलित घरे, ऊर्जा कार्यक्षम इमारती आणि स्मार्ट सिटींची चर्चा करतो. पण या छोट्याशा मुंगीने हजारो वर्षांपूर्वीच पर्यावरणपूरक वास्तुकलेचा आदर्श घालून दिला आहे. ना सिमेंट, ना स्टील, ना यंत्रसामग्री; तरीही भक्कम, सुरक्षित आणि हवेशीर घर. निसर्ग हा खरोखरच सर्वात मोठा अभियंता आहे, याची जाणीव अशा वेळी प्रकर्षाने होते.

पॅगोडा अँट आकाराने सामान्य मुंग्यांपेक्षा थोडी मोठी असते. तिचा रंग गर्द तपकिरी किंवा काळपट असतो. शरीरावर बारीक केस असतात. पण तिची एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तिला धोका जाणवला तर ती अत्यंत आक्रमक बनते. तिचा दंश वेदनादायी असतो आणि बराच वेळ जळजळ जाणवत राहते. म्हणूनच जंगलातील अनुभवी आदिवासी आणि वनरक्षक अशा घरट्यांना हात लावण्याचे टाळतात. आदिवासी समाजाला जंगलातील प्रत्येक जीवाची चांगली ओळख असते. अनेक ठिकाणी पॅगोडा अँटची उपस्थिती हे जंगल निरोगी असल्याचं लक्षण मानलं जातं. कारण ही मुंगी फक्त मोठ्या झाडांवर आणि तुलनेने अबाधित जंगलांमध्ये आढळते. जिथे जैवविविधता समृद्ध आहे, तिथे तिच्या वसाहती भरभराटीला आलेल्या दिसतात. ‘एवढ्याशा मुंगीने काय फरक पडतो?’ असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण निसर्गात कोणताही जीव निरर्थक नसतो. प्रत्येक जीवाची एक भूमिका असते आणि
पॅगोडा अँटही त्याला अपवाद नाही.
ही मुंगी झाडांवर राहणार्या अनेक किड्यांवर आणि अळ्यांवर उपजीविका करते. त्यामुळे झाडांना हानी पोहोचवणार्या कीटकांची संख्या नियंत्रणात राहते. एका अर्थाने ती झाडांची नैसर्गिक सुरक्षा रक्षकच आहे. अन्न शोधताना ती अनेक बिया एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाते. त्यामुळे वनस्पतींच्या प्रसाराला मदत होते. अनेक बिया मुंग्यांच्या घरट्याजवळ रुजतात आणि नवीन रोपांची वाढ होते. पॅगोडा अँट स्वतः अनेक पक्षी, सरडे, पाली आणि इतर लहान प्राण्यांसाठी अन्नाचा स्रोत आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व संपूर्ण अन्नसाखळीशी जोडलेलं आहे. निसर्गातील या सूक्ष्म संबंधांची जाणीव आपल्याला अनेकदा होत नाही. पण एखादा छोटा जीव नाहीसा झाला तरी त्याचे परिणाम दूरवर जाणवू शकतात.

