पुतीननी हे युद्ध का उचकवलं?
एकेकाळी रशिया हे एक साम्राज्य होतं; काही काळ युक्रेन त्या साम्राज्याचा भाग होता. रशियातली झारशाही कोसळली, झारची जागा कम्युनिस्ट पार्टीनं घेतली, रशियात सोवियेत युनियन स्थापन झालं. काही काळ युक्रेन सोवियेत युनियनमध्ये होतं. १९९० नंतर युक्रेन सोवियेत युनियनच्या बाहेर पडला.
पुतीनचा युक्रेनवर खुन्नस आहे. रशियातून फुटून बाहेर पडलेले सगळे देश जिंकून ते पुन्हा रशियात आणून रशिया हे पूर्वीसारखं विशाल साम्राज्य करायचं पुतीन यांचं स्वप्न आहे.
पुतीन यांचं व्यक्तिमत्व हाही एक घटक महत्त्वाचा आहे.
पुतीन सोवियेत युनियनच्या काळात (कम्युनिस्ट राजवट) केजीबी या गुप्तहेर/घातपाती संघटनेत काम करत असत. १९९१ साली गोर्बाचेव यांच्या ‘ग्लानसोस्त, पेरेस्त्रॉयका’ या धोरणाचा परिणाम म्हणून सोवियेत युनियनमधले १५ घटक देश युनियनमधून बाहेर पडून स्वतंत्र झाले. बोरीस येल्तसिन या बाजारवादी-कम्युनिस्टविरोधी नेत्यानं संसद आणि सरकार हस्तगत करून नव्यानं अस्तित्वात आलेल्या रशियाचं अध्यक्षपद मिळवलं. या काळात पुतीन त्यांच्या हुशारी आणि चलाखीनं, केजीबीमध्ये वापरल्या जाणार्या ‘उद्योगांचा’ वापर करून सत्तेत वरवर चढत गेले. रशियातले धनाढ्य आणि शक्तिवान लोक त्यांनी जवळ केले. पुतीन सत्तेत नंबर दोनवर पोहोचले.
रशिया-मॉस्को हे सत्तेचं केंद्र आणि बाकीचा देश-राज्य मॉस्कोच्या मर्जीनुसार वागणार, हे मॉडेल पुतीनना आवडत होतं. हे मॉडेल कम्युनिस्ट आहे की आणखी काही, याच्याशी पुतीनना देणंघेणं नव्हतं. केंद्राच्या हातात पूर्ण सत्ता असणं आणि केंद्रानं ती राबवणं हा पुतीनच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा होता. केजीबीमध्ये काम करत असतानाही हस्तकांना खेळवणं, त्यांच्याकरवी कामं करून घेणं ही पुतीन यांच्या कामाची पद्धत होती, पुतीन यांनी स्वतः कोणतीही कारवाई-कामगिरी पाडली नाही.
सोवियेत युनियन मोडल्यावर उरलेल्या रशियाच्या संरक्षणाची चिंता येल्तसिन यांना होती. फुटून निघालेल्या युक्रेन-बेलारूस यांच्याशी त्यांनी वाटाघाटीही सुरू केल्या होत्या. तेवढ्यात चेचेन बंडखोरांनी डोकं वर काढलं. चेचेननं आक्रमक धोरण अवलंबलं तर रशियाचं नुकसान होईल या विचारातनं चेचेनमधलं बंड मोडणं आणि चेचेन्याला मापात ठेवणं यासाठी येल्तसिननं चेचेन्यावर आक्रमण केलं. आक्रमणाची जबाबदारी पुतीनवर होती. पुतीन खुष. रशिया या केंद्राच्या हाती सत्ता रहावी आणि इतर देशांनी रशियाचं-मॉस्कोचं ऐकावं या विचारसूत्रात ते बसत होतं.
१९९९ साली पुतीन पंतप्रधान झाले. गोर्बाचेव, येल्तसिन यांचा राजकीय अंत झाल्यावर सत्ता पुतीन यांच्या हाती आली. ती हाती आल्यावर पुतीननी त्यांचं धोरण अधिक स्पष्ट केलं. झारशाही किंवा त्याच्या आधीपासून रशिया हे एक साम्राज्य होतं. युक्रेन, बेलारूस इत्यादी विभाग रशियन साम्राज्याच एक भाग होते, त्यांची संस्कृती-भाषाही रशियनच होती. कम्युनिस्ट क्रांती झाल्यावरच्या संधीकाळात युक्रेन काही काळ रशियातून फुटलं होतं. हा युक्रेनमधल्या फुटीर लोकांचा कावा होता. काही काळ युक्रेन सोवियेत युनियनपासूनही वेगळं झालं होतं, हाही युक्रेनचा फुटीरतावाद होता असं पुतीन यांचं मत होतं. लेनिन यांनी युक्रेनला एक स्वतंत्र देश अशी मान्यता देऊन, एक समान अधिकाराचा देश म्हणून सोवियेत युनियनमध्ये सामील करून घेतलं ही लेनिनची चूकच होती, असं पुतीन यांचं मत होतं. थोडक्यात असं की युक्रेन हा रशियाचा अविभाज्य भाग आहे, तो रशियापासून वेगळा होऊ शकत नाही अशी पुतीन यांची पक्की धारणा होती.
रशियाचे सर्वेसर्वा झाल्यावर पुतीन यांनी जॉर्जिया गिळून त्यांच्या मनात काय आहे याची चुणूक दाखवली.
जॉर्जियात ओसेशिया नावाचा एक प्रांत होता. त्यात रशियन भाषकांची बहुसंख्या होती.
जॉर्जिया त्या रशियन भाषकांवर अन्याय करतो आहे असं दाखवून त्यांच्या संरक्षणासाठी पुतीननी जॉर्जियावर आक्रमण केलं आणि जॉर्जिया ताब्यात घेतला, जॉर्जिया रशियन फेडरेशनमध्ये सामील झाला. २०१४मध्ये तोच खेळ पुतीननी केला. युक्रेनचा भाग असलेल्या क्रायमियातल्या रशियन लोकांना ‘न्याय देण्यासाठी’ पुतीननी क्रायमिया खालसा केला. रशियन फौजा क्रायमियात पोचल्या. खास गनीम क्रायमियातल्या पार्लमेंटमध्ये घुसले. रशियाधार्जिणे संसद सदस्य पार्लमेंटात पोचले, युक्रेनी संसद सदस्यांचे त्यांचा घरी जाऊन खून करण्यात आले. क्रायमियाच्या संसदेनं रशियाचा हस्तक्षेप आणि मालकी मान्य करून सगळा मामला अधिकृत करून टाकला. युक्रेनी जनतेनं थयथयाट केला. युरोपीय देश, अमेरिका यांनी निषेध केला, युनोनं निषेधाचे ठराव केले. काही उपयोग झाला नाही, क्रायमिया रशियाचा भाग झाला.
रशियन साम्राज्य पूर्वीसारखं प्रस्थापित करणं हे पुतीन यांचं स्वप्न आहे. तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. रशियातल्या ग्रेट सम्राटांच्या पंगतीत पुतीन यांना बसायचं आहे. युक्रेनचे डोनबास, खारकीव हे विभाग पुतीन यांना गिळायचे आहेत. आज डोनबास, खारकीव वगैरे; उद्या आणखी काही भाग, परवा आणखी काही भाग करत करत युक्रेनवर सत्ता स्थापन करणं हा पुतीन यांचा प्लान आहे. ‘ब्लिट्झ’ करून पटकन कीव ही राजधानी पटकावायची, तिथं आपल्या हस्तकाला प्रेसिडेंट नेमायचं असा प्रयत्न होता. ते समजा जमलं नाही तरी पूर्व आणि दक्षिण युक्रेनचा भाग तरी क्रायमियासारखा गिळायचा असा पुतीन यांचा प्लान होता. त्यासाठीच २२ फेब्रुवारीला कारवाई सुरू झाली.
*****
युक्रेन रशिया युद्ध तीन चार दिवसात संपलं नसलं तरी फार दिवस चाललं नसतं हेही तितकंच खरं. ते इतका दीर्घ काळ चाललं याचं कारण झेलेन्सकी.

झेलेन्सकी यांची भाषा रशियन. त्यांनी कायद्याची पदवी घेतली पण वकिली केली नाही. २०१४ साली रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं. २०१५ रोजी झेलेन्सकी यांनी एक मिडिया कंपनी स्थापली, फिल्म-टीव्हीशो-मनोरंजनाचे कार्यक्रम इत्यादीसाठी. त्यात त्यांनी सर्वंट
ऑफ पीपल, लोकसेवक, या शीर्षकाचा कॉमेडी शो केला. युक्रेनचा प्रेसिडेंट हे पात्र होतं. हा शो तुफ्फान लोकप्रिय झाला, अख्खा युक्रेन झेलेन्स्कीला प्रेसिडेंट म्हणून ओळखू लागला. शो ऐन भरात असताना २०१९ साली प्रेसिडेंटपदाची निवडणूक लागली. झेलेन्सकीच्या सहकार्यांनी सर्वंट ऑफ पीपल नावाची पार्टी स्थापन केली आणि झेलेन्सकीला निवडणूक लढवायला सांगितलं. जणू टीव्ही शो चाललाय अशा थाटात झेलेन्सकींची मोहीम चालली. टीव्हीवालाच माणूस, कॅमेरे, रिफ्लेक्टर, सेट घेऊन झेलेन्सकी फिरत असे आणि त्याची भाषणं टीव्हीवरून दाखवली जात. युक्रेनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होता. झेलेन्सकीचा प्रेसिडेंट शुद्ध चारित्र्याचा होता, लोकांमध्येच वावरत असे, लोकांची कामं करत असे. लोकांना झेलेन्सकी खराखुरा प्रेसिडेंटच वाटला. ७३.४ टक्के मतं मिळवून झेलेन्सकी निवडून आला.