आज या अद्भूत जीवासमोर सर्वात मोठा धोका आहे तो जंगलांच्या र्हासाचा. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. रस्ते, धरणे, खाणी, औद्योगिक प्रकल्प आणि वाढतं शहरीकरण यामुळे जुनी झाडं वेगाने नष्ट होत आहेत. एखादं मोठं झाड तोडलं जातं तेव्हा आपण फक्त लाकूड गमावत नाही; तर त्यावर अवलंबून असलेली संपूर्ण परिसंस्था गमावतो. एखाद्या ७०-८० वर्षांच्या झाडावर असंख्य पक्षी, कीटक, शेवाळे, बुरशी आणि सूक्ष्मजीव आश्रय घेत असतात. पॅगोडा अँटची वसाहतही अशाच झाडांवर विकसित होते. झाड तोडलं की हजारो मुंग्यांचं घर एका क्षणात उद्ध्वस्त होतं. नव्याने लावलेलं रोप स्वागतार्ह असलं, तरी त्या रोपावर अशी समृद्ध परिसंस्था निर्माण होण्यासाठी अनेक दशवेâ लागतात. म्हणूनच वृक्षारोपणाइतकंच प्रौढ वृक्षांचं संरक्षण महत्त्वाचं आहे.
आज हवामान बदल, तापमानवाढ, पूर, दुष्काळ आणि जैवविविधतेचा र्हास या समस्या जगासमोर उभ्या आहेत. अशा काळात जंगल आणि त्यातील प्रत्येक जीवाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. निसर्गाचं संतुलन टिकवण्यासाठी मोठ्या प्राण्यांइतकेच छोटे जीवही आवश्यक आहेत. मुंग्या, मधमाशा, गांडुळे, फुलपाखरं आणि असंख्य कीटक मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र सुरळीत ठेवत असतात. पॅगोडा अँट आपल्याला आणखी एक महत्त्वाचा धडा शिकवते सहकार्याचा. तिच्या वसाहतीत कोणतीही मुंगी निष्क्रिय नसते. प्रत्येकाला आपलं काम माहीत असतं. कोण अन्न आणणार, कोण अळ्यांची काळजी घेणार, कोण घरट्याची दुरुस्ती करणार आणि कोण संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार हे सर्व ठरलेलं असतं. हजारो मुंग्या एकत्र येऊन जे साध्य करतात, ते अनेकदा माणसालाही जमणं कठीण जातं.
जंगलात भटकताना अशा घरट्यांकडे पाहिलं की निसर्गाविषयीचा आदर आणखी वाढतो. एका झाडाच्या फांदीवर उभं राहिलेलं हे छोटंसं साम्राज्य आपल्याला शाश्वत जीवनशैली, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि सामूहिक जबाबदारी यांचे धडे देत असतं. पुढच्या वेळी जंगलात गेलात, तर फक्त पायवाटेकडे पाहू नका. थोडी मान वर करा. कदाचित एखाद्या फांदीवर तुम्हाला पॅगोडा अँटचं घरटे दिसेल. हजारो मुंग्यांनी उभारलेला तो महाल केवळ एक घरटा नसून निसर्गाच्या बुद्धिमत्तेचा जिवंत पुरावा आहे.

झाड वाचलं तर पॅगोडा वाचेल. पॅगोडा वाचला तर मुंग्या वाचतील. मुंग्या वाचल्या तर जंगलाचं संतुलन टिकेल. आणि जंगल टिकले तरच आपल्या भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि समृद्ध जैवविविधता लाभेल. कारण निसर्गात कोणीच क्षुल्लक नसतं. प्रत्येक जीव महत्त्वाचा असतो. प्रत्येक झाड महत्त्वाचं असतं. प्रत्येक मुंगी महत्त्वाची असते. आणि या पृथ्वीवरील जीवनाचा प्रत्येक धागा जपणं हीच खरी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आहे.
‘पॅगोडा अँटचे बहुमजली घरटे मी यापूर्वी जंगलात, निसर्गभ्रमंतीदरम्यान पाहिले होते. मात्र ठाणे पूर्व येथील चेंदणी कोळीवाडा बंदर परिसरात, सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात एका झाडावर असे घरटे पाहणे हा खरोखरच वेगळा आणि आनंददायी अनुभव ठरला. शहरातील वाढते शहरीकरण, कमी होत चाललेली हिरवळ आणि सततची मानवी वर्दळ यामध्येही निसर्ग आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झुंज देत आहे, याची ही जिवंत साक्ष आहे.
आपण अनेकदा मोठे पक्षी, फुलपाखरे किंवा प्राणी शोधत निसर्गाकडे पाहतो; पण अशा सूक्ष्म जीवांचे जगही तितकेच अद्भूत आणि अभ्यासपूर्ण आहे. हजारो मुंग्यांनी एकत्र येऊन झाडाच्या फांदीवर उभारलेले हे घरटे त्यांच्या संघटनशक्ती, नियोजन आणि निसर्गदत्त कौशल्याची ओळख करून देते. चेंदणी कोळीवाड्यासारख्या गजबजलेल्या शहरी भागात असे घरटे आढळणे म्हणजे जैवविविधतेची छोटी पण महत्त्वाची खूण आहे.
आनंद कोळी (चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व)