क्रायमिया गिळल्यापासूनच पुतीनचे युक्रेन गिळण्याचे आराखडे तयार केले होते. एक टीव्हीवरचा नट प्रेसिडेंट झाला म्हटल्यावर पुतीन खुष झाले. हा अननुभवी माणुस काय राजकारण हाताळणार अशा थाटात पुतीननी आखणी सुरू केली. राजकारणाला नवखा असल्यानं कोरी पाटी घेऊनच झेलिन्सकी रस्त्यावर उतरले. त्यांचं भाबडेपण प्रभावी ठरलं. झकपक कपडे कशाला घालायचे, नेहमीचे कपडे ठीक आहेत की असं म्हणत साधा टी शर्ट घालून झेलेन्सकी शपथ घ्यायला गेले. नंतरही कायम टी शर्टात राहिले. कीववर रॉकेट कोसळत असताना त्यांनी कीव सोडायला नकार दिला. पत्नी आणि मुलीला दूर पाठवलं.
डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले. व्हाइट हाऊसमधली बैठक. कॅमेरे लावलेले, जगभरच्या चॅनेलांचे. ट्रम्प यांनी झेलेन्सकीचा अपमान केला, टाकून बोलले. झेलेन्सकीनी प्रत्युतर दिलं. ट्रम्प आणखी भडकले. अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करण्याची धमकी ट्रम्पनी दिली. हे सारं लाईव्ह चाललं होतं. या बैठकीनंतर अधिकृत जेवणाचा कार्यक्रम होता. झेलेन्सकी चिडले. बैठकीतून बाहेर पडले ते सरळ विमानतळाकडं रवाना झाले. सर्वांची धावपळ झाली.
मुरब्बी लोकांनी झेलेन्सकीलाच धारेवर धरलं. युक्रेन बिकट परिस्थितीत असताना झेलेन्सकीनी पडतं घ्यायला हवं होतं, प्रत्युत्तर द्यायला नको होतं अशी टीका केली. काही दिवस मध्ये गेले. झेलेन्सकी ट्रम्प यांच्याशी बोलले, वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या. ट्रम्पनी अपमान करणं सोडलं नाही. तुमच्या हातात पत्ते नाहीत, हुकुमाचे पत्ते नाहीत, तुम्ही लढाई हरणार आहात, माघार घ्या, असं ट्रम्प म्हणाले. आता मात्र झेलेन्सकी शांत होते. शांतपणे म्हणाले की पत्ते नसतील पण युक्रेनची जनता पाठीशी आहे, युक्रेनची जनता शरण जाणार नाही. ट्रम्प नव्या पोपना भेटायला गेले असताना झेलेन्सकी रोममध्ये पोचले आणि पुन्हा ट्रम्पना भेटले. रशिया या किती तरी पटीनं बलाढ्य देशाशी लढायचं तर अमेरिकेचे पैसे आणि शस्त्रं अनिवार्य होती.
झेलेन्सकी पुतीनना भेटायला उत्सुक होते. सांगाल तिथं भेटायला येतो असा निरोप पुतीनना दिला. पुतीन कधीही समोरासमोर झेलेन्सकीना भेटले नाहीत.
*****
चोवीस तासांत युक्रेनची लढाई संपवतो असं ट्रम्प जाहीरपणे म्हणाले. ट्रम्प कधी झेलेन्सकीला धमकी देत, कधी पुतीनना. ट्रम्पनी प्रस्ताव मांडला की युक्रेननं काही भूभाग रशियाला देऊन प्रकरण मिटवावं. ट्रम्प यांच्या मते लढाई हा जमिनीचा बाजार होता, देवाणघेवाण हा बाजाराचा नियम ट्रम्प लावत होते. झेलेन्सकी म्हणाले, की एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. पुतीन म्हणाले की, युक्रेन हा रशियाचाच भाग असल्यानं तो मिळवण्याचा आपला अधिकारच आहे, तो मिळवल्याशिवाय लढाई थांबणार नाही.
चोवीस तास उलटले, चोवीस आठवडे उलटले, चोवीस महिने उलटले… ट्रम्प यांची जादू काही चालत नाहिये.

